महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,76,264

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०१

Views: 1360
10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०१ –

“बाई, मेणाउतार व्हा.” पडद्याकडे बघून युवराजांनी आज्ञा केली. म्यानातून धारी तलवार बाहेर पडावी, तशी गोदावरी बाहेर आली. तिची मान वरच उठत नव्हती. तोफेचे भांडे फुटते तसे काळीज फुटून जातेय की काय, असे तिला वाटत होते. सारी जाण सुन्न झाली होती तिची.

“बैठक घ्या.” घोड्याच्या रोखाने संभाजीराजांनी हात उठविला. अंगावर वीज पडल्यागत गोदावरी थरारली. हे तिला जमणारे नव्हते. कसे सांगावे, तेही तिला कळेना. तिची अडचण लक्षात येताच संभाजीराजे घोटाळले. एवढ्या निर्धाराने पार पडलेल्या मनसुब्यावर पाणी पडणार म्हणून चरकले. लागलीच काही योजून त्यांनी मनोमन निर्णय घेतला. डोळ्यांचे पाते लवायच्या आत त्यांनी त्या चुनेवाणी घोड्यावर झेप घेतली. कायद्यांना झटका देताच ते उमदे जनावर ऊर उचलून पुढचे खूर अधांतरी करीत खिंकाळले. गोदावरीला वळसा घालून संभाजीराजांनी तिला घोड्याच्या उजव्या तर्फेला टाकली. तिच्या ध्यानीमनी नसता एका बलदंड भुत्याच्या निर्भाव हाताची पकड तिच्या कमरेभोवती पडली. दुसऱ्याच क्षणी ती संभाजीराजांच्या घोड्यावर खेचली गेली. जनावराला वर्मी कळ यावी, अशी टाच बसली. घोडा दौडू लागला. त्याचा माग धरून घोडाइतांचे पथक उधळले. धूळलोट उसळले. वादळी वाऱ्यालाही मागे टाकेल असा तो वेताळाचा नायक, रायगडाचा रुद्र दौडू लागला, लिंगाणा किल्ल्याच्या रोखाने.

रायगडचा जोडकिल्ला असलेल्या लिंगाण्याचा पायथा आला. बाईला लिंगाण्यावर आणण्यात आले. आपल्या इमानी धारकऱ्यांच्या चौकीपहाऱ्यात तिला एका कोठीत बंदिस्त ठेवून तिचा निरोप घेताना संभाजीराजांना भरून आले. तिच्या तोंडाकडे बघण्याचा धीर त्यांना झाला नाही.

केवड्याच्या झळाळ पात्यासारखा दिसणाऱ्या तिच्या पायांच्या पंजावर नजर ठेवून ते म्हणाले, “तुम्हाला इथं आणलं म्हणून आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी दुसरा इलाज बाकी राहिला नाही. तुम्ही आमच्या ‘कैदी’ आहात. आमच्या महाराजसाहेबांसमोर तुम्हाला आणि आम्हालाही उभे राहावे लागेल. तेव्हा आई जगदंबा आणि जगदीश्वर कौल देईल तसे करा. कुणाच्याही भीड – भरीला तुम्ही बळी पडणार नाही, असा आमचा विश्वास आहे. आम्ही युवराज आहोत तरीही आमच्या हातून तुमची ही जनानी कैदी घडली यासाठी तुमचे शरमिंदे आहोत. शक्‍य झाल्यास त्यासाठी आम्हाला माफ करा. येतो आम्ही.”

जे समजून केले त्यासाठी खंत, पश्चात्ताप करण्याचे कारण नाही, असे ठाम ठरवूनच युवराज संभाजीराजे लिंगाणा उतरू लागेल. इकडे रायगडावर हाहाकार उठला होता. एवढे धीराचे अण्णाजी, पण पायांखालची वाळू सरकल्यासारखे ते हवालदिल झाले. लज्जेने तोंडाशी उपरण्याचा शेव धरून ते आपल्या वाड्याकडून महाराजांच्या खासेवाड्याकडे चालले. त्यांनी मनोमन कसलातरी निर्णय केला होता. ज्या गडावर ते इतकी वर्षे इतमामाने राहिले होते तोच त्यांना क्षणात परका वाटू लागला.

“स्वामी, आम्हास सेवेतून मुक्त करून निरोपाचे विडे द्यावेत.” राजांच्या कानी मनचा सल घालताना खालमानेच्या अण्णाजींच्या डोळ्यांतून आसवे टपटपली. खालच्या रुजाम्यात ती एकजीव झाली. सारा महाल एकान्ती होती. अण्णाजी कसल्या अग्नीने पोळून बोलताहेत तेच छत्रपती महाराजांना कळेना.

“मतलब?” महाराजांनी नजर अण्णाजींच्या पगडीवर फिरली.

“स्वामी स्वामी” अण्णाजींना बोलवेना. लहान मुलासारखे ते जागच्या जागीच गदगदू लागले. आपले तोंड ओंजळीतल्या उपरण्याने त्यांनी झाकून घेतले. छत्रपती ते बघताना चरकले. बैठक सोडून उठले. चमत्कारिक साद त्यांच्या तोंडून बाहेर उमटली – “सुरनी स.” आजवर अण्णाजींचे हरपलेले मंत्रिपणाचे भान जागे झाले.

त्यांनी आपला हुंदका मुश्किलीने रोखता केला शांत, संथ चालीत महाराज अण्णाजींच्या जवळ आले. तेवढ्या वेळात त्यांनी काय बोलावे हे योजून घेतले होते. अण्णाजींच्या खांद्यावर गुलाबी हात – तळवा चढवीत महाराजांनी विचारले, “अण्णाजी, माणसं आम्हाला कंटाळतात. पारखी होतात. नेताजी झाले, प्रतापराव झाले, संभाजी कावजी झाला. आम्हाला त्यांच्या मनीचे सल कधीच कळू शकले नाहीत. तुम्ही ती संधी तरी आम्हाला देताहात. बोला, अण्णाजीपंत, आमचा काय कसूर घडतो, म्हणून सावलीसारखी असलेली माणसं आम्हाला पारखी होतात. आम्हाला एकदा ते कळू द्या तरी!”

त्या प्रत्येक बोलाने अण्णाजींनी मुश्किलीने रोखलेला उमाळा पुन्हा वर खेचला गेला. जी नजर स्वामींच्या भगव्या मोजड्यांवर जोडलेली असायची, ती एकाएकी वर उचलली गेली. ते आपले सारे कढ क्षणभर विसरून गेले. पगडी डोलवीत अण्णाजी राजांच्या स्फटिक शिवलिंगा सारख्या सत्त्वतेजी मुद्रेकडे बघतच राहिले.

“नाही. स्वामी कसूर आपला नाही. कुणाचाच नाही. असलाच तर तो आमच्या कमनशिबाचा आहे. आम्हाला निरोप द्यावा.” अण्णाजींनी झुकून छत्रपतींच्या मोजड्यांना हाताची बोटे भिडविली “तुमच्या तोंडीची कमनशिबाची ही भाषा ऐकायला मासाहेब पाहिजे होत्या अण्णाजी.” जिजाऊंच्या आठवणीने राजे विचारगत होत थांबले. त्यांनी धीराने भोगलेले आणि परतविलेले नशिबाचे फेरे राजांना आठवले.

“अण्णाजी, जायचंच ठरविणाऱ्याला आई भवानीही रोखू शकत नाही. फक्त त्याचे सही कारण आम्हांस सांगून जा. काय झाले म्हणून हा डाव अर्धामुर्धा सोडून तुम्ही मोहरा पालटताहात? बोला.” छत्रपतींनी अण्णाजींचे खांदे आवेगाने हलविले.

“स्वामी, जीभ उठत नाही आमची. परब्रह्माचे आम्ही खाल्लेले चार घास आपल्या कृपेमुळेच मिळाले आहेत. त्याची जाण सुटत नाही. आमची कसलीच तक्रार नाही.

कुणाचाच कसलाही कसूर नाही.” अण्णाजींना बोलणे सुधरेना “तक्रार नाही म्हणता म्हणजेच तक्रार गंभीर आहे. कसूर नाही म्हणता मतलब कसूर जबर आहे. सुरनीस, आम्ही छत्रपती या नात्यानं तुम्हास आज्ञा करतो आहोत – तुम्ही चाकरीची मुक्ती का मागता, ते कुलदैवताच्या साक्षीनं आम्हास साफ – साफ सांगावं.”

राजांचा आवाज बदलत – बदलत दरबारी झाला.

रस्सीखेचीला पडलेले अण्णाजी घुटमळले. कसलातरी प्रचंड विश्वास त्या “सुरनीस’ या शब्दांतून त्यांना मिळून गेला. डोळे शेवाने टिपत, उपरण्याचे काठ दोन्हीवमुठींत घट्ट पकडून अण्णाजी सिद्ध झालेल्या निर्धारी स्वरात म्हणाले, “आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे महाराज. त्यासाठीच आम्हाला चाकरीतून मुक्तता मिळावी.”

“साफ बोला. काय झालं? कुणी लुटलं तुमचं सर्वस्व?” छत्रपती सावध झाले.

“महाराज, महाराज, क्षमा असावी – युवराजांनी!”

“अ ण्णा जी!” पोताचा चटका बसावा तसे राजे चरकले.

“काय – काय केलं युवराजांनी, अण्णाजी?” कयास नसलेली वाट धरण्यासाठी राजांचे मन धडपडू लागले.

“क्षमा असावी स्वामी. त्यांनी केलं आहे, ते आपल्यासमोर बोलतानाही आम्हाला शरम वाटते. आम्ही अभय मागतो.”

“अभय दिलं अण्णाजीपंत. सांगा युबराजांनी काय केलं?” छत्रपतींची मुद्रा बांधली जाऊ लागली. कपाळपट्टीवर जाणवण्यासारखी शीर उमटून आली.

“महाराज, खुद्द आमच्या घरची, घरपणासाठी आलेली नात्याची सुबासिन युवराजांनी गडाबाहेर काढली. आम्हाला कुणालाच तोंड दाखवायला जागा नाही. आम्ही सर्वस्वी लुटले गेलो आहोत. हे पाय सोडणं जड जातं. तरी आम्हाला निरोप द्यावा.” अण्णाजी खाली राजांच्या पायांशी गुडघे टेकून बोलतच होते. त्यातील एकही शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोहोचत नव्हता.

“सुवबासिन गडाबाहेर काढली’, हे ऐकताच राजांचे उभे अंग संतापाने थरथरले. श्वास चढीला पडला. नाकाच्या बळत्या शेंड्यावर घामाचे तुषार गोळा झाले. प्रचंड खंत आणि अनावर संताप यांच्या कोंडीत सापडलेला त्यांचा रक्ताचा कण अन्‌ कण थरथरत त्या लोखंड लाल, संतप्त राजमुद्ेवरून द्रेवरून शब्दांच्या ठिणग्या उसळल्या,

“अण्णाजी, हेच कारण असेल, तर गडच काय कदाचित हे जगही सोडावं लागेल. पण ते तुम्हाला नव्हे – संभाजीराजे भोसल्यांना! श्रींच्या नावे चाललेल्या दरबारी तुम्हास काटेकोरीनं न्याय मिळेल. विश्वास ठेवा.” छत्रपती अंत:पुराकडे एकान्तवासासाठी चालले.

मुजऱ्यासाठी झुकलेल्या अण्णाजींच्या कानी समोरून चाललेल्या राजपुरुषाच्या टोपाच्या हिंदोळत्या मोतीलगातून ओघळत आल्यासारखे बोल मात्र बाहेर पडल्याशिवाय राहहेले नाहीत – “तुम्ही मात्र राजांना पारखण्यात आता केलीत तशी गफलत पुन्हा कधी न करणे!”

घामाघूम झालेले संभाजीराजे रायगड चढून आले. त्यांना आठवत होते तेव्हापासून असा प्रसंग त्यांच्यावर कधीच आला नव्हता. गडाच्या कारखानदारीतील माणसे त्यांना बघून नेहमीप्रमाणे कमरेत झुकत नव्हती. त्यांतील कितीतरी नजरा चक्क तिरस्काराने भरलेल्या दिसत होत्या. कितीतरी अनुकंपेने भिजलेल्या होत्या. पण कुठेच आदराचा भाव त्यांना दिसेना. रायगडाहून नेहमी ठेंगणे वाटणारे आकाश त्यांना आता आपल्या टोपाला भिडल्यासारखे भिववू बघत होते. त्या उभ्या, नांदत्या, राबत्या गडावर एकाच गोष्टीने पुन्हा बांधून टाकले. नगारखान्यावरचा जरीपटका नामसर्पी वेटोळी फेकत लहरत होता, त्यामुळे.

जेवढ्या तडफेने रायगड उतरून ते लिंगाण्याकडे दौडले होते, तेवढीच आता त्यांची पावले मणामणाचे साखळदंड जखडल्यासारखी जडशीळ पडू लागली. एकाच विचाराने की – ‘आज पहिल्याने आम्हाला आमच्या वर्तणुकीबद्दल महाराजसाहेबांसमोर सफाई द्यावी लागणार.’

होय. ते आपणहून महाराजांच्या खासेवाड्याकडेच चालले होते. त्यांच्या कानी घडले ते सारे घालण्यासाठी. ते देतील ती आज्ञा मानण्यासाठी. सातमहालातील सोयराबाईंच्या “थोरल्या महाला’वर अत्यंत जळजळीत नजर टाकून न ते खासेवाड्याकडे वळले. त्यांच्या संगती कुणी नव्हते. त्यांना आपले एकटेपण कधी, ते जाणवले.

महाराजांच्या खासेमहालाचा दरवाजा ते ओलांडू लागले, तेव्हा खंडोजी दाभाड्याने त्यांना मुजरा देत आपली जबाबदारी पार पाडली – “खाशांचा हुकूम हाय. म्हालाचा राबता समद्यांस्री बंद हाय!” संभाजीराजांनी त्याने आडवा घातलेला भाला त्याच्याकडे न बघताच मनगटी तडाख्याने बाजूला सारला.

ज्या न कळणाऱ्या नात्याने ते देवमहालात जगदंबेशी हट्टाला पडले होते, तसल्याच नात्याने ते आपल्या आबासाहेबांशी हट्टाला पडणार होते. आज मोठ्या धैर्याने मासाहेब सोयराऊंच्या पायगुंतवा करणाऱ्या वागणुकीचा पाढा ते आपल्या छत्रपती पित्यासमोर वाचणार होते. इतके दिवस रोधलेला बांध आज फुटणार होता.

मिर्झा रजपुतांच्या गोटात ओलीस राहणारे, मथुरेत एकटेच मागे राहताना मागे न कचरणारे, भागानगरपर्यंत दौड घेणारे युवराज संभाजीराजे आपल्या आबासाहेबांच्या पायांवर डोके ठेवून म्हणणार होते – “तुम्हीच आमच्या आऊ आणि आबा आहात. आता रायगडी राहणे नको वाटते. आम्हाला स्वारीसाठी बरोबरच ठेवून चालवावे. आमचे युवराजपदी पायी टाकले आहे. ते आमच्या रामराजांना देऊन त्यांना दरबारी महालात सोनपायरीवर बसते करावे. आग्ऱ्यात ज्या मोजड्या आम्ही उचलून आपल्यासमोर ठेवल्या त्याच आम्हाला बक्षाव्या. आम्हाला त्याच सर्वांहून मोलाच्या आहेत. एकच मागणं मागावं म्हणतो आम्ही. आम्हाला समजून न घेणारे गडावर कुणीच नाही. यासाठी जसे निरोप घेताना मथुरेत आम्हाला पोटाशी धरलंत तसंच धरावं. आमचं मन जाणणाऱ्या थोरल्या आऊसाहेब आम्हाला कानभर हिताच्या गोष्टी सांगून गेल्या आहेत. फक्त आपला हात आमच्या पाठीशी सदैव असावा.”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment