धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०४ –
गोदावरी गेली. कधीही न पुसता येणारा एक सल युवराजांना देऊन. ती गेली आणि सोयराबाईंच्याबद्दल संभाजीराजांच्या मनी केळणीसारखी एक आढी बसली. प्रसंग पडल्यास या मासाहेब कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा जीवघेणा अनुभव त्यांना येऊन चुकला. घडल्या घटनांनी वर्मी दुखावलेल्या युवराजांना कसे जवळ घ्यावे, हा पेच महाराजांना पडला. गोदावरीच्या निमित्ताने आपल्या इमानाच्या निष्ठा अण्णाजींना राणीसाहेबांच्या पायी टाकाव्या लागल्या होत्या. आता त्या परतू शकत नव्हत्या. झाल्या प्रकारचा विचार करून-करून श्रांत झालेले संभाजीराजे ख्वाबगारात मंचकावर लेटले होते. त्यांचा डोळा लागला होता. पायगतीला बसून येसूबाई त्यांचे पाय चेपीत होत्या. निळ्याभोर आकाशात क्षितिजकड फोडून काळ्या ढगांची एक लांबट झड उतरावी तशी सुख झालेल्या संभाजीराजांच्या सतेज कपाळावर झोपेतच आठी उमटली. तिला धरून सगळी चर्या डाग दिल्यागत आक्रसून आली. लयीच्या श्वासात फेर पडला. चंद्रकांत मणी पाझरून यावा, तशी घामथेंबांनी सगळी चर्या फुलून आली आणि येसूबाईंचा भीतीने थरकाप उडावा असे कुणालातरी आकांतानं थोपवायला चालल्यासारखे –
“थांबा! थांबा!” असे ओरडत, संभाजीराजे झोपेतच फेकल्या गोफणीसारखे ताडकन उठले. सारे अंग थरथरत होते त्यांचे. पोसाने त्यांची चर्या पुसता – पुसता येसूबाईनी थरकत्या जिव्हाळ्याने विचारले, “कोण धास्तीचं ओरडणं झालं हे….” काहीच जाब न देता युवराजांनी विचार वारण्यासाठी मानेला एक झटका दिला. त्यांना स्वप्न पडले होते! दिवसाढवळ्या, भयानक!
येसूबाईंनी दिलेल्या पाण्याचा पेला त्यांनी ओठांआड केला. त्यांना सावचित्त झालेले बघून येसूबाई हलकेच बोलल्या, “बाहेर सदरी दालनात कविराज खोळंबलेत.”
मानेवरचे केस तसेच रुळते सोडून संभाजीराजे सदरी दालनात आले. त्यांना बघताच कवी कुलेश आणि एका हिंदोस्थानी असामीने लवून मुजरा केला.
“युवराज, ये दुर्गा काली के भगत है – उधो योगदेव.” कविराजांनी आल्या असामीची पछान करून दिली. कवी कुलेश आपल्या हिंदोस्थानी भाषेतच बोलत होते. उधो योगदेव कमरेत लवला. त्याच्या कपाळी गंधाचे आडवे शैव पट्टे होते. अंगी उत्तरी पेहराव होता. गोऱ्यापान उद्धव योगदेवाची गोल चर्या सतेज डोळ्यांपुढे निर्धारी दिसत होती.
“स्वीकार कीजिये युवराज, मैय्या कालीका भस्मप्रसाद.” असे म्हणत योगदेवाने कमरेला लटकावलेल्या कशातून काढलेली भस्माची पुरचुंडी आणि प्रसादाचा द्रोण युवराजांच्या ओंजळीत ठेवला. “दुर्गा भवानीच्या कृपेनंच आम्ही सलामत निभावलो. पुढंही तारणार तीच थोर आहे.” या मनी उठलेल्या विचाराबरोबर संभाजीराजांनी ती ओंजळ तशीच उचलून कपाळाला भिडविली.
“युवराज, आज्ञा हो तो एक बात पेश करना चाहते है।” कुलेशांचा आवाज पालटला होता.
“जरूर. बेशक बोलावं कविराजांनी.” मथुरेतील त्यांच्या मदतीची जाण संभाजीराजे विसरले नव्हते.
“युवराज, जो हुवा है, भवानी के इच्छासे। आप उसको भूल जाईये। बहुत श्रेष्ठ है आपके महाराज। सुभाग है आपका, आप उनके पुत्र है। आप कवि है। हम कैसे बताए कि कवित्व ब्रह्माका प्रसाद है। क्षमा और संयमन ही उसका सुभाव है)” त्यांच्या मनात खूप काही बोलण्यासारखे होते. पण आपण उत्तरेकडील आहोत, कुठेतरी मांडणीच्या गोंधळात अदब सुटेल, या विचाराने ते थांबले.
“कविराज, आबासाहेबांच्यावर आमचा कसलाच रोष नाही. त्यांना क्षमा करण्याचा आमचा वकुब नाही, मासाहेबांना मात्र आम्ही ती करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडं कवी म्हणून बघता. पण आम्ही आमच्याकडं प्रथम युवराज आणि नंतर कवी म्हणून बघतो.” बोलता – बोलता संभाजीराजे थांबले.
कवी कुलेशांना मराठी बोली अंदाजाने समजत होती. बोलता मात्र येत नव्हती. समोरच्या देखण्या, तेजस्वी राजपुत्राने त्यांना आपल्या बेडर वागण्याने अतत तच जिंकले होते. जेवढी होईल ती सेवा या दख्खनी पितापुत्रांची निष्ठेने करावी, या ते मराठी मुलखात आले होते.
“आप विश्राम कीजिये। हम आग्या लेते है।” अप्रिय विषय अधिक चाळवला जाऊ नये, या हेतूने कवी कुलेश म्हणाले. झुकता मुजरा देत, हटत्या पावलांनी योगदेवांसह दालनाबाहेर पडले. “या कवी कुलेशांना बघितलं की, मथुरेची आठवण होते. केवढा समय पिछाडीला पडला.’ सुस्कारा देत संभाजीराजे अंत:पुराकडे वळले.
“घ्येवा.” आत येताच एक गोंदल्या मायेचा हात त्यांच्या समोर आला. विचारांची तंद्री सुटली. दुर्गेचा प्रसाद असलेली ओंजळ संभाजीराजांनी तशी पुढे केली. त्या ओंजळीत एका कुणबाऊ हातून गुळ-खोबऱ्याचा प्रसाद पडला. ती धाराऊ होती! तिनेही आपल्या गावच्या कापूरव्होळाच्या शंभू – महादेवाला कसलातरी नवस घातला होता. आणि आज तिने तो फेडून टाकला होता!
ढाशा बाऱ्याने गडावर जोर धरला. जगदीश्वर, शिर्काई मंदिरावरची तिकोणी निशाणे त्याने उधळून लावली. खास बनावटीचा असलेला जरीपटकाही त्याच्या मारगिरीला टिकणार नाही म्हणून नगारखान्यावरून उतरण्यात आला. या वाऱ्याने छत्रपतींना कणकण भरली. महाराज आजारी पडले. ढासा खोकला आणि ज्वराची कणकण यांनी त्यांना मंचकावर लेटणे भाग पडले. राजतबीब औषधी मात्रा देण्यासाठी त्यांच्या सेवेत खपू लागले.
महाराणी या नात्याने आणि सेवेच्या निमित्ताने छत्रपतींचा महाल सोयराबाईंनी आपल्या ताब्यात घेतला. अहोरात्र त्यांचाच राबता महालात पडला. पुतळाबाई, सकवारबाई, येसूबाई, धाराऊ कुणीच महाराजांच्या महालात वास्तपुस्त करण्यापलीकडे थांबू शकत नव्हते.
दुपार धरून लेटल्या महाराजांचा डोळा लागला होता. त्यांना भेटीसाठी जीव कासावीस झालेले संभाजीराजे निर्धारी मनाने त्यांच्या महालाच्या दारात आले. पहाऱ्यावरचे धारकरी त्यांना बघताच पाती कपाळाला भिडवून झुकत मागे हटले. भिंती धरून असलेल्या कुणबिणींनी पदर नेटके केले. महाराजांच्या उशाशी बसलेल्या सोयराबाईंनी युवराजांवर नजर टाकली, मात्र त्यांच्या कपाळीचे कुंकुचिरे एक जागी गोळा झाले. त्या उठल्या नि मानेचा काटा जराही न मोडता खड्या चालीने बाहेर पडू लागल्या. युवराजांच्या अंगावरून बाहेर जातानाही त्यांनी मानेला वळते करून त्यांच्यावर दृष्टी टाकण्याचे कष्ट दिले नाहीत!
त्या समोरून जाताना, मन निर्भाव असलेल्या युवराजांचे शरीर मात्र कमरेत झुकलेच! त्याचे त्यांनाच मग आश्चर्य वाटले. महाराज सुख झालेत, हे बघून संभाजीराजे दरवाजातूनच मागे परतायला निघाले. त्यांची निसटती नजर आबासाहेबांनी पांघरलेल्या शालनाम्यावरून फिरली. महाराजांचे पाय, कूस पालटताना त्याबाहेर उघडे पडले होते. त्या दर्शनाने त्यांना जखडून ठेवले. शांत पावलांनी ते महालात आले. आपल्या महाराजसाहेबांच्या पायांना हाताची बोटे भिडवून ती त्यांनी टोपाकडे नेली. मंचकावर ते पायगतीला बसून राहिले. कुणबिणी एक-एक करता बाहेर पडल्या. ढाशा वाऱ्याची एक चुकार झमकी महालात शिरली. लेटल्या छत्रपतींच्या विरळच; पण सडक, काळ्याशार दाढीची चवरी ढाळून गेली!
ते बघताना संभाजीराजांच्या अंतरंगातून आठवणीचे एक पान भिरभिरत आले. कधीतरी धाराऊने त्यांना कौतुकाने सांगितले होते – “धाकलं, बालपनी तुमी लई चलवळं हुतासा. धन्याच्या दाढीसंगं झट्या घेतल्यात कैकदा तुमी.”
संभाजीराजे नजर जोडून आबासाहेबांच्या डोळे मिटलेल्या शांत मुद्रेकडे बघू लागले.
“दरबारी सिंहासनावर बसून “तुम्हास आरोप मंजूर?’ असे विचारणारी, ‘आग्ऱ्यात “कभी नहीं’ म्हणून दाराबाहेर पडताना बेभान झालेली ‘, “ही मराठ्यांची मसनद आहे. ती कुणाच्याही फर्मानी तुकड्यास जुमानत नाही. कुणासमोरही गुडघे टेकण्यास आमचे युवराज येणार नाहीत. चालते व्हा!’ असे बहादूरच्या वकिलाला झाडताना रसरसून उठलेली, ‘आमचे सरलष्कर, तुमचे मुतालिक गेले’, अशी गुजर काकांची खबर सांगताना व्याकूळ झालेली, “मासाहेब, आम्ही पोरके झालो!’ म्हणत गेल्या आऊसाहेबांच्या छातीशी बिलगताना गदगदून आलेली, “फते घेऊन या,’ असे म्हणत भागानगरच्या स्वारीसाठी आम्हाला निरोप देताना अभिमानाने फुलून आलेली, पन्हाळगडावरच्या रंगरूपी पिंडीसारखी एरव्ही दिसणारी ही मुद्रा आता केवढी शांत आहे!’ संभाजीराजे महाराजांच्या धारदार नाकाकडे नि निमुळत्या डोळ्यांकडे बघतच राहिले.
“बहुत श्रेष्ठ है आपके महाराज!” कविवाणी त्यांच्या कानामनात फिरत राहिली. थोरल्या महालाची चंद्रा दासी दोन वेळा चक्कर टाकून गेली. बऱ्याच वेळाने महाराजांना जाग आली. पापण्यांच्या किलकिल्या कवाडांतून संभाजीराजांना झगमगीत टोप दिसताच “तुम्ही?” म्हणत राजे नीट बसतेच झाले. उन्हाच्या तिरिपेवर तेगीचे पाते झळझळावे, तशी त्यांची मुद्रा भरून पावलेल्या समाधानाने उजळली होती.
त्यांना उठते बघून तत्परतेने मंचक सोडलेले युवराज कमरेत झुकले. “असू द्या. बसा तुम्ही – आम्हाला विश्वास होता तुम्ही याल म्हणून. हा खोकला त्यासाठीच आम्ही उपकारी मानला होता.” बोलताना महाराजांना ढास लागली. ती निवारणे हाती नसतानाही आतओढीने संभाजीराजे व्याकूळपणे पुढेसे झाले. ढास सुमार झाली. तिने महाराजांची मुद्रा लालावून टाकली होती.
“शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात, तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं, तर आईच्या पाठबळानं केलं याहून आम्ही अधिक काही केलं असतं.” मागील काळात गेल्यागत महाराज थांबले.
थोड्या अवकाशाने म्हणाले, “पण भलत्या ठिकाणी पणाला घातलं की, अशा बेडरपणातून काय निघतं, ते आता ध्यानी ठेवा. एका सतीच्या आहुतीला तुम्ही बांधलेले आहात. कशानंही त्याची फेड होऊ शकत नाही. कुणाच्याही नामी- बदनामीपेक्षा तिचा जीव मोलाचा होता.” छत्रपतींचा गळा उबळीने खवखवला. ढासेवर ढास सुरू झाली. ते खोकणे संभाजीराजांना चारी बाजूंनी जखडून बांधत चालले, पिळत चालले.
“आम्हाला खंत एकाच गोष्टीची वाटते. जे मनी खुपते, ते तुम्ही आम्हाला खुले बोलत नाही. आमची धास्त घेता. सारे मानतात तसेच तुम्हीही आम्हाला छत्रपती मानता. विसरता, आम्ही तुमचे आबा आहोत.” कसल्यातरी यातनेने राजे कळवळून थांबले होते.
“आमच्या जागी असता तर कळलं असतं की, छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं! विचार करा. एक भरल्या चुड्याची स्त्री हकनाक बळी गेल्यावर, हयात असत्या तर मासाहेबांच्यासमोर कुठल्या तोंडानं तुम्ही बा आम्ही उभे राहिलो असतो. शंभू, त्यांच्या स्मरणासाठी झडणाऱ्या घाटेचा नाद कधीच परता सारू नका. एक वेळ आम्हास विसरलात तरी चालेल – पण त्यांना – त्यांना मात्र कधीच विसरू नका.” छत्रपतींनी डोळे मिटले होते.
“आबा” मंचकावर कपाळ टेकलेले, गोदावरीच्या सलाने मनोमन जळणारे संभाजीराजे गदगदत होते. छत्रपतींनी त्यांच्या काळजाला अचूक हात घातला होता.
“शांत व्हा. शंभू, .” महाराजांचा कडेधारी हात युवराजांच्या खांद्यावरून थापटता, समजावता फिरत राहिला आभाळ सूर्याला शांतवू बघत होते!
“तबीब आले. उठा.” राजांनी त्यांना समज दिली. मात्रा देण्यासाठी आलेल्या तबिबाकडे हसत बघत महाराज म्हणाले, “या, आता आम्हास मात्रेची जरूर आहे, असं वाटत नाही. ढास सुमार झाली आहे.” ते म्हणताना येणारी उबळ महाराजांनी मुश्किलीने घशाच्या घाटीतच थोपविली. ते करताना त्यांच्या चर्येवरच्या नसेनसेवर पडणारा ताण संभाजीराजांना स्पष्ट जाणवत होता. मनात कुठेतरी कविवाणी दौड घालीतच होती – “बहुत श्रेष्ठ है आपके महाराज!”
महाराजांचा खोकला कब्जात आला. तबिबांनी त्यांना हवापालटाचा सल्ला दिला. सातारा किल्ल्यावर विश्रांतीसाठी जाण्याचा छत्रपतींनी निर्णय केला. त्यांच्या प्रवासाची गडावर तयारी सुरू झाली. आता थंडी हटत आली होती. कवी कुलेश, केशव पंडित, उधो योगदेव यांच्याशी धर्मशास्त्र, पुराणग्रंथ, राजकारण यावर चर्चा करणाऱ्या संभाजीराजांना महाराजांच्या खासेवाड्याकडून वर्दी आली.
“काय निमित्तानं वर्दी आली असावी?’ याचा विचार स्वतःशी घोळवीतच संभाजीराजे खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. महाराजांना आदराने मुजरा करताना त्यांची नजर दालनात हात बांधून उभ्या असलेल्या पगडीधारी असामीवर पडली.
“युवराज, हे पंडित उमाजीपंत. आम्ही त्यांना मुद्दाम बोलावून घेतलं आहे.” महाराजांनी पगडीधारी असामीकडे हात दिला. पंडित संभाजीराजांना पाहून झुकले.
“आम्ही साताऱ्यास निघालो आहोत. तुमचा वेळ केशव पंडित व त्यांच्या सोबतीत कारणी लागेल. हे थोर शास्त्रजाणते आहेत. ग्रंथांचा वकूब आहे यांना. तुमचं काव्यशास्त्र यांच्या संगतीनं वाढीस लागेल असा भरोसा आहे आम्हांस.” महाराजांनी घडल्या प्रकाराचा बितपशील करीणा हस्तगत केला होता. राणीसाहेबांना शंभूराजांचे युवराजपद खोलवर रुपते आहे, त्या ह्यांना कैचीत पकडण्यासाठी पावले टाकताहेत, हे छत्रपतींना कळून चुकले होते.
“जशी आज्ञा.” संभाजीराजांनी एव्हाना उमाजी पंडितांना नीट न्याहाळून टाकले होते. “चलावं पंडित.” दालनाबाहेर पडताना युवराज म्हणाले. जायला निघाले.
“ऐकता?” महाराजांचा निसटता जिव्हाळ्याचा बोल आला.
“नखशिखा हे राधेवरचं काव्य तुम्ही बांधलंत असं आम्ही ऐकून आहोत. आम्हांस ते ऐकविलं नाहीत! आता या दोन्ही पंडितांच्या संगतीत आम्हांस ऐकण्यासारखं काही बांधून दाखवा!”
गोरेमोरे झालेले संभाजीराजे “जी” म्हणत अगोदर त्यांच्या नजरेपार गेले!
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०४.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.