महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,70,342

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११२

By Discover Maharashtra Views: 1351 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११२ –

महमदाच्या दोन्ही हातांशी असलेल्या दोघा असामींपैकी एकट्याने त्याच्या कानाशी होत काहीतरी त्याला सांगितले. आणि ते दोघे त्याला एकटा सोडून महाराजांच्या वाड्याच्या रोखाने चालू लागले. ते दोघे वाईचे कुलकर्णी होते. महाराजांच्या खबरगीर पथकातील निष्णात खबरगीर होते. मराठी मुलूख सोडून नेताजीचा काबूल-कंदाहारपर्यंत त्यांनी शिताफीने पाठलाग केला होता. वेळोवेळी, मुसलमान झालेल्या नेताजीवर टेहळ ठेवून त्याच्या खबरा महाराजांना त्यांनी पावत्या केल्या होत्या.

औरंगजेबाने नेमून दिलेल्या काबूल-कंदाहारच्या मोहिमेत असताना कुलीखान शरम, खंत, अवमान यांनी पेटून उठला होता. त्याने मोगली तळ सोडून पळून जाण्याचा यत्न केला, पण त्याला पकडण्यात आले. आणि काढण्या घालून लाहोरला रवाना करण्यात आले. लाहोरच्या सुभेदाराने ‘कमिने’ म्हणत हबशांकरवी या महमदाच्या पाठीवर भर चौकात कोरडे उतरविले होते!

मुसलमान झालेला हा मराठ्यांचा सरलष्कर रोज रात्री डेऱ्यात पाठ टेकताना सवयीने की स्वत:ला धीर येण्यासाठी; पण “शिव शिव’ म्हणत होता! त्या “शिव शिव’ बरोबर त्याला एक बाकदार नाक, आणि दोन तेजाळ डोळे समोर दिसत होते. रात्र-रात्र तो बिछायतीवर तळमळून काढत होता. ह्या साऱ्या खबरा या वाईच्या कुलकर्ण्यांनी महाराजांना दिल्या होत्या. महाराजांच्या सूचनेप्रमाणे आग्ऱ्याजवळ हे कुलकर्णी कुलीखानासमोर प्रकट झाले होते. “महाराज थोर मनाचे. सारे पोटी घालतील. जाऊन पाया मिठी घातली पाहिजे. लावले रोप जपले पाहिजे. त्यावर हत्यार धरणे शहाणपणाचे नाही.” असे कुलीखानाला नाना प्रकारे समजावून, पुढे घालून ते वाईचे कुलकर्णी रायगडी घेऊन आले होते. हे योग्य वेळी घडले होते. कारण औरंगजेबाने कुलीखानालाच दख्खनेवर चाल घेण्याचा हुक्म दिला होता. मोठा अकलेचा विचार करून महमद खान रायगडी आला होता. पुरत्या दहा वर्षांनंतर!

सदरकरी असामी पाठीशी घेतलेले, झपाझप चालणारे संभाजीराजे हमचौकाच्या बगलेला असलेल्या दगडी कठड्यावर आले. भोवतीच्या साऱ्या पगड्या मुजऱ्यासाठी झुकल्या, पण त्यांचे लक्ष कुणाकडेच नव्हते. हमचौकात उभ्या राहिलेल्या नेताजींना बघताच त्यांचेच पाय साखळदंड पडल्यासारखे खिळून गेले.

“धाकल्या मासाहेबांचे हे नातलग! काय झालं हे! मर्दान्याची माती! हे नेताजीकाका? छे, मरणसुद्धा यापरीस गोमटं दिसलं असतं!’ संभाजीराजांच्या काळजात कालवाकालव माजली. “मानूस जिथं उपाजतं ती जागा साद घालती मानसाला.” विचाराबरोबर संभाजीराजांच्या नेत्रकडा दाटला. त्यांनी महादेव यमाजींना आज्ञा केली, “कारभारी, आसवाबाचे एक तबक सिद्ध करा.”

आसवाब कुणासाठी असावेत, हे महादेव यमाजींनी हेरले. “जी” म्हणत ते मागल्या पावली तबक आणण्यासाठी परतले. संथ चालीने संभाजीराजे महमद कुलीखानाच्या सामने आले. गर्दन खाली टाकलेल्या कुलीखानाला फक्त त्यांच्या पायीच्या बाकदार, भगव्या मोजड्या तेवढ्या दिसल्या. साक्षात महाराजच समोर आहेत, या गैरसमजाने तो अंगभर थरारला! त्याच्या डईचा मोगली किमॉश क्षणभर डावा, उजवा डुलला. पाणथेंब उडाले. गदगदता उमाळा उरात कोंडत महमद कुलीखान पायमिठी घालण्यासाठी पुढे झाला! झटकन झुकून संभाजीराजांनी त्याचे हात वरच्या वर झेलले. त्यांच्या तोंडून नकळत हलके शब्द सुटले, “नेताजी काका!”

चमकलेल्या कुलीखानाने मान वर घेतली. लवभर त्याची कोरलेली दाढी थरथरली. “हे कोण?” आणि फरीसारखी गोल, पुष्ट मुद्रा व तेच पोतासारखे, आगफेकी, तेजाळ डोळे बघून महमदाने ओळखले – ‘हे धाकलं राजं! हे उपाजले त्या वक्ती किल्ले पुरंदराचे किल्लेदार हुतो आमी! धावत्या पायांनी जाऊन तोफखान्याकडच्या गोलंदाजांना बत्ती द्याया सांगितली हुती आमी – तवा… तवा मासाब हुत्या! मासाब…? आता त्ये पाय दिसायचं न्हाईत! काय झालं हे? रजपुताच्या गोटात या धाकल्या राजांच्या पाठीशी गेलो हुतो. केवढी निधडी छाती यांची! नंग्या हत्यारानं यांच्या डेऱ्यावर पहारा देत रात्र जागविताना कऱ्हेपठारावर मनात काही-बाही यायचं. हे मात्र बिनघोर सुख झाल्यालं असायचं डेऱ्यात.

“यांचं… यांचं पायसुद्धा धरायची लायकी न्हाई आमची. कशापायी गड चढून आलो, ह्यो विटाळ घालायला? परतावं.’ गलगललेला महमद वळता व्हायला निघाला. संभाजीराजांनी झटकन त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नुसती नजर दिली. धरल्या हाताने त्याला संगती घेऊन ते शांतपणे पायऱ्या चढून कठड्यावर आले.

जमलेल्या मावळमाणसांच्या बारा-बंद्यांचा ताण ते बघताना सुमार झाला. महादेव यमाजींनी आणलेल्या तबकाकडे हातरोख देत संभाजीराजे कुलीखानाला म्हणाले, “अगोदर पेहराव बदलून घ्या. बिनघोर असा.”

कुलीखानाला आपल्या असामीच्या सुपुर्द करून संभाजीराजे सातमहालाच्या रोखाने चालू लागले. रायाजी त्यांच्या पाठीशी झाला. सातमहालातील सगुणाबाई साहेबांच्या महालासमोर ते आल्याची वर्दी रायाजीने आत पोच केली. “नेताजीकाका आले.” ही वार्ता मासाहेबांच्या कानी घालण्यासाठी संभाजीराजे महालात प्रवेशले. गडावर कसलीतरी गडबड चालली आहे एवढाच अंदाज लागलेल्या सगुणाबाई समोर उभ्या होत्या. युवराजांनी त्यांना नेहमीची अदब दिली. आणि आता त्यांना कळून चुकले की, घडले ते मासाहेबांच्या कानी घालताना शब्द साथ देत नाहीत.

“मासाहेब, ते आलेत.” संभाजीराजांना बांधणी साधेना. आजवर त्यांनी वा सगुणाबाईंनी जाणीवपूर्वक कधी नेताजींचा विषय बोलण्यात आणला नव्हता.

“कोण?” सगुणाबाईंच्या कपाळीचे कुंकुपट्टे वर चढले.

“महम… नेताजीकाका!” घसरते बोलणे संभाजीराजांनी सावरले.

“काय म्हणता!” प्राजक्ताचे फुलार झाड खुलून दिसावे, तशी सगुणाबाईंची गोल चर्या उजळून उठली. पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी त्या राजस्त्रीच्या चर्येवर असंख्य वेदनांचे जाळेच जाळे दाटून आले. ते संभाजीराजांनी बघू नये, म्हणून त्या त्यांना पाठमोऱ्या झाल्या. नेताजीराव सगुणाबाईंचे सख्खे काका होते.

“येतो आम्ही.” संभाजीराजांनाही काय नि कसे बोलावे, ते सुचले नाही. सगुणाबाईच्या महालाबाहेर पडणाऱ्या संभाजीराजांच्या मनात कवी कुलेशांनी सांगितलेल्या त्या चतुर्थ नायकांपैकी धीरोद्धत’ नायकाची लक्षणे कारण नसता डोकावून गेली. “चंचल स्वभावाच्या, आत्मगौरवी, मायावी; पण सामर्थ्यशाली पुरुषाला धीरोद्धत नायक मानतं काव्यशास्त्र!”

वाईकर कुलकर्ण्यांनी महमद कुलीखानास छत्रपती महाराजांच्यासमोर रुजू घातले. मोठ्या मनी महाराजांनी मराठ्यांच्या वाट चुकल्या सरलष्कराला धर्माच्या गोतावळ्यात घेण्याचा निर्णय केला. आपल्या मंत्रिमंडळाची त्याला संमती घेतली. नाशिकला थैलीस्वार धाडून अनंत भटांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी व गडाचे राजोपाध्ये प्रभाकरभट यांनी शुद्धीकरणाचा मुहूर्त काढला. आषाढ वद्य चतुर्थीचा. धर्मकल्पनांना जबरदस्त कलाटणी देणारा हा भारतवर्षातील पहिला विधी होता. जबरीने धर्मांतरित केलेल्या हिंदुधर्मीयांना आजवर परतीच्या वाटा बंदच होत्या. रायगडाच्या सुवर्णी सिंहासनाला साक्ष ठेवून छत्रपती महाराज शास्त्रोक्त पद्धतीने त्या खुल्या करून देणार होते! साऱ्या गडभर या विधीचीच चर्चा चालू झाली.

लोहार मेटावरचे लोहार मात्र ‘शा शू’ करीत घण उतरवून हत्यारांची शेकडो पाती घडवीत होते. त्यावर नजर टाकण्याचा शब्द महाराजांनी संभाजीराजांना टाकला होता. कोंडाजी फर्जंद, रूपाजी भोसला, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी ही मंडळी आता युवराजांच्या दिमतीला असल्यासारखी झाली होती. त्यांना पाठीशी घेऊन संभाजीराजे लोहार कारखान्यावर आले. इथे दहा-दहाच्या हारीने आमनेसामने असे थोराड भाते फुरफुरत पेटले होते. निखाऱ्यावरची लालेलाल पाती सांडशीने उचलून कारागीर लोहार, घणकऱ्याला नुसत्या हुंकाराने घण कसा अचूक उतरावा याची लग देत होते. घडलेल्या, पाणी द्यायच्या, काळसर, निळपट हत्यारांच्या बनावटीप्रमाणे धोप, फिरंग, बाकी, पठाणी अशा कलमवार राशी घालण्यात आल्या होत्या. संभाजीराजांना बघताच कामात गढलेले, घामेघूम लोहार घण-सांडस थोपवून अदब द्यायला धडपडू लागले. हातपंजा उठवून त्यांना नुसत्या इशारतीवर काम चालू ठेवायला सुचवीत संभाजीराजे कलमवार घातलेल्या हत्यारांच्या राशीजवळ आले. झुकून प्रत्येक रा? एक-एक हत्यार उचलून, मूठ भरून पेलून बघत ते कोंडाजी, खंडोजी, रूपाजी यांच्या हाती देऊ लागले.

“या घडल्या हत्यारांना आपणाला कोण कमरेशी वागवील, याची काहीही कल्पना नाही. कुणाची शिरे यांच्या उतरत्या वारांना धूळदोस्त होतील, याचा यांना अंदाज नाही. या धूळदोस्त होणाऱ्या शिरांमुळंच कुणाच्या शिरी मानाचे पेच चढतील याचा यांना कयास नाही. जीव लावून यांना घडविणाऱ्या या लोहारांना ही हत्यारे चालविता येत नाहीत! यांचं काय होणार हे त्यांनाही ठाऊक नाही. केवढ्या गुंतवळीचा आहे, हा हयातीचा शतरंज?’ हाती घेतलेल्या फिरंग-माटाच्या हत्याराकडे, विचारात गेलेले संभाजीराजे नुसते बघतच राहिले.

“धाकलं धनी, ह्यो योक माट पारखून बघावा.” कारखान्याच्या प्रमुखाने दगडोजीने – एक बांकी संभाजी राजांच्या समोर धरली. हातची फिरंग रायाजीकडे देत हसत संभाजीराजांनी ती बांकी बोटाच्या पकडीत घेत निरखली. “भात्यावं घातलं तवा ह्ये हत्यार डोळ्याखाली पडाय पायजे हुतं धनी. पार गंजल्यालं हुतं. हत्ती टाक्यातनं कुणीतरी ह्ये गाळ उपसताना भाईर काढलं अन्‌ शिलेखान्यात भरना कक्‍्येलं. शिकल पार झडल्याली, पात्याला कुचमून ह्ये पार तांबारून ग्येलं हुतं. आता न्हाई वळखाय येत!” दगडोजी आपली करामत सांगताना अभिमानाने फुलून आला होता.

संभाजीराजांना मात्र हातातील बांकीने नेताजीरावांची सय करून दिली होती! त्या बांकीला धरून, दुहातीच्या कैक ऐरणींवरून घण घेताना उसळणाऱ्या ठिणग्या त्यांचे डोळे पकडू बघू लागल्या. मनात विचारांच्या ठिणग्यांचा शिवरता सडा पसरू लागला. “आमचे महाराजसाहेब केवढे थोर, कसबी लोहार! त्यांच्या मनाचा ठाव आम्हास नाही.

लागत नाही. लागायचा नाही. हाती सांडस नाही, समोर पेटता भाता नाही, दिमतीला घणकरी नाही – पण माणसांचा गंज ते नुसत्या जबानीने निपटून काढतात! आम्हास बाटले होते, ते नेताजीकाकांना नुसते पदरी घेतील, पण – पण त्यांनी त्यांच्या शुद्धीकरणाचा निर्णय केला. मुलूखभर त्याची आमंत्रणं धाडली. हे केवळ माणसांचा गंज काढणे नव्हे. हे तांबरलेल्या उभ्या धर्माचाच गंज निपटणे आहे. ते तेच करू जाणत, हे असले आगीशी झट्या घेणारे लोहारकाम!’ अभिमानाने संभाजीराजांचे डोळे उजळले.

“बाबा, फार देखणं आहे हे काम !” म्हणत संभाजीराजांनी बांकी दगडोजीच्या हाती दिली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment