बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान –
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले व सुखरूप विशालगडास पोहचले. बाजीप्रभू देशपांडे यांनी प्रराक्रमाची शर्थ करत स्व:प्राणाचे बलिदान देवून शत्रू रोखून धरला . छत्रपती राजाराम महाराज यांनी 30 ऑगस्ट १६९२ रोजी बाजीप्रभू देशपांडे यांचे पुत्र बाबाजी प्रभू व राजश्री रामचंद्र पंडित अमात्य यांना लिहिलेल्या पत्रात आपणास “ बाजीप्रभू यांनी कैलासवासी स्वामीपाशी ( शिवाजी महाराज ) एकनिष्ठ होऊन सेवा करून स्वमिकार्यावारी खर्च झाले. “ अशी महत्वपूर्ण नोंद आढळून येते.(बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान)
पत्र क्रमांक : – १८६ , महाराष्ट्रेइतिहासाची साधने विभाग २
छत्रपती राजाराम महाराज यांनी बाजीप्रभू देशपांडे यांचे पुत्र बाबाजी प्रभू यांना ३० ऑगस्ट १६९२ रोजी पत्र पाठविले त्यात ते बाबाजी प्रभुना लिहितात “ पूर्वी तुमच्याकडे सेनापतींची जमेनिविसी ( हिशोब तपासण्याची जबाबदारी ) होती . राजाराम महाराज हे कर्नाटक प्रांतात गेले असता त्यांनी हे काम काशीराम प्रभू यांच्याकडे सुपूर्द केले. आपणाकडे काही जबाबदारी द्यावी असा आग्रह राजश्री रामचंद्र पंडित अमात्यांनी धरला . परंतु महाराज आपणास काही काम देत नाहीत तोपर्यंत आपण काही काम करणार नाही असे सांगून आपले बंधू महादजी बाजी यांना आमच्या पदरी सेवेस कर्नाटकात पाठविले. महादजी यांचे आजाराने निधन झाले. तुमचे वडील बाजीप्रभू यांनी कैलासवासी स्वामीपाशी ( शिवाजी महाराज ) एकनिष्ठ होऊन सेवा करून स्वमिकार्यावारी खर्च झाले. तुम्हीही एकनिष्ठेने सेवा केली आहेत तशीच पुढे कराल असा विश्वास आहे.
सेनापती संताजी घोरपडे यांची जमेनिविसी आपणास दिली असून सेनापतीच्या नावाने सनदा पाठविल्या आहेत व सदर पत्र हे तुमच्यासाठी पाठविले आहे. स्वामीनी ( राजराम महाराज ) सांगितल्याप्रमाणे कार्यभाग चौकसपणे व एकनिष्ठेने करणे. तसेच तुमचे बंधू अंताजी बाजी कर्नाटकात सेवेत होते. अंताजी बाजी हे हजारी सरदार होते त्यांना पंचहजारी सरदार करून दक्षिणेत पाठविले आहे. राजश्री रामचंद्र पंडित अमात्य व राजश्री संताजी घोरपडे सेनापती यांना तस्गी आज्ञापत्रे देण्यात आली आहेत. महादजी बाजी हे सेवेसाठी आले होते परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे पुत्र बाजी महादेव यांना किल्ले राजगडाची कारखानीसीची सनद देण्यात येत आहे. तुम्ही आपले समाधान राखून स्वामिसेवा एकनिष्ठपणे करत जाणे. स्वामी तुमचे चालवितील.
पत्र क्रमांक : – १८७ ,महाराष्ट्रेइतिहासाची साधने विभाग २
छत्रपती राजाराम महाराज यांनी राजश्री रामचंद्र पंडित अमात्य यांना ३० ऑगस्ट १६९२ रोजी आज्ञापत्र पाठविले त्यात ते लिहितात “ कर्नाटक मुक्कामी असताना अंताजी बाजी यांनी विनंती केली हिरडस मावळ्यातील परगण्याचे देशकुलकर्णी पद वंशपरंपरेणे निजामशाहीच्या कारकीर्दीपासून चालत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व वतनदार लोकांच्या इनामती जप्त झाल्या. त्यावेळेस आमचे देखील इनामगाव जप्त झाले. आमचे वडील बाजी प्रभू यांनी कैलासवासी स्वामीपाशी ( शिवाजी महाराज ) एकनिष्ठ सेवा करून स्वमिकार्यावारी खर्च झाले. आपणही आजपर्यंत एकनिष्ठतेने सेवा केली . तरी आपण कृपाळू होऊन आमचे इनामगाव परत द्यावे अशी विनंती केली.
छत्रपती राजाराम महाराज वरील विनंतीवरून राजश्री रामचंद्र पंडित अमात्य यांना लिहितात कि “देशकुलकर्णी हिरडस मावळ हे स्वामींच्या पायाशी एकनिष्ठेने वर्तणूक करतात. बाजीप्रभू कैलासवासी स्वामींचे ( शिवाजी महाराज ) वेळेस स्वामी कार्यावर खर्च झाले. तरी पूर्वी इनामगाव व शेती यांची मना स आणून सदरहू पैकी दोन हजार टक्याचा इनाम एक गाव व शेते नेमून देवून यांस व याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने इनाम चालवण्याविषयी प्रांत मजकुरचे देशाधिकारी यांना सनद आपल्या नावे करून देणे आणि इनाम चालेल ऐसे करणे.
बाजीप्रभू यांचे चित्र :- स्वामीरक्षणार्थ धारातीर्थी देह ठेवणाऱ्या या वीराचा फोटो महाडचे कै.आबाजी परशुराम कर्णिक उर्फ महाडकर यांच्या घरी एका अत्यंत जुन्या बखरीत जीर्नावस्थेत सापडला. हे चित्र अर्थात एक जुन्या बखरीतील रेखाचीत्रावरून काढिले आहे. हे उघड आहे :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :-
महाराष्ट्रेइतिहासाची साधने विभाग २ :- श्री. वा. सी.बेंद्रे.
इतिहाससंग्रह पुस्तक २ :- दत्तात्रय बळवंत पारसनीस