धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०० –
बाडीतील आपल्या घरी परतलेल्या अण्णाजींनी प्रथम गोदावरीला जनानी दालनात बोलावून ठीक जबानीवर घेतले. “तुझ्या नि युवराजांच्या गाठीभेटी झाल्या?” पगडीचा लाल रंग अण्णाजींच्या डोळ्यांत उतरला. गोदावरीने खाली घातलेली मान डोलावली. तिच्या डोळ्यांवाटे धारा सरसरू लागल्या.
“शरम नाही वाटत?” अण्णाजी तिच्यावर जबानीची वीज ओढत कडाडले. “माझं ऐकावं. मला…” भरल्या डोळ्यांत जीव गोळा करून गोदावरी बोलायला गेली.
“चूःप, गळ्यातल्या मंगळसूत्राची तरी लाज धरायची होतीस तू? खबरदार या उंबऱ्याबाहेरे कदम पडलं तर.” तिच्याकडे बघणे असह्य झालेले अण्णाजी तरातर दालनाबाहेर पडले. गदगदलेली गोदावरी गुदमरू लागली. दालनाच्या दगडी भिंतीवर तिने अहेव कपाळ दोन – चारदा असह्य कोंडीने आपटले. त्यावरचा टिळा विसकटू लागला.
“नखशिखा’ दालनात बंदिस्त झाली. चांदणवेल काळ्या ढगांनी येरगटून गेली. रायगड जनानी मनसुब्यात दस्त झाला. आता गडावरच्या लोकांना गोदावरी दिसेनाशी झाली. ‘युवराजांनीच तिला गडावरून हलविली आहे. आपला कसूर झाकण्यासाठी त्यांनी हे विपरीत केलं आहे.’ अशा विचित्र अफवा गडावर पसरल्या. सोयराबाईंचा चाकरनामा त्यासाठी पद्धतशीर खपू लागला. महाराणींच्या महाली अण्णाजींची ये – जा वाढली. गोंधळलेल्या अण्णाजींना काय करावे ते सुचत नव्हते. सोयराबाई गोदावरीला भरीला घालण्याची मसलत नाना ढंगांनी त्यांच्या गळी उतरवू बघत होत्या.
थोरल्या महाली आपल्यासंबंधी काहीतरी प्राणघातक शिजते आहे, याचा युवराजांना सुगावा लागला. त्यांनी आपले खबरगीर अण्णाजींच्या घराभोवती आणि “थोरल्या महाला”वर पेरून टाकले. एकच एक विचार संभाजीराजांना स्वस्थ बसू देईना. ‘आता बाई अण्णाजींच्या घरी राहणे धोक्याचे आहे. आमच्या व तिच्या दृष्टीनेही. तिला कैचीत पकडले जाणार आहे. तिला अण्णाजी आणि थोरला महाल यांपासून वेगळे केले पाहिजे. पण हे घडावे कसे? भरल्या घरातून एका विवाहित स्त्रीला ताब्यात घ्यावे कसे?’
बेचैन, हैराण झालेले संभाजीराजे आपल्या महाली अस्वस्थ पायफेर टाकीत होते. मध्येच थांबून दगडबंद छताकडे बघताना काही सुचेनासे झाले की, धीर येण्यासाठी “जगदंब, जगदंब’ असे पुटपुटत टपुटत होते. विचित्र कोंडीने महालात ते आणि ब्राह्मणवाडीत गोदावरी जखडली होती. कुठल्याही क्षणाला ही बाब छत्रपती महाराजांच्या कानी पडणार होती. मासाहेब सोयराबाई काय योजून अण्णाजींच्या भेटी घेताहेत हे कळत नव्हते. ताण दाटत होता. पेच सुटत नव्हता.
सोयराबाईंनी गोदावरीला वर्दी धाडून बोलावून घेतले होते. आता काय पिकणार? जगदंबाच जाणली तर जाणू शकणार होती.
“धाकलं सरकार, थोरल्या म्हालाकडची चंद्रा कुणबीण सुरनिसाच्या वाड्यावर ग्येलिया. बाड्यावरन मेणा निघालाय. मेण्यात बसल्याली बाई बालेकिल्ल्याकडं थोरल्या म्हालातच यायला निघालिया.” खबरगिराने महालात येऊन पेश केलेली खबर ऐकताना युवराजांचे मन असंख्य शंकांनी ढवळून निघाले.
जखमी वाघासारखे संभाजीराजे पाठीशी हात बांधून फेऱ्या टाकू लागले. काही – काही सुचत नव्हते. बाब अंदाजापार चाललीय. त्यांना वाटले, तडक उठावे नि मासाहेबां समोर उभे राहून याचा जाब विचारावा. आलेला खबरगीर पुढच्या आज्ञेची वाट बघत खोळंबलाय याचेही त्यांना भान राहिले नाही. स्वत:शीच काहीतरी योजून बाहेर पडताना त्यांनी खबरगिराला आज्ञा केली
– “जा, थोरल्या महालाची मिळेल ती खबर टाकोटाकीनं आमच्या कानी पडली पाहिजे. गफलतीस माफी नाही.” मुजरा टाकीत खबरगीर निघून गेला. निर्धारी, बांधल्या मुद्रेने संभाजीराजे देवमहालाच्या रोखाने चालू लागले.
त्यांना येताना बघून देवमहालाचा सरंजामी पोतराज कमरेत झुकत सामोरा आला. त्याच्याकडे ढुंकूनही न बघता कठोर, जरबी आवाजात युवराज म्हणाले, “आम्हास देवमहाल एकान्ती पाहिजे. आईस साकडे घालणे आहे. निघून जा.” आखीवर हत्तीच्या सोंडेचा, कल्पना नसता तडाखा बसताच माहुताची व्हावी, तशी सुन्न आणि कठोर अशी धाकल्या सरकारांची मुद्रा बघून पोतराज चरकला, मुकाट बाहेर निघून गेला खेचल्यासारखे, दगडी पुतळ्यागत संभाजीराजे चालले. नंदादीपाच्या उजेडाचा भंडारा अंगभर फासून, डोळे विस्फारून, अंगावर चालून आल्यासारख्या दिसणाऱ्या अष्टभुजा भवानीच्या डोळ्यांशी त्यांचे सुत्त डोळे जोडले गेले. त्या जगज्जननीच्या सर्वसंहारक आगतेजी डोळ्यांचे त्यांना तिळभरही भय वाटत नव्हते. कसल्यातरी न कळणाऱ्या नात्याच्या अधिकाराने त्यांचे मन तिच्याशीच हट्टावर आले होते.
तडक जाऊन तिचे आठी हात गदगदा हलवावेत, तिला विचारावे, “एवढे अहोरात्र तुझ्याभोवती पाजळले पोत नाचत असताना तुला काहीच कसं नजरेला येत नाही!”
समोरच्या नचे रोखलेले डोळे त्यांना पालटताना (दिसू लागले. क्षणात ते कमळकळ्यांसारखे लागले. एकरोख, अचल नजरेने सं – धाकटे छत्रपती त्या डोळ्यांना निरखू लागले.
“आ ऊ साहेब!’ मनाच्या खोलवटातून एक अनावर उमाळा उसळून आला. जगदंबेचे त्रिकाल साक्षी डोळे त्यांना थोरल्या आऊसाहेबांच्या डोळ्यांसारखे दिसत होते! त्यांचे सुतपण विरघळू लागले. मनाची कवाडे खडाखड उघडू लागली. “त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका! ” कुठूनतरी राजेबोलाचे एक मोरपीस गरगरत त्यांच्या रोखाने आले. जिजाऊंच्या बोलीभाषेत. कावरे-बावरे होत त्यांनी देवमहालभर मान फिरविली. पोत, पालखी, पलंग, परडी आईच्या सरंजामाच्या चारी बाजूंच्या वस्तूच जशा नाचत म्हणत होत्या – “त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका!”
युवराजांचे राजस मन होलपटू लागले. सगळे अंतरंग गदगदून आले -“आऊसाहेब, तुम्ही – तुम्हीच पाहिजे होतात आज! कसं सोसावं? काय कराव? तुम्हालाच विचारलं असतं. नाही बाकी सारे सोसले असते आम्ही. हे ताकदी बाहेर आहे आऊसाहेब. त्यांचं समाधानच होणार आहे, हे कळतं तर थोरल्या महालाच्या मासाहेबांसमोर हाती पोत घेऊन आमचं शिवगंध आम्ही त्यावर धरून दावलं असतं! आऊ, आम्ही कैचीत फसलोय. या जगदंबेच्या साक्षीनं सुचतंय तेच करणार आहोत. विश्वास ठेवा, तुमच्या पायाची आण आम्हास आहे. आम्ही निधडेपणी जे करू ते ती आण स्मरूनच.” संभाजीराजांनी डोळे मिटले. आता त्यांचे मन स्थिर, शांत झाले होते. छातीचा भाता निश्वयी विश्वासाने तुडुंबला होता. त्यांनी तबकातील बेलफुलांची ओंजळ अष्टभुजेच्या चरणी वाहिली. परडीतील भंडाऱ्याची मूठ तिच्या उग्रमंगल रूपावर उधळली. मळवट भरून घेत, तिला पाठ न दाखविता मागच्या पावलांनी झुकते होत, ते देवमहालाबाहेर पडले. आता जे काही त्यांनी मनी बांधले होते, त्याला गडावर कोणीच रोख देऊ शकत नव्हते.
आपले कारभारी महादेव यमाजी यांना युवराजांनी बोलावून घेतले. त्यांना दोन सूचना केल्या – “आमच्या हुजराती फौजेकडचे दहा – बारा शिलेबंद धारकरी जरोरीनं आमच्यासमोर रुजू करा. हुशारीचे पटाईत आणि घोडाईत शेलके निवडून धाडा. तुम्ही खुद्द जातीनं गड उतरून पाचाडवाडीत एक जीनकसली घोडदळी तुकडी सिद्ध ठेवा. तुमच्या पाठीनंच आम्ही गड उतरून येणार आहोत.”
महादेव यमाजी ‘जी’ म्हणत झुकत युवराजांच्या महालाबाहेर पडले. एका खिदमतगाराने लोखंडी जाळीचे बख्तर तबकातून उचलून संभाजीराजांच्या पाठीशी होत, त्यांच्या कसदार, भरल्या अंगावर चढविले. दुसऱ्याने केसरी वाणाचा झगझगत्या जरीकामाचा जामा त्यावर बसविला. मनगटी पोहच्या आवळल्या. ढालीचा भक्कम थाळा युवराजांच्या पाठीला भिडवून तिचे वाद छातीशी करत संभाजीराजांच्या हाती दिले. त्या वादांची पक्की गाठ युवराजांनी छातीवर आवळली! कमरेला शेला कसला. डोकीचा सफेद जिरेटोप उतरून तबकात ठेवला. तबकातील केसरी टोप उचलून मस्तकी धारण करताना त्यांना हातातील सोनकडे मागे – पुढे झाले. सरळधोप, जडशीळ तलवारीचे म्यान त्यांनी कमरेला आवळले. उंच गडकोटावर जन्मलेला तो साक्षात रुद्र सिद्ध झाला. येईल त्या वादळाला तोंड द्यायला. उंचावर राहणाऱ्यांना केव्हाही वादळाला तोंड द्यायला सिद्धच असावे लागते!
साज चढवून मोकळे झालेले खिदमतगार चार पावले पाठीशी होत अदब धरून क्षणभर रेंगाळले. युवराज संभाजीराजांनी त्यांना जाण्याचा इशारा भरण्यासाठी हातपंजा उठविला. ते जायला निघाले. त्यांतला एक पळभर अडखळला. त्याला आपल्या धाकल्या छत्रपतींना सांगावेसे वाटले – “मळवटीच्या आईच्या भंडाऱ्याचा इस्कोट झाल्यागत दिसतोय, धाकलं धनी. जरा दरपानाला दरशान दिऊन जावं जाताना!” पण ते प्रत्यक्षात बोलण्याची त्याची छाती काही झाली नाही.
एकटे-एकटे संभाजीराजे विचारांची भिंगरी फोडायला चकरा टाकू लागले. महादेव यमाजींनी पाठविलेल्या शिलेदार धारकऱ्यांची तुकडी मुजरा भरत पेश झाली. ते तगडे जवान बघताना युवराजांचा चेहरा उजळून निघाला. भागानगरपर्यंतच्या दौडीतले ते मर्दाने होते. बांधल्या, शांत आवाजात संभाजीराजे त्यांना मनाचा हेत – बेत सांगू लागले. धारकरी ते कान देऊन ऐकू लागले.
थोरल्या महालावर देख ठेवणारा खबरगीर आला. खबर देत म्हणाला, “म्हाल शाप बंदिस्त झालाय धनी. खबर उचलाय वाव न्हाई. काय करायचं म्होरं?” क्षणभर संभाजीराजे स्तब्ध झाले. मग ठरवून म्हणाले, “आता खबरीची गरज नाही. बाई बाहेर पडली की, पापणी मिटायच्या आत आम्हाला वर्दी दे.”
रायगड वरून शांत होता. नगारखान्यावरचा जरीपटका मावळवाऱ्यावर लहरत होता. क्षण – क्षण कुणालाही कल्पना येणार नाही, अशा अज्ञाताची भली भक्कम कवाडे खोलत होता. युवराजांचा मनसुबा कानी पडलेले त्यांचे निधडे, हुकमाचे बंदे धारकरी बाहेर पडले. फुटकळ झाले. एक – एक करत नगारखान्याच्या भव्य दरवाजाजवळ येऊन पांगून जागा धरून राहिले.
तिकडे सात महालांपैकी थोरल्या महालाच्या दरवाजातून संगमरवरी मूर्तीसारखी दिसणारी गोदावरी अण्णाजींच्या मागून बाहेर पडली. डागण्या दिल्यावर होईल, तशी तिची मुद्रा व्याकूळ दिसत होती. आपले निष्पाप मन ती ना अण्णाजींना, ना राणीसाहेबांना पटवू शकली होती. तिला दोषी ठरवूनच अभयासाठी पाठीशी घालण्याचा थोरपणा फारा कौशल्याने सोयराबाईंनी केला होता. तिला आता महाराजांची परवानगी घेऊन अण्णाजी त्यांच्या भेटीला नेणार होते. ती काहीच बोलणार नव्हती. बोलणार होते अण्णाजी. ती फक्त मान डुलवणार होती.
गोदावरीला मेण्यात बसलेली बघून अण्णाजी फडाच्या रोखाने निघून गेले. मेणा नगारखान्याच्या रोखाने चालू लागला. त्याच्या दुहाताने अण्णाजींचे दोन धारकरी हाती नंग्या तेगी पेलत चालले. भोयांनी दुडकी चाल धरली.
मेण्याची वर्दी मिळालेले संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. त्यांची मुद्रा ताठर, कठोर होती. जसा त्यांच्या राजचर्येचा भाजता पोतच तयार झाला होता. झडणाऱ्या मुजऱ्यांकडे त्यांचे ध्यान नव्हते. झपाझप चालत ते नगारखान्याच्या भव्य दरवाजाजवळ आले. त्यांची धारकरी माणसे त्यांना बघून कमरेत झुकली. रानचे तरस एकवट होतात तशी एकवट झाली.
हातीचे थोपे मागे-पुढे झुकवीत भोयांनी गोदावरीचा मेणा नगारखान्याच्या दरवाजाबाहेर घेतला मात्र, चहूबाजूंनी त्याला संभाजीराजांच्या धारकऱ्यांचे भक्कम कडे पडले. हातपंजा उठवून इशारतीची आज्ञा देणाऱ्या साक्षात संभाजीराजांनाच सामने बघून भोयी थांबले. मेणा थोप्यावर पेलता ठेवून त्यांनी अगोदर मुजरे भरले. मेण्याच्या पडदेबंद खिडकीजवळ होत धाकटे छत्रपती संभाजीराजे राजबोलीत, अधिकारी भाषेत म्हणाले, “आम्ही युवराज बोलतो आहोत बाई. तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे!! डर – भय बाळगू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही – आम्हास आमच्या थोरल्या आऊसाहेबांची आण आहे.”
अण्णाजींच्या धारकऱ्यांना तिकडे केव्हाच बगलेला काढण्यात आले होते.
“उठाव!” त्या एकाच जरबी शब्दाने भोयांना घाम फुटला. थोपे अलग करून त्यांनी त्या जागी खांदे दिले. ज्या रोखाने युवराजांची तर्जनी उठली होती त्या आघाडी मनोऱ्याकडे मोहरा करून त्यांनी मुकाट दुडकी चाल धरली. बेभान संभाजीराजे आघाडीला झाले. नंग्या तेगीच्या वळ्यात चाललेला तो मेणा रायगडाची व्यापारपेठ उजव्या तर्फेला तशीच सोडून मनोऱ्याकडे निघाला. भेटणारी चुकार माणसे, मेण्यात बालेकिल्ल्याकडची खाशी स्वारी असावी म्हणून त्याला मुजरे देऊ लागली. महादरवाजा मागे पडला. संभाजीराजांचे धारकरी भोयांना एकही पाऊल लटका पडू देत नव्हते. लहाना दरवाजा पार करून मेणा पाचाडात उतरला. वाडीच्या वेशीवरच ठाण झाला. महादेवपंतांनी सिद्ध ठेवलेले घोडाइतांचे पथक युवराजांची वाटच बघत होते. त्यांनी घोडी हारीने पुढे घेतली. त्यातल्या चुनेवाणाच्या एका घोड्याचे कायदे संभाजीराजांनी आपल्या हाती घेतले. जनावर मेण्याजवळ आणले.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १००.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.