महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,582

सामानगड | Samangad Fort

Views: 5521
7 Min Read

सामानगड | Samangad Fort

कोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्र सपाटीपासून २९७२ फूट उंचीवर राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड(Samangad Fort) उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व होते. याठिकाणी सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा ठेवला जात असे. सर्वांत लहान परंतु मजबूत किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख होती. कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे.

१२ व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी ३० एकर क्षेत्रफळातील अंडाकृती आकाराच्या डोंगरावर सामानगड(Samangad Fort) हा किल्ला बांधला. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर १६७६ मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बाधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद आहे. प्रसंगवशात समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना याच किल्ल्यातील असल्याचे वर्णन समर्थ चरित्रात आढळते. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठय़ांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठय़ांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे आधिपती करवीरकर छत्रपती होते.

१८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात गडाचा गडकरी मुंजाप्पा कदम शहीद झाला. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज गावी हलविण्यात आली. शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा सामानगड(Samangad Fort) किल्ला अनेक वर्ष उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते तेव्हा प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता.

संकेश्वरनजीकच्या निडसोशी मठाचे संस्थापक आद्य शिवलिंगेश्वर महास्वामी यांचा जन्म या ठिकाणीच झाल्याची नोंद आहे. या किल्ल्याचे असे ऐतिहासिक महत्त्व असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही. सद्यस्थितीत विहिरीभोवती दगड व सिमेंटचे कठडे बांधलेले आहेत. हा किल्ला पाहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागते. पुणे-बंगळुरू महामार्गावरील संकेश्वर या गावावरूनही येथे जाता येते. गडहिंग्लज वरून भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्या मोठय़ा विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे.

सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. किल्ल्यास १० ते १५ फुट उंचीची भक्कम तटबंदी असून टेहळणीसाठी प्रवेश बुरूज, झेंडा बुरूज, वेताळ बुरूज, शेंडा बुरूज असे लहान मोठे दहा बुरूज आहेत. गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरूनच निशाण बुरुजाकडे जायचे. गिरीमित्रांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे इतर किल्याप्रमाणे याला तटबंदी बुरुज आहेतच पण सर्वात महत्वाचे म्हणजे येथील विहिरी बाराव्या शतकातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ आणि एकमेवाद्वितीय नमुना आहेत. गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी आभुषणे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्या त्यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. अशा प्रकारचा खडक सामानगड वगळता वीस किलोमीटर परिसरात उपलब्ध नाही. तसेच जांभा दगडाचे आगर असलेल्या कोकणातसुद्धा अशा विहिरी आढळत नाहीत. सामानगडावर अशा तीन विहिरी आहेत. विहिरींना बांधीव कठडा नसल्यामुळे लांबून त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. यापैकी सातकमान विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर वैशिष्ट्यपूर्ण आहे.

जमिनीत खूप खोल खोदलेल्या उभ्या आडव्या आणि परत उभ्या अशा तीन अजस्त्र तीन चरी आहेत. त्यापैकी उभ्या दोन चरीमधील अंतर सुमारे ६० फुट इतके आहे. चरींच्या प्रवेशद्वारावर सात भव्य कमानी आहेत म्हणून हिला सात कमानीची विहीर म्हणतात. विहिरीत उतरण्यासाठी पाय-या असुन पाय-यांवर सुंदर कमानी आहेत. पाय-या संपल्यावर भुयार लागते त्यापुढे पाणी लागते. यापुढे आपणास जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते. पारंपारिक कल्पनेला छेद देणाऱ्या या विहिरी आहेत. आज या विहिरीभोवती प्रचंड झाडी असल्यामुळे आणि या झाडांच्या मुळांमुळे विहिरीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत. भविष्यात या भिंती आणि विहिरी ऐतिहासिक ठेवा म्हणून जपायच्या असतील तर याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा एकदा हे सर्व ढासळले तर पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही. अंबाबाई मंदिरापुढे एक घसरत्या पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीत छोट्या कुंडीसारखी आणखी एक चौकोनी विहीर आहे. तिसरी विहीर ‘ अंधार कोठडी ‘ या नावाने आज ओळखली जाते. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. विहिरीत उतरण्यासाठी पाय-या आहेत. विहीर चौकोनी आकाराची आहे.

मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे. कमान बाव पाहून आपण मंदिराच्या मागील पायवाटेने गडाच्या पिछाडीकडील तटावर जायचे. या तटावरून जाताना तटाच्या बाहेर आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे अनेक खांब आपणास दिसतात. तटाबाहेरील जागा किती प्रमाणात खोदली हे प्रमाणित करण्यासाठी जागा खोदताना असे खांब सोडले जायचे. यापुढे आपणास चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंडय़ा बुरूज लागतो. सोंडय़ा बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी उभारली आहे अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये आहे. याशिवाय गडावर दोन बळद म्हणजेच जमिनीखालील कोठारे दिसुन येतात. गड पाहून झाल्यानंतर गडावरून सरळ जाणा-या सडकेने १५ मिनिटांत आपण मारुती मंदिर गाठायचे. या मंदिरासमोर कातळात कोरून काढलेली लेणी आहेत. या लेण्याच्या पाय-या उतरून आत गेल्यावर महादेव मंदिर दिसते. मंदिरात मोठे शिवलिंग व अनेक कमानीदार देवळ्या आहेत. येथून उतरणा-या डांबरी सडकेने पुढे गेल्यावर आपणास भीमशाप्पांची समाधी लागते, येथे स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. सामानगड(Samangad Fort) व आजुबाजूचा परिसर पाहण्यास ३ ते ४ तास लागतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

1 Comment