महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,52,128

संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर (सासवड)

By Discover Maharashtra Views: 4952 2 Min Read

संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर (सासवड)

सासवडच्या पश्चिम दिशेस चांबळी नदीच्या पावनतीरी हे पुण्य पवित्र सोपानदेव मंदिर उभे आहे. मंदिर उंचावर असून पुढच्या बाजूने दगडी बांधकाम करून विस्तृत चौथरा बनवला आहे. यावर जाण्यास दोनही बाजूने जुन्या पध्दतीच्या उंच पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आल्यावर महादेवाचे ‘नागेश्वर मंदिर’ दिसते. हे नागेश्वर मंदिर संत सोपान देवांच्या आधीचे आहे. नागेश्वर मंदिराची गाभारा व सभामंडप अशी रचना असून पूर्ण बांधकाम दगडी आहे तसेच समोरील पटांगणात नंदी आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूस सोपान देवांनी समाधी घेतली.

मंदिराच्या बाजूने पुढे आल्यावर उजव्या हाताला मुख्य सभामंडप आहे. या मंडपात मध्यभागी भव्य अशी वीर मारुतीची मूर्ती आहे. अनेक लाकडी खांबावर हा मंडप उभा असून यातले सहा लाकडी खांब कलाकुसरीने भरलेले आहेत. याच मंडपात रोजचे प्रवचन व विशेष दिवशी कीर्तनाचे कार्यक्रम होतात. इथेच विणेकरी वीणा घेवून उभे असतात. या सभामंडपाच्या पुढेच दगडी मंडप आहे. दगडी मंडपातून आत गेल्यावर डावीकडे राम लक्ष्मण व उजवीकडे विठ्ठल रखुमाई आहेत. या मंडपातून दोन्ही देवांच्या मधून गाभाऱ्यात प्रवेश करता येतो.

गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे. काळ्या पाषाणातील समाधी पायऱ्यांची आहे. सकाळी नित्य पूजेनंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो.समाधीच्या मागील बाजूस मुरलीधर कृष्णाची मूर्ती आहे .

संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके ११९९ (ईस १२७७) मध्ये झाला. भगवदगीतेवर त्यांनी साररूप ओवीबद्ध टीका ” सोपानदेवी ” या नावाने लिहिली. वयाचे १९ वे वर्षी त्यांनी मार्गशीर्ष वद्य तृतीया शके १२१८ ( ईस १२९६) साली त्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली, समाधीच्या दक्षिण भागी एक विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष असून तिथे सोपानदेवाच्या पादुका आहेत. तेथून समाधिस्थळी सोपानमहाराजांनी प्रवेश केल्याचे सांगतात.

जेष्ठ वद्य द्वादशीला ला संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होते. प्रस्थान म्हणजे पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघते.

माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

Leave a Comment