साखर बावडी, इंदापूर –
सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर शहर हे मालोजीराजेंच्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे. इंदापूरात आपल्याला स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली एक विहीर पहायला मिळते. ती विहीर म्हणजे साखर बावडी. महाराष्ट्रात पूर्वी पाण्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी विहीरी बांधल्या गेल्या त्याला स्थानिक भाषेत वेगवेगळ्या नावाने संबोधतात काही ठिकाणी बारव म्हणतात तर काही ठिकाणी बावडी म्हणतात. ह्या विहीरी म्हणजे नुसतेच पाण्याचा साठा नाहीतर वेळप्रसंगी धान्य, रसद पण साठवता येईल अशी व्यवस्था असायची.
साखर बावडीला दोन ठिकाणाहून प्रवेश आहे आत पायऱ्यांनी उतरल्यावर चहूबाजुनी बांधकाम केले आहे आणि तिथे साठवणूक होत असावी हे लक्षात येते. ही बावडी ३०० वर्षाहून जुनी आहे. तिचे बांधकाम कोणाच्या काळात झाले हे सांगणे कठीण आहे. काही स्थानिक म्हणतात विश्वासराव पेशवे ह्यांनी बांधली तर काही म्हणतात हैद्राबादच्या निजामशहाच्या काळात बांधकाम झाले. पण हा ऐतिहासिक वारसा पहाण्यासारखा आहे व तो जपला जाणे गरजेचे आहे.
टीम – पुढची मोहीम