महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,56,070

सकवारबाई यांचे सहगमन सती परंपरा की राजकारण ?

By Discover Maharashtra Views: 1529 11 Min Read

सकवारबाई यांचे सहगमन सती परंपरा की राजकारण ?

छत्रपती शाहू महाराजांचे १५ डिसेंबर १७४९ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सकवारबाई सती गेल्या. सकवारबाई सती गेल्या कि त्यांच्यावर पेशवा बाळाजी बाजीराव किंवा महाराणी ताराबाई यांनी मानसिक दबाव आणून त्यांना सती जाण्यास प्रवृत्त केले का ? सकवारबाई यांचे बंधू कुवारजी शिर्के यांनी सकवारबाई यांच्याशी सहगमनाबाबत काही बोलणी केली का ? त्या संबंधितील नोंदीचा एक आढावा.

गोविंद खंडेराव चिटणीसकृत श्री शाहूमहाराज यांची बखर :-

सहगमन करण्याचा संकल्प :- ताराबाई , राजारामसाहेबांची स्त्री शाहूमहाराजांची चुलती कैदेत ठेवली होती ति पहावयास आली. त्यास नको म्हणावे असा समय कोणाचा ? कोण बोलतो ? परंतु रायाने तितक्यात त्याजवळ जावून विनंती केली की, महाराज ! आपण धनी , आणि हा प्रसंग आपण पाहू नये, असे सर्वांचे मनोदयातून, त्याचकरिता विनंती करतो, तर आपण आपले ठिकाणी चलावे , तेथे मला आज्ञा करावी. जशी आज्ञा होईल तसे करण्यास नित पडेळ. असे बोलून तेथे नेवून बंदोबस्त केला आणि पुढे कसे करावे म्हणोन ( पेशव्याने ) विचारले. त्याचे उत्तर त्यांनी ( ताराबाई ) केले की, सकवार राहिल्यास राज्याचा डोहणा करील , राज्य बुडवील , कोणाचे पाय भुईस लागू देणार नाही, याकरिता बरोबर जाईल तर चांगले, सहगमनाचा विचार कळेल तसा तिने करावा. मग पुढे विचार करणे तो करावा. करवीरहून संभाजीस आणावयाचे सर्वांचे सल्लेस येणार नाही आणि मीही सल्ला देत नाही , परंतु बारसी पानगाव गोधळे यांचे घरी माझ्या सुनेचा मुलगा संभाजीचे स्त्रीचे व आईचे भयानी नेवून ठेविला , त्यास आणून गादीवर बसवा, आणि राज्य चालवावे दुसरे काय ! . …..लहान थोर एक विचार मनसोबा ठरला कि सकवार बाईसाहेबास सती घालवावी, न जातील तर बळे न्यावी, आताच शेवट केला पाहिजे . बाईचे बंधू कुवारजी शिर्के यांनी तिला “ तू आपला लौकिक मिळवून जा , यात फार चांगले लोक म्हणतील असे पर्यायाने सांगितल्यावर ( ति ) बरे बोलली “

( सदर बखरीतील नोंदीनुसार ताराबाई आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या मसलतीत ताराबाई ह्या सकवारबाई यांनी सहगमन करावे या बाजूने होत्या . तसेच त्यावेळी जमलेले इतर मान्यवर लोक तसेच सकवारबाई यांचे बंधू देखील सकवारबाई यांनी सहगमन करावे या मताचे होते. )

मल्हार रामराव चिटणीस विरचित थोरले शाहू महाराज यांचे चरित्र :-

सकवारबाईचा सहगमनाचा निश्चय :- प्रधानपंत व गोविंदराव कारभारी व सरदार यांणी शहरची नाकेबंदी करून वाड्या भोवती चौक्या व कारखाने यांस चौक्या पहारे याप्रमाणे करून , प्रधानपंत वैगरे गोविंदराव यांचे वाडीयात येऊन बसले. आणि राणीसाहेब यांचे तीर्थरूप कुवारजी शिर्के यांस बोलावून नेले आणि सांगितले. जे “ बाईसाहेबांची मर्जी कशी आहे? महाराजांसारखे रत्न गेले ! पुढे राज्यकारभार चालणे त्यास आम्हास सर्वांस घेऊन महाराजांची आज्ञा झाली आहे त्याप्रमाणे राज्याचे अधिकारी करून करावयाचे आहे. आम्ही सर्व आज्ञांकित महाराज तेच बाईसाहेब आहेत. किंवा सहगमन करण्याचा संकल्प आहे. हे विचारून यावे. म्हणून पाठविले आणि “ आपणापाशी बखेडा करणार कारभारी यांचा बंदोबस्त महाराजांचे आज्ञेने करितो” म्हणून सांगून पाठविले. आणि दादोबा प्रतिनिधी आणि यमाजीपंत व त्यांचे लोक या भोवते आपले लोक पाठवून नजरबंदी करविली. शिर्के यांनी बाईसाहेबांस निरोप सांगितला. तेव्हा बाईसाहेबी विचार केला जे “ सर्व प्रकारे बलवान प्रधानपंत व गोविंदराव व सर्व कारभारी होऊन ताराबाईचे नातू राज्यावर बसवणे हे राजकारण सिद्ध झाले. तेच पुत्र घेऊन आपण राहावे तरी त्याचे आज्ञेत चालून ताराबाईचे आज्ञेत चालावे यात शोभा राहावयाची नाही. आपण दादोबा व यमाजीपंत यांचे नादी लागून प्रधान, चिटणीस व कारभारी सर्व तोडिले व मसलतही प्रतिनिधीने शेवटास नेली नाही. याउपरही राहण्यास व्यर्थ आहे. “ म्हणोन सहगमन करण्याचा निश्चय केला. “ जाली ति गोष्ट बरीच जाहाली . महाराज गेले. आम्हास राहावयाचे नाही. तुम्ही सर्व महाराजांची आज्ञा जाली असेल तसे करून राज्य राखावे” बोलिली पदर टाकीला. आणि साहित्य लौकर करावे म्हणून आज्ञा पाठविले.

( सदर नोंदीत कुवारजी शिर्के यांना तीर्थरूप ( वडील ) म्हटले आहे ते सकवारबाई यांचे भाऊ आहेत कारण वडील रामोजी हे २१ जून १७४८ रोजी वारले.

सदर बखरीतील नोंदीनुसार पेशव्यांनी सकवारबाई यांच्या भावास सकवारबाई यांच्याकडे त्यांच्या मनातील इच्छा जाणून घेण्यास पाठविले. )

मराठ्यांची बखर ग्रांट डफ :-

पेशव्याची शिबंदी साताऱ्या किल्यावर चढली आणि रामराजा , ताराबाईचा नातू , तो कोल्हापूरवरून येत होता. त्यास आणावयाकरिता कितीएक लोक सामोरे गेले. असे झाले तेव्हा सकवारबाई समजली कि, मी जे मनात योजिले ते लोकात प्रसिद्ध झाले, आता ते काहीएक सिद्धीस जावयाचे नाही.’ बाळाजीने तर , तिने पहिल्याने म्हटले होते कि मी सती जाईन , तेव्हापासून मोठ्या मेहनतीने ते लोकांत प्रसिद्ध केले होते. कां किं, तिचे सती जाणे त्यास अत्यंत हितवाहक होते. यास्तव ते अवश्य घडावे याकरिता त्याने तो उद्योग केला. मग शाहू मेल्यावर बाळाजीने सकवारबाईला कपटाने विनंतीपुर्वक आग्रहाचा निरोप पाठविला कि , मी तुमचे आज्ञेत वागणारा इमानी चाकर असता तुम्ही का सती जाता.? आपण न जावे. असे तिला सांगून पाठवून तिचे भाऊ कुवारजी शिर्के यांस बोलावून सांगितले कि “ तुमची बहिण सती न गेली तुम्ही व तुमचे जातीचे मराठे यांचा मन राहणार नाही , त्यास तिने ते अवश्य केले पाहिजे. जर तुम्ही करवाल तर तुम्हास कोकणात जहागिरी देवू . अशा कृतीमेंकरून बाळाजी पेशवा याने आपली मसलत सिद्धीस नेली. त्या सकवारबाईस अशा अडचणी उत्पन्न करून सती घालविले.

( ग्रांट डफ पेशव्याने सकवारबाई यांच्याकडे आपण सती जावू नये अशी विनंती केली. परंतु त्याच वेळी राजकारण करत सकवारबाई यांच्या भावास जहागीरीची आमिष देवून त्यांच्या बहिणीस सकवारबाईस सती जाण्यास प्रवृत्त करावे अशी मसलत केली. )

पंत अमात्य बावडेकर बखर :-

पेशव्यांनी चिटणीसास हाताखाले घेऊन वाड्याचा व शहराचा बंदोबस्त करून , दादोबा प्रतिनिधी उर्फ जगजीवनराव यांस व त्याचे मुतालिक यमाजी शिवदेव यांस कैद करून , सकवारबाईसाहेबांच्या पुढे करंडा सदाशिव चिमणाजी यांनी ठेविला. सकवारबाईसाहेब यांनी कुंकू लावून घेऊन माहुलीसंगम कृष्णातीरी सहगमन केले.

( हे खरे नाही सदाशिव चिमणाजी मागून ६ दिवसांनी २० डिसेंबर रोजी पुण्याहून साताऱ्यास आला. :- रियासतकार सरदेसाई )

छत्रपतींच्या घराण्यातील सती परंपरा

शहाजीराजे यांच्या निधनानंतर जिजाबाई सती जाण्यास निघाल्या परंतु शिवाजी महाराजांच्या विनंतीआर्जव आग्रहास्तव त्यांनी सती जाण्याचा निर्णय बदलला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई महाराजांच्या निधनानंतर २४ दिवसांनी सती गेल्या. परंतु सोयराबाई सती गेल्या नाहीत

छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर राजाराम महाराजांचे पागोटे घेऊन सती गेल्या. परंतु ताराबाई सती गेल्या नाहीत.

महाराणी ताराबाईचे पुत्र शिवाजीराजे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पार्वतीबाई सती गेल्या परंतु त्यांच्या दुसऱ्या पत्नी भवानीबाई गरोदर असल्याने सती गेल्या नाहीत

सती जाणे हे ऐच्छिक स्वरुपाची परंपरा आपणास छत्रपतींच्या घराण्यात दिसून येते.

इतिहासकारांची मते :-

गोविंद सखाराम सरदेसाई :- वर दिलेलेया पुराव्यावरून पाहता सकवारबाईस सती जाण्याचा निरोप पाठवण्यास एकटा पेशवाच प्रमुख नसून, त्या वेळी जमलेल्या सर्व प्रमुख मंडळीचा त्यात सहभाग होता. किंबहुना त्यात ताराबाईच अग्रेसर होती.

हि चाल हल्ली कितीही क्रूर व वेडगळ भासत असली , तरी त्या वेळी सर्वत्र प्रचलित होती. बहुदा सती जाणे हा नियम व न जाणे हा अपवाद समजला जाई . न जाण्यास योग्य प्रापंचिक करणे असतील तर गोष्ट निराळी. एरवी जिला असे काही कारण लागू नाही , तिची साहजिक प्रवृत्री सती जाण्याकडे कोणी न सांगताच होत असे.

सकवारबाईच्या वयाला पन्नासी उलटली असावी . तिला मुल वैगरे पाश काही एक न्हवता. तिचा प्रपंच झालेला होता. शाहूला आता दुसरी राणी सती जाणारी न्हवती. तेव्हा या राणीने सती जाणे शाहुच्या लौकिकाला त्या काळी साजेसे व जरुरीही होते.

सकवारबाई सती न जाती तर पुढील इतिहासाचा ओघ जास्त यशस्वी झाला असता असे मानण्यास काही कारण नाही.

आसाराम सैंदाणे : – महाराजांच्या निधनाच्या वेळी सकवारबाईनी पेशव्यांनी मुदाम सती जाण्यास भाग पाडले असा आक्षेप घेतला जातो. परंतु तिच्या पक्षातील दुर्गतीमुळे तिला हे सतीत्व पत्करणे भाग पडले. त्यामुळे

पेशव्यांवरील हा दोष अपोआप गळून पडतो . परंतु त्यास वकिलीबाण्याचे स्वरूप इंग्रजशाहीच्या आरंभी दिले गेले. गेलेले हे राज्य पुंड पेशव्यांचे महाराज छत्रपतिचे राज्य कायम आहे असा भेदनीतीचा डाव इंग्रज राज्यकर्ते सातारच्या प्रतापसिंहाच्या वेळेस मतलबाने करू लागले. तेव्हा या मताला दुजोरा देणारे इतिहासकारही निर्माण झाले.

जयसिंगराव पवार :- सकवारबाईंच्या सतीप्रकरणाच्या संदर्भात बखरीशिवाय अन्य काही समकालीन पुरावे नाहीत. बखरीतहि एकवाक्यता नाही. तथापि. तत्कालीन राजकारणाचा साकल्याने विचार करिता सकवारबाईनी सती जाणे हे जसे पेशव्याच्या सोयीचे होते तसे ताराबाईच्याही फायद्याचे होते. कारण सकवारबाई मागे राहिल्यामुळे पेशवे व ताराबाई या दोघांच्याही मार्गावर अडचणी निर्माण होणार होत्या. तेव्हा या दोघांनीही सकवारबाईच्या सतीच्या विचारास ( मूक अथवा उघड ) संमती दिली असणे स्वभाविक वाटते.

वरील सर्व नोंदीच्या आधारे छत्रपती शाहू महाराज आजारी असताना त्यांनी ताराबाईचा नातू रामराजा यास स्वराज्याचा उत्तराधिकारी करावे असे ठरविले. परंतु सकवारबाईस ताराबाईचा नातू गादिवार आल्यास आपल्याला ताराबाईच्या आज्ञेत तिच्या मर्जीत राहावे लागेल याची कल्पना आली. त्यामुळे आपल्या मर्जीतील राजा स्वराज्याच्या गादीवर बसवण्यासाठी दादोबा प्रतिनिधी व यमाजी शिवदेव यांना आपल्या गोटात सामील करून शाहू महाराजांच्या त्यांच्या भोवती आपला बंदोबस्त ठेवला. पेशवा व चिटणीस यांना दगाफटका करण्याचा बेत आखला होता. ताराबाईस आपला नातू रामराजा यास सकवारबाई दगाफटका करेल अशी भीती वाटत होती.

छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर नानासाहेब पेशव्यांना सकवारबाई काही गडबड करतील अशी आशंका होती त्यामुळे त्यांनी सातारा शहराची नाकाबंदी करून चौकी पहारे बसविले. सकवारबाईच्या मर्जीतील दादोबा प्रतिनिधी व यमाजी शिवदेव व त्यांच्या लोकांना नजरबंद केले. त्यामुळे सकवारबाई एकाकी पडल्या. शाहू महाराजांच्या पश्च्यात ताराबाई व पेशवे यांच्या अंकित राहावे लागेल याची कल्पना सकवारबाई यांना आली होती. ताराबाई, नानासाहेब पेशवे व बंधू शिर्के यांना देखील सकवारबाई यांनी सती जावे अशी इच्छा होती असे दिसून येते. शाहू महाराजांबरोबर सती जाण्यात लौकिक होईल हि तत्कालीन समाजातील धारणा होती. त्यानुसार छत्रपतींच्या घराण्यातील हि परंपरा जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला .

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :-
रामराव चिटणीस विरचित थोरले शाहू महाराज यांचे चरित्र
गोविंद खंडेराव चिटणीसकृत श्री शाहूमहाराज यांची बखर :- विवरणात्मक टीपा चिटणीस बखर
मराठ्यांची बखर ग्रांट डफ
मोगलमार्दिनी महाराणी ताराबाई :- जयसिंगराव पवार
छत्रपती थोरले शाहू महाराज :- आसाराम सैंदाणे
पंत अमात्य बावडा दप्तर
मराठा रियासत खंड ३

Leave a Comment