महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,39,290

साखरे महाराज मठ, पुणे

By Discover Maharashtra Views: 1623 5 Min Read

साखरे महाराज मठ

भाऊ महाराज बोळातून शारदा गणपती मंदिराकडे जाताना डाव्या हाताला विटांच्या बांधकामची श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर अशी पाटी असलेली इमारत दिसते. तोच साखरे महाराज मठ. मठामध्ये आत गेल्यावर ऐसपैस सभामंडप आहे. समोर अतिशय प्रसन्न भाव, खांद्यावर रुळणारे केस, आशिर्वाद देणारा हात या रुपातील संत ज्ञानेश्वर महाराज यांची संगमरवरी बैठी नितांत सुंदर आणि पुणे शहरातील एकमेव मुर्ती आहे. त्यांच्या मागे थोड्या उंचावर विठ्ठल- रुक्मिणीची सर्वांग सुंदर मुर्ती आहे.

या वास्तुत पुर्वी ज्ञानेश्वरीचे आद्य प्रवचनकार, ज्यांनी ज्ञानेश्वरी शुध्द करुन सर्व वारकरी संप्रदायात पोहोचवली असे श्री.नाना महाराज साखरे याचं वास्तव होत. या मठात त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचनं,किर्तनं केली व सामान्य लोंकांना ती समजुन सांगितली. या साखरे महाराजांच मूळ आडनाव जोशी. पुणे येथे राहणाऱ्या जोशी घराण्यातील श्री रामचंद्रपंत जोशी हे चिमाजी अप्पा पेशवे यांचे खासगी कारभारी होते. त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचे साक्षात अनुग्रहीत श्री.अच्युत केसकर महाराज यांना २७ दिवसांच्या आळंदी येथील अनुष्ठानानंतर प्रत्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊलींनी स्वप्नांत येऊन सांगितलं की, “ आजपासून तूं जो ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगशील तोच बरोबर असेल.” त्याच श्री.अचुत्य महाराजांनी मग श्री रामचंद्र जोशी यांच्यावर अनुग्रह केला व अनुग्रह झाल्यावर त्यांनी अचुत्य महाराजांवरील निष्ठेने आपल्याजवळील २१ लाख रुपयांवर उदक सोडले व अचुत्य महाराजांच्या उपदेशावरुनच त्या २१ लाख रुपयांच्या द्रव्याचा पुणे व आळंदी येथील ब्रह्मवृंदांवर भोजनासाठी खर्च केला. त्यावेळी आळंदी व पुणे येथे अशी स्थिती झाली की, पुणे व आळंदी येथील व्यापार्‍यांकडे तूप व साखर मिळेनाशी झाली. तेव्हापासून श्री रामचंद्र जोशी यांचे आडनाव साखरेबुवा असे प्रचलित झाले.

अच्युत महाराजांचे परमशिष्य जोशी यांचे भाऊबंदांपैकी गोविंदपंत जोशी यांच्या ४ पुत्रांपैकी श्री.हरिपंततात्या जोशी यांचेकडे ज्ञानपरंपरने साखरे ही बिरुदावली लावली गेली. हेच हरिपंततात्या संन्यस्त झाले त्यावेळी त्यांचे नाव ब्रह्मानंद स्वामी असे होते. हरिपंत तात्या समाधिस्थ झाल्यावर त्यांचे बंधु श्री.पंढरीनाथ महाराज यांनी हरिपंततात्यांचे तीन पुत्रांपैकी एक पुत्र श्री.नाना जोशी यांचेकडून ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथांचे अध्ययन करुन घेतले.पुढे रोज अध्ययन करत करत श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांना मुखोद्गत झाला व तो ग्रंथ सुलट उलट असा कसाही ते म्हणू शकत.साखरे घराण्यानुसार चालणार्‍या पारंपारिक पारमार्थिक कृत्यांचा भाग पंढरीनाथ महाराज यांच्यानंतर नाना महाराज यांच्यावर पडला व ते साखरे महाराज नावाने ओळखले जाऊ लागले.

नाना महाराज यांनी पुढे ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या श्रवणास येणार्‍यांपैकी श्री.साधुरामबुवा यांचा पुण्यातील फुले मंडईजवळचा मठ विकत घेऊन ते या मठातच वास्तव्य करुन अखेरपर्यंत राहिले. या मठातच नाना महाराज ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत असत व इतर ग्रंथांचे पाठही होत असत. नाना महाराज यांनी इ. स. १९०३ अर्थात शके १८२५ चैत्र साली संन्यासाश्रम स्विकारला व नंतर ६ महिन्यांनीच भाद्रपद व. १० शके १९०३ मध्ये ते समाधिस्थ झाले. त्यांचे समाधी मंदिर ओंकारेश्वर मंदिराजवळ आहे. नाना महाराज यांनी समाधी  घेतल्यावर त्यांचे कनिष्ठ चिरंजीव  पुरुषोत्तम जोशी साखरे यांनी या मठाचा ज्ञानेश्वरी वाचन मंदिर इ. स. १९२७ साली जिर्णोद्धार केला. तसेच आळंदी देवाची येथे भगवान गोपाळ कृष्णाच्या मूर्तीची स्थापना कन्हैयाश्रम येथे शके १८४३ इ. स. १९२१ रोजी केली. त्यांनीच या मठात इ. स.१९२८ शके १८४९ माघ शु.५ मध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची मुर्ती स्थापन केली. तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुर्तीची स्थापना इ. स. १९४७ माघ शु.६ मध्ये केली.

नाना महाराज साखरे यांचा मुलगा पुरुषोत्तम जोशी साखरे यांनी जेष्ठ शु.११ शके १८६० मध्ये संन्यास घेतल्यावर त्यांना ‘कृष्णानंद सरस्वती स्वामी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. श्री कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज हे पौष शु.१ शके १८७५ रोजी समाधिस्थ झाले.

आजही या मठात ज्ञानेश्वरीची अखंड पारायण दरवर्षी होतात. या मठात अश्विन पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा काकडा साजरा केला जातो. सकाळी कुडकुडत्या थंडीत त्याच उत्साहाने रोज भाविक पांडुरंगाला जागे करण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. काकडा झाल्यावर मुखप्रक्षाला म्हणत काकडा ओवाळला जातो व धन्य धन्य हो प्रदक्षिणा म्हणत छोटी पालखी हातात धरुन मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते व काकड आरतीची सांगता होते. नंतर प्रसाद म्हणुन लोणीसाखर वाटली जाते. कार्तिकी एकादशी झाली की तुळशी विवाह संपन्न होतो. साखरे महाराज मठाची तुळस व दगडुशेठ गणपती मंदिरातला श्रीकृष्ण वाजत गाजत मठात आणला जातो. नंतर त्याच औक्षण करुन मंगलाष्टकांच्या स्वरात तुळशी विवाह संपन्न केला जातो. गोवर्धन पर्वत करुन त्याची पुजा केली जाते. त्याचबरोबर मठात अन्नकुट हि संपन्न होतो.

संदर्भ:
साखरे महाराज मठ इतिहास – विनायक मोडक
मुकुंद सरनाईक

पत्ता :
https://goo.gl/maps/3nKMMn19699VJT9v9

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment