महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,983

रोहीडा किल्ला | Rohida Fort

By Discover Maharashtra Views: 4342 12 Min Read

रोहीडा किल्ला | Rohida Fort

शिवाजी महाराज व सह्याद्री यांचे एक अतुट नाते आहे. स्वराज्याच्या स्थापनेत सह्याद्री व त्याच्या परीसराचे अपुर्व योगदान आहे. स्वराज्याच्या सुरवातीचा श्रीगणेशा मांडला गेला तो सह्याद्री, त्यात वसलेली बारा मावळ आणि तेथील मावळे यांच्या सहाय्यानेच. या बारा मावळातील नीरा नदीच्या दुआबत असलेल्या रोहीडा खोऱ्यात वसलेले एक प्रमुख मावळ म्हणजे हिरडस मावळ. स्वराज्य स्थापनेच्या सुरवातीच्या काळातील अनेक घटना हिरडस मावळ परीसरात घडल्या आणी याला साक्षीदार ठरला हिरडस मावळाचा बिनीचा शिलेदार म्हणजे रोहीडा किल्ला उर्फ विचित्रगड. आणी म्हणूनच कि काय हा किल्ला बिनीचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो.

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला गडाच्या पायथ्याशी असलेले बाजारवाडी गाव गाठावे लागते. कधीकाळी गडाची पेठ असलेल्या या वाडीचे आजच्या काळातील बाजार शब्दानुसार बाजारवाडीत रुपांतर झाले असावे. मुंबई पुण्याहुन बाजारवाडीला जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भोर शहर गाठावे लागते. मुंबई-भोर हे अंतर २०० कि.मी.असुन पुण्याहुन हे अंतर ५० कि.मी.आहे. भोरवरून बाजारवाडी हे अंतर ७ कि.मी. असुन तेथे जाण्यासाठी एस.टी तसेच खाजगी वाहनांची चांगलीच सोय आहे.

गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाचा माथा समुद्रसपाटीपासून ३५६० फुट उंचावर आहे. बाजारवाडीपासून गडावर जाण्यासाठी मळलेली वाट असुन उभी चढण असलेली हि वाट तासाभरात आपल्याला गडाच्या पहिल्या दरवाजात घेऊन जाते. या वाटेवर एका ठिकाणी मेटाचे अवशेष असुन तेथुन संपुर्ण गड व खालुन गडावर येणारी वाट नजरेच्या टप्प्यात राहते. गडाचा पहिला दरवाजा उत्तराभिमुख असुन साध्या बांधणीचा हा दरवाजा उभ्या कड्यावर बांधलेला आहे. आकाराने लहान असलेल्या या दरवाजाला नव्याने लाकडी दरवाजा बसवलेला आहे. दरवाजाच्या चौकटीवरील शिल्पांची पुर्णपणे झीज झाली असुन आत उजव्या बाजुस लहान घुमटी तर डावीकडे पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.

येथुन वळणदार पायरीमार्गाने २५-३० पायऱ्या पार करून आपण गडाच्या दुसऱ्या गोमुखी दरवाजात पोहोचतो. या दरवाजासमोर आडव्या बुरुजाची बांधणी करून रणमंडळाची रचना करण्यात आली आहे. या दरवाजावर दोन शरभशिल्प कोरलेली असुन शेजारील भिंतीवर गजमुख कोरलेले आहे. या दरवाजातुन आत शिरल्यावर डावीकडे मोठी देवडी असुन या देवडीला अनेक कोनाडे आहेत तर उजवीकडे जमीनीत खोदलेले एक भुमिगत कोठार आहे. या कोठाराच्या तोंडावरील बाजुस असलेले छप्पर नष्ट झाल्याने व भिंतीतुन पाणी पाझरत असल्याने आत पाणी जमा झाले आहे. अनेक ठिकाणी हे पाण्याचे टाके असल्याचे वाचनात येते. या कोठाराच्या कड्याकडील बाजुस अजुन एक दालन आहे पण यात उतरणारा जिना व छत कोसळलेले आहे.

येथुन ५०-६० पायऱ्या चढुन आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. मुहम्मद आदिलशाहच्या काळात बांधलेल्या या दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीव काम केलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस गजमुख कोरलेले असुन त्या शेजारी डाव्या बाजुस मराठी तर उजव्या बाजुस पर्शियन शिलालेख आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस बसण्यासाठी ओटे असुन कमानीवर कमाल,मासा अशी शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या भागातील तटबंदीची पडझड झाली असुन काटकोनात बांधलेले हे तिन्ही दरवाजे पार करून आपला गडावर प्रवेश होतो.

गडावर प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला गडाची सदर व त्यामागील उंचवट्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. उंचवट्यावर असलेल्या किल्लेदाराच्या वाड्यात अलीकडे झालेल्या उत्खननात सापडलेली तीन भुमिगत कोठारे पहायला मिळतात. किल्लेदाराच्या सदरेसमोर असलेला बुरुज सदर बुरुज म्हणुन ओळखला जातो. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला फत्ते बुरुजाकडे तर डावीकडील वाट रोहिडेश्वर मंदिराकडे घेऊन जाते. गड चढुन आलेला शिणवटा घालवण्यासाठी आपण प्रथम रोहिडेश्वर मंदिराकडे जाऊन थोडा विसावा घ्यावा कारण या भागात कोठेही सावली उपलब्ध नाही. मंदिराकडे जाताना मोठ्या प्रमाणात दिसणारे घरांचे चौथरे त त्यावर शिल्लक असलेल्या भिंती पहाता गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी.

रोहिडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन त्याची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे गडावर एखादा मुक्काम करायचा असल्यास या मंदिरात ५ ते ७ जणांची सोय होऊ शकते. मंदिरात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात कातळात कोरलेले एक टाके असुन त्या शेजारी काही समाधी व कोरीव दगड पडलेले आहेत. मंदिरात थोडीशी विश्रांती झाल्यावर आपल्या उर्वरीत गडभ्रमंतीस सुरवात करावी. मंदिराच्या डाव्या बाजुस मोठा तलाव असुन या तलावाकडून मंदिराच्या मागील बाजुस जाणारी वाट शिरवले बुरुजावर जाते. या वाटेवर काही मोठे चौथरे पहायला मिळतात.

रोहीडा किल्ल्याचा परिसर एकुण बारा एकरवर पसरलेला असुन दरवाजा कडील तटबंदी वगळता याच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. शिरवले बुरुजापासून गडफेरीला सुरवात केल्यास याची नावे अनुक्रमे शिरवले-शर्जा-दामगुडे-पाटणे-वाघजाई-फत्ते व सदर बुरुज अशी आहेत. शिरवले बुरुज आकाराने चांगलाच मोठा असुन फार कमी किल्ल्यावर असे बुरुज पहायला मिळतात. बुरुजाच्या तटातील शौचकूप आजही उत्तम अवस्थेत असुन बुरुजाच्या खालील भागात राहण्यासाठी वरील बाजुस छप्पर टाकण्याची सोय केलेली आहे. हा बुरुज खंदकाने मुख्य किल्ल्यापासून वेगळा केला असुन तटबंदीला दुहेर सरंक्षण दिलेले आहे. शिरवले बुरुज पाहुन तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर आपण शर्जा बुरुजाजवळ पोहोचतो. या बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. शर्जा बुरुजावरून पुढे आल्यावर आपण दामगुडे बुरुजावर पोहोचतो. लंबाकृती आकाराचा हा बुरुज तटबंदीच्या सपाटीवर बांधलेला असुन बुरुजासमोर एका मोठया वास्तुचे अवशेष आहेत.

बुरुजाच्या पुढील भागात वाटेवर एक चुन्याचा घाणा पहायला मिळतो. घाण्याच्या पुढील भागात कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या उजवीकडे डोंगर उतारावर कातळात कोरलेले मोठे पाण्याचे टाके असुन याच्या तोंडावर दगडी बांधकाम केलेले आहे. या टाक्यात जमा झालेले जास्त पाणी चार बांधुन पुढील दोन टाक्यात सोडलेले आहे पण हि दोनही टाकी आज कोरडी पडली आहेत. यातील डोंगराच्या बाजुस असलेल्या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या वरील बाजुस कातळात कोरलेले एक भुमीगत टाके असुन त्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरल्या आहेत. सध्या गडावर पिण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो. या टाक्यात जमा झालेले जास्त पाणी कातळात छिद्र पाडुन पायऱ्या असलेल्या टाक्यात सोडलेले आहे. या टाक्याच्या पुढील भागात अजुन तीन टाक्याचा समूह असुन या सर्व टाक्यातील पाणी उपशा अभावी शेवाळलेले आहे. येथे एकुण आठ टाक्यांचा समूह असुन भुयारी टाके वगळता एकही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही.

टाक्यांशेजारी तटबंदीच्या आतील बाजुस मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असुन येथे बऱ्यापैकी वस्ती असावी. टाकी पाहुन आपण कड्यावरील तटबंदीत असलेल्या लहान गोलाकार आकाराच्या पाटणे बुरुजावर येतो. पाटणे बुरुज पाहुन आपण तटबंदीवरून गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या वाघजाई बुरुजावर पोहोचतो. वाघजाई बुरुजासमोर डोंगरधारेवर असलेल्या वाघजाई मंदिरामुळे या बुरुजाला वाघजाई हे नाव पडले आहे. खंदक वगळता शिरवले व वाघजाई बुरुजाची रचना एकसमान आहे. वाघजाई बुरुजाच्या पुढील भागात असलेली घडीव दगडाने बांधलेली तटबंदी आजही सुस्थितीत असुन या तत्बंदीच्या काठावर आपल्याला काही चौकीचे व घरांचे अवशेष पहायला मिळतात.या अवशेषात कातळात कोरलेले व बांधीव पायऱ्या असलेले एक टाके पहायला मिळते. तटबंदीच्या टोकावर पुढे असलेल्या फत्ते बुरुजाशेजारी एक लहान दरवाजा (चोर दरवाजा) असुन या दरवाजाने गडाबाहेर जाता येते.

गोलाकार आकारच्या फत्तेबुरुजावर ध्वज लावण्यासाठी गोलाकार चौथरा असुन ध्वजाची काठी रोवण्यासाठी असलेला दगड तेथे पाहता येतो. फत्ते बुरुजावरून सदर बुरुजावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडाच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर एक चौथरा ,कोरडा पडलेला तलाव व किल्लेदाराचा वाडा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. इतक्या मोठ्या गडावर एकही तोफ दिसुन येत नाही हि गोष्ट मनाला खटकल्याशिवाय रहात नाही. गडाच्या तटावरून फिरताना पूर्वेस वज्रगड-पुरंदर, उत्तरेस सिंहगड, वायव्येस राजगडतोरणा, पश्चिमेस केंजळगड तर दक्षिणेस रायरेश्वराचे पठार नजरेस पडते. सर्व प्रकारच्या अवशेषांनी परिपूर्ण असा हा रोहीडा किल्ला व्यवस्थितपणे पहाण्यासाठी दोन तासांचा अवधी हाताशी हवा.

रोहीडा किल्ल्याच्या इतिहासात डोकावले असता या किल्ल्यावर अनेक सत्तांतरे झाल्याचे दिसुन येते. यादवकालीन निर्मिती असलेला हा किल्ला त्यानंतर बहमनी, निजामशाही व आदिलशाहीच्या ताब्यात होता. बुरहाने मासीर या फारसी ग्रंथात बुऱ्हाण निजामशहा याने जिंकून घेतलेल्या अठ्ठावन्न किल्ल्यांच्या यादीत रोहीडा किल्ल्याचा उल्लेख येतो. किल्ल्यावर असलेल्या तिसऱ्या दरवाजावरील देवनागरी आणि पर्शियन शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केल्याचे दिसुन येते. जेष्ठ इतिहास संशोधक डॉ.ग.ह.खरे यांनी या शिलालेखाचे वाचन केले असुन हा दरवाजा मुहम्मद अदिलशहाच्या कारकीर्दीत सु.१०१६ दुर्मुख संवत्सर, शके १५७८, चैत्र ते ज्येष्ठ शु.१० (म्हणजेच १६ मार्च ते २३ मे १६५६) या कालावधीत बांधला असुन या वेळी रोहिड्याचा हवालदार विठ्ठल मुदगलराव असल्याचा मजकूर शिलालेखावर कोरला आहे. या शिलालेखावरून मे १६५६ नंतरच्या काळात ह्या भागावर कृष्णाजी बांदल ह्यांची जहागिरी असुन रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतल्याचे समजते.

किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. या लढाईत कृष्णाजी बांदल मारले गेले. लढाईनंतर बांदलाचे मुख्य कारभारी बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकारी स्वराज्यात सामील झाले. या लढाईमुळे रोहीडा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात जे काही मोजके गड शिवाजी महाराजांनी जिंकले त्यात रोहीडा देखील होता. इ.स.१६६५ मधील पुरंदरच्या तहानुसार मोगलांच्या ताब्यात दिलेला हा किल्ला २४ जून १६७० मध्ये मराठयांनी पुन्हा जिंकुन घेतला. कान्होजी जेधे यांच्याकडे भोरची पुर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व काही जमीन इनाम होती. यासाठी कर म्हणुन ते सरकारात ३० होन जमा करत. रोहीड्याच्या अधिकाऱ्यांनी इतक्या कमी कराबद्दल महाराजांकडे विचारणा केली असता शिवाजी महाराजांनी जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले ३० होन द्रव्यच घ्यावे निर्णय दिला. सन १६७१ मध्ये शिवाजी महाराज रोहिडा पाहाण्यासाठी येणार होते असे काही कागदपत्रांवरून समजते.

१६७१ ते १६८९ या काळात हा किल्ला काही काळ मोगलांकडे तर काही काळ मराठ्यांकडे होता. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जेमतेम चारसहा महिने किल्ल्याचा ताबा मोगलांनी घेतला पण लगेचच १६९० मध्ये कान्होजी जेध्यांचे पुत्र सर्जेराव जेध्यांनी रोहिडा मोगलांकडून जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. १७०७ मध्ये भोर संस्थानचे सचिव शंकराजी नारायण यांच्याकडे या किल्ल्याचा ताबा होता. शंकराजी नारायण यांचा अंत या गडावरच झाल्याचेही काही कागदपत्रांवरून कळते. नंतरच्या काळात संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा किल्ला भोर संस्थानच्याच ताब्यात होता.

आपण आज पहात व अनुभवत असलेला हा गड शिवदुर्ग संवर्धन या संस्थेच्या परिश्रमाचे फळ आहे. या गडावर त्यांनी केलेले संवर्धन वाखाखाण्याजोगे असुन गड संवर्धन कसे असावे याचे ते उत्तम उदाहरण आहे. संस्थेने गडावर गडपाल नेमलेला असुन उत्सव प्रसंगी तो मावळ्याचा वेश परिधान करून गडावर आलेल्या दुर्गप्रेमी मावळ्यांचे गुळपाणी देऊन स्वागत करतो इतकेच नव्हे तर काही प्रसंगी गडावर प्रसादाचे आयोजन केले जाते. या बाबत त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवली जात नाही. त्यांच्या या कार्यास फुल न फुलाची पाकळी देऊन सहकार्य करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यांच्या या कार्याला मनपुर्वक सलाम.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment