संत श्री तुकाराम महाराज मंदिर, देहू
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवोनिया ||
तुळसीहार गळा कासे पितांबर | आवडे निरंतर तेची रूप ||
मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभ मणी विराजित ||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ||
पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव. वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे संत जगत्गुरू श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभरबुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती.
गाथा आणि अनेक अभंगांच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला भेटतात. श्री संत तुकाराम महाराज हे श्री विठोबाचे नि:स्सिम भक्त. त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्र्वर महाराजांप्रमाणेच तुकाराम महाराजांचीही पालखी पंढरपूरला जात असते.
विठ्ठल मंदिर, जुने शिवमंदिर, इंद्रायणीचा डोह ही देहूतील बघण्यासारखी ठिकाणे आहेत. जवळच रामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आहेत. संत तुकाराम महाराज चिंतनासाठी, साधनेसाठी भंडारा डोंगरावर जात असत.
ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले आणि तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते. या इंद्रायणी नदी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडा वर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे.
संत तुकाराम महाराजांच्या साधुत्वाची आणि कवित्वाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्या वेळी आनंदावस्थेत त्यांना स्वतःसाठी काहीही प्राप्त करावयाचे नव्हते. ‘तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ।’ अशा अवस्थेत ते होते. आपल्या भक्तीबळावर ‘आकाशाएवढ्या’ झालेल्या संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकारामबीज) येथे मोठी यात्रा भरते.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti