सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/१९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.
सचिन रमेश तेंडुलकर हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरची निवड केली होती. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडूलकर यांना क्रिकेट चा देव मानले जाते .
पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला . हा सन्मान त्याला त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय विमान दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला तो पहिला खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.
साभार – Wikipedia