महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,362

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०३

Views: 1374
10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०३ –

भवानीच्या थोरल्या पातीच्या भुत्यासमोर धाकल्या पातीचा भुत्या “’चुकार’ म्हणून खडा झाला! आज आबासाहेबांसमोर त्यांचे ‘शंभूराजे’ हे असे जगदंबेने उभे केले. छत्रपती महाराजांसमोर तो मानी युवराज दोषी म्हणून पेश झाला! आकृतीसमोर सावलीच न्यायदानासाठी खडी ठाकली. विशाल आभाळासमोर उगवतीचा सर्जा सूर्यच आरोपित म्हणून खडा ठाकला!! सोडला तर श्वासानेही भंगेल अशी शांतता दरबारभर पसरली. आणि क्षणातच आर्त जिव्हाळ्याच्या सादेने ढवळून निघाली. “दादामहाराज!” सिंहासन चौथऱ्यावर मोरोपंतांच्या बगलेला उभे असलेले पाच वर्ष उमरीचे रामराजे भयचकित झाले होते!

पिळवटल्या काळजाने आणि भरल्या डोळ्यांनी संभाजीराजांचा भरदार ऊर दाटून आला. जाम्याच्या वादांची छातीवरची गाठ उचलली गेली. त्यांना बाटले – ‘असंच तरातर चालत पुढं जावं. बाळमहाराजांना पायऱ्या उतरवून छातीशी कवळावं; उचलून, मांडलेल्या तबका शेजारी आपल्या नेहमीच्या जागी बसवावं.’

“पंत, बाळराजांना त्यांच्या महाली पावते करा.” महाराजांनी मोरोपंतांना समज दिली. लगबगीने पुढे होत मोरोपंतांनी रामराजांना पिछाडीच्या मार्गाने बाहेर काढले. महाराजांच्या खाजगी कारभाऱ्यांच्या हवाली त्यांना सुपुर्द करून मोरोपंत पुन्हा आपल्या पंतप्रधानी स्तंभाजवळ येऊन हात बांधून उभे राहिले. आपल्या जागेवर ठेवलेल्या नजराण्याच्या तबकावर नजर खिळलेल्या संभाजीराजांना एका विचाराने सुत्रपण आले – ‘त्या जागी बैठक घेताना कधी ध्यानीमनीही आलं नाही की, केव्हातरी हे असंही इथं उभं राहावं लागेल! दाटली शांतता कशी फोडावी हे न सुधारल्याने प्रल्हादपंत गोंधळले होते.

“न्यायाधीश, आरोपितास समज द्या. दरबारचा रिवाजी मुजरा रुजू झालेला नाही!” छत्रपतींची मान नागफण्यागत ताठ झाली. आवाज जरबी कठोर झाला. ते बोल कानी पडलेले संभाजीराजे क्षणभर इकडे – तिकडे बघत कावरेबावरे झाले. पंतांनी समज देण्यापूर्वीच हात बांधले असल्याने कमरेत झुकूनच त्यांनी अदबमुजरा घातला. महाराजांची गर्दन ते बघताना सुमार झाली. त्यांनी बगलेला पडलेला विषय पटावर घेतला.

“आरोपितावरचे आरोपपत्र दरबारास पेश करा न्यायाधीश.”

“जी. आज्ञा.” प्रल्हादपंत, न्यायाधीश नात्याने आरोपपत्र वाचू लागेल –

“आरोपित रा. रा. संभाजीराजे बिन – बिन…” प्रल्हादपंत महाराजांसमोर त्यांचा नावनिशीने उल्लेख कसा करावा, या पेचाने अडखळले!

“वाचा.” सिंहासनाने त्यांच्या जिभेचा खोडा काढून टाकला.

“आरोपित रा. रा. संभाजीराजे बिन सिवाजीराजे भोसले, उमर वर्षे अठरा, हाली राहणार किले रायगड.” प्रल्हादपंत वाचू लागले –

“तुम्हावरी फिर्यादी रा. रा. अनाजीपंत बिन दत्तोजी प्रभुणीकर सुरनीस – किले रायेगड, उमर वर्षे अजमासे पन्नास, हाली राहणार किले रायेगड यांची वहिमी फिर्याद ऐसी जे – ” सर्वांत कटू काम करण्यापूर्वी प्रल्हादपंतांनी एकदा श्वास घेतला. उपरण्याने घाम टिपला.

“तुम्ही फिर्यादीचे नात्यातील कबिल्याकडील घरपणासाठी आलेल्या गोदावरी नामे करून असलेल्या सवाष्ण स्त्रीचे बळमर्दीने किल्ले रायेगडावरून हरण केले आहे. सदरील स्त्री हाली तुमचे कब्जात म्हणून किल्ले लिंगाण्यावर असे.” प्रल्हादपंत थांबले.

“पेशी केली फिर्याद तुम्हास मंजूर?” महाराजांनी अण्णाजींना विचारले.

“जी.” मुजरे देत अण्णाजी खालच्या मानेने म्हणाले.

“आरोपित संभाजीराजे, तुम्हास आरोप मंजूर?” महाराजांचे डोळे रोखले होते. त्यांना आजवर दरबारात कोणी कधी दिली नव्हती, अशी भेट नजर आज संभाजीराजांनी

“नाही! आम्हास आरोप साफ नामंजूर आहे!” युवराजांच्या तोंडून तासासारखे ठणठणीत बोल उठले.

“मतलब? बाई तुमच्या कब्जात नाही?” महाराज क्षणभर गोंधळले.

“जी. आहे!” आज संभाजीराजांनी गर्दन खाली होतच नव्हती.

“मग आरोप नामंजूर काय म्हणून?” ती बावनकशी राजपात्रे एकमेकांना थडकू लागली. ठोस शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या.

“बाई आमच्या ‘कब्जा’त नाही – कैदेत आहे! आम्ही तिचे “हरण’ केलेले नाही. तिला राजरोस आमच्या कैदेत घेतले आहे.” संथपणे जाब आला.

“कोण हेतानं? कोण अधिकारात?” विचारांचा, गुंतवा  अनावर झाल्याने महाराजांनी वळलेली मूठ राजआसनाच्या हातदांडीवर उतर

“मतलबी माणसांचा तिला आमच्याविरुद्ध भरीला घालण्याचा मनसुबा होता म्हणून – आमच्याशी संबधित असलेली बाब भलत्या थराला जाणार होती. म्हणून युवराजांच्या अधिकारात आम्ही बाईला कैदेत घेतले आहे. छत्रपती महाराजांचे फर्जंद या नात्याने. भोसल्यांना प्रसंगी प्राणाचे मोल देऊन इज्जत जपावी लागते, हे स्मरून, संभाजीराजे भोसले या नात्याने आम्ही बाईला कैदेत घेतले आहे.” सारा दरबार ते बेडर, जळजळीत बोल ऐकताना चक्रावून गेला. सगळीकडे चुळबुळ माजली.

“कोण मतलबी माणसं? कसला मनसुबा?” महाराजांच्या मूळशोधी सवालाने दरबार चिडीचाप झाला. साऱ्यांचे जीव कानांत एकवट झाले.

संभाजीराजांनी पेटती नजर एकवार राणीवशाच्या झिरझिऱ्या पडद्यावर फिरली. रामराजे आणि थोरल्या आऊसाहेब यांच्या आठवणीने घशाशी आलेले शब्द घोटाळले. असह्य शांतता दाटून पडली.

“आम्ही विचारतो – कोण माणसं तुमच्या खिलाफ बाईस भरीला घालू बघणारी? कसला मनसुबा होता त्यांचा?” महाराजांची जरब वाढली. आता पहिल्याने संभाजीराजांची गर्दन खाली झुकली. मान डोलवीत ते म्हणाले, “नाही – महाराज आम्ही त्यांचे नाव या दरबारी इथं घेऊ शकत नाही!”

“मग तुमची सफाई खडी होऊ शकत नाही.” तेवढाच निर्धारी प्रतिबोल सिंहासनावरून उठला. सुटू घातलेला कथला पुन्हा गुंतत चालला.

“महाराज, क्षमा असावी. या फिर्यादीचे सुनावणीचे कामी खुद्द बाईलाच दरबारी पेश होण्याची आज्ञा व्हावी. अभय देऊन तिच्या तोंडूनच खऱ्याखोट्याची शहानिशा व्हावी, असं आम्हास वाटतं.” सरलष्कर हंबीररावांनी ऐन क्षणी युवराजांच्या मनी घोळणारी सफाई रुजू घातली. राणीवशाच्या पडद्याआडून दोन जळजळीत डोळे आपल्याकडे तिरस्काराने रोखले गेले आहेत, हे काही हंबीररावांना कळले नाही!

“नाही बाई माणसाला भरल्या दरबारी पेश होण्याची आज्ञा करणे, आम्हास रास्त दिसत नाही.” अण्णाजी दत्तो प्रथमच बोलले. लगबगीने बोलले. “अण्णाजी, आरोपित म्हणून खुद्द युवराज या भरल्या दरबारी आणण्यात आले आहेत हे तुम्ही विसरताहात!” छत्रपतींनी त्यांना दुरुस्त केले.

“पंत, बाईला अभय देऊन दरबारी पेश होण्याची समज द्या. जातीनं तुम्ही हे काम हाती घ्या.” महाराजांनी पेशवे मोरोपंतांना आज्ञा केली.

“जी.” ती उचलली गेली.

“आरोपित संभाजीराजे, तुमचे निर्दोषपण दरबाराला जाहीर होईपर्यंत कमरेची युवराजपणाची तलवार आणि भोसले कुलाची शान असलेली कवड्यांची माळ अंगी वागविण्याचा तुम्हास कोण अधिकार आहे?” महाराजांच्या रसरशीत सवालाने दरबार थरकला.

संभाजीराजांचे बांधले हात झटका बसावा, तसे कवड्यांच्या माळेला जाऊन भिडले. डोळ्यांत कातरपणा गोळा झाला. आता मात्र ते पिळवटून म्हणाले, “ना ही! आमची वाटल्यास गर्दन उतरली जावी!”

“खामोश!” छत्रपती ताडकन सिंहासनावरून खडे झाले. दरबार चरकला. काय घडेल, ते आता कुणालाच सांगता येणार नव्हते. युवराजांची हजारो इंगळ्या डसल्यासारखी मुद्रा बघताना फक्त एकाच निधडया छातीच्या वीराला येईल ते संकट पेलण्याची तयारी ठेवून जबान खोलावीशी वाटली, सरलष्कर हंबीरराव मोहित्यांना.

“महाराज, क्षमा असावी. युवराजांचे दोषीपण सिद्ध झाल्याखेरीज ती माळ साक्षात जगदंबेलाही त्यांच्या अंगावरून उतरविता येणार नाही! आम्हाला विश्वास आहे, ते सिद्ध झालं तर माळ सत याय रवी युवराज बोलल्या प्रमाणं गर्दनच उतरवून ठेवतील!”

महाराजांची नजर ल्या हंबीररावांच्या इमानी पाठीवरून फिरली. त्यांनी दरबार उलगल्याची इशारत देण्यासाठी हातपंजा उठविला. सगळे मानकरी कमरेत झुकले.

संभाजीराजेही झुकले. त्यांनी मान वर केली तेव्हा चौथऱ्यावर महाराज नव्हते. एक – एक करीत जाणाऱ्या मंत्र्यांपैकी हंबीररावांच्या पाठीवर त्यांची नजर कृतज्ञपणे जखडून गेली. राणीवशाच्या पडद्यावर थरथरत्या वळ्या उठून जात होत्या. तिकडे देवमहालात जगदंबेच्या मूर्तीसमोर माथा टेकलेल्या सूनबाई येसूबाईंच्या पाठीवरून पुतळाबाईचा थरथरता हात सांत्वनासाठी अजूनही फिरतच होता!

गोदावरीला आणण्यासाठी लिंगाण्यावर गेलेले मोरोपंत रिकाम्या हातांनी आणि खिन्न जड मनाने परतले. जिथून कुणीच आणि कधीच परतू शकत नाही अशा दरबारात गोदावरी जाऊन पोहोचली होती!

चौबाजूंनी अंगावर धावून आल्यासारख्या मनातल्या वादळी विचारांनी गोदावरी कातर, हैराण झाली होती. तिचे देखणे, नाजूक स्त्रीपण विजेसारखे कठोर, चपळ झाले होते. आपले तोंड कुणालाही दाखवूच नये, हा विचार एका निर्धारी क्षणाला तिने बांधून घेतला. निसर्ग – विधीचे निमित्त करून ती संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कड्यातून कोठीबाहेर पडली, लिंगाण्याच्या एका उंच कातळटोकावर उभे राहून तिने आपल्या श्वेत नेसूचा पदर खोचला. हात जोडून, डोळे मिटत कुलदेवतेचे स्मरण केले. डोळे उघडून खाली बघताना तिला खालची खोल खाई जगदीश्वराच्या शांत पिंडीसारखी वाटली. आपल्या देहाचे बिल्वदल त्यावर अर्पावे या अनावर आवेगानिशी तिने आपला नखांपासून शिखापर्यंत, पवित्र असलेला परंतु असंख्य मानसिक यातनांनी घायाळ झालेला देह समोर झोकून दिला.

तिच्या विखुरल्या देहाचे मिळतील ते अवशेष भिल्लांना दरीत उतरवून मोरोपंतांनी वर काढले. तिचे प्रेत लिंगाण्याच्या पायथ्याशी वस्त्राने झाकून… ही काळीजतोड खबर महाराजांच्या कानी कशी घालावी, या विचारात मोरोपंत परतले होते. त्यांनी आणलेल्या वार्तेने अवघा रायगड विचित्र, दाटल्या शोकसागरात बुडाला. कुणालाही ती वार्ता ऐकताना काही बोलता येईना. गोदावरीने आपल्या कृतीने साऱ्यांचीच जबान बंद करून टाकली होती. संभाजीराजांच्यावरचे चौकीपहारे उठविण्यात आले.

मोरोपंत, हंबीरराव, प्रल्हादपंत यांच्या सोबतीत छत्रपती आपल्या वाड्याबाहेर पडले. भोयांनी सामोरी आणलेली पालखी त्यांनी हात – इशारा देऊन नाकारली. गड उतरण्यासाठी ते पायीच चालले.

पाचाडात उतरताच महाराजांनी पागेकडची घोडी जीन कसून सिद्ध ठेवण्याची सैसला आज्ञा केली. चालत जाऊन प्रथम जिजाऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सैसने सिद्ध केलेल्या घोड्यावर मांड घेतलेले छत्रपती महाराज लिंगाण्याच्या रोखाने दौडू लागले. त्यांच्या मागून त्याचे सोबती मंत्री आणि निवडक धारकरी दौडू लागले. साऱ्यांसह महाराज वस्त्राच्छादित गोदावरीच्या प्रेताजवळ आले. मोरोपंतांनी आगेवर्दी दिल्याप्रमाणे लिंगाण्याच्या पायथ्याला चिता रचण्यात आली होती. धारकऱ्यांनी गोदावरीचे प्रेत चितेवर ठेवले. चितेला चूड देण्यात आला. महाराज चितेवर चढलेल्या सतीकडे रोखल्या नजरेने बघतच राहिले.

“पंत, या सतीचे वृंदावन सिद्ध करण्यास आबाजी महादेवांना सांगा.”

छत्रपतींनी मोरोपंतांना सांगितले. वळते होत इतरांना कळायला अवघड असलेला तो राजा जनावरावर मांड जमवून दुडकक्‍्या चालीने दौडू लागला. रायगडाच्या भवानी टोकावर उभे असलेले संभाजीराजे लिंगाण्याच्या पायथ्याशी दिसणाऱ्या जळत्या चितेकडे सुत्नपणे बघत होते. ती दूरवर दिसणारी पेटती चिता त्यांच्या काळजाला कातरत होती. एक चांदणवेलीसारखी सतेज स्त्रीच, हातात पूजेचे तबक घेऊन चालत येत होती. ती निर्भय, प्रकाशरूप स्त्री थेट युवराज संभाजीराजांच्या समोर येऊन थांबली. युवराजांच्या मोजड्यांवर रोखलेली तिची नजर वर उठत नव्हती. अंगावर सौभाग्यवाण असलेल्या त्या सतीच्या तोंडून बोल आले – “खूप सोसावं लागलं युवराजांना आमच्यासाठी. शक्‍य असल्यास त्यांनी आम्हाला माफ करावं!”

डोळे विस्फारलेल्या संभाजीराजांच ओठ स्वत:लाच समजावल्यासारखे पुटपुटत होते – “नखशिखा! नखशिखा!!”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०३ –

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment