धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११४ –
दिग्विजयी दसरा उजाडला. नौरात्री घटात बसलेली भवानी उठली. दूधधारांचा तिला अभिषेक झाला. समृद्धीची थळी तिच्या पायाशी दाटली. संभाजीराजे, मंत्रिगण, जमलेला निवडीचा सरदार लोक यांनी घेर टाकलेल्या पालखीतून दिवस फुटीवर महाराज रायगड उतरून पाचाडात आले. महाराजांच्या माघारी पाचाडच्या वाड्यात राहण्याचा निर्णय केलेल्या पुतळाबाईंनी दोघा पितापुत्रांच्या तळहातावर दह्याच्या कवड्या ठेवल्या.
रघुनाथपंत, जनार्दनपंत हणमंते, हंबीरराव, येसाजी, सर्जेराव जेधे, धनाजी जाधव, दत्ताजी त्रिमल, सूर्याजी मालुसरा, संताजी घोरपडे, नेताजी पालकर, नागोजी जेधे, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे, सोमाजी बंकी, बाळाजी आवजी, बाबाजी ढमढेरे, अण्णाजी, मोरोपंत असा निवडीचा मर्दाना पाठीशी घेत महाराज संभाजीराजांसह पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. वाड्याच्या सदरेवर टांगलेली नि:स्पंद घंटा त्यांना मूकपणे आशीर्वाद देत होती.
“हर हर म्हादेव!” घाटीघाटीतून किलकाऱ्यांचे लोळ उसळले. त्यात पेटल्या तोफभांड्यांचे दणदणते वार मिसळले. आघाडीला असलेले नाईक बहिर्जीचे टेहळं पथक मार्गी उधळलं.
तीस हजारांचा सेनासागर भोसले पितापुत्रांच्या पाठमागाने पुढे सरकू लागला. रणशिंगे शहारली. चौघडे दुडदुडू लागले. चालला! श्रींचा भुत्या नव्या दिशा फोडायला चालला. चिपळूणच्या रोखाने. स्वारी कर्नाटकवर! मजल दरमजलीने चिपळूण हे भार्गवस्थान टप्प्यात आले. महाराज व संभाजीराजांनी जोडीने तीर्थाचे दर्शन घेतले. अभिषेक झाला. दाने वाटली. चिपळूण सोडून सेनासागर भैंगारपूरच्या वाटेला लागला. गर्द आंबराईने वेढलेल्या शृंगारपूरच्या वेशीवर पिलाजी शिर्के, गणोजीसह पालखी घेऊन महाराजांच्या आगवानीला आले. ऊरभेटी झाल्या. रक्ताच्या गोतावळ्यासह महाराज व संभाजीराजे शृंगारपुरात प्रवेशले.
सूर्यराव सुर्वे शृंगारपूरच्या वतनावरून परागंदा झाल्यापासून त्याचा राहता वाडा, “कारभारी वाडा ‘ झाला होता. त्याच वाड्यात महाराजांचा मुक्काम पडला. रात्री सावचित्ताच्या समयाला महाराजांनी प्िलाजींच्याकडे संभाजीराजांच्या बाबत विषय काढला. प्रभानवल्लींचा सुभा सांभाळण्यासाठी युवराज शृंगारपूरला ठाण होणार, हे त्यांच्या कानी घातले. हरभातेने युवराजांना जोड द्यावी, असा शब्द टाकला. पिलाजींनी आनंदाने तो उचलला. आपले जावई गणोजी, कन्या राजकुवरबाई यांचे क्षेमकुशल महाराजांनी विचारले. रात्रीचे थाळे शिर्के-भोसले असे जोडीपंक्तीने झाले.
दुसऱ्या दिवशी पहाट धरून महाराजांनी वाडा सोडला. संभाजीराजांच्यासह ते भावेश्वरीच्या दर्शनाला आले. शिर्क्यांच्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेऊन पिलाजींना खांदाभेट देऊन महाराजांनी शृंगारपूर सोडले. पितापुत्र आंबाघाटाच्या रोखाने चालले. उन्हे चढू लागली. मोरोपंत, अण्णाजी रायगडाकडे परतले. आंबाघाटाची चढण सामने येताच महाराजांनी ‘विजय’चे कायदे आखडले व पायउतार झाले. संभाजीराजांनी मांड मोडली. पिछाडीचा सेनासागर थोपला.
“राजे, परता आता. आम्ही निघतो.” महाराजांचा तळहात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. काही क्षण बेजबान तसेच घुटमळून गेले. निरोपाची वेळ आली होती.
“महाराजसाहेब सांभाळून असावं. दर मुक्कामावरून आम्हास खबर कळवावी. मागील चिंता धरू नये.”
“शंभू, आम्ही चिंता करणार कोण? साऱ्याची चिंता वाहणारी आई थोर आहे. आम्ही सांगितलं ते कार्यी घाला. सूनबाईसह कबिल्यानिशी येऊन शृंगारपुरी ठाण व्हा.आम्ही परतू ते पिलाजींच्या तोंडून त्यांच्या जावयांची तरफदारी ऐकावयास. येतो आम्ही. जय भवानी!”
दोन बुलंद ऊर क्षणात एकमेकांना भिडले. सोनचौकडे हिंदोळले. टोपांतील मोतीलगी लडलडल्या. शब्द कोंडून गेले. डोळेच बोलके झाले. मिठी सुटली. “शिव-शंभो’ विलग झाले. महाराजांनी झटकन जनावरावर झेप घेतली. खंडोजी, रायाजी, अंतोजी अशा आपल्या धारकऱ्यांसह संभाजीराजे बगलेला झाले. दिग्विजयी सेनासागर घाटाच्या चढणीला लागला.
संभाजीराजे चढण चढणाऱ्या “विजय ‘ घोड्याकडे जोडल्या नजरेने बघत राहिले. उगाच त्यांना उत्तरेत निरोप देऊन पाठमोरे झालेले कफनीधारी महाराज आठवले! कानात बोल घुमले – “साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे!”
जेव्हा ते शृंगारपुरात घुसले, तेव्हा किन्नाट धरून आले होते. शिरक्यांच्या पागेकडचा निवडक घोडा महाराजांच्या दिमतीला रुजू झाला होता. शिर्क्यांच्या पागेचा सैस उरलेल्या घोड्यांतील एक पथक घेऊन ते पागेत ठाण करायला मोतद्ारांसह चालला होता. सैस आणि मोतद्दार संभाजीराजांना बघून अदबीनं कमरेत झुकले. घोडेपथक थांबले. संभाजीराजांची नजर त्या पथकावरून फिरली.
आघाडीच्या खुरावर पांढऱ्या रंगाचे चांदवे असलेले ते उभे पथक ‘पऐबी’ होते. गैरशकुनी होते! ते बघताना संभाजीराजे मनोमन चरकले! शृंगारपुरी दोन दिवस मुक्काम करून संभाजीराजांनी पिलाजीमामा, गणोजीराजे यांचा निरोप घेतला. ते रायगडावर आले. रायगड आता राहुजी सोमनाथ यांच्या कारभाराखाली होता. पुतळाबाई पाचाडच्या वाड्यात येऊन राहिल्या होत्या. सातमहालातील आपला महाल त्यांनी येसूबाई आणि दुर्गाबाई यांच्या सेवेत जोडून दिला होता. सिंदखेडच्या राणूअक्का अद्याप गडावरच होत्या. त्यांना सोयराबाईंची कुठलीच चाल पसंत नव्हती. आपल्या भावाला, संभाजीराजांना शक्य ते सगळे पाठबळ देण्यासाठीच त्या माहेरी राहिल्या होत्या.
सुभे प्रभानवल्लीचा फड शृंगार पुरात बसविण्यासाठी संभाजीराजांनी माणसं पारखून सुरुवात केली होती. या कामी त्यांना कवी कुलेशांची मसलत मिळू लागली.
केशव पंडित, उमाजी पंडित, विश्वनाथ ही माणसे बरोबर ठेवण्याचा सल्ला महाराजांनीच दिला होता. परशरामपंत, खंडोजी बल्लाळ, महादेव यमाजी यांच्याशिवाय तर फडाचे पान हलू शकत नव्हते. संभाजीराजांनी या सर्वांना शृंगारपुरी जाण्याची आज्ञा दिली. सुभ्याचा फड हलला. संभाजी राजांचा निरोप घेऊन ककी कुलेशांनी, उधो योगदेवसह रायगड सोडला. कामंदकीय नीतिसार, विष्णुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत असे ग्रंथ बांधलेली बासने बेगारांच्या डुयांवर देऊन केशव पंडितांनी; उमाजी पंडितांसह शृंगारपुराची वाट धरली. रायगड सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला. महाराज परतेपर्यंत शृंगारपूरला मुक्काम धरावा लागणार म्हणून संभाजीराजे रामराजांना सतत आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. सोयराबाईंना ते काही मानवत नव्हते.
वाटचालीला पहारा देणाऱ्या शिबंदीचे धारकरी संभाजी राजांनी निवडले. शृंगारपूरना आपण कबिल्यानिशी येत असल्याचा खलिता पुढे पिलाजीमामांना पाठविला. जगदीश्वराच्या शिवर्पिडीवर अभिषेक चढविला.
“आम्ही रायगड सोडणार ‘ हे कानी घालावे, म्हणून राणूअक्कांची भेट घेण्यासाठी ते सातमहालांतील पुतळाबाईंच्या महाली आले. या महालात आता येसूबाई, दुर्गाबाई, राणूआक्का अशा मेळजुळीनं राहत होत्या.
राणूअक्कांना अदब देऊन संभाजीराजांनी विषय काढला. “आक्कासाहेब, आम्ही आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे कबिल्यानिशी शृंगारपुरी जाणार आहोत.” राणूअक्कांनी ते शांतपणे ऐकून घेतले. थोड्यावेळाने त्या निर्धारी राजस आवाजात म्हणाल्या, “आम्ही ते समजून आहोत. आम्ही जातीनं तुमच्या संगती यायचं ठरविलं आहे!”
“आम्ही नाही समजलो. ” गोंधळलेल्या संभाजीराजांनी चमकून विचारले. “बाळमहाराज, इथं आल्यापासून मिटल्या जबानीनं आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही सारं बघतो आहोत. दूर असता आमच्या कानी जे-जे पडत होतं, ते एवढ्या वाकड्या वाटेचं असेल, असं आम्हास खरं पटत नव्हतं. मासाहेबांच्या डोळ्यांस तुम्ही खुपता. जे घडलं आहे ते काहीच नव्हे एवढे घडणार आहे, आम्ही बरीक ते ताडलं आहे. साऱ्यांनी तुम्हास “पोरकं ‘ मानलं आहे. आता… आता आम्हीच तुमच्या पाठीशी साबलीसारख्या राहणार आहोत. जे कोणी तुमच्या पायी खोडे घालू बघतील त्यांना जाब विचारणार आहोत. बाळमहाराज, तुमची इच्छा असो नसो, आम्ही शृंगारपुरी येणार आहोत!”
भारल्या नजरेनं संभाजीराजे अक्कासाहेबांच्याकडे बघतच राहिले. मनाच्या वर्मी जागेवर बोट ठेवणाऱ्या राणू अक्कांच्या बद्दल त्यांना रक्ताचा उमाळा दाटून डोळ्यांत आला. काय बोलावं त्यांना सुचेना.
“गुमान झालात? बोला. ” अक्कासाहेबांनी विषय सोडला नाही. “जशी आपली इच्छा अक्कासाहेब.” संभाजीराजांनी त्यांना संमती दिली. ठरल्या दिवशी सातमहालासमोरच्या चौकात तीन पडदेबंद मेणे तयार झाले. येसूबाई, दुर्गाबाई आणि राणूअक्का यांच्यासाठी! पालखी दरवाजाने ते बाहेर पडले.
युवराजांनी राहुजी सोमनाथांचा निरोप घेतला. सोयराबाईनी कितीद्दी थोपविण्याचा प्रयत्न केला, तरी हट्ट धरलेले रामराजे अण्णाजी आणि मोरोपंत यांच्या बरोबरीने आघाडी मनोऱ्यापर्यंत आलेच. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ थोपटीत संभाजीराजे त्यांना म्हणाले, जसे महाराज आंबाघाटाच्या पायथ्याशी खुद्द त्यांनाच म्हणाले होते तसे, “बाळराजे, परता आता. येतो आम्ही.”
दादामहाराज…” काहीतरी बोलण्यासाठी रामराजे घोटाळले.
“बोला.” संभाजीराजांनी त्यांचा खांदा हळुवार थोपटला.
“आम्ही… आम्ही येऊ?” रामराजांचे डोळे केवढ्यातरी अपेक्षेने भरून आले होते. खांद्यावरचा संभाजीराजांचा हात आपोआप मागे हटला. एकसरीने त्यांनी अण्णाजी,
मोरोपंत, राहुजी यांच्यावर नजर फिरवली. सर्वांच्या माना खाली होत्या. संभाजीराजांना तो प्रसंग आठवला, राजगडावरचा. ते रजपुताच्या गोटात ओलीस जायला निघाले तेव्हाचा. तेव्हा निरोप द्यायला आलेल्या महाराजांनी ध्यानीमनी नसता एकाएकी आपल्या छातीवरची माळ उतरवून दुपेडी करीत त्यांच्या गळ्यात चढविली होती!
कसल्यातरी निर्धाराने, तळपत्या डोळ्यांनी संभाजीराजांनी आपल्या छातीवरच्या आईच्या कवड्यांच्या माळेला हात घातला. हलकेच ती उतरविली आणि तिचा दुपेडी फेर रामराजांच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, “आम्ही नसलो तरी, ही आमची निशाणी ठेवा. येतो आम्ही. पाचाडच्या सदरेवर थोरल्या आऊंची घाट वाजते. तिला नेमाने मावळमाचीवर जाऊन मान देत चला! जय भवानी! ‘ ‘
कुणाकडेही न बघता संभाजीराजे तडक रायगडाच्या आघाडी मनोऱ्यांना पाठमोरे झाले. सहज म्हणून त्यांनी नजर गंगासागर टाक््यावर फिरली. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या वाकड्या फांदीवर अंग मुरवून बसलेला एक खंड्या पक्षी त्यांना दिसला. नुकतंच काहीतरी मटकावल्या सारखा तो आपली लांब चोच साफ करीत होता!
गडाच्या उताराला लागलेल्या राजमेण्यांच्या मागून मावळी पायताणांची कुरकुर उठवीत, काखोटीचे गाठोडे सावरीत चाललेल्या धाराऊचे पायताणांच्या कुरकुरीशी मेळ पडलेले मन स्वत:लाच विचारीत होते, ‘असं कशापायी हुतंया हे समद? ‘ शृंगारपुरात सुर्व्यांच्या वाड्यावर संभाजी राजांचा प्रभानवल्ली सुभ्याचा फड बसला. सुभ्याच्या अखत्यारीतले सरदार-दरकदार सरंजामानिशी युवराजांच्या भेटीसाठी शृंगारपुरात येऊ लागले. हिवाळ्याच्या दाटल्या धुक्यात शृंगारपूर गजबजू लागले.
पुरात संभाजीराजांनी धतुर्विधेचा सराव घ्यायला सुरुवात केली. पुराच्या चौतर्फाने गर्द राने दाटलेली होती. त्यात जागोजागी केंबळी झोपड्यांच्या वाड्या करून राहिलेले धनगर रानात “वाघरू ‘ उठल्याची, “काळ्या जनावरांनी ‘ विधूस मांडल्याची खबर पुरात आणू लागले.
गणोजी, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी असे पट्टीचे शिकारखेळे घेऊन संभाजीराजे रान काढू लागले. त्यांनी पाडलेली जनावरे बघायला पंचक्रोशीतल्या वाड्या-मजऱ्यांतील माणसे पुरात येऊ लागली. तीर-कमान आणि ठेचणीच्या बंदुकीची निशाणमार यावर संभाजीराजांचा बेजोड हात बसला.
एका शुभमुहूर्ती कुलदेवता भवानीला अभिषेक चढवून तिच्या आशीर्वादाने संभाजीराजांनी ‘बुधभूषणम् ‘ या काव्यग्रंथाला हात घातला. या काव्यग्रंथात विष्णुधर्मोत्तर पुराण, कामंदकीय नीतिसार, मत्स्यपुराण, महाभारत आदी ग्रंथांतील श्लोक निवडून देवदेवतांची स्तुती, राजनीती, प्रकीर्णनीती या विषयांवर चर्चा करायची होती. संभाजी राजांचा हा तर आवडीचा विषय होता.
वाड्याच्या बैठकी दालनात लाकडी अडंग्यांवर समोर पुराणग्रंथ मांडून बैठक बेतलेल्या केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश यांच्याशी संभाजीराजांची काव्य शास्त्राची बैठक बसली. धूपदानातून उठत, फिरक्या घेत दालनाच्या छताकडे झेपावणाऱ्या धुराच्या वळ्यांवर अचल नजर जोडलेले संभाजीराजे कशाततरी हरवल्यासारखे विचारगत झाले. हलकेच त्यांच्या पापण्यांची कवाडे मिटली गेली. आता चर्या आगळीच शांत-सुंदर दिसू लागली. विघ्तहर्त्या श्रीगजाननाची भाक करणारे बोल त्यांच्या ओठांतून सहज उमटू लागले. उजव्या हाताशी बसलेले परशरामपंत ते बोल शहामृगपिसाच्या टोकाने पकडून कागदावर रचू लागले.
“देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम्।
भक्तविघ्हनने धृतरत्ं तं नमामि भवबालकरत्रम्।॥।”
– देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, दुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्े वारणाऱ्या, रत्ने धारण करणाऱ्या, ‘शिवा’च्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो!
गणेशस्तवन केलेल्या शंभूराजांना आपल्या थोरल्या महाराजसाहेबांचे – शहाजीराजांचे स्मरण झाले. त्यांचे हुबेहूब वर्णन करणारे घडीव, गीर्वाण बोल युवराजांच्या ओठांतून सुटू लागले –
“भृशत् बलान्वयसिंधुसुधाकर: प्रथितकीर्त उदारपराक्रमः।
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव:।। ”
-सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले!
भोवतीचे पंडित कानांचे शिंपले टवकारून गिर्दीला रेललेल्या, मिटल्या डोळ्यांच्या संभाजीराजांना एकटक निरखू लागले. पाणवठ्यावरून बगळ्यांची सफेद रांगच रांग तरंगत जावी, तसे काही क्षण शांतपणे तरंगत गेले. आता मिटल्या डोळ्यांसमोर संभाजीराजांना आपल्या आबासाहेबांची अनेक रूपे, स्वरूपे तलवारीच्या फिरत्या, तळपत्या पात्यासारखी दिसू लागली.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११४ –
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.