महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,289

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०२

By Discover Maharashtra Views: 1355 11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०२ –

“महाराजसाहेब.” वाड्याच्या अंत:पुराच्या बंद दरवाजावर संभाजीराजांच्या कडेधारी हाताची थाप पडली. दरवाजा उघडला नाही. उघडणार नव्हता. उघडू शकत नव्हता! आत स्वराज्याच्या कामी आजवर खर्ची पडलेल्या असंख्य जिवाशी बांधील राजेपण ठरवून बंदिस्त झाले होते. छत्रपती महाराज प्रथम छत्रपती होते. नंतर पिता, पती, भाऊ होते. राजांना रक्ताची नाती नसतात. राजआसंदी चढतानाच ती त्यांना मोहोरबंद करून ठेवावी लागतात. त्या बंद दरवाजासमोर संभाजीराजांचे डोळे भरून आले. कुणी आम्हाला मुजरा केला नाही. आम्हास कुणी आपलेसे करणार नाही!

“ठण ठण ठण !” जगदीश्वराच्या चौकआवारातील सांज आरतीसाठी झडणाऱ्या घंटांचा नाद खासेवाड्यात घुसला. बंद दरवाजाबाहेर संभाजीराजांना आणि आत मंचकावर सर्चिंत बसलेल्या महाराजांना कैलासवासी मातुश्री जिजाऊसाहेबांची आठवण रोखता आली नाही. एकमेकांना दिसले, कळले नाही; पण त्यांच्या हाताची बोटे जाऊन छातीला भिडली होती. आत महाराजांच्या मनी विचार उठून गेला – “मासाहेब, आमच्यावरचा हा प्रसंग बघायला आज तुम्ही नाहीत ते एकपरीनं ठीक आहे. तुमच्यानं मुलाकडून नातवाचा निवाडा बघवला नसता.’

बाहेर संभाजीराजांच्या मनी विचाराने काहूर केले – “थोरल्या आऊ, तुम्ही आज हव्या होतात. सारे दरवाजे बंद असताना आम्ही तुमच्याच पायांशी आलो असतो. तुमच्या “शंभूबाळ’ या एकाच सादेनं कैक रायगड उरावर पेलण्याचं बळ आम्हाला लाभलं असतं! युवराज संभाजीराजे त्या दरवाजासमोरून परतले. त्या क्षणाबरोबरच मराठी मसनदीचे भाग्य परतले. भोसले कुळीची राजस नाती परतली. सत्यच सत्याला पाठमोरे होऊन, नियतीच्या फसगती बरोबर माघारी परतले.

आपल्या महालात आलेल्या आरोपित संभाजीराजांवर महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाईना आणि येसूबाईनाही त्यांची भेट घेणे शक्‍य झाले नाही. काळवट रात्र पाचाड खोरीला घेर टाकत उतरली. तिने तीन जीव वेगवेगळ्या मनःस्थितीत बंदिस्त झालेले बघितले. लिंगाण्यावर गोदावरी संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असह्य राजेपणाच्या, कुणालाही दिसू, उमगू न शकणाऱ्या जीवघेण्या बंदिवासात!

रायगडाच्या हयातीतील दुसरा काळा दिवस उजाडला. राजमाता जिजाऊ गेल्या तो पहिला आणि दुसरा – आज भरल्या दरबारी आरोपित संभाजीराजांची सिंहासनाधिष्ठित छत्रपतींसमोर सुनावणी होणार होती. आकृति – सावलीसारखे असलेले ते पितापुत्र येईल त्या सत्याला निडरपणे सामोरे जाणार होते. महाराजांची भेट घ्यावी म्हणून पुतळाबाई, सरलष्कर हंबीरराव, येसूबाई यांनी आकांती खटपट केली होती, पण त्यांना यश आले नाही.

“युवराजांना तोफेच्या तोंडी दिले जाणार.” या वार्तेने माणूसन्माणूस भयकातर झाले होते. रात्र – रात्र विचारांनी होलपट केलेले संभाजीराजे ‘प्राणांती सजा’ झालीच, तर त्यासाठी मन बांधून सिद्ध झाले होते. हवालदिल माणसांची रीघ दरबारी महालाकडे लागली. कुणीच काही बोलत नव्हते. म्हणता – म्हणता दरबारी चौक मानकऱ्यांनी भरून गेला.

राजपेहराव धारण केलेले महाराज देवमहाली शांत चित्ताने आई भवानीच्या मूतीसमोर उभे होते. मूकपणे डोळ्यांनीच तिच्याशी त्यांचे उदंड बोलणे झाले. बेलफुलांची जळ तिच्या संन्यस्त चरणांवर अर्पून तो मराठ्यांचा योगी राजा देव महालाबाहेर पडला. एक – एक धीमे राजपद सिंहासनाकडे जाण्यासाठी पडू लागले. उचलत्या प्रत्येक पावलांबरोबर एक – एका नात्याचा, तोडायला अवघड जाणारा बंध आपोआप गळून पडू लागला. एकाएकी त्या योगी चरणांना सर्वांत जिव्हाळ्याच्या जनाती नात्याच्या बजचुड्यांची आर्त हाकेबरोबरच मिठी पडली – “आबा.”

महाराज देवमहालाबाहेर पडण्याची वाट बघत बाहेरच्या दगडबंद भिंतीला लागून राजस्रुषा येसूबाई उभ्या होत्या. तेवढे मोजकेच क्षण त्यांना युगासारखे फरफटून घेऊन गेले होते. असह्य कढाने, पित्याची माया देणाऱ्या महाराजांच्या पायांना त्यांनी मिठी घातली होती. आपल्या सौभाग्याचे दान घेण्यासाठी. बरच्या आभाळाएवढ्या राजपुरुषाचे बांधून घेतलेले मनही पळभर डळमळले. उसळू बघणारा भावउमाळा रोधण्यासाठी छत्रपतींनी क्षणभर डोळे मिटून घेतले. त्यांचेच बोल नको त्या क्षणी त्यांच्या सेवेला रुजू झाले – “सूनबाई, तुम्हांस बघितले की, आम्हाला आमच्या आऊसाहेबांची याद येते!”

ज्या पदरात महाराजांनी स्वहस्ते जोखमीची शिक्के – कट्यार सोडली होती, तोच पदर पसरून सूनबाईंनी देवीच्या दरवाजात त्यांना गाठले होते. त्यांच्या रूपाने जशा मासाहेबच काही बोलू बघत होत्या. त्या विचाराने राजे शिवाजी कळवळले. तसेच पुढे जाण्यासाठी ओढ घेणारे त्यांचे मन अडखळले.

“सूनबाई” छत्रपतींचा कडेधारी थरथरता हात येसूबाईंच्या पाठीवर गेला. त्या स्पर्शातील थरथरीने येसूबाई अंगभर हमसल्या. “उठा. शांत व्हा.” राजांनी त्यांना उठते केले. बोलावे म्हटले तरीही येसूबाईंच्या गळ्यातून शब्द फुटेना. जे सांगायचे होते, ते त्यांचे हमसणेच सांगत होते.

“आमचं ऐका. शांत व्हा.” बोलातील जाणते धैर्य मरणाच्या दारातील दुबळ्या जिवालाही निर्धारी करणारे होते.

“खरंच तुम्हाला बघितलं की, मासाहेबांचीच याद येते! तुम्ही तशाच आहात. या क्षणी गडावर आम्हाला समजून घेणाऱ्या एकट्या तुम्ही – तुम्हीच आहात.” क्षणभराची स्तब्धता आपोआप उतरली. “येसू. मासाहेबांना भुलू नका. याहून बिकट प्रसंगातून त्या कैकवार गेल्या, पण त्यांचा पदरकाठ नाही चळला. कुळाला साजेल असे तेवढे थोर धैर्य गडावर फक्त तुमच्यातच आहे. विश्वास ठेवा. तुमच्या सौभाग्याला हात घालण्याचं कर्म जगदंबेनं आमच्या हातून घडविलंच तर… तर पुन्हा म्हणून आम्ही त्या सिंहासनावर दिसणार नाही! हयातभर तुमच्या सेवेसाठी रुजू होऊ. तुम्हाला मासाहेब मानूनच!

“आता आमच्या हातून काही घडू नये, यासाठी त्या जगदंबेला साकडं घाला. आम्ही ते घालून आलो आहोत.

“मुली, डोळे पूस. तुला – आम्हाला डोळे आहेत, ते जगदंबेचे! ते पाझरून नाही चालत. येतो आम्ही.” शांतपणे येसूबाईचे खांदे हळुवार थोपटून महाराज चालले.

तेवढ्याच शांत पावली येसूबाई बाई देवमहालात चालल्या. या क्षणी त्यांना कुणीही पाठमोरे पाहिले असते तर जिजाऊ गेल्या आहेत, हे त्याला खरेच वाटले नसते!

तिकडे दरबारच्या राणीवशात महाराणी सोयराबाई येऊन दाखल झाल्या होत्या. काहीतरी योजून त्यांनी आज रामराजांना संगती आणले होते. त्यांच्याखेरीज सात महालाकडली कुणीही जननी असामी त्या राणीवशात आली नव्हती. सिंहासन चौथऱ्यावरील सोनखांब धरून मोरोपंत, दत्ताजी, प्रल्हादपंत, हंबीरराव, रघुनाथ पंडित आदी सात मंत्री खडे होते. फक्त सुरतीस अण्णाजी दत्तोंचा खांब रिकामा होता. फिर्यादी असल्याने आज ते त्या जागी उभे राहू शकत नव्हते. समोरच्या दरबारी चौकात ते खालच्या मानेने उभे होते. चौथऱ्याच्या उजव्या तर्फेला असलेला, सुवर्णी दंडावरच्या मत्स्यमोर्चेलावर मढविलेला भला – मोठा, ढंगदार, सोनेरी मासा, माणकाचा लालबुंद डोळा रोखून भरल्या दरबारावर देख देत होता.

चौकातील हजारी कारंज्याचे पाणी उसळी घेऊन जरीबतूसारख्या तारांचा फुलोरा फुलवीत, पुन्हा भोवतीच्या हौद्यात कोसळत होते. छताकडून झोल टाकीत वळलेले, जागजागीचे झिरझिरे पडदे गडवाऱ्याने शहारत होते. पूर्वाभिमुख सुवर्णी सिंहासनाच्या हातदांडीत मुरून बसलेले सिंह खुल्या जबड्यांमुळे ते ‘सिंहासन’ आहे, हे पटवीत होते. त्यावरच्या छत्राच्या घेराला ओळंबलेल्या सुवर्णी झुरमुळ्या मंद लडलडत होत्या.

नेहमीच्या शिरस्त्याची शिंगाची कातरी ललकारी सरसरत दरबारी महालभर फिरली. तिला धरून नगारखान्याची नौबत दुडदुडली. सोनेरी गुर्थब घेतलेला गुर्शबारदार सिंहासन चौथऱ्यावर आला. गुर्झबी दांडा आपटत त्याने अल्काबाची हरळ दिली – “राजभरियाविराजित, सकळगुणमंडित, क्षत्रिय कुलवतंस गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशहा, श्रीमान छत्रपती शिवाजीमहाराज!”

हाच अल्काब तिवार झाला. ‘अदब अदब’ म्हणत गुर्झबारदाराने जहालीची अंतिम समज भरल्या दरबाराला दिली. त्याने दिलेल्या सोनेरी फरसबंदावरच्या ठोक्याने न्यायतुलेची पारडी कळणार नाहीत, अशी शहारली. एकमेकांचा श्वास ऐकू पडावा असे काही क्षण दाटत, थबकत गेले. पाठोपाठ मैनाक पर्वताच्या शिखरावर पक्षिराज गरुड चढलेला दिसावा तसे, त्या झळझळीत सोनेरी चौथऱ्यावर छत्रपती महाराज दिसू लागले.

त्यांच्या दर्शनाबरोबर उभा दरबार लपकन कमरेत झुकला. आपल्या दरबारी प्रजेला आशीर्वादासाठी म्हणून महाराजांनी हात उठविला. राणीवशातून सोयराबाईंनी पाठविलेले रामराजे चौथऱ्यावर येऊन आपणाला मुजरा करताहेत, हे महाराजांना कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा क्षणभर ते घोटाळलेच. मान न वळविता म्हणाले, “पंत, बाळराजांना तुमच्या तर्फेस उभे करून घ्या!”

“जी.” मोरोपंत पुढे झाले. त्यांनी रामराजांना आपला हात देत आपल्या शेजारी घेतले. ते बघताना झिरझिऱ्या पडद्याआडच्या सोयराबाईंच्या मानेला झटका बसला. युवराजांच्या मोकळ्या पडलेल्या सोनपायरीच्या जागेवर स्वारी बाळराजांना हसत बसती करील, असा त्यांचा गैरअंदाज होता!

महाराजांनी सिंहासनाला वंदना दिली. त्याला पायांचा स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेत छत्रपती सिंहासनारूढ झाले. बाकदार भगव्या मोजडीचा उजवा पाय चरणासनावर विराजला. हातपंजा उठवून महाराजांनी दरबारी कामाकाजाला सुरुवात करण्याची आज्ञा मंत्रिगणांना दिली. दोन्ही बाजूंनी शुभ्र फुलोऱ्याच्या चवऱ्या सिंहासनावर मंद ढळू लागल्या.

आज एकदम आघाडीलाच  सुवराज आरोगत म्हणून दरबारसामने येऊ नयेत, अशी इच्छा असलेल्या सरलष्कर हंबीररावांनी, कोरे होत झुकून आपल्या फौजेकडच्या काही मागण्या पेश केल्या. हात उठवून छत्रपतींनी त्यांना ‘मंजुरी’ दिली. चौथऱऱ्यासमोरच्या होद्यासारख्या बैठकीत बसलेल्या चिटणीस बाळाजींनी शहामृग पीस फिरवीत, त्याची नोंद करून घेतली.

कुठल्यातरी दरबाराकडून गडावर आलेल्या नजराण्याची दोन तबके पेशवे मोरोपंतांनी “आपली करण्याची’ विनंती छत्रपतींना केली. त्यांतील एक तबक रिवाजाप्रमाणे युवराज संभाजीराजांना आले होते! महाराजांनी आपले तबक हस्तस्पर्श देऊन स्वीकारले. युवराजांचे तबक, ते बैठक घेत होते, त्या जागी तसेच ठेवण्यात आले. वेळ जात होता. ते ध्यानी येताच महाराजांनी न्यायाधीश प्रल्हादपंतांना समज दिली, “न्यायाधीश, तुमच्या तर्फेचे कामकाज दरबारी रुजू करा.”

प्रल्हादपंत ‘आज्ञा’ म्हणत झुकले. उभार दरबार धनुष्याची कमान ताणली जावी तसा ताणावर पडला. “आरोपित युवराजांना पेश करा.” प्रल्हादपंतांनी आपल्या न्याय खात्याच्या धारकऱ्यांच्या सुभेदाराकडे बघत आज्ञा केली.

राणीवशाच्या बगलेकडून दरबारात येणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर सगळ्या मानकऱ्यांचे डोळे जखडून पडले. क्षणाक्षणाने आतली असंख्य काळजे थडथडली. चहूबाजूंनी दहा हत्यारबंद धारकऱ्यांनी घेर टाकलेले आरोपित युवराज संभाजीराजे भोसले “श्रीं’च्या न्यायकठोर सिंहासनासमोर आणले जात होते. अंगी केसरी जामा, मस्तकी तसाच झगमगता टोप, कपाळी रोखलेले शिवगंधाचे ठसठशीत पट्टे, छातीवर रुळलेली चौसष्ट कवड्यांची माळ, कमरेला ठिपकेदार किरमिजी मांडचोळणा, दोन्ही हातांची मनगटे निळ्या शेल्यात बांधलेले संभाजीराजे दरबारात येत होते. त्यांची पुष्ट गर्दन ताठ होती. डोळे कसल्यातरी निर्धारी तेजाने तळपत होते.

अनवाणी पाय खालच्या पायघडीवर भक्कम पडत होते. गुहेतून बाहेर पडलेल्या ऐन भरीच्या छाव्याचे ते निडर रूप होते! त्यांना तसे बघताना दरबारी मानकऱ्यांतील कित्येकांचे ओठ रिवाज विसरून चुकचुकले. त्यांच्या फौजेकडच्या काही मानकऱ्यांनी त्याही स्थितीत त्यांना अदबमुजरे रुजू घातले. धारकऱ्यांनी आरोपिताला सिंहासनाच्या थेट सामने उभे करून नंगी पाती कपाळाला भिडवीत हटत आपापल्या जागा घेतल्या. मराठ्यांच्या जागी राजासमोर त्याचा रूपपराक्रमी फर्जंद आरोपित म्हणून उभा ठाकला! जिजाऊंच्या ‘सिऊबा’ राजांसमोर त्यांचे “शंभूबाळ’ गुन्हेगार म्हणून पेश झाले!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment