मौर्य सत्तेचा उदय –
मोठमोठाली साम्राज्ये का निर्माण होतात? या साम्राज्यांच्या नायकांची लोक का निवड करतात ? मौर्य साम्राज्याच्या उदयामागे मौर्य सत्तेचा उदय साम्राज्याचा नायक चंद्रगुप्त व चाणाक्य एक बृहत भारत स्थापण्याचे स्वप्न तर पहात होतेच तसेच परकीय आक्रमणापासून भारताला जपायला एक मध्यवर्ती प्रभावी केन्द्रीय सत्ता असावी हेसुद्धा त्यांच्या धोरणा मागे एक मुख्य कारण होते. राष्ट्रीयत्वाचा विचार बिंबवणारे हे दोन नायक ज्ञात इतिहासात पहिलेच असतील.
कुरु,पांचाल,शुरसेन,मत्स्य,चेदी,कोसल,काशी,मगध,वृज्जी,मल्ल,वत्स,अंग,अवन्ती,अश्मक,गांधार,कांभोज या सोळा महाजन पदांची माहिती बौद्ध ग्रंथात मिळते. बृहत मौर्य साम्राज्याच्या पहिले विभागलेल्या या महाजनपदांच्या भारतात काय घडत होते तर सततचे एकमेकांसोबतच्या लढाया कधी कोसलांचे वर्चस्व वाढायचे तर कधी काशीचे ! अशीच अशांततेची परिस्थिती इतर महाजनपदांची !
अशावेळी बिंबिसार व अजातशत्रूने बलाढ्य मगध साम्राज्य उदयास आणले अजातशत्रूने (कुसुमपूर) पाटलीपुत्र ला जो गंगा व शोन नदी किनारी किल्ला बांधून राजधानी बसवली त्यामुळे पुढील इतिहासात पाटलीपुत्रला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. यानंतर मगधाच्या राज्यावर शिशुनाग आला व त्यानंतर त्याचा मुलगा कालाशोक. या कालशोकाच्या खून एका न्हाव्याने करून नंदवंशाची स्थापना केली.
नंद घराणे:- नंद घराण्याचा संस्थापक महापद्मानंद याने आपली सत्ता मध्यपूर्व व दक्षिण भारतावर पसरवली होती. गोदावरी नदीच्या काठावरील नांदेड (नव नंदडेर)या ग्रामनामावरून माहापद्मानंदाने दक्षिणेतला मुलूख घेतला होता असे दिसते. यानंतरच्या राजांची फारशी माहिती इतिहासाला नाही.अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी “आग्रामिस”नावाचा राजा राज्य करीत होता असे ग्रीक इतिहासकार म्हणतात.या राजाच्या आर्थिक पिळवणुकीमुळे याचे नाव धनानंद पडले असावे असे वाटते.
परकिय आक्रमणे:-
इराणी आक्रमण:- इ.स.पुर्व ६ व्या शतकात सायरसेच्या(इ.पू ५५८ ते ५३०) नेतृत्वाखाली इराण्यांचे भारतावर पहिले आक्रमण झाले. सायरसने बँक्ट्रीयाचा काही भाग जिंकला. याचा नातू दारियस याने मात्र भारताच्या वायव्य भागात इराणी साम्राज्य प्रस्थापित केले. दारियस ने सिंधूचे खोरे, गांधार ,पंजाबचा पश्चिम भाग व सिंधू प्रांत आपल्या इराणी साम्राज्यात जोडला. दारियसचा मुलगा झर्झीस याने जेव्हा ग्रीसवर स्वारी केली तेव्हा ‘थर्मापिलीच्या’ लढाईत भारतीय सैन्याची एक तुकडी इराण्यांच्या बाजूने लढत होती. हिरडोटस याने या भारतीय तुकडीचे विस्तृत वर्णन केले आहे. हे इराणी साम्राज्य तिसर्या दारियस पर्यंत टिकले. त्यानंतर तिसर्या दारियस चा अलेक्झांडरने पराभव केला.
ग्रीक आक्रमण :- मँसिडोनियातुन पूर्वेकडे जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर जेव्हा भारतावर कोसळला तेव्हा भारतातील अभी , शशीगुप्ता सारख्या एतद्देशीय फितुरांनी त्याला मदत जरी केली असली तरी भारतातील अनेक स्थानिक टोळ्यांकडून त्याला कडवा प्रतिकार सहन करावा लागला. इ.पू. ३२६ च्या वसंत ऋतूत जेव्हा अलेक्झांडरने भारताच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हा आभीसारखे राजे त्याच्या स्वागताला सामोरे गेले.विरोधाभास असा की अभी च्या शेजारील राज्यातील पोरसासोबत बोलणी करायला जेव्हा त्याला पाठवल्या गेले तेव्हा या स्वातंत्र्य प्रेमी राजाने “मी केवळ एक सार्वभौम राजा आहे म्हणून बरोबरीच्या नात्याने अलेक्झांडरने सीमेवर भेटायला तयार व्हावे” असे बाणेदार उत्तर देऊन लढायची सिद्धता केली.पोरसाचा पराभव करून अलेक्झांडरला मालव, क्षुद्रक , शिबी, अर्जुनायण यांचाही कडवा प्रतिकार सहन करावा लागला.जिंकलेल्या प्रदेशातील सततची बंडे, मगधाच्या साम्राज्य ला जिंकण्याची असमर्थता सैन्याचे मायदेशी जाण्याचा अट्टहास यामुळे हतबल झालेल्या अलेक्झांडर आपल्या मातृभूमीकडे वापस वळला.
मौर्यांचा उदय:- सततची परकीय आक्रमणे ! सायरसनंतर ग्रीकांच्या हातात अशी दोनशे वर्ष परकीयांच्या जोखडात पडलेला वायव्य भारत ! यामुळे मध्यवर्ती प्रबळ सत्तेची आवश्यकता निर्माण झाली होती.नंदाची सत्ता प्रबळ असली तरी तिला धनानंदच्या धोरणामुळे विरोध होत होता.काहींच्या मते चंद्रगुप्ताचे वडील धनानंदच्या सैन्यात अधिकारी होते.चंद्रगुप्ताच्या वडिलांचा सुद्धा मतभेदांमुळे नंदा कडून खून झाला होता. चंद्रगुप्त नंदाच्या सैन्यात सेनापती होता. पुढे यानेही नंदाची मतभेदामुळे नौकरी सोडली.अशावेळी नंदाच्या दरबारातून अपमानित झालेल्या कौटिल्यला चंद्रगुप्ता सारखा कसलेला सेनानी हवाच होता आणि अनायासे त्याला चंद्रगुप्ताच्या रुपाने तो मिळालाही ! बौद्ध, जैन व ग्रीक वाङ्मयाचा आधारे चंद्रगुप्त क्षत्रिय असल्याची ग्वाही मिळते. सामाजिक परिस्थितीनुसार नीच कुळातील धणानंदाला सिंहासनावरून पदच्युत करून त्या जागी चंद्रगुप्त सारख्या क्षत्रियला बसवणे चाणाक्याला कठीण नव्हते !
नंदाचे राज्य यावेळी कळसास पाेहाेचले हाेते.परंतु जुलमी राज्यकारभार ,आर्थिक पिळवणूक आणि नंद राजांची शिलभ्रष्ट वागणूक यामुळे नंदराजे प्रजेत अप्रिय झाले हाेते.
पुढे राज्य क्रांतीच्या वेळी कौटिल्याने काश्मिरचा पर्वतराजीचा राजा पर्वतक यांच्याशी संधान बांधले.सर्व तयारी करून नंद साम्राज्यावर झेप घेतली. त्याच्या या सैन्यात पंजाब, गंधार , कम्बोज इथले सैन्य तर होतेच तसेच भाडोत्री पारशी ,शक, ग्रीक सैनिकही होते.
चंद्रगुप्ताने सत्तारूढ होताच पहिली स्वारी वायव्य भारताच्या ग्रीक साम्राज्यावर काढली आणि अवघा वायव्य भारत ग्रीकांच्या जोखडातून मुक्त केला. यावरून एक लक्षात येते की चंद्रगुप्ताला व कौटील्याला नंदाचा फक्त सूडच घ्यायचा नव्हता तर भारताला परकीय आक्रमकांपासून मुक्तता सुद्धा द्यायची होती !
चंद्रगुप्ताचा प्रबळ सैन्यापुढे व अफाट पराक्रमा पुढे ना युडेमस टिकू शकला ना सेल्युकस निकेटर !
(समाप्त)
संदर्भ:- १) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती _ गो.बं.देगलूरकर
२)प्राचीन भारत :- धनंजय आचार्य
३)political history of ancient india _ H.C.Raychaudhary
4)https://en.wikipedia.org/wiki/Chandragupta_Maurya…
5)https://en.wikipedia.org/wiki/Chanakya?wprov=sfla1
– Pruthviraj Dhawad