विचित्रगड/रोहीडा | Rohida Fort
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा सुरेख डोंगर मार्ग आहे त्या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत यापैकी रोहीड खोऱ्यामध्ये हिरडस मावळात ‘किल्ले रोहीडा’ वसलेला आहे रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे त्या खोऱ्यात बेचाळीस गावे होती त्यापैकी एकेचाळीस गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात रोहिडा किल्ला (Rohida Fort) हे रोहिड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते..
रोहिडा किल्ल्याला ‘विचित्रगड’ किंवा ‘बिनीचा किल्ला’ असे देखील संबोधले जाते तो किल्ला भोरच्या दक्षिणेस आठ किलोमीटर अंतरावर स्थित आहे..
गडावरील तिसरा मुहम्मद आदिलशाहच्या कालावधीत बांधलेला दरवाजा विशेष सुंदर आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूस बसण्यासाठी ओटे आहेत कमानीच्या दोन्ही अंगास उमलती कमळे मत्स्य आकृती व कमानीबाहेर दोन्ही बाजूस कोरलेले हत्तींचे शीर असा तो सुरेख दरवाजा आहे तेथे देवनागरी आणि फारसी भाषेत कोरलेले शिलालेख दिसून येतात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ ग ह खरे यांनी त्या फारसी शिलालेखाचे वाचन केले आहे ‘हा दरवाजा मुहम्मद अदिलशहाच्या कारकीर्दीत सु. १०१६ दुर्मुख संवत्सर, शके १५७८, चैत्र ते ज्येष्ठ शु. १० (म्हणजेच १६ मार्च ते २३ मे १६५६) या कालावधीत बांधला आहे या वेळी रोहिड्याचा हवालदार विठ्ठल मुदगलराव हा होता..’
असा मजकूर शिलालेखावर लिहिलेला आढळतो ‘बुरहाने मासीर’ या फारसी ग्रंथात बुरहान निजामशहा याने जिंकून घेतलेल्या अठ्ठावन्न किल्ल्यांच्या यादीत रोहिड्याचा उल्लेख आला आहे शिलालेखावरून मे १६५६ नंतर रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते.
किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली त्यात कृष्णाजी बांदल मारला गेला त्या वेळेस बाजीप्रभू देशपांडे हे बांदलाचे मुख्य कारभारी होते लढाई नंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले इ.स १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते पुढे तो किल्ला मोगलांनी जिंकला मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे रोहिडा किल्ला भोरकरांकडे होता.
Credit – सचिन पोखरकर