महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,824

संत गाडगे महाराज यांचे वऱ्हाडी भाषेतील किर्तन

By Discover Maharashtra Views: 4170 4 Min Read

संत गाडगे महाराज यांचे वऱ्हाडी भाषेतील किर्तन –

‘एकखेप हात वरते करून म्हना.. गोपाला गोपाला.. हात बांधले काय तुमचे ? हात वरते करा.. त्या बुवाले काय झालं ? भजन काहून करत ना ? उभे राहा.. हे पाहा बाभुईचं खोड उभं राह्यलं.. बसा खाली. देवाचं भजन कायच्यासाठी करा लागते ? कारन की मानसाच्या आंगात अभिमान हाये.. मानूस सोताले मोठा तिर्मखराव समजते, हा अहंकार गेला पाह्यजे म्हनून भजन करा लागते.. तुकोबा म्हंतात, ज्याचा अभिमान गेला तुका म्हने देव झाला.. म्हना..’

‘गोपाला.. गोपाला..’
‘देवाचं नाव घ्याले पैसे पडत नाहीत, बगरपैशाची भक्ती होते, काही काही लोकं देवाच्या नावानं लुटतात, कोनी म्हनते होम करा.. शांती करा.. पितराले दान द्या.. अमुक करा.. तमुक करा.. हे सगळी लूट व्हय.. याच्यातून देव भेटत नाही.. लुटनाराचं पोट भरते, हे लूट थांबली पाह्यजे म्हनून संतानं सोपा इलाज सांगतला.. नामसमरन करा.. अहंकार गेला की मानूस परोपकारी होते, कोनी म्हनते देव भेटासाठी गुरू करा लागते, कायले पाह्यजे गुरू ? माहा कोनी गुरू नाही अन् माहा कोनी चेला नाही, तुकोबा म्हंतात,
तुका म्हने गुरूत्व गेले गुरवाडी
पूर्वजाशी धाडी नरक वासा

काहून की समाजात काही काही लबाड गुरू आहेत, तुमाले पापपुन्याच्या कथा सांगून भेव दाखोतात, जो गुरू होते त्यालेच भलकसा अहंकार असते, मी साधासुधा अळानी मानूस आहो, मी गावोगाव फिरलो.. नवस करनारे.. आंगात आननारे लोकं पाह्यले.. मनाले तळमळ लागली की आपून करतो हे बरं नाही, लोकाइले शिक्षनाचं महत्त्व समजलं पाह्यजे.. आपून किती देव करून ठेवले ?’
‘तेहतीस कोटी’
‘येतईबुवा, लखमाजी बुवा.. आसरा खासरा.. असे देव गावाच्या बाहीर काटीखाली मांडूनठेवले, आता मले सांगा, हे जग कोन केलं ?’
‘देवानं’
‘आकाश, समुद्र’
‘देवानं’
‘मंग ज्यानं एवढी मोठी धरती बनवली तो कोन्या झुडपाखाली लपून बशीन काय ?’
‘नाही’

‘म्हनून देवळात देव नाही.. देऊळ बांधलं मानसानं.. त्याच्यात देव बसोला मानसानं.. तुकोबा म्हंतात, तीर्थी धोंडा पानी देव रोकडा सज्जनी.. तीर्थात देव नाही.. तीर्थात पंडे लुटतात.. तांब्याभर पान्याचे पंधरा रुपये.. बाप मेला की तो म्हनते चाटी करा.. नाशिकले जाऊन विधी करा.. त्याले दक्षना द्या.. बापहो, पुनर्जन्मावर माहा विश्‍वास नाही.. एकखेप मानूस मेला म्हनजे तो काही केल्या वापस येत नाही.. पुढचा जन्म कोनं पाह्यला ? तुकोबा म्हंतात, जन्म नाही रे हा आणिक, तुका म्हने माझी भाक ! जित्याजागत्या म्हतार्‍या मानसाले सोडून देतात अन् मेल्यावर पितराले जेऊ घालता ? हा कोनता न्याय ? आता मले सांगा, तुम्ही सत्यनारायण करता काय ?’

‘हो’
‘सत्यनारायन देवाची भक्ती नाही, हा भटजीचा पोट भर्‍याचा धंदा हाय.. सत्यनारायनाच्या पोथीत असं हाय की कलावतीनं सत्यनारायण केला नाही म्हनून तिच्या नवर्‍याची नाव डुबली, अन् प्रसाद घेतल्यावर वरते आली.. हे खरं नाही, त्या सत्यनारायण करनार्‍या भटजीबुवाले म्हना.. अडीच लाख रुपये घे.. अडीच कोट घे.. अन् समुद्रातली एखांदी आगबोट वरते आनून दाखो.. येइन काय ?’
‘नाही’

‘लोकं गनपती बसोतात.. त्याच्या आरत्या करतात.. त्याले जेऊ खाऊ घालतात.. अन् शेवटच्या रोजी कुठी लांबोतात ? मोरया मोरया करत पान्यात ! अरे ज्याच्या आरत्या केल्या त्यालेच पान्यात डुबून मारता ? हे कोनती भक्ती व्हय ? तुमच्यावर खटला भरला त फौजदारी गुन्हा होते. म्हनून समाज सुधारला पाह्यजे.. शिक्षन सार्‍यात मोठी दवा हाये. उच्चशिक्षन घेतलं पाह्यजे.. मानूस जागृत झाला पाह्यजे.. जो मेंढीपळन राह्यते तो कामातून जाते.. देवानं आपल्याले अक्कल देली.. तिचा वापर केला पाह्यजे.. नाहीतर तुका म्हने हेला अन् पानी वाह्यता वाह्यता मेला.. बोला.. गोपाला गोपाला…’

 

गुल्लेर, नरेंद्र इंगळे

Leave a Comment