रोकडोबा मंदिर, शिवाजीनगर –
पुण्यातील काही जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर गावठाणाचे ग्रामदेवैत असलेले श्री रोकडोबा देवस्थान. हे मंदिर २५० / ३०० वर्ष जुने आहे. पूर्वीच्या काळी हा परिसर भांबवडा ह्या नावाने ओळखला जात असे. इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्याचा भांबुर्डा असा अपभ्रंश झाला. पुढे आचार्य अत्रे यांच्या प्रयत्नांनी त्याचे शिवाजीनगर असे नामकरण झाले.
श्री समर्थ रामदास स्वामींनी ह्या दैवताची इथे स्थापना केली असं मानलं जातं. परंतु पुढे रोकडोबाच्या भक्तांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायरीजवळ बकऱ्यांचे बळी देणं सुरू केले. इ. स. १८६९ च्या सुमारास श्री जंगली महाराजांनी ह्या प्रथा बंद पाडल्या, भजनी मंडळांच्या दिंड्या इथे आणवून, वातावरणात प्रासादिक बदल घडवून आणले. त्या जंगली महाराजांचा देहांत या रोकडोबा मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला झाला. रोकडोबा मंदिर या नावावरून हे नेमकं कोणत्या दैवताचं मंदिर याचा उलगडा होत नाही. कदाचित इथे भैरोबासारखा एखादा स्थळीय देव असावा, त्याची जागा हनुमानानं घेतली असावी. या मंदिराच्या उभारणीच्या वेळी इथे काम करणाऱ्या कामगारांना रोख/रोकडा पैसा देत असत, म्हणून हे स्थान रोकडोबा या नावाने ओळखले जाऊ लागले.
सुमारे दीड-पावणेदोन मीटर उंचीची मूर्ती, भव्य कपाळ आणि मोठ्या मिशा असल्यामुळे रोकडोबाचं उग्र दर्शन घडतं. मंदिराच्या परिसरातच गणपती, शनी, नागोबा आणि देवी यांचीही मंदिरे आहेत. मूर्तीच्या मागे जंगलीमहाराजांचं पूर्णाकृती चित्र व पादुका आहेत. चित्रकार अरुण फडणिसांनी काढलेलं हे चित्र म्हणजे जंगलीमहाराजांच्या देवळातील मोठ्या चित्राचीच प्रतिकृती आहे. पूर्वी मंदिरामागे धर्मशाळा होती. या मंदिराचा परिसर मोठ्या उंच भिंतींनी वेढलेला आहे. मंदिराला भव्य, लाकडी सभामंडप आहे. गाभारा व सभामंडप या दरम्यान तीन कमानी असणारी अंतराळ ओवरी आहे. त्यासमोर दगडी कासव जमिनीवर दिसते.
देवळाचा प्रशस्त गाभारा लोखंडी खांबांच्या आधारावर उभारलेला आहे. मात्र ह्या खांबांमधील एक खांब इतर खांबांपेक्षा वेगळा दिसतो. त्याचं कारण असं की, गाभारा उभारताना एक खांब कमी पडत होता. त्याच काळात मंडईची उभारणी चालू होती. तेथील एक खांब इथे आणून बसविला, म्हणून तो इतर खांबांपेक्षा वेगळा दिसतो. नीट न्याहाळून पाहिल्याशिवाय ही गोष्ट पटकन ध्यानात येत नाही. ह्या मंदिरात इतिहासासंदर्भात एक लोककथा प्रचलित आहे की, लाल महालावरील शिवाजी महाराजांच्या छाप्याच्यावेळी त्यांनी आपले घोडे ह्या मंदिराच्या आवारात बांधले होते.
भांबवड्याची पाटीलकी शिरोळे घराण्याकडे होती. वंशपरंपरागत वतनदारी होती. परिसरात त्यांच्या जमिनीही भरपूर होत्या. पेशव्यांशी त्यांचे संबंधही पूर्वापार होते. पानिपताच्या युद्धात या मंडळींनी पेशव्यांना उत्तम साथ दिल्याचे दाखले आहेत. माधवराव पेशव्यांनी भांबवड्याच्या राणोजी शिरोळे यांना मौजे पिंपळे गुरव या गावाचा मोकासाही इनाम दिला होता.
या मंदिराच्या समोर एक श्रीराम मंदिर आहे. ते जंगलीमहाराजांच्या शिष्या रखमाबाई गाडगीळ यांनी बांधले. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती असून, पायथ्याशी मारुती आहे. मंदिराच्या मागील बाजूस एका खोलीत रखुमाबाई गाडगीळ आणि गुरुभक्त तुळसाअक्का या दोघींच्या समाध्या आहेत.
संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/sb2GuyJwqtUKcGB66
आठवणी_इतिहासाच्या