महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,02,171

सलगर घराणे

Views: 1547
4 Min Read

सलगर घराणे | मातोश्री बयाबाई सलगर –

माणदेशातील सिध्दनाथ  खरसुंडीच्या भागातील करगणी, गोमेवाडी, हिवतड इत्यादी गावाचे वतनदार सलगर होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात पराक्रम गाजविलेले सरदार विठोजी सलगर, सरदार अंगाजी सलगर, बहिर्जी सलगर हे याच घराण्यातील मात्तबर वीरपुरुष होत.सलगर घराणे.

सलगर घराण्याच्या संबंधाने समकालीन मोगल इतिहासकार शहानवाज खान म्हणतो कि, ” सलगर घराणे हे धनगर असून यांचे पूर्वज तुंगभद्रेच्या तीरावरील ‘अनेगोंदी’ येथील आहेत, याच गावाला पूर्वी राजगादी होती. पुढे याच घराण्यातील वंशज विजापूरला येऊन नेमाजीराजे सिंदे यांच्या सैन्यात प्रमुख बनले आणि पुढे चालून मुघलांनी बहिर्जीला सात हजारांची मनसब देऊन ‘राजा वीर बहादूर’ हि पदवी दिली होती. हा बहिर्जी फक्त योद्धा नसून एक साहित्यिक सुद्धा आहे, तो फारसी आणि उत्तरेतील दोआब (मैथिली किंवा भोजपुरी असावी) मधील भाषेत काव्य करतो.”

मराठेशाहीच्या काळात आपल्या पराक्रमाने नावारूपाला आलेल्या अनेक  सरदार घराण्यांमध्ये सलगर या घराण्यातील वीर पुरूषांचा व स्ञीयांचाही समावेश करावा लागेल.

मातोश्री बयाबाई सलगर या एक समर्थ विधवा स्ञी,त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर (बहुदा आगाजी सलगर राजा वीर बहाद्दूर ) त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. इ.स.वी १७२८ च्या शाहूदफ्तरांतील एका पञानुसार (दफ्तर अंक-२,पञ क्र-१७२८) परगणे पालिम व परगणे पोहनेर हे दोन महाल मातोश्री बयाबाई सलगर यांस मोघलाईतून जहागीर असल्याची नोंद सापडते. तसेच, आणखी एक पञ असे: यादी बयाबाई सरगरीण यांस पञ की मौजे बुजरूख परगणे पालीम हा गाव राजश्री यशवंतराव महादेव खासनीवीस याजकडे मुकासा दिल्हा असे. तरी तुम्ही मशारनिल्हेकडून कमाविसदारांचे एकविसी साहित्य करून मौजे मजकूरचा वसुल सुरळीत घेत जाणे म्हणून पञ.

तसेच मातोश्री  बयाबाई सलगर यांनी सातारच्या शाहु छत्रपतींना त्यांच्या सरदाराकडून सलगरांच्या  जहांगीरी मध्ये धामधुम मांडली जायची त्याविरुध्द शाहु छत्रपती यांच्या कडे तक्रार केली असता शाहु छत्रपती यांनी आपल्या सरदारांना तंबी देणारे पत्र दिले ते असे , ” परगणे पालिम व परगणे पोहनेर हे महाल बयाबाई सलगर यांस मोगलाईतून जहांगीर आहे. त्या महालात (तुम्हा ) कडून मनमानी सारखी धामधूम करून वसूल घेतला, तरी त्या महालात उपद्रव करावया प्रयोजन काये ? हे गोष्ट उत्तम न केली. हाली हे आज्ञापत्र सादर केले असे तरी दोही महालास उपद्रव लागो न देणे. तेथील रुपया घेतला असेल तो फिरोन देणे. ये विसी पत्रे.

1 आनंद सोमवंशी सरलष्कर

1 संभूसिंग जाधवराव

सखोजी वागमोडे मुकासा परगणे पोहनेर यांस पत्र जे तहप्रमाणे रास्ती मुकासबाबेचा यैवज होईल तो वसूल घेणे. जाजती उपसर्ग लागू न देणे.

फिरोन बोभाट येऊ न देणे.

पत्रे चैत्र बहुल त्रितिया.

माहे जिलकाद चैत्रमास राक्षस संवतत्सर तेरीख 23 रोज चैत्र बहुल दशमी भानूवासर मु॥ शाहूनगर”

या पत्रावरून मातोश्री बयाबाई सलगर  या तत्कालीन राजकारणातील एक मोठे प्रस्थ होते. दस्तुरखुद्द शाहु छत्रपतींना त्यांच्या पत्राची दखल घ्यावी लागली व आपल्या सरदारांना त्यांच्या महालात धामधूम मांडू नये या विषयी ताकीद दिली.

6 जानेवारी रोजी वाफगाव येथे पार पडलेल्या महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळ्यामध्ये मातोश्री बयाबाई सलगर यांच्या तैलचित्राचे अनावरण महाराज भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते पार पडले. हे चित्र मातोश्री सलगर यांचे वंशजांचा विद्यमाने साकारले आहे.

माहिती संदर्भ :-
सरंजामी मरहट्टे प्रकरण14 राजा वीरबहाद्दूर सलगर घराणे
प्रकरण 18 घराण्यातील कर्तबगार स्त्रिया

लेखक – संतोष पिंगळे.
चित्रकार – शिवराज जगताप

धन्यवाद
मधुकर सर्जेराव हाक्के
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ,सांगली.

Leave a Comment