सालोटा | Salota Fort
महाराष्ट्रात भटकंतीसाठी प्रसिध्द असलेल्या दुर्गजोडीमध्ये नाशीक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेले साल्हेर-सालोटा या किल्ल्यांचा सर्वात वरचा क्रमांक आहे. यातील साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असुन त्याचा उपदुर्ग असलेला सालोटा (Salota Fort) हा उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असल्याने गडप्रेमी त्याला भेट देत असले तरी सालोट्यावर फारसे अवशेष नाहीत या माहितीमुळे त्यांची पावले सालोट्याकडे फारशी वळत नाही. पण हे खरे नाही कारण सालोटा हा देखील अवशेष संपन्न किल्ला आहे. उत्तरेला गुजरात मधील डांगप्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण यांच्या सीमेवर साल्हेर-सालोटा हे दोन्ही किल्ले वसलेले असुन केवळ एका खिंडीने एकमेकापासुन वेगळे झाले आहेत.
सालोटा किल्ल्यावर जाणारी एकमेव वाट या खिंडीतुन गडावर जात असली तरी या खिंडीत जाण्यासाठी मात्र साल्हेर,माळदर, वाघांबे अशा तीन गावातुन वाटा आहेत. या सर्व वाटा शेवटी वाघांबे खिंडीत एकत्र येतात. साल्हेर-सालोटा हि भटकंती एकत्र करावयाची असल्यास वाघांबे गावातुन येणारी वाट सोयीची ठरते. या वाटेने आधी सालोटा करून खिंडीतील दरवाजाने साल्हेरवर जाता येते व साल्हेर किल्ला पाहुन साल्हेरवाडीत उतरता येते. या वाटेने सकाळी लवकर सुरुवात केल्यास कमी श्रमात व कमी वेळात दोन्ही किल्ले एका दिवसात संपुर्णपणे पाहुन होतात.
वाघांबे हे सालोटा किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेले गाव नाशिकपासुन १३४ कि.मी. अंतरावर तर सटाणा या तालुक्याच्या ठिकाणापासुन ताहराबाद मार्गे ४५ कि.मी. अंतरावर आहे. वाघांबे गावात रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या लहानशा सप्तशृंगी मंदिरामागुन साल्हेर-सालोटा मधील खिंडीत जाण्यासाठी वाट असुन गडमाथ्याशिवाय वाटेत पाणी नसल्याने गाडी थांबते तेथील टाकीतुन पाणी भरून घ्यावे. वाघांबे गावातुन खिंडीत जाण्यास दिड तास तर गडावर जाण्यास साधारण अडीच तास लागतात. वाघांबे गावातुन खिंडीकडे पाहिल्यास सालोटा किल्ल्याची उजवीकडील डोंगरसोंड गावाकडे उतरताना दिसते. या सोंडेवरूनच खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. साल्हेरवर जाणारे बहुतेक भटके या वाटेचा वापर करत असल्याने वाट बऱ्यापैकी रुळलेली आहे.
डोंगरसोंडेच्या वरील पठारावर काही उध्वस्त अवशेष दिसुन येतात. या ठिकाणी बहुदा खिंडीतून गडावर जाणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी गडाचे मेट असावे. या वाटेच्या पुढील भागात काही ठिकाणी खडकात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. येथुन सालोटा किल्ल्याकडे पाहिले असता डावीकडे कडयाच्या टोकावर किल्ल्याची तटबंदी, त्यातील बुरुज व किल्ल्याचा दरवाजा दिसुन येतो. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावरून गडावर जाणारा हा मार्ग आज पुर्णपणे उध्वस्त झाला असुन या डोंगरसोंडेच्या खालील बाजुस एक खाच दिसुन येते. केवळ खालूनच नव्हे तर किल्ल्याच्या माथ्यावरून या दरवाजात येणारी वाट आज पुर्णपणे नष्ट झाल्याने वरूनही तेथे उतरता येत नाही. हा दरवाजा केवळ या वाटेवरूनच पहायला मिळतो. खिंडीच्या थोडे अलीकडे वाटेच्या उजव्या बाजुस झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी खडकात कोरलेले लहानसे पाण्याचे टाके असुन या झऱ्यात जानेवारी पर्यंत पाणी असते.
खिंडीत आल्यावर उजवीकडील वाट साल्हेर किल्ल्यावर जाते तर डावीकडील निमुळती वाट सालोटा किल्ल्याच्या डोंगराला डावीकडे ठेवत वर जाताना दिसते. लहान पायवाट व काही ठिकाणी घसारा असल्याने हि वाट सांभाळूनच पार करावी लागते. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर वर पहिले असता कोरलेला कातळ दिसतो. या कातळात वर जाण्यासाठी पायऱ्या व गडाचा पहिला दरवाजा कोरलेला आहे. वाटेत एके ठिकाणी लहानशा सपाटीवर काही उध्वस्त अवशेष दिसतात. या अवशेषात दगडावर कोरलेल्या पादुका तसेच एक शिवलिंग पहायला मिळते. हि सालोटा किल्ल्याची चौकी असावी कारण गडाचा दरवाजा याच्याही वरच्या भागात आहे. सालोटा किल्ल्यावर फारसे भटके जात नसल्याने किल्ल्याची वाट फारशी रुळलेली नाही त्यामुळे वरील पायऱ्यांचा मागोवा घेतच वर जावे लागते. या पायऱ्यावर काही प्रमाणात माती पसरली असली तरी येथुन वर जाणारी वाट आपण आतापर्यंत चढुन आलेल्या वाटेच्या तुलनेत सोपी आहे.
सालोट्याच्या पायऱ्या म्हणजे कोरीवकामाचा नमुना आहे. २-३ फुट उंच व ५-६ फुट रुंदीच्या ७० अंशाच्या कोनात या ५०-६० पायऱ्या कोरल्या असुन वरच्या टोकाला या पायऱ्याना एके ठिकाणी काटकोनात वळवुन दुसऱ्या काटकोनात किल्ल्याचा संपुर्ण दरवाजा कातळात कोरून काढला आहे. किल्ल्याचा हा दरवाजा पश्चिमाभिमुख असुन बाहेरील चौकटीच्या दोन बाजुस कमळाची फुले तर वरील बाजुस गणपती कोरला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्यासाठी कातळात कोरलेल्या दोन मोठया गुहा असुन दरवाजाच्या आत वरील बाजुस असलेला कातळटप्पा कोसळला आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर या कोसळलेल्या दगडावर चढुन आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. येथुन पुढे किल्ल्यावर जाणारी वाट किल्ल्याच्या संपुर्ण पश्चिम भागाला वळसा मारत उत्तरेकडे वळते. कडा तासुन काढलेल्या या वाटेवर किल्याचा घडीव दगडांनी बांधलेला दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. वाट फारशी रुंद नसल्याने या दरवाजा शेजारी पहारेकऱ्यासाठी देवडी न बांधता दरवाजाच्या वरील बाजुस दगडी माळा बांधलेला आहे.
वाटेच्या पुढील भागात उजवीकडे कातळात कोरलेली दोन टाकी असुन यातील एक टाके उघडे तर दुसरे टाके बंदिस्त आहे पण या दोन्ही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे काही अंतरावर खडकात खोदलेल्या उघडया तसेच बंदिस्त तोंडाच्या गुहा दिसुन येतात. गडाच्या पश्चिम भागाला वळसा मारून वाट ज्या ठिकाणी उत्तरेकडे वळते त्या ठिकाणी मोठया प्रमाणात वरील कातळकडा कोसळला आहे. येथील एकुण रचना पहाता या ठिकाणी गडाचा अजुन एक दरवाजा असण्याची शक्यता आहे. पण कोसळलेल्या दगडांचे प्रमाण जास्त असल्याने खालील काहीच दिसुन न येता आपण दगड चढुन किल्ल्याच्या पुढील भागात येतो. येथे उजवीकडे वळलेली वाट आपल्याला कातळात कोरलेल्या दरवाजातुन गडमाथ्यावर नेते तर सरळ जाणारी वाट कपारीत कोरलेल्या दोन टाक्याकडे नेते. या दोन्ही टाक्यात पिण्यायोग्य थंडगार पाणी आहे. हि वाट टाक्याच्या पुढे आपण वाघांबे गावातुन येताना पाहिलेल्या दरवाजाकडे जाताना दिसते पण टाक्याच्या पुढील भागातील कातळ कोसळल्याने पुढे जाता येत नाही.
पाणी पिऊन ताजेतवाने झाल्यावर मागे फिरून गडमाथ्यावर जाणारी वाट धरावी. या वाटेने कातळात कोरलेल्या तिसऱ्या व शेवटच्या पुर्वाभिमुख दरवाजाने आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. दरवाजाच्या आतील बाजुस वर जाण्यासाठी ८-१० पायऱ्या कोरल्या आहेत. गडाचा माथा साधारण त्रिकोणी आकाराचा असुन समुद्रसपाटी पासुन ४५५० फुट उंचीवर पुर्वपश्चिम १० एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावर आल्यावर समोरील उंचवट्यावर न जाता सर्वप्रथम गडाच्या पुर्व टोकाकडे निघावे. वाटेच्या सुरवातीस उजवीकडे गड्माथ्याच्या उंचवट्याखाली खडकात खोदलेले लांबलचक टाके असुन त्याच्या अलीकडे एका मोठया वास्तुचा चौथरा आहे. येथे बहुदा गडाची सदर अथवा किल्लेदाराचा वाडा असावा. पुढे वाटेवर सपाटीवर अजुन एक पाण्याने भरलेले टाके असुन वाटेच्या शेवटी गडाच्या पुर्वेला एक उध्वस्त वास्तुच्या आत मारूतीची शेंदुर फासलेली मुर्ती पहायला मिळते. या वास्तुच्या कड्याकडील भागात मोठया प्रमाणात तटबंदी असुन या तटबंदीवरील फांजी आजही शिल्लक आहे.
तटबंदीला लागुनच असलेल्या एका वास्तुच्या भिंती आजही पहायला मिळतात. या तटबंदीच्या खालील भागात किल्ल्यात येण्यासाठी अजुन एक दरवाजा आहे पण वाट कोसळल्याने तेथे जाता येत नाही. मारुती मुर्ती समोरून माथ्यावरील उंचवट्यावर जाण्यासाठी वाट असुन या वाटेने आपण साल्हेर किल्ल्यासमोर असलेल्या पश्चिम भागात पोहोचतो. येथुन साल्हेर किल्ल्याचे अप्रतिम दर्शन घडते. साल्हेरच्या कोरलेल्या पायऱ्यांची सुंदरता व पिरामिड रूप पहायला सालोट्याला भेट द्यायलाच हवी. सालोट्यावरुन आजुबाजूचा विस्तीर्ण परिसर तसेच गुजरातमधील डांगपर्यंतचा परिसरही नजरेस पडतो. या उंचवट्यावरून गडाच्या पश्चिम भागात उंचवट्याखाली असलेली खडकात खोदलेली पाण्याने भरलेली दोन टाकी व पश्चिम कड्यावरील टोकावर असलेले वास्तु अवशेष दिसतात. उंचवट्यावरुन खाली उतरल्यावर तेथे जाता येते. माथ्यावरुन गडाच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. सालोट्याचा इतिहास साल्हेरशी निगडीत असल्याने त्याचे वेगळे ऐतिहासिक संदर्भ आढळुन येत नाही.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.