धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०९ –
महाराजांच्या वाड्याच्या दर्शनी सदरेवर मंत्री दत्ताजीपंत युवराजांची वाट बघत खोळंबून होते. संभाजीराजांना येताना बघून दत्ताजीपंतांनी त्यांना मुजरा घातला.
“दत्ताजीपंत, तब्येत कशी आहे महाराजसाहेबांची?” संभाजीराजांनी त्यांचा मुजरा घेता-घेताच विचारले. “जी. व्यंकटेशकृपेने महाराज खुशाल आहेत. नुकताच पालीला जाऊन त्यांनी पाटीलकीच्या एका कथल्याचा मजहर दिला. आम्ही संगती होतो. आता सरकार स्वारी साताऱ्यावर आहे. कर्नाटक प्रांतातून आलेल्या रघुनाथपंत हणमंत्यांशी कसल्यातरी मोठ्या मनसुब्यानं स्वामींची खलबतं चालू आहेत.” ते ऐकताना संभाजीराजांची चर्या समाधानाने उजळून निघाली.
“युवराज, आपल्यासाठी स्वामींनी खास खलिता देऊन आम्हास धाडलं आहे. आपल्याच हाती तो जातीनं देण्याची आम्हास ताकीद आहे.” दत्ताजीपंतांनी कमरेच्या शेल्यात खोवलेली थैली काढून झुकते होत, ती युवराजांच्या हाती दिली. थैली घेऊन कपाळाला लावून संभाजीराजांनी फासबंद उकलला. आतली पत्रवळी बाहेर काढून उलगडती धरली. वळीतील शब्दा-शब्दांबरोबर संभाजीराजांची मुद्रा सोनथाळ्यासारखी झळझळत चालली.
“श्रींचे आशीर्वादे करोन आम्ही सर्वरूपे सुखरूप आहोत. खलिता देऊन दत्ताजीपंत खास हेतानं पाठविले असत. त्यास दिमतीस घेवोन, तुम्ही खासा फौजबंदीने विजापुरी मुलखावर मिरज, अथणी तर्फेने घुसोन चालविणे. जोखीम न घेता, वरच्या टापांनी मुलूखमारीचा बेत ठेवणे.” विजापूर दरबारी चाललेल्या वजीर खवासखान आणि सरदार बहलोलखान यांच्या बेदिलीचा फायदा उठवायचा बेत महाराजांनी आखला होता. ही मोहीम त्यांनी संभाजी राजांना जोडून दिली होती.
“दत्ताजीपंत, आजचा दिवस तुम्ही विश्रांती घ्या, तुम्हा-आम्हाला निघणे आहे. मिरजेच्या रोखाने.” बाकीचे सारेच युवराज विसरून गेले. “जी! स्वामींनी ती कल्पना दिली आहे आम्हाला. आम्ही पाचाडात उतरून बांधणी करावी म्हणतो. येताना सातारहून थोडी शिबंदी आम्ही आणली आहे.” “ठीक आहे. आमच्या पंगतीला थाळ्याला असा आज. तुमच्या संगतीनंच गड उतरू आम्ही.” मुजरा देऊन दत्ताजींनी सदर सोडली.
संभाजीराजांच्या मुठीत पत्रवळी होती. मनात विचार होते मोहिमेचे! पाचाडच्या वेशीवर दहा हजार शिलेबंद धारकऱ्यांची फौज खडी ठाकली. तिच्या आघाडीला जीनवंत घोड्यांवर मांड जमविलेले संभाजीराजे, दत्ताजीपंत, रूपाजी भोसले, कोंडाजी फर्जंद असा खासा मर्दाना सिद्ध झाला. चौघडे झडले. हातपंजा उठवून, मागे न बघता संभाजीराजांनी आणि पाऊलोकांनी ‘हर हर महादेव’ ची गगनभेदी झील उठवली. कर्माजीने रामोशी घोडाइतांचे, खबरगिरांचे पथक दौडीचा मार्ग बिनघोर आहे की नाही, याची टेहळणी देण्यासाठी पुढे उधळले.
चालून निघाले! युवराज संभाजीराजे आदिलशाहीच्या रोखाने मुलूख-तोडीसाठी चालून निघाले. आता त्यांचे मन शांत होते. महाराजांनी सोपविलेल्या जोखमीने मनाचे सूर्यफूल उमलले होते. मिरज बगलेला ठेवून आदिलशाहीचा लहान-मोठी खेडी तसनस करीत संभाजीराजांनी वारा प्यालेली फौज अथणी या मातबर व्यापारपेठेच्या वेशीवर येऊन थडकली! मावळ्यांनी अथणीला चौक भरला. आदिलशाही रियाया भयहैराण होऊन सैरावैरा धावू लागली. “पेठ लुटीस घाला. बोला हर हर महादेव!” जंगाच्या आवेशाने मुद्रा फुलून उठलेल्या संभाजीराजांनी तेगीचे नंगे पाते अथणीवर रोखून घोष दिला.
व्यापारपेठ लुटीला पडली. लकलकत्या मुंग्यांनी चहूबाजूंनी झटून भलामोठ्ठा भुजंग वारूळाबाहेर काढावा, तशी एक लाखाची लुटीची रास मावळी तुकड्यांनी संभाजीराजांच्या समोर घातली. सुवराजांच्या आज्ञेप्रमाणं दत्ताजीपंतांनी या फत्तेची महाराजांना खबर देणारा खलिता केला. मिळाली लूट डागबंद करून रायगडाच्या वाटेला लावण्यात संभाजी राजांना मुजरा भरून खबरगीर कर्माजी फौजेतून फुटला. त्याने पन्हाळ्याची वाट धरली.
महाराज साताऱ्याहून पन्हाळगडी दाखल झाले होते. धरल्या हत्याराने आदिलशाही मुलूख ताराज करून विजयी संभाजीराजे रायगडी परतले. फौजफळी तोडून घेतलेले दत्ताजीपंत बेळगाव प्रांतावर उतरले. महाराज अद्याप पन्हाळगडावरच होते. आदिलशाहीच्या वारेजोड मोहिमेतील यशाने युवराज म्हणून ढासळतीला लागलेले संभाजीराजांचे स्थान रायगडी पुन्हा बांधले जाऊ लागले. आता दिवस गर्मीला पडले. संभाजीराजांना सिद्धान्त-कौमुदी, मुक्तावली, रघुवंश, अमरकोश या ग्रंथांत आगळाच मानसिक आनंद मिळू लागला. केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश, उधो योगदेव यांच्या संगतीत त्यांच्या घटका रमू लागल्या. अशाच एका बैठकीत चर्चेसाठी विषय निघाला काव्यग्रंथातील नायिकांचा.
“पंडित, काव्यशास्त्रानं किती भेद सांगितले आहेत नायिकांचे?” हारीने शिस्त धरून उभ्या राहिलेल्या मंडळीतील केशव पंडितांना संभाजीराजांनी सवाल घातला.
“जी. नायिकांचे तीन प्रमुख भेद कल्पिले आहेत काव्यशास्त्रानं. स्वीया, परकीय व सामान्या.” केशव पंडितांनी काही वाचले होते त्यावरून ते तत्परतेने म्हणाले.
“लक्षणं काय त्यांची?” उत्सुकतेनं संभाजीराजांनी विचारले.
“स्वीया म्हणजे स्वस्त्री, परकीया म्हणजे परस्त्री, सामान्या म्हणजे गणिका. काव्यशास्त्रानं यांतील स्वीया हा नायिकाप्रकार मोलाचा मानला आहे. त्याचे तृतीय भेद कल्पिले आहेत.”
“कोणते?”
“मुग्धा, मध्यमा व प्रगल्भा असे. मुग्धा म्हणजे जिने यौवनात नुकतेच पदार्पण केले आहे. जिचा क्रोध सौम्य आहे, प्रणयात शालीन असून जिला विशेष स्त्रीसुलभ लज्जा असते, ती नायिका. मध्यमा म्हणजे जिचे यौवन विकसित आहे, प्रणयात जी कुशल असून संभाषणात चतुर आहे ती. प्रसंगानुरूप लज्जेचा लपंडाव खेळणारी नायिका. प्रगल्भा म्हणजे कमी लज्जा असलेली, प्रणयात तरबेज, संभाषणाचे मोहजाल टाकणारी नायिका.” भेद सांगून केशव पंडित अभिमानाने कमरेत झुकते झाले.
“व्वा!” संभाजीराजांनी मनखुलास दाद दिली. कसल्यातरी विचारात गेल्यासारखे ते हातीचे गुलाबफूल चाळवू लागले. नायिकांचे हे संभाषण इथेच संपणारसे साऱ्यांना वाटले.
“युवराज, आग्या हो तो स्वीया नायिकाके सौंदर्यशास्त्रमें माने गये अष्ट उपभेद हम चरणोमें सादर करेंगे!” कुणालाही कल्पना नसताना कवी कुलेश बोलून गेले. ते ऐकताना केशव पंडितांच्या कपाळी कळेल न कळेलशी आठी उमटून गेली.
“जरूर… जरूर, कविराज.” संभाजीराजांनी हातातील फुलाला फिरका दिला. खांद्यावरून सरकलेले उत्तरभारती उपरणे ठाकठीक करीत कवी कुलेश किंचित झुकते झाले. त्यांच्या मस्तकीच्या गुलाबी, कनोजी पगडीला धरून ओळंबलेल्या जरीवस्तू, झुरमळ्या डुलल्या. “युवराज, सौंदर्यशास्त्र स्वीया नायिकाके अवस्थानुसार अष्ट उपभेद मानता है — खंडिता, अभिसारीका, स्वाधीनपतिका, विप्रलब्धा, वासकसज्ञा, कलहांतरिता, प्रोषितभर्तृुका और विरहोत्कंठा!”
“वाहव्वा! बहोत खूब, कविराज लक्षणं सांगा या अष्टनायिकांची.” मुद्रा उजळलेल्या संभाजीराजांची नजर कवी कुलेशांच्यावर जखडून पडली
“जी,” म्हणत कवी कुलेश पुढे म्हणाले,
“स्वपति अन्य स्त्रीपर मोहित देखकर
ईर्षासे कोपिष्ट होनेवाली नायिकाको खंडिता मानते है। जिसपर पतिका सर्वाधिक प्रेमयोग
जुडता है, उस नायिकाको स्वाधीनपतिका जानते है। संकेतस्थानपर आनेका अभिवचन
देकर वह नायकसे पूरा न होनेके कारण जो स्वयं को अपमानित मानती है वह नायिका है, विप्रलब्धा!”
कवी कुलेशांच्या बोला-बोलांबरोबर केशव पंडित आणि उमाजी पंडित यांना त्यांची त्यांनाच न कळणारी घालमेल उरात उठली. संभाजीराजांच्यासमोर त्यांना ती नीट प्रकटही करता येईना. किती झाले तरी कुलेश ‘उत्तरी’ होते. या मुलखात उपरे होते युवराजांची दाद पकडत खुललेल्या कुलेशांना या कशाचेच भान नव्हते ते बोलतच होते –
“आज अपना पति आनेवाला है, इस अपेक्षा से शृंगारमंडित होकर प्रतीक्षा करनेवाली नायिकाको काव्यशास्त्र वासकसज्जा मानता है। पति अनुनय करते समय उसको दुरुत्तर करके प्रथम अवमानित करनेवाली और उपरांत सखी के सामने पश्चात्ताप प्रकट करनेवाली नायिकाको कलहांतरिता कहा जाता है। जिसका पती दूर देशके सफरमें जानेके कारण उसका दर्शन दुरापास्त है, यह जानकर भी जो व्याकूल होती है। उस नायिकामें प्रेषितभर्तृका का भाव शास्त्र देखता है। और निश्वयसे आज पतिका दर्शन होनेवाला है, इस अपेक्षासे प्रतीक्षा करती हे, और पती जल्द न आनेके कारण जो विरह- व्याकुल हो उठती है, उस नायिका का विरहोत्कंठा नाम ख्यात है शास्त्रमें। युवराज, काव्यशास्त्रमें इन अष्टनायिका के रूपमें बहुत स्त्रीरूप प्रकट हाए है।”
आता सगळी बैठक आपोआपच कुलेशांच्या कब्जात गेली होती.
“शाब्बास कविराज,” अशी दर्दी दाद देत बैठकीवरून उठलेले संभाजीराजे कुलेशांच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या छातीवर रुळणारा मोतीकंठा उतरून तो कवी कुलेशांच्या हातात ठेवला. “कविराज, या अष्टनायिकांचे स्वभावी भेद आम्ही काव्यात बांधावे म्हणतो.” स्वत:शी बोलल्यासारखे संभाजीराजे म्हणाले.
“जी! संकल्प पूरा करनेमें चंडी युवराजको आशीर्वाद दे।” कुलेशांची मान, राजकदर स्वीकारताना झुकली, ती तशीच होती. रायाजीने आणून ठेवलेल्या तबकातील विड्यांना संभाजीराजांनी हातस्पर्श दिला. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले.
“नायिकाभेद’ या काव्याच्या बांधणीत संभाजीराजे गुंतले. उन्हे तापू लागली. एक दिवस उन्हे टळतीला लागली असताना अचानक महादरवाजावरची नौबत झडली. पाठोपाठ परशरामपंत या संभाजीराजांच्या कारकुनांनी येऊन युवराजांना वर्दी दिली, “सिंदखेडहून जाधवराव आलेत. संगती मधल्या आक्कासाहेब गड चढून आल्या आहेत.” जाधवांकडे दिलेल्या संभाजीराजांच्या भगिनी राणूबाई आणि रुस्तुमराव जाधव लवाजम्यासह येऊन पालखी दरवाजात थांबले होते.
रशरामपंतांना हाताशी घेत संभाजीराजे त्यांच्या आगवानीसाठा पालखी दरवाजात आले. त्यांना बघताच रस्तुमराव पुढे झाले. खांदाभेट पडली. मेण्यातून उतरलेल्या राणूबाईंचे दर्शन होताच संभाजीराजे हसत पुढे झाले. त्यांची पायधूळ घेता- घेता म्हणाले, “आक्कासाहेब, थैली, खलिता नसता अचानक येणं झालं. आम्हास गड उतरून पाचाडी तुम्हास सामोरं येता आलं नाही.”
“आगेवर्दी न देता माहेरी येण्यात कसलं सुख असतं, ते तुम्हाला कसं कळणार बाळमहाराज.” हसत राणूबाई म्हणाल्या. हातांची ओंजळ पसरून त्यांनी संभाजीराजांचा मुखडा प्रेमाने आपल्याकडे घेत त्यांच्या कपाळावर आपले ओठ टेकले. राणुबाई शकुनाच्या पावलांनीच जशा रायगडी आल्या होत्या. कारण त्या आल्या नि चारच ंत पन्हाळ्याहून निघालेला हरकारा रायगडावर आला. त्याने बातमी आणली – “छत्रपती महाराज खासा येत आहेत!”
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १०९.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.