धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११३ –
वद्य पक्षातील असला तरी नेताजींना शुद्ध करणारा चतुर्थीचा क्रांतिकारक दिवस उगवून आला. पावसाळा होता तरी आमंत्रण पावलेला खासा लोक गडदाखल झाला होता. होमकुंड मांडलेल्या दरबारी चौकात पूर्वाभिमुख बैठकीवर छत्रपती महाराज स्थानापन्न झाले. त्यांची पायगत धरून उभारलेल्या बैठकीवर डाव्या हाताशी रामराजांना घेऊन संभाजीराजे बसले. त्या राजबैठकींना धरून दुतर्फा मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, प्रल्हादपंत, निराजीपंत, दत्ताजीपंत अशा अष्टप्रधानांनी शिस्त धरली. सवत्या उठविलेल्या राणीवबशात पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, येसूबाई, धाराऊ, दुर्गाबाई असा जनाना दाखल झाला.
मंत्रघोषाच्या गजरात शुद्धीकरणाला सुरुवात झाली. आधल्या दिवसभर उपोषण करून नेताजींनी चित्तशुद्धी केली होती. प्रभाकरभटांनी त्यांना दरबारीचौकात आणले. मांडल्या पाटावर बसविले. गडाच्या बैतेदार न्हाव्याने त्यांची कोरली दाढी उतरविली. डुईचे मुंडण करून शेंडीचा संजाबी घेर राखला. नेताजींनी स्त्रान केले. प्रायश्चित्त घेतले. पंचकुंभात भरलेले समंत्रक जल मंत्रांच्या उद्गोषात अनंतभट आणि प्रभाकरभट नेताजींच्या मस्तकावर शिपकारू लागले. उभ्या अंगावरची कसलीतरी चिकटून बसलेली अमंगल कात त्या प्रत्येक शिपकाऱ्याबरोबर झडून पडते आहे, अशी विचित्र भावना नेताजींच्या मनी उठू लागली.
भरला दरबारी चौक त्या अपूर्व विधीकडे भारावल्या नजरेने बघू लागला. महाराज बैठकीवरून उठले. चौरंगीवर उभ्या असलेल्या नेताजींच्या समोर आले. हातातील जानव्याचा गोफ त्यांनी नेताजींच्या छातीला उजवा धरून गळ्यात चढविला. त्या जानव्याच्या स्पर्शाने त्याहून अधिक ते चढविताना होणाऱ्या महाराजांच्या बोटांच्या निसटत्या स्पर्शाने नेताजींच्या अंगी काटा सरकून आला. मराठ्यांचा भ्रष्ट सरलष्कर त्या काट्याबरोबर पावन झाला.
एक-एक करीत महाराजांनी तबकातील पेहरावांची घडी नेताजींच्या खांद्यावर टाकली. ऊरभर गलबलून गेलेल्या नेताजींनी हमसा रोखत, सर्वादेखत महाराजांच्या पायांना भावभरी मिठी घातली. त्या मिठीनं खुद्द छत्रपतीच काही क्षण सुत्च झाले. हळुवार झुकत नेताजींना त्यांनी वर घेतले.
अजून… अजून नेताजींची गर्दन काही वर उठत नव्हती! सर्वांना जाहीर झाले की नेताजी शुड झाले. पुन्हा हिंदू झाले. पण… पण खुद्द नेताजींनाच आपण अद्याप साफ शुद्ध झालो, असे वाटत नव्हते!
“धनी” भावनावेगाने अतिशय घोगरट झालेले शब्द कसेबसे त्यांच्या तोंडून सुटले. त्या एकाच शब्दाने महाराजांच्या काळजातही खोलवर खळबळ माजली.
“बोला. ” महाराजांची नजर नेताजींच्या मुंडनी मस्तकावर फिरली.“धनी, एक मागणं हाय पायाशी.” नेताजींना उरातला कढ खोलताना कष्ट पडत होते.
“बोला. मोकळ्या मनी बोला. ”
“आमास््री… आमास्री…काय पाहिजे.”
“धनी एकडाव… एकडाव ‘नेताजी’ म्हून साद घालावी! जीव घुटमळलाय ती साद ऐकाय!” महाराजांची गर्दन गुर्शबी दांड्यासारखी ताठ झाली. नेताजींचे खांदे पकडीत घट्ट धरून महाराज म्हणाले, “आता… आत्ता तुम्हास कळून आलं, नावाची नास्रा कोण असते ती! गर्दन वर घ्या. नेताजीराव तुम्ही आमचे आहात!”
कुठल्यातरी समंत्रक जलाने नव्हे, तर महाराजांच्या ओठांतून सुटणाऱ्या नामोच्चारावर आपण साफ ‘शुद्ध’ होऊ, असे मानणाऱ्या नेताजींची आसुसलेली कानपाळी महाराजांच्या तोंडून आलेली ती साद ऐकताना रसरसून आली. अनेक भावनांच्या उमाळ्याने त्यांनी आपले तोंड ओंजळीत झाकण्याची धडपड केली. त्यांना ती संधी न देताच महाराजांनी कडकडून ऊरभेट दिली. स्वतःला हरवून, बसल्या बैठकीवरून बघणाऱ्या संभाजीराजांच्या मनी ती ऊरभेट खोल खोलवर रुजली.
दुपारी या विधीनिमित्त पंगत मांडण्यात आली. महाराज आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेताजीरावांना इतमामाने पाटावर बसविण्यात आले. कधी नव्हे ते या पंगतीला वाढण्यासाठी पुतळाबाई व सगुणाबाई दिसत होत्या. महाराजांनी पंगतभर नजरफेर टाकीत “घ्या मंडळी” म्हणत इशारा दिला. तबकातील वाडगे एक-एक करून चौरंगावर उतरविणाऱ्या महाराजांचे नकळत सारे अनुकरण करत होते. फक्त विचारात गेलेल्या नेताजींनी, मोगली गोटातील सवयीप्रमाणे भातात थेट हात घालून कालवायला सुरुवात केली होती!
महाराजांनी खलबताला तोंड फोडले. जमली मंडळी जिवाचे कान करून ऐकू लागली. शिवबोलाचे हयातभर उरात जपून ठेवावे, असे मोती संभाजीराजांच्या कानांच्या शिंपल्यावर उतरू लागले – “समस्त मंडळींस धाडून भेटीस पाचारण केले, ते एक थोर मसलत मनी ठेवून. हे राज्य वाढीस पडले पाहिजे . आजवर इदलशाहीकडून आम्हावर मातबरीच्या चाली आल्या. फतेखान आला. अफजल आला, जौहर आला. आम्हास होत्याचे नव्हते होते की काय, असे होऊन गेले. आईच्या प्रसादेकरून आम्ही साऱ्यातून सलामत निभावून गेलो.
“आज इदलशाही सुमार झाली आहे. घरबखेड्यानं पार पोखरून निघाली आहे. समयास हत्यार धरून तिचा साधेल तेवढा मुलूख तोडून चालविण्याचे योजिले आहे. गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सुक्षेम राहावे, ते होत नाही. करिता तुंगभद्रेपासून धरून कावेरीपावेतो करून इदलशाही मारण्याचा मनसुबा धरला आहे. त्यासाठी कुतुबशाहीची दोस्ताना बांधला आहे. मोगलाईशी सुलूख साधला आहे.
“विजयादशमीचा मुहूर्त धरून, शिलेबंदीनं आम्ही खासा प्रांत कर्नाटकावर मोहीमशीर होणार आहोत. आजवर दिली तशी समस्तांनी ह्या मसलतीस इमानानं मनगटजोड दिली पाहिजे. हे राज्य थोर व्हावं, ये ‘श्री’चे मती फार आहे. तुम्ही- आम्ही सारे तिच्ये भुत्ये. हिंमत बांधून उचल घेतली, तर फत्ते देणार ती समर्थ आहे.” महाराज तळपत्या डोळ्यांना बोलत राहिले. मोहिमेचा तपशील त्यांनी खलबताच्या कानी घातला. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांना पटाईत, भालाईत, घोडाईत यांना पारखून निवडण्याचे काम जोडून दिले.
आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा जाबता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, “प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो पावेतो, रायगड धरून मागील साहेबसुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही, अण्णाजी, चांगोजी साऱ्यांनी त्यांच्या मसलतीने विलायती रक्षून असावे. काही संकटकाळ आल्यास निभावून न्यावा.”
“जी. आज्ञा.” मोरोपंतांनी हुंकार दिला. पण… पण अण्णाजींना हा जाबता मनोमन पसंत पडला नाही! महाराजांनी आपल्या जबानीच्या वैभवाने खलबत एवढे बांधून आणले होते की, प्रकटपणे अण्णाजींना कुरबुरीचा शब्द काढण्याची हिंमतही झाली नाही. महाराजांनी आपल्यावर टाकलेली रायगडाची जोखीम कसकशी त्यांच्या पश्चात सांभाळून न्यावी, या विचारात संभाजीराजे गेले. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. खलबत उठले.
“शंभू, आम्ही एक सांगावं म्हणतो. बरे समजुतीनं घ्याल?” मुद्दाम बोलावून घेतलेल्या संभाजीराजांना महाराजांनी शब्द घातला. “जी. आज्ञा व्हावी.” महाराज कशासंबंधी बोलताहेत त्याचा संभाजीराजांना काही माग आला नाही. “रायगड तुमच्या अखत्यारीखाली राहावा, हे राणीसाहेबांना मानवत नाही. तुम्ही जाणता त्यांचा स्वभाव. आमच्या माघारी त्या नाही तर माहेरी तळबीडास जाण्याच्या गोष्टी करताहेत. हे दिसावं, तर चखोट दिसत नाही. त्यांना आता आणखी काही सांगावं, त्यास आमचं मनच घेत नाही. प्रयत्नांचे दोन दिवस फुकट गेले. समयास घेणे, ते तुम्हीच समजाव्यानं घ्यावं. घ्याल?” बोलन्बोल कसा अंतरीच्या व्यथेने पिळवटला होता.
“राणीसाहेब!” त्या एका शब्दानेच संभाजीराजांचे मन घुसमटू लागले. संतापाने भरीची दमदार छाती नकळत वरखाली लवलवू लागली… “आमचे सोडा, पण खुद्द महाराजसाहेबांच्या वाटेवर त्या केवढे फासके पेरून ठेवतात! किरण साधून केवढ्या नेमक्या वक्तास! काय बिघडवले आहे आम्ही त्यांचे! निमित्त आमचे होते, घायाळ होतात महाराजसाहेब! साऱ्यांना वाटते, हे आम्हीच करतो. आम्ही बेदिल आहोत. ना आम्हाला त्यांना खुलेपणी जाब विचारता येतो, ना आबासाहेबांना त्यांच्याबाबतचा शब्द सांगता येतो. कसले युवराजपद हे? तोंडी तोबरा, पाठीवर कोरडा असे कुठवर सोसावे? का सोसावे? हे युवराजपद आम्हीहून मागितले नाही. वडील म्हणून जन्माला आलो, त्याने हे रिवाजाने चालत आले. च्या नजरेत ते खुपते. अण्णाजींना हाताशी धरून त्या पायाच्या अंगठ्याने अशा गाठी घालतात की, भल्याभल्यांना त्या हातांनी उकलू नयेत! यास त्या ‘राजकारण’ म्हणतात. त्यांच्या जनानी राजकारणात आमच्या मनाचा पायपोस होतो. आबासाहेबांची कोंडणारी फरफट पडते. कशासाठी मुलाहिजा धरतात या राणीसाहेबांचा आबासाहेब?’
“गुमान झालात?” संभाजीराजांना गप्पच बघून महाराज थंडपणे म्हणाले.
“जी. आबासाहेब देतील तो कौल आम्हास प्रसाद आहे.” महाराजांना या ऐन वेळी कसलीच यातना देऊ नये असे त्यांना वाटले.
“आम्हाला विश्वास होता, तुम्ही हेच बोलाल. दसरा धरून आम्ही गड सोडणार आहोत. तुम्ही आमच्या संगतीच मांड घ्या. मुलखाच्या सदरीपावेतो आम्हाला सोबत द्या. मग शृंगारपुरी पिलाजींच्याकडे ठाण व्हा! तिकडील प्रभानवल्लीचा आणि पन्हाळातर्फेचा सुभा आम्ही तुमच्या अखत्यारीत देणार आहोत. तो हरभातेनं आबादान रक्षून असा. केशव पंडित, उमाजी पंडित तुमच्या दिमतीला राहतील. फडाच्या राबत्यासाठी विश्वनाथ, खंडोजी बल्लाळ, परशरामपंत, महादेव यमाजी यांना संगती घ्या. पंडितांच्या सोबतीत तुम्हाला लाभलेल्या काव्यशक्तीच्या प्रसादाला चाल द्या.” बोलते महाराज येसूबाई आणि शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरीच्या आठवणीने थांबले.
“एक अर्जी आहे. आज्ञा होईल, तर पायाशी रुजू घालू.” संभाजीराजांनी निर्धार बांधला.
“बोला.” महाराजांचे डोळे त्यांच्या छातीवरच्या माळेवर जोडून पडले.
“या स्वारीत आम्ही जातीनिशी महाराजसाहेबांच्या पाठीशी राहावे म्हणतो. रायगड आणि मागील जाबता एकसरीनं मासाहेबांच्या दस्तुरीखाली राहू द्यावा. आम्हीच आबासाहेबांच्या जोडीनं आलो, तर सारे सवालच निकाली जातील.” ते ऐकताना महाराज हसले. “शंभू, हे मागणं तुम्ही घालणार हे केव्हाच आम्ही साईन न आहोत. हे राजकारण आहे. ते मनाच्या उमाळीवर नाही चालत. एकदा आग्ऱ्यात – आम्ही असे फसलो. हे गाठीशी असता पुन्हा तोच ढंग ठेवावा, हे रास्त नाही. पूर्ण विचारांती आम्ही तुम्हाला प्रभानवल्लीचा सुभा सांगितला आहे. आमचे ऐका. तो आपला करून चालवा.”
“जी. आज्ञा. फक्त एक व्हावं. आम्हास सुपुर्द केलेल्या सुभ्यात मंत्रिगणांनी नजर-देख घालू नये.”
“तुमची इच्छा असेल, तर तेही होईल. पण त्यांच्या ठायी कोणेविशी आकस धरून तुमचे भागणारे नाही. आज-उद्या याच लोकांच्या पाठबळानं तुम्हाला हर कदम टाकावं लागणार. डावे जाणाऱ्यास हिकमतीनं वळतं करावं लागतं. एक नेताजी पारखे झाले, तर कोण घोर पडला आम्हास!”
“आमच्या मनी कुणाबद्दल आकस नाही महाराजसाहेब. डावे जाणाऱ्यांना आम्ही पड खाऊन वळतं केलंही असतं, पण नको तेव्हा पायी खोडे घालणाऱ्यांना काय करावं?
सुख झालेल्यास जागं करता येतं, बतावणी घेणाऱ्यांचं काय करावं? आता थोर मनसुब्यानं आबासाहेब मोहीमशीर होताहेत. मागील विचार त्यांनी करू नये. साहेबी दिली आज्ञा आम्हास शिरोधार्थ आहे.”
“युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची? आम्हालाही साहेबी पुण्याच्या बरड जहागिरीवर नामजाद केले. आम्ही त्यांचे काही मानले नाही. आम्ही मुलखापरीस माणसे बांधीत गेलो. मोरोपंत, अण्णाजी ही माणसे वकुबाची. तुम्हास त्यांची मर्जी धरता येत नाही. त्यांना तुमची हिंमतबाजी लागी पडत नाही. जीव टांगणीला पडतो तो आमचा. दर्याच्या बसकणीत जंजिरेकर हबशी दबा धरून आहे. आम्ही मुलखापार बघून तो कोकण फाट्यांचा दावा साधेल काय? आज ना उद्या औरंगची हवस आमच्या राज्यावर चाल धरेल त्याचं काय? केवढी थोर राजकारणं कार्यी घालायची आहेत! त्यासाठी माणूस-माणूस तेवढा एकवटून जुंपणं आहे. समर्थांनी दिलेला बोध हमेशा आमच्या कानी गुंजी घालतो. “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ तुम्हीही तो भुलू नये. ध्यानी ठेवावं की, राजियांनासुद्धा प्रसंगी दोन घरे मागची चाल ठेवावी लागते, दौलतीचा शतरंज जोखमीनंच खेळावा लागतो.
“हे राज्य आमचं नाही, तुमचं नाही, राणीसाहेबांचं नाही. हे श्रींचं – आईचं राज्य आहे. इमानाचे कैक जीव आजवर त्यासाठी खर्ची पडले आहेत. भोसला तेवढा या राज्याचा नेक भुत्या आहे. याचं भान सुटलं की, तेढ पडते. राणीसाहेबांना तो पोच नाही. तुम्हीतरी तो सोडू नये. त्यांच्या मनी लालस पैदा झाली आहे. रामराजांना पुढं घालून त्या काही करू बघतात. आम्ही ते खूब पारखून आहोत. त्या गफलत करतात, आम्ही त्यांना काय मानतो त्याविशी. राणीसाहेब रामराजांच्या मासाहेब यापेक्षा आम्ही त्यांना ‘महाराणी’ मानतो. या राज्याच्या रियायाच्या ‘आऊ’ मानतो. हसावं की रडावं, या पेचाच्या त्यांच्या चाली काळजास घरे धरतात. मुलाहिजा न धरता त्यांना काही सजा फर्मावावी तर दर्षणात देखून आपल्याच हाती आपल्या मुखास काजळी फासावी तसे होईल!
“द्ौलतीसाठी मिर्झा-रजपुताच्या गोटात ओलीस राहण्याचा भार आम्ही तुमच्यावर टाकला. उत्तरेस अंगी कफनी चढवावयास लावून एकले मथथुरेस काळदाढेत दिवस काढण्याचा भार आम्ही तुम्हावर टाकला. आणि आज… आजही भार तुम्हावरच टाकतो आहोत! आम्ही हे सुखासुखी नाही करत. भोसल्यांच्या पुरुषांना भार पेलण्यासाठीच जगदंबेच्या उदरी जन्म मिळतो. इतर कुणापेक्षाही तुम्ही आणि रामराजे आमचे आहात. ते पोर लहान उमरीचे, तुम्ही भरीचे. हे सारं समजून घ्या.”
काळाचे पडदे फाडणारे ते श्रीमंत योग्याचे शिवबोल संभाजीराजांच्या मनी पीळ पाडून गेले. झटकन पुढे होत त्यांनी महाराजांचे पाय धरले. दाटल्या जवान कंठातून बोल सुटले, “आबासाहेब, ही धूळ मस्तकी धरून आम्ही शपथपूर्वक सांगतो, या राज्याचा कवडीइतकाही लोभ तो आमच्या मनी नाही. सर्वांहून हे पाय आम्हास मोलाचे आहेत. आपण सांगाल तसंच होईल.”
“शंभू” वर घेतलेल्या बांड्या भोसल्याला छातीशी बिलगून घेताना महाराजांच्या तोंडून एवढीच हलकी साद सुटली. रायगडाच्या नगारखान्यावरचा जरीपटका मावळ वाऱ्याला थपडा देत सळसळत होता. मध्येच त्याची नोकदार टोके फडकन वळत होती. नजर ठरणार नाही, अशा उंचाव्यावरून थेट कर्नाटकच्या रोखाने मोहरा धरीत होती.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११३.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.