महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,482

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११५

Views: 1424
11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११५ –

आग्ऱ्याच्या भरल्या दरबारातून तख्ताला पाठ दाबीत तरातर बाहेर पडणारे, तोफगोळ्यासारखे आबासाहेब, सिंहासनासमोर तडक खडे होत, बहादूरच्या मोगलाई वकिलाला ‘चालते व्हा’ची नगारखान्याकडे बोटाचा रोख देत जरब देणारे आबासाहेब, “नावाची नाम्रा तुम्हास आत्ता कळली नेताजीराव ‘ म्हणत पालकरकाकांना अपार मायेनं ऊरभेट देणारे महाराजसाहेब, थोरल्या आऊंच्या छत्रीवर सोनपाने वाहून गुडघे टेकीत पायरीला नम्नभावे कपाळ भिडविणारे आबासाहेब, साताऱ्याच्या किल्ल्यावर बिछायतीला लेटून घायाळ झालेले असहाय आबासाहेब, “’वडिली जोडून दिली दौलत कोण पुरुषार्थाची? ‘ असे शांतपणे सुनविणारे – ‘जन्माने भोसला तेवढा आईचा नेक भुत्या ‘ म्हणत आम्हास छातवानाला बिलगते घेणारे आबासाहेब –

ती रूपे एकमेकांत मिसळू लागली. डोळ्यांत मावेनाशी झाली. महाराजांचे वर्णन करणारे नेमके शब्द संभाजी राजांना गवसेनासे झाले. नाकगड्डा चिमटीत धरताना त्यांच्या कपाळी आठ्याच आठ्या फुलल्या. त्यांना नकळतच गर्दनीला झोल मिळाला. झोलाने त्यांच्या टोपातील मोतीबंद लडी डुलल्या. आणि त्यावरून फडफडत झेपावल्यासारखे वाटावे, असे शब्दांचे सोनेरी पक्षी उडाले –

“यस्य अनेक वसुंधरा परिवृट्‌ प्रोत्तुंग चूडामणे:।

पुत्रत्व समुपागत: “शिव ‘ इति ख्यात: पुराणे विभु:।। ”

त्या शहाजीराजांना महामूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे उत्तुंग म्होरके वाटणारे, पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी, हे पुत्रश्नेष्ठ झाले!

“कविकालभुजंगम अवलीढं, निखिल धर्ममवेक्ष्य विक्लव य:।

जगत: पतिरंशतोवताप: स शिवच्छत्रपतियत्येजय:।।”

त्या कलिकालाच्या भुजंगाला पचविलेल्या, अखिल धर्माची हीनावस्था बघून विव्हळ झालेल्या, स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतींचा जयजयकार असो!

“जयत्यजेय: ‘ संभाजीराजे दोन-तीनदा स्वत:शीच पुटपुटले. सफेत “विजय ‘ घोड्यावर मांड जमवून आंबा घाटाची चढण चढणारे, सरासर डोळ्यांआड होणारे महाराज त्यांना दिसू लागले. उभ्या आंबा घाटाची दरडच घुमत गर्जताना त्यांना ऐकू येऊ लागली – “आम्ही चिंता करणारे कोण? चिंता वाहणारी आई थोर आहे!” आपल्या कुलाचा वसा आठवत संभाजीराजांचे मन स्वत:वर येऊन ठाण झाले. महाबळेश्वरच्या गोमुखातून पाण्याची धार लागावी, असे त्यांच्या तोंडून काव्यबोल पाझरू लागले –

“तस्यात्मज: शंभूरिति प्रसिद्ध: समस्तसामंतशिरोवतंस।

य: काव्यसाहित्यपुराणगीतकोदण्डविद्यार्णवपारगामी।।

बिविच्य शास्त्राणि पुरातनानामादाय तेभ्य: खलु सोयमर्थम्‌|

करोति सदग्रंथममुं नृपाल: स शंभूवर्मा बुधभूषणाख्यम्‌।।

त्या शिवाजीराजांचा – भोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा, काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – “शंभूराजे ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. पुराणग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभूवर्मा हा ‘बुधभूषणम्‌ ‘ नावाचा सदूंथ रचीत आहे!

आपला काव्यग्रंथ रसिकांनी कसा वाचावा याचा करीणा देताना तर संभाजीराजांची गोल, पुष्ट, मर्दानी चर्या उजळून निघाली. खानदानी अदबीचा भंडारा त्या चर्येबर शालनाम्यासारखा पसरला –

“विविच्य सन्त: कृतिमस्मदीयां गृहून्तु सद्‌ असदूच्ञ त्यजन्तु।

क्षीरावियुक्तं परिहृत्य नीरं क्षीरं भजन्ते खलु राजहंसा:।। ”

दुधात मिसळलेले पाणी वगळून राजहंस फक्त दूधच सेवन करतात तसे विद्वान, सज्जन सत्य तेवढेच आपलेसे करून असत्य वगळून टाकतात! डुईची पगडी डोलवीत परशरामपंतांनी युवराजांनी सांगितलेला, रसिकांना उद्देशून असलेला श्लोक कागदावर उतरविला. त्याखाली दुरेघी ओढली. मऊ वाळूची चिमट हलकेच कागदावरच शिवरली. ग्रंथाचा पहिला सर्ग समाप्त झाला होता.

संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकीतल्या पंडितांतील कवी कुलेश त्यांच्यावर केव्हाचे डोळे जोडून नुसते एकटक बघत होते. ते भारावून उठले. कमरेत झुकून त्यांनी अगोदर संभाजीराजांना अदब दिली.

“युवराज, उत्तरसे इस मुल्क आये, पर कोई युवराज ऐसे ढंग की काव्यरचना करता है, ऐसे न हमने देखा न सुना! ” कुलेश भारावून बोलले. “शुक्रगुजार कविराज, तशरीफ घ्या. आता आमच्या कुलदेवता आई भवानीची स्तुती बांधणे साधते का, ते पाहावे म्हणतो आम्ही.” हाताच्या इशारतीने संभाजीराजांनी कुलेशांना बसते केले.

त्या बैठकीदालनात पिलाजी येऊन भिंतीकड धरून उभे आहेत, याचे कुणालाच भान नव्हते! मिटल्या डोळ्यांनी संभाजीराजे देवबोलीत काही सांगताहेत, हे बघून अभिमानाने फुललेले पिलाजी काही न बोलता ती बैठक तसेच बघत राहिले होते.

“जगदंब, जगदंब! ” संभाजीराजांनी डोळे मिटते घेतले. उजव्या हाताची बोटे नव्याने धारण केलेल्या छातीच्या माळेवरून फिरू लागली. पाजळते पोत नाचू लागले, भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागल्या. कानभरून संबळ तुणतुणी घुमू लागली, “उदं ग अंबे उदं!’ उदोकार थरकू लागले. शस्त्रं उगारलेली, रक्तनेत्री, व्याघवाहनी जगदंबा संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली! भवानीची स्तुती करणारे देववाणीतले बोल त्यांच्या ओठांतून उधळू लागले. आईने बैठक घेतलेला, काळ्या- बाळ्या पट्ट्यांचा मानकरी वाघ त्यांना झळमळीत संगमरवरासारखा पांढरा दिसू लागला. त्यांच्या ओठांतून सुटणाऱ्या शब्दांना जशी सोनकळाच आली –

“स्फटिकचितपीठे शामलांगी भवानी -”

आहे स्फटिकासारख्या धवल आसनावर विराजमान झालेली ही शामलांगी भवानी आहे.

“विलसत भालतिलका – कपाळी रक्तटिळा शोभणाऱ्या, पुर्णेन्दुह्द्यवदनां – पुनवेच्या चंद्रासाराखा मनोहर मुखडा असलेल्या, सवर्तुलस्तनद्वंद्रमु – कलशस्तनी, पद्मनेत्रविराजिताम्‌ – कमलनेत्री, शंभूकान्ता तेजस्वी कांती लाभलेल्या, निम्रनाभिं – खोलगट नाभीच्या, कृशमध्यां – चिवळ कंबर असलेल्या, विलसद्रक्तवसनां रक्तकांची परिवृताम्‌ – रक्तरंगी नेसू ब चोळी ल्यालेल्या, चंद्रचूडमणीस्तुतिमेणानां – धरणीश शंभू रचितामतिभकत्या – त्या चंद्रचूडमणी भवानीची मी राजा शंभू भक्तिभावे स्तुति गातो! ”

“वा! व्वा! ” कवी कुलेशांनी न राहवून भरघोस दाद दिली. पिलाजींचे फुलले डोळे तर संभाजीराजांच्या मुखड्यावर जखडूनच पडले होते.

संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकी दालनाच्या उंबरठ्यात त्यांना खोळंबलेली धाराऊ दिसली. ती परतण्याच्या बेतात आहे, हे ताडून इतर कुणाशीच काही न बोलता युवराजांनी तिची दखल घेतली – “बोला आऊ, काय आज्ञा आहे?”

कसे बोलावे या पेचात धाराऊ खिनभर घुटमळली. मग निर्धाराने म्हणाली, “ह्ये दयेवाधर्माचं क्काय चाललया त्ये हुं दे! थाळं लावल्यात त्येवडं कानावं घालायचं हुतं! ”

हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. उठता-उठता त्यांच्या मनी विचार आला, “आम्ही काव्य बांधतो ती देवबोली उजवी की या धाराऊची कुणबाऊ, निखळ मावळबोली उजवी? ‘ ठेवणीचे जरी आसवाब लेवून येसूबाई, दुर्गाबाई आणि राणूअक्का सिद्ध झाल्या. आज मकर संक्रांत होती. सरंजामानिशी जाऊन गावदेवता भावेश्वरीची ओटी सवाष्ण हातांनी भरायची होती.

पहाट धरून संभाजीराजांनी मल्लखांबाचे दशरंग, चक्रीचे नागपिळ्यासारखे हात करून घेतले. अंघोळ घेऊन, दुधाची गिंडी रिचवून रात्री देव्हाऱ्यात ठेवलेली भवनीची माळ त्यांनी गळ्यात धारण केली. रायाजीने समोर धरलेल्या दर्पणात बघून सरशीने कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून घेताना त्यांना जिजाऊंचे बोल आठवले. “शिवानंच हे सुखदु:खाचे जोडपट्टे तुमच्या कपाळी रेखले आहेत!”

सदरेवर येऊन युबराजांनी सुभ्याच्या रयतेला दर्शन दिले. संक्रमणाचा दिवस असल्याने बडीलधाऱ्यांचे दर्शन घ्यावे, म्हणून ते राणूअक्कांच्या भेटीसाठी दरुणीमहालात आले. आपल्या स्वारीला येताना बघून येसूबाई पदरकाठ तोलीत सावरत्या झाल्या. दुर्गाबाई तर शरमून अंतःपुरात जायला निघाल्या.

“बाई, थांबावं. ” येसूबाईंनी त्यांना रोखते केले.

आत आलेल्या संभाजीराजांनी राणूअक्कांना हसत अदब दिली. सहज नजर जाता त्यांना एका पाटावर चांदीच्या ताटात मांडलेला, गूळ-तिळांनी बांधलेला मगर दिसला. देवीसमोर तो आज पुजायचा होता. मुहूर्त धरून त् धरून त्याला फोडून तोच तिळगूळ वाटायचा होता. पाटाजवळ जात संभाजीराजे तो मगर निरखीत राहिले.

“बाळमहाराज, तीरकमान, शिकार, ग्रंथपुराण यांतून तुम्हाला कबिल्याकडच्या या ‘तीळ-गुळा’ची याद राहते की नाही, आम्हाला अंदेश होता! ” राणूअक्का खालमानेने उभ्या असलेल्या येसूबाई व दुर्गाबाई यांच्याकडे बघत हसून म्हणाल्या. मगरावरची नजर तशीच ठेवीत ते म्हणाले, “आमचं या मगरासारखंच आहे अक्कासाहेब! मनानं धरली ती बाब सोडवत नाही आम्हाला. आम्ही महाराजसाहेबांना काव्य बांधून दाखवणार आहोत.”

“आम्हास त्यातील काही कळत नाही! आज आम्ही तुमची बंदुकीची निशाणमार बघावी म्हणतो. दावाल? ” येसूबाई, दुर्गाबाईच्याकडे बघतच आक्कासाहेब हे म्हणाल्या.

संभाजीराजे सबागतीने बोलून गेले – “जी आज्ञा. आज संध्याकाळी भावेश्वरीच्या आवारातल्या पिंपळावर श्रीफळं बांधण्यात येतात. बार टाकून ती छेदायची असतात. आम्ही संध्याकाळी निशाणमार दावू. आपण ती बघायला यावं. ” संभाजीराजांनी राणूअक्कांना नजर दिली. तशीच ती येसूबाई व दुर्गाबाईच्यावर फिरविली. तिचा अर्थ होता

– “यांनाही आणावं येताना! ‘ राणूअक्कांना तो कळला. त्या नुसत्याच हसल्या. मघापासून त्यांना जे म्हणायचे होते, ते आत्ता कुठे त्यांच्या ‘बाळमहाराजां’च्या दखलेत झाले होते.

“येतो आम्ही!” संभाजीराजे महालाबाहेर पडले.

एका कुणबिणीने मगर ठेवलेल्या चांदीच्या थाळ्यावर सरपोस घालून तो उचलून खांद्यावर घेतला. हाती कुंकवाचे करंडे घेतलेल्या राणूअक्का, येसूबाई, दुर्गाबाई पाठीशी कुणबिणींचा तांडा घेऊन वाड्याबाहेर पडल्या.

संध्याकाळी पुराच्या वेशीवर असलेल्या भावेश्वरीच्या आवारात तोड्याच्या बंदुकीचे बार दणदणू लागले. वीर पवित्रा घेतलेले संभाजीराजे बंदुकीचा दस्ता उजव्या खांद्याला आवळून, डावा डोळा मिटत पिंपळावरच्या श्रीफळांवर बार टाकू लागले.

एकसरीने त्यांनी श्रीफळांचा पंचोत्रा फोडला. फळांच्या कवच्याच्या ठिकऱ्या पाराखाली उतरल्या. श्रीफळांतील पाण्याने पिंपळपाने न्हाऊन निघाली. आणि ते बघताना बैठकीवर बसलेल्या येसूबाई व दुर्गाबाईची मनेही एका आगळ्याच भावनेने न्हाऊन निघाली! किंक्रांतीचा सण असल्यामुळे आज शिरक्यांच्या वाडयावर संध्याकाळी मानाचे बकरे पडणार होते.

पुरातील पिलाजींच्या वाड्यात संभाजीराजांची “बुधभूषणम्‌’ची दुसरी काव्यशास्त्र बैठक बसली. आज “राजनीती’ची बांधणी करायची होती. ग्रंथाचा हा तर गाभा होता. धूपदानातून गंधमंगल वळी उठू लागली. दालनभर गरगरत फिरू लागली. शांतता पसरली.

परशरामपंतांनी कापडी अस्तर असलेल्या कोऱ्या कागदावर हस्तलेख लिहिला –

“| द्वितीयो ध्याय:। ‘ राजनीती:

“पंडित, “राजा ‘ म्हणून जो म्हणतात, त्यास कोण-कोण लक्षणांची जोड लागते? ” उमाजी पंडितांना संभाजीराजांनी सबाल घातला.

“जी ” समोरच्या अडंगीवरच्या कामंदकीय नीतिसाराची पाने उलटी टाकीत काही वेळाने उमाजी पंडित म्हणाले, “क्रोध, लोभ, भय, द्रोह यांचे स्तंभन केलेला, वृद्धांच्या हितोपदेशांनी संपन्न झालेला, स्वत: संपादन केलेल्या गुणांचा असा राजा असावा. ”

हारीने समोर मांडलेल्या अडंग्यांवरच्या ग्रंथांची पाने संभाजीराजे उलटी घालू लागले. परशरामपंतांच्या कानातील भिकबाळीकडे बघत संभाजीराजे राजलक्षणांचे प्राजक्तकळे काव्यवेदीवर उधळू लागले –

“मेधावी, मतिमान, दक्ष:, क्षमावान, क्रजु-

बुद्धिमान, सावध, क्षमाशील, मृदु अंत:करणाचा। ”

धर्मात्मा अपि न असूयक: –

धर्मशील, पण असूया नसलेला स्मरणत्युपकृतं, वृद्धोपसेवी य: –

केलेले उपकार जाणणारा, वडीलधाऱ्यांचे अनुसरण करणारा. शूरो न व्यसनी – शूर असूनही व्यसनी नसलेला!

अविसंवादी, दीर्घदर्शी, जितक्रोधो, जितेन्द्रिय: –

विसंवादी बुद्धी नसलेला, दूरदृष्टीचा, क्रोध जिंकलेला आणि इंद्रियांवर कब्जा मिळविलेला असा राजा असावा.

“ कविराज, अशा राजाचा राज्यकारभार कोण भातेचा असावा? हा विष्णुपुराणातील श्लोक केवढा गोमटा आहे!” मध्येच थांबून संभाजीराजांनी कुलेशांना नजर दिली. स्वत:ला आवडलेला प्लोक ते वाचू लागले –

“नातिदण्डो न निर्दण्ड-

अतिकायदेबाज नसलेला व कायदा एकदम ढिलाही न टाकणारा.

व्यवहारे सम: प्राप्ते पुत्रेण रिपुणा सह।

गनीम असो व साक्षात स्वत:चा पुत्र असो, व्यवहारात दोघांशी समतोल असणारा! ”

त्या श्रोकाबरोबर महाराजांच्या आठवणीने संभाजीराजांची मुद्रा अभिमानाने कशी फुलून उठली. भारल्यासारखे ते राजलक्षणे पुढे सांगू लागले –

“लोकाधार:, दुष्परिग्रह: –

तो रयतेला आधार देणारा आणि दुष्टांचे निर्दालन करणारा असावा! ”

“वाहवा! ”

“छान! ”

“उत्तम! ”

कुलेश, केशव पंडित, उमाजी पंडित साऱ्यांनीच त्या मर्मी राजलक्षणांना एकदम दाद दिली. मुद्रेच्या पुनवेचा चंद्रथाळा झालेले, स्वकुलाच्या अभिमानाने डोळे तेजाळलेले संभाजीराजे पुढची राजलक्षणे सांगणार तोच त्या दालनात पिलाजीमामा प्रवेशले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment