महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,69,753

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११०

By Discover Maharashtra Views: 1389 12 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११० –

महाराजांची आगवानी करण्यासाठी आपल्या दिमतीच्या माणसांनिशी संभाजीराजे पाचाडात उतरले. दुसऱ्या दिवशी दुपार धरून प्रथम रामोशांचे टेहळे पथक पाचाडात शिरले. वळिवाचा माग देणारी गर्मी वाढली होती. वारा पडून होता. तिसऱ्या प्रहराला पडला वारा एकाएकी अंगी आल्यासारखा घुमू लागला. धुळीचे खांब उठवू लागला. त्यातून घोडी फेकीत मोरोपंत, रघुनाथपंत, जनार्दनपंत, हंबीरराव, येसाजी, आनंदराव अशा असामींना पाठीशी घातलेले महाराज पाचाडच्या वेशीत घुसले. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या.

संभाजीराजांना सामोरे बघून महाराज पायउतार झाले. जहाली करीत मोतद्दारांनी आघाडीच्या घोड्यांचे कायदे पकडत जनावरे स्वारांपासून तोडली. चौबाजूंनी बेलाग वाऱ्याने चौक भरला होता. फरफरत्या जाम्याचे भान नसलेले संभाजीराजे उधळलेल्या धुळीला बाजूस सारून नेमकी आपल्या महाराजसाहेबांची पायधूळ घेण्यासाठी पुढे झाले. ही फारा दिवसांवेरीची भेट होती.

संभाजीराजांना झुकू न देताच वरच्यावर घेत महाराजांनी ऊरभेट तिली. उजव्या हाताशी उभ्या असलेल्या रघुनाथपंत व जनार्दनपंत हणमंत्यांच्याकडे बघत महाराज म्हणाले, “यांना पारखलंत?”

“जी…” संभाजीराजे घोटाळले.

ओळख पडत नव्हती. हे पाहून महाराज म्हणाले, “हे तुमच्या काकामहाराजांचे – एकोजीराजांचे – कर्नाटक-सुभा रघुनाथपंत हणमंते. त्यांना पारखे होऊन थोर मसलतीसाठी आमच्या भेटीस आलेत.” डोळ्यांत फिरू बघणारे धूलिकण थोपविण्यासाठी पापण्या आक्रसत महाराज म्हणाले, “आणि हे त्यांचे बंधू जनार्दनपंत.”

मस्तकी कर्नाटकी माटाची पगडी असलेल्या, भरदार रघुनाथपंतांनी व जनार्दनपंतांनी “जय व्यंकटेश. मुजरा युवराज” म्हणत हसून संभाजीराजांना अदब दिली.

“आबासाहेब, वारा उठलाय. वळिवाची मार धरणार. लवकर निघावं.” संभाजीराजांनी आजारातून उठलेले महाराज भिजू नयेत म्हणून जहाली केली. “चला.” एका बाजूला रघुनाथपंत, जनार्दनपंत ब दुसऱ्या हाताशी संभाजीराजे असे महाराज पाचाडच्या वाड्याचा रोख ठेवून चालू लागले. पाणथेंबांची चटचटती टपटप झाडांच्या पानावळीवर उठू लागली. तिच्याशी आणि घोंगावत्या वाऱ्याशी लग लागून राहिलेले महाराज चालता-चालता म्हणाले, “शंभूराजे, या रघुनाथपंतांच्यासारखी माणसं दूर देशाहून येऊन राज्याच्या भल्याची मसलत रुजू घालतात ते बघितलं की, सार्थक वाटतं आम्ही करतो त्या दौडीचं.”

संभाजीराजांनी आत्यंतिक आदराने रघुनाथपंतांना न्याहाळले.

“महाराजसाहेब, सिंदखेडच्या आक्कासाहेब गडावर आल्या आहेत. संगती रुस्तमजी आहेत.” संभाजीराजांनी वार्ता महाराजांच्या कानी घातली. चालते महाराज ते ऐकताना थांबल्यासारखे झाले. राणूबाईच्या चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळला. “कशा आहेत राणूबाई?” महाराजांनी विचारले.

“ब्येस दिसल्या.” नात्यांचा जिव्हाळा शब्दांची मोरपिसे करून गेला.

सारे वाड्यावर आले. आणि थोड्याच अवकाशात सगळी पाचाडखोरी वळिवाच्या तडतड्या धारांनी कब्जात घेतली. विजा कडकडू लागल्या. झाड-झाडोरा कुदणीला पडला. दिवस जसा डुबल्यासारखाच झाला. दुसऱ्या दिवशी सारे निथळलेला रायगड चढून आले. गडावरच्या इमारतींना झड्या आवळण्याचे काम चालू होते. गवताने गंजीखाने आणि धान्यडागांनी अंबारखाने आबादान केले जात होते.

स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून होताच महाराजांनी रुस्तुमजींना भेटीचे बलावू दिले. काहीतरी योजून आलेले रुस्तुमजी छत्रपतींच्या भेटीस रुजू झाले. महाराजांनी त्यांचा, नात्यागोत्याचा हालहवाल पुसून घेतला. रुस्तुमजी अदबीने एका-एका सवालाला बयाजवारीने जाब देत होते, पण ते काहीतरी मनचे बोलण्यासाठी भांगा शोधताहेत, हे महाराजांनी ताडले. रुस्तुमजींना बोलते करण्यासाठी महाराजांनी जवळीक देत विचारले, “आम्ही आपले एकलेच हाल-हवाल विचारतो आहोत तुमची रुस्तुमजी! तुम्हास नाही वाटत आमच्या क्षेमकुशलाची वाजीपुजी करावी असे?”

रुस्तुमजी गोंधळून चमकले. नुसतेच “जी” म्हणून घुटमळले.

त्यांच्याकडे हसून बघत महाराजांनी त्यांना बोलण्यासाठी धीर दिला… “बोला”

“जी – आम्ही एक मनसुबा धरून आलो आहोत.”

“ते आम्ही केव्हाच जाणून आहोत. मूळ बोला.”

काही क्षण शिवर्पिडीवर घुटमळणाऱ्या अभिषेकजलाच्या थेंबासारखे घुटमळले

“आम्ही… आम्ही युवराजांच्यासाठी सोयरिकीचे बोलणे लावण्यासाठी आलो आहोत!” रुस्तुमजींनी मन खोलले.

“रुस्तुमराव, मनसुबा ठीक आहे. तुमच्याशी फेर रक्तसंबंध येणे, हे आम्हालाही रुचते, पण तुमच्या या शब्दांचा निर्णय आम्ही उदईक देऊ. कसे?” येसूबाई आणि संभाजीराजे यांचा सासूद घेऊन मगच जाधवरावांना काय ते सांगावे, असा निर्णय महाराजांनी मनोमन केला होता.

“जी. आमची घाई नाही.” महाराजांचा ‘उदईक’ म्हणजे आशेला जागा या आनंदाने रुस्तुमराव बोलून गेले.

धाराऊने लगबगीने येऊन पुतळाबाईच्या महाली असलेल्या येसूबाईंना खास वर्दी दिली – “थोरलं धनी येत्याहेत! तुमच्या भ्येटीसाटनं.” येसूबाईंना ते ऐकताना खरेच वाटले नाही. त्या हसून म्हणाल्या, “केवढी भलती थट्टा करता आऊ!”

“शंबू म्हादेवाची आन. धन्यांनी मला बलाऊन घिऊन सांगितलं.” नरड्याच्या घाटीवर चिमट ठेवीत धाराऊने वर्दीची शहानिशा दिली. येसूबाईची मग मात्र तारांबळ उडाली. कपाळीचे कुंकुचिरे नेटके आहेत की नाहीत हे दर्पणात बघून घेतले पाहिजे, या विचाराने त्या आतल्या दरुणीदालनात जायला निघाल्या. जाताना त्यांना धाराऊने शपथ घेण्यासाठी भाबडेपणी बोललेला “शंबू” हा शब्द आठवून हसू आल्याशिवाय राहिले नाही!

महाली आलेल्या महाराजांना, जरीश लूचा पदरकाठ हाती धरून तिवार नमस्कार करताना येसूबाईंना “आबासाहेब आमच्या भेटीसाठी कसे?’ हे कोडेच उकलेना.

“सौभाग्यवंत व्हा!” असा त्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांनी त्या गोंधळल्या आहेत, हे जाणले होते. त्यांना अधिक कोड्यात न ठेवता महाराजांनी आपल्या येण्याच्या कारणाला खुबीने तोंड फोडले – “तुम्हास आठवतं सूनबाई, आम्ही तुम्हाला शिक्के-कट्यार सुपुर्द केली ते?”

काहीच अंदाज न लागलेल्या येसूबाईंची होकारी मान डुलली.

“आता गडावर सिंदखेडहून रुस्तुमजी आलेत – ते मात्र तुम्हास नुसतीच कट्यार सुपुर्द करू म्हणतात! आपली कराल?” महाराज हसत म्हणाले. ते बोलणेच असे होते की, काही कळले नाही तरी येसूबाईंच्या तोंडून आदरापोटी

“जी?” ही होकारी साद सुटली. “खरंच तुम्हाला बघितलं की, आम्हाला आऊसाहेबांची याद येते!” पुन्हा येसूबाईना न कळणारे महाराज बोलून गेले. त्याला मात्र सखोल कारण होते. त्यांचे त्यांनाच कळणारे.

“रुस्तुमजींनी युवराजांसाठी सोयरिकीचा शब्द आम्हाला टाकला आहे. त्यास तुमची संमती असेल तरच आम्ही त्यांना निर्णय देणार आहोत. बोला. ही जोखीम आपली कराल? सावत्रपणाचा गुंता केवढा दाटणीला पडतो, हे जाणता तुम्ही.” बोलते महाराज सोयराबाईंच्या कटू आठवणीने थांबले.

उकरली जाणार नव्हती, तरी दगडी फरसबंदी पायाच्या अंगठ्याने उकरू बघणाऱ्या येसूबाईंची कानपाळी रसरसली. “गडाचा पायथा धरून वाहणाऱ्या काळनदीच्या पात्रावरून एक भलामोठा केसरी टोप वाहतीला लागला आहे. हात पसरून थोपवावं म्हटलं, तरी आमचे हातच तेथवर पोचत नाहीत!’ या विचाराने येसूबाई क्षणभर भांबावल्या. साक्षात थोरल्या मासाहेबच जणू शेजारी उभ्या राहून आपल्या खांद्यावर हळुवार हात ठेवीत बोलताहेत तसे त्यांना वाटले, “ही भोसल्यांची माणसं पदरी घेणं म्हणजे साक्षात जगदंबेचा पोतच पदरी घेणं आहे! त्यासाठी तिच्याकडूनच आभाळाएवढा पदर घ्या मागून!”

येसूबाईंना गुमान बघून महाराजांना वाटले, त्यांना ते सारे पसंत नसावे. “येतो आम्ही,” म्हणत ते जायला वळलेही.

“आबासाहेबांनी आमचं नाही ऐकलं. सिंदखेडकरांनी टाकल्या शब्दास आम्ही मनखुशीनं राजी आहोत.” अभिषेक घेणाऱ्या भवानीच्या ओठांवरून दुधाचे थेंब टपकावेत, तसे येसूबाईंच्या तोंडून शांत बोल सुटले. जात्या महाराजांचे पाय, ते ऐकताना अडखळल्यासारखे झाले. वळून त्यांना येसूबाईंना पुन्हा म्हणावेसे वाटले, “तुम्हास बघितलं की, आम्हाला आऊसाहेबांचीच याद येते. कारण… कारण त्याही अशाच होत्या. आमच्या महाराजसाहेबांनी बेंगळुरी दुसरा ठाव केला. मातोश्री तुकाबाईसाहेबांशी. पण… पण आमच्या मासाहेब कधी शब्दानंसुद्धा त्यांच्याबद्दल तकरारीनं आमच्याकडे बोलल्या नाहीत.” महालाबाहेर पडणाऱ्या, पित्याचीच माया देणाऱ्या महाराजांना येसूबाईना सांगावंसं वाटत होतं, “आबासाहेब, सिंदखेडकरांनी शब्द टाकलेली कट्यार सोन्याची की कसली त्याचं आम्हास काही नाही. पण… पण… आपण पदरी घालू कराल तर… तर तावते निखारेही आम्ही हसत आपलेसे करू! आभाळाएवढा पदर करून!”

साहेबवाड्यावर आलेल्या महाराजांनी लगोलग संभाजी राजांना सदरेवर बोलावून घेतले. जसे येसूबाईंना विचारले तसे मात्र त्यांनी संभाजीराजांना नाही विचारले. समोर अदब धरून उभ्या असलेल्या संभाजीराजांना बघताना मथुरेत भगवी छाटी घातलेल्या बाळसंन्याशाचे रूप त्यांच्या मनात तरळून गेले. स्वत:लाच समजावीत ते मनोमन बोलून गेले. “केवढे वाढीवर पडले हे! किती बघितलं यांनी! इच्छा नसता पडल्या पेचाची उकल करण्यासाठी यांना कैकवार भरीला घालणं पडलं. जोवर मासाहेब होत्या तोवर यांना भरीला घालताना त्या मायेपोटी विरोध करीत आल्या.”

“राजे,” महाराजांनी कसे बोलावे, ते बांधून घेत तोंड फोडले, “तुम्ही काव्य बांधता, आम्ही मात्र एक चालते-बोलते काव्य तुम्हास बक्षावे म्हणतो!” महाराज थांबले.

संभाजीराजे गोंधळात पडले.

“कवींना जसे हाताशी एकास दुसरे कलम लागते, तसे हयातीला एकास दुसरे जिवाचे माणूसही लागते! सस्तुमजींनी तुमच्यासाठी सोयरीक आणली आहे. आम्ही जाधबांशी फेर घरोबा बांधावा म्हणतो.” “पण…” लेण्यातील, पायी “नूपुर’ असलेली स्त्रीमूर्ती आणि थाळ्यासारखा गौरवर्णी मुखडा समोर उभा ठाकलेले संभाजीराजे येसूबाईच्या आठवणीने चाचरले. “कळलं आम्हास! सूनबाईंना भेटूनच आलो आहोत आम्ही. त्या राजी आहेत. तुमचं बोला.” संभाजीराजे जखडबंद झाले. त्यांना काय बोलावे सुधरेना.

“म्हणजे तुम्ही याला राजी नाही, असंच मानावं आम्ही?” महाराजांनी त्यांना पुरतेच खोड्यात घातले.

“नाही… तसं आम्हाला नव्हतं म्हणायचं.”

“तुम्ही काहीच म्हटलेलं नाही, मतलब?”

“महाराजसाहेब करतील ते आम्हास ‘आज्ञाप्रमाण’ आहे!”

““आज्ञाप्रमाण’ म्हणजे आमची आज्ञा झाली तसं तुम्हाला हे मान्य आहे, असं होतं. आम्ही तुम्हाला आज्ञा केली नाही!” राजांना निकोप होकार संभाजीराजांच्या तोंडून वदवून घ्यायचा होता. संभाजीराजांनी तो दिला.

“जी. आम्ही मनखुशीनं राजी आहोत!”

साहेबसदर सोडून बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना एका विचाराने चुकल्यासारखे वाटले, “छे, या बाबीचा तरी सल्ला पुसायला आज खरोखर थोरल्या आऊसाहेब पाहिजे होत्या!” आणि पाचाडच्या सदरेवरची घाट निसूर होती, तरी त्यांना उगाच तिचे टोल कानी पडल्यासारखेच वाटले!

महाराजांना निरोप घेतलेले रुस्तुमजी रायगड सोडून आपल्या वतनावर निघाले. राणूबाई रायगडीच राहिल्या. पंधरवडा परतला आणि हत्यारबंद धारकऱ्यांनी भोवती शिस्त धरलेला एक मेणा संगती घेऊन रुस्तुमजी रायगडावर परतले.

संभाजीराजांच्या दुसऱ्या विवाहासाठी साखरपुड्याची बैठक खासेवाड्यावर बसली. जाधवरावांनी आणलेली मुलगी जरीकळीचा शालू लेवून बैठकीसमोर पेश आली. बसल्या जाणत्यांना रिवाजाचा तिपेडी नमस्कार घालून ती अदबीने उभी राहिली. भोसल्यांचा जनाना तिचे देखणेपण बघतच राहिला. पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई सातमहालाकडची सगळी खाशी मंडळी त्या बैठकीत होती. नव्हत्या फक्त सोयराबाईसाहेब! त्यांचे अंग एकाएकी कशाने तरी धरले होते!

येसूबाईना तर समोरची ‘सोनकट्यार’ निरखताना वाटले, ‘जी आम्हास काही लागी पडत नाहीत, ती स्वारींची कवनं यांना नक्कीच समजतील! आबासाहेब म्हणाले तशाच आहेत या… कट्यारीगत! सोनकट्यारीगत. पण समोर उभ्या असलेल्या, होऊ घातलेल्या आपल्या हिस्सेकरी स्त्रीमधील एकच बाब येसूबाईना खटकली. जशी थोरल्या आत्यासाहेबांच्या गोऱ्यापान पायांवर असते, तशीच रेखलेली आळत्याची नक्षी याही पायांवर दिसत होती! गुंतवळ असलेली!

“सारं पार पडताच जेव्हा या आमच्या भेटीस येतील तेव्हा कसं सांगावं यांना… ही आळत्याची नक्ष तेवढी नका रेखत जाऊ पायांवर! या विचारात येसूबाई गेल्या.

मुलगी बैठकीला एकमुखी पसंत पडली. तिच्या हनुवटीखाली तर्जनी देऊन “मुली” म्हणत महाराजांनी तिचा मुखडा उचलता घेतला. आणि म्हटले. “मासाहेबांच्या आणि बसल्या सदरेच्या साक्षीनं ही सिंदखेडकर जाधवांची कन्या आम्ही आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे यांच्यासाठी सोयरिकीस पक्की केली असे.”

पुतळाबाईंनी त्या मुलीचा मळवट भरला. साखरपुडा पक्का झाला. धर्मखात्याकडच्या राजोपाध्यांनी पंचांगाचा मेळ घालून अक्षय तृतीयेचा मुहूर्त शोधून काढला. ठरल्या दिवशी, गोरज मुहूर्त धरून शाही इतमामात विवाह-समारंभ पार पडला. नव्या सूनबाईंचे नाव ठेवण्यात आले, दुर्गाबाई. अष्टनायिकांवरचे काव्य बांधू बघणाऱ्या संभाजीराजांच्या जीवनात दुसऱ्या नायिकेने प्रवेश केला!

संभाजीराजांचा ‘नायिकाभेद’ काव्यखंड बांधून पुरा झाला. त्या काव्याचे श्लोक मनी घोळणारे युवराज महाली आले. समोर येसूबाईंना बघताच अष्टनायिकांचे वर्णन करणारे उभे काव्य त्यांच्या मनी फेर टाकून गेले. येसूबाई दरुणी दालनाच्या रोखाने जायला निघालेल्या बघून “थांबा” म्हणत संभाजीराजांनी त्यांना रोखते केले. एकामागून एक अशा काव्यातील अष्टनायिका त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. रोखल्या नजरेने ते येसूबाईच्याकडे नुसते बघत राहिले. साऱ्या नायिका एकत्र केल्या तरी त्यांची सांगड त्यांना येसूबाईशी काही घालता येईना!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११० –

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment