महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,27,278

संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर

By Discover Maharashtra Views: 7132 4 Min Read

संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर – व्यक्तिवेध –

संभाजी कावजी हा शिवाजी महाराजांचा भालदार होता. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली चंद्रराव मोरे मारला गेला. परंतु चंद्रराव मोरे याचा भाऊ हणमंतराव मोरे हा जावळीच्या खोऱ्यात चतुर्बेट येथे मुक्कामी होता त्यास मारल्याशिवाय जावळीवर असलेला धोका संपणार न्हवता. याकरिता संभाजी कावजी यास हणमंतराव मोरेकडे पाठवले असता संभाजी कावजीनी त्यास ठार मारले. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ हणमंतराव म्हणवून चंद्रररायचा भाऊ चतुर्बेट म्हणून जागा जावळीचा होता. तेथे बल धरून राहिला. त्यास मारल्याविना जावळीचे शैल्य तुटत नाही . असे जाणून संभाजीकावजी म्हणून महालदार राजियाचा होता. त्यास हणमंतराव याजकडे राजकारणास पाठवून , सोयरिकीचे नाते लावून . एकांती बोलाचालीस जावून , संभाजीकावजी याने हणमंतरायासी कट्यारीचे वार चालवून जीवे मारिले. जावळी काबीज केली.

अफझलखान स्वराज्यावर चाल करून आला अश्या बिकट प्रसंगी शिवाजी महाराजांना त्याची भेट घ्यावी लागली. अफझलखान दगा करणार याची खात्री शिवाजी महाराजांना होती . शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत विश्वासू मावळे घेतले. संभाजी कावजी हे देखील त्यामध्ये शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून प्रतापगडास गेले. खानाने दगा करताच शिवाजी महराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. जखमी झालेल्या खानास पालखीतून नेण्यात येऊ लागले. संभाजी कावजी यांनी पालखी वाहणाऱ्या भोयांच्या पायावर वार केले व खानाचे डोके कापून शिवाजी महाराजांकडे आला. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ इतक्यात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले आणि पालखीवाले भोयास पाडिले. खानाचे डोचके कापीले . हाती घेऊन राजीयाजवळ आला.

शिवाजी महाराजांनी त्याच्या धाडसाचे कौतुक करत त्यास चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमले. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी संभाजी कावजी याचा मित्र बाबाजी राम हा शाहिस्तेखानास जावून मिळाला. त्यामुळे शिवाजी महाराज संभाजी कावजीवर रागावले. त्यामुळे संभाजी कावजी नाराज झाला व तो देखील शाहिस्तेखानास जावून मिळाला. शाहिस्तेखानाने त्याचे बळ व शौर्य पाहून त्यास पाचशे स्वरांनसह तैनातीस ठेवले. शिवाजी महराजांनी प्रतापराव गुजराना आज्ञा केली त्यानुसार त्यांनी इ.स. १६६१ मध्ये त्यास ठार केले. ९१ कलमी बखरीतील नोंदीनुसार “ बाबाजी राम याजवर मेहरबानी होती. ते राज्याचार सांगत होते.

बुऱ्हाननजीक भेटले होते. त्याउपर संभाजी कावजी बांदा त्यावरी इतराजी झाली. पारखा होऊन शाहीस्तेखानास भेटला जोरावर होता. घोडा चहू पाई धरून उचलिला. त्याजवरून मेहरबान जाले. मनसफ जाली मौजे मलकर त्या स्थळी गाव बळकट करून ठाणे तेथे घालोन पाचशे स्वरानिसी होता. त्याउपर राजे स्वामिनी प्रतापराव गुजर सरनौबत फौज पाठवून ठाणे मारून संभाजी कावजी युद्ध करता पडला. शके १५७९ मन्मथ नाम संवत्सरे वैशाख वद्य दशमी सोमवार मुक्काम ठाणे मंलकर.

संभाजी कावजी यांची संभाव्य समाधी पुण्यातील चीखलवडे या गावी परंपरेनुसार दाखवली जाते

कावजी कोंढाळकर :-

कान्होजी जेधे व बांदल देशमुख यांच्यातील वैरातून झालेल्या युद्धात कावजी कोंढाळकर यांचे भाऊ पोसाजी ठार झाले. कान्होजी जेधे यांनी कावजी कोंढाळकर यांना आश्रय दिला.

कावजी कोंढाळकर यांणा अफझलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांच्याकडून मागून घेतले. कावजी कोंढाळकर देखील प्रतापगड युद्धात असावेत. जेधे शकावितील नोंदीनुसार “ कान्होजी जेधे यांजपासून कावजी कोंढाळकर , वाघोजी तुपे यास मागोन घेऊन हशमाच्या हजारीया सांगितल्या.”

शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला त्यावेळी मोगलांचा सरदार बुलाखी देइरी किल्याला वेढा घालून बसला होता . शिवाजी महाराजांच्या आज्ञानुसार कावजी कोंढाळकर यांनी त्याच्यावर हल्ला केला व वेढा मोडून काढला . जेधे शकावितील नोंदीनुसार “ देइरी गडास बुलाखीने येऊन वेढा घातला तेथे कावजी कोंढाळकर जावून चारशे लोक मारून वेढा काढला. “

संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर ह्या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. संभाजी कावजी यांच्या नावापुढे कोंढाळकर असे लावले जाते संभाजी कावजीकोंढाळकर परंतु त्यास काही संदर्भ नाही.

संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १.
सभासद बखर , ९१ कलमी बखर , जेधे शकावली.

श्री. नागेश सावंत

Leave a Comment