महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,800

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११७

By Discover Maharashtra Views: 1435 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११७ –

गावदेवता भावेश्वरीच्या मंदिरासमोरच्या आवारात अवघे शृंगारपूर लोटले होते. देवीला सामोरा येईल असा बिछायती, गिर्द्या मांडलेला बैठकीचा चौथरा संभाजीराजांसाठी सिद्ध केला होता. त्यावर गिर्दीला रेलून संभाजीराजे बसले होते. त्यांचा माग धरून पाठीशी पिलाजीमामा, गणोजीराजे, कान्होजीराजे असा शिर्क्यांचा मर्दाना बसला होता. डाव्या बगलेला धरून केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश, उधो योगदेव, महादेव यमाजी, परशरामपंत, खंडोजी, अंतोजी, रायाजी एकटाकीने खडे होते. उजव्या बगलेला मांडलेल्या जनानी बैठकीवर येसूबाईच्या आईसाहेब, येसूबाई, राजकुवरबाई, राणूअक्का, दुर्गाबाई असा भोसले-शिर्क्यांचा जोड-जनाना बसला होता. त्यांच्या पाठीमागे खांद्यावर तबक तोलून धरलेली, आजवर घडलेले “मायंदाळ’ मनात रेंगाळत असलेली धाराऊ उभी होती.

भावेश्वरीच्यासमोर येईल असा, आंबवती आणि श्रीफळांनी सजलेला होळीचा सावरीचा स्तंभ चांदणे अंगावर घेत उभा होता. त्याला धरून आवाराच्या मध्यभागी येईल, असा लाकडांचा भला मोठ्ठा हुडवा रचण्यात आला होता. हातशेणी रचून त्यातील लाकडे पुरती झाकून टाकली होती.

“धाकलं धनी सणाच्या दिसाचा मान करावा. होळीला चूड द्यावा.” होळीसणाचा मानकरी, शृंगारपूरचा गावगुरव संभाजीराजांच्यासमोर येऊन आर्जवाने म्हणाला. हातातील मशालीचा चूड त्याने उंच उठवला.

युवराज संभाजीराजे बैठकीवरून उठले. पायीच्या राजमोजड्या त्यांनी उतरल्या. गुरवाच्या हातातील चूड आपल्या हाती घेतला.

“जय भवानी” पुण्यस्मरणाची भाक फोडून त्यांनी हुडव्याला पेटता चूड दिला. हुडवा पेटला. दूधरंगी चांदण्यात ज्वाळांचे पिवळे, तांबडे पक्षी उड्या घेऊ लागले. होळी शेलगली. धगधगलेल्या होळीच्या आगीशी झट घेण्यासाठी होळकरी खेळे सिद्ध झाले. संभाजीराजे हुडव्याला पाठ न दावता हटत्या कदमांनी बैठकीवर बसले. गुरवाने पेटत्या हुडव्याला फेर घालीत चारी अंगानी श्रीफळे रसरसत्या निखाऱ्यात फेकली. बेभान झालेले होळकर खेळे आगीभोवती घिरट्या घालू लागले. मरणाला कनवटीला लावणारे हात एका मागोमाग एक असे फुलल्या, तडकत्या निखाऱ्यात मानाचे श्रीफळ शोधण्यासाठी बेगुमान घुसू लागले.

जमले शृंगारपूर डोळ्यात जीव आणून होळकरांची खटपट बघत होते. अर्धी घटका हटली ती मानाचे फळ आगीच्या कड्यातून काही बाहेर निघत नव्हते. कित्येकांचे हात पोळून निघाले होते. फेकलेल्या श्रीफळांचे कोळसे झाले म्हणून “आई, ल्येकरांचा अपराद पोटात घे गं माये!” म्हणत भेदरल्या गुरवाने दुसरी श्रीफळे धडाधड हुडव्यात फेकली. खेळ्यांची दमगीर झालेली पहिली फळी हटली. दुसरी पुढे झाली, भोवतीचे श्वास रोखणीला पडले. नव्या दमाच्या होळकरांची सणाच्या आगीशी हातघाई जुंपली. आता चंद्र कलू लागला. मध्यरात्र टळून गेली. होळकरांच्या तीन फळ्या येऊन आगीशी झुंज घेऊन हटल्या होत्या. मानाचे फळ काही निखाऱ्याबाहेर निघत नव्हते. होळीसण कुचमला. बावबरलेले शृंगारपूरकर भेदरून आपापसांत कुजबुजू लागले.

बैठकीवर बसलेले संभाजीराजे गिर्दी सोडून ताठपणे बसले होते. त्यांची कठोर नजर हुडव्यातील निखाऱ्यांना आता जरब भरू लागली. रायाजी, अंतोजी यांच्यामागून गावकुसाची अब्रू राखण्यासाठी गणोजीराजे शिर्केसुद्धा हुडव्याभोवती चकरा टाकून खाली हाताने परतले.

संभाजीराजांनी एकदा जमल्या सणकऱ्यांवर नजर टाकली. सगळ्यांच्या माना खाली होत्या. हुडवा धडधडतच होता. युवराजांच्या मस्तकात ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या.

“भृशत्‌ बलान्वयसिंधुसुधाकर:।’ अर्थात, ‘सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली

असे राजे शहाजी होऊन गेले!’

“यस्य अनेक वसुंधरा परिवृट प्रोत्तुंग चुडामणे:।

पुत्रत्व समुपागत: “शिव’ इति ख्यात: पुराणे विभु:।।’

“त्या शहाजीराजांना महामूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे म्होरके वाटणारे, पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे असे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले!’

“तस्यात्मज: शंभूरिति।’ म्हणजे त्यांचा पुत्र मी ‘शंभूराजे’ या नावाने मशहूर आहे. “तस्यात्मज:’ म्हणजे “त्यांचा पुत्र.

संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले! कलू घातलेला चंद्र पुन्हा स्थिरावला! थरकलेले चांदणे थिजले. खाली गेलेल्या कैक माना वर उठल्या. आता भावेश्वरी समोरचा पेटता हुडवाच जसा संभाजीराजांच्या डोळ्यात उतरला होता. “आम्ही-आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्याबाहेर. आशीर्वाद द्यावा.’ झपाझप चालत संभाजीराजे ऐन हुडव्याजवळ आले. बेभान स्थितीत त्यांनी अग्निकुंडाला एक चक्कर टाकली.

“जय भवानी!” सर्वांच्या अंगावर काटा सरकावबा, अशी राजघाटीतून साद फुटली. दुसऱ्याच क्षणी त्या शिवाच्या पुत्राचा – रुद्राचा हात फुलल्या निखाऱ्यात घुसला. धगीने मनगटाभोवती बांधलेली पोहची होरपळून निघाली. राजपुत्र आणि अग्नी यांची इरेसरीची झुंज पडली! धगीचा अंदाज घेत संभाजीराजे हुडव्यात हात चालवू लागले. होरपळणारा हात अधिकच इर्षेने चालू लागला आणि बघता-बघता तळहात पोळून टाकणारा काळपट ठिपका त्या राजहाताने निखाऱ्याबाहेर खेचला! पापणी लवण्याच्या आत तो “जय भवानी”च्या गजराबरोबर फरसबंदीवर आपटण्यात आला. ठिकऱ्या- ठिकऱ्या उसळल्या मानाच्या श्रीफळाच्या!

“आई भावेसरी गं माते!” म्हणत गुरवाने आपले अंग गावदेवीसमोर सरळ दंडवतात झोकून दिले.

“जय भवानी”चा आवारभर जल्लोपता कल्लोळ झाला. कवी कुलेश, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी सारेच युवराज संभाजीराजांचा हात धरण्यासाठी पुढे धावले. त्यापैकी एकाच्याही हातात हात न देता संभाजीराजांनी तो पाठीशी तसाच घेतला आणि- आणि आपल्या पेटत्या डोळ्यांनी एकदा जनानी बैठकीवर नजर टाकली. येसूबाईसह सारा जनानाच तडक उठून खडा झाला होता.

येसूबाई दिसताच संभाजीराजे सारा आगडोंब विसरून पुनवेच्या चांदण्यालाही लाजवील असे मंद हसले, पण – पण ते येसूबाईना दिसू शकले नाही. कारण त्यांच्या डोळ्यांवर आसवांचे झिरझिरे आडपडदे उतरले होते!

शिकारीसाठी रान काढण्याच्या मनसुब्याने आज संभाजीराजांनी हाके रानात धाडले होते. रायाजी, अंतोजी व खंडोजी असे खेळे संगती घेण्याचे योजले होते. सदरेवर तेल दिलेली तोड्याची धुराटी बंदूक येसूबाईनी मलमपट्टी बांधलेल्या संभाजीराजांच्या पोळल्या हाती देत खंडोजी म्हणाला, “फार नामी शिस्त आहे हत्याराची युवराज.”

फिरंगी माटाची ती धुराटी हाती घेत संभाजीराजांनी खांद्याला भिडवली. नळीच्या डोक्यावरच्या माशीवर, डावा डोळा मिटत शिस्त बघितली. धरल्या शिस्तीतस्तात येसूबाईनी उन्हाला लावलेला जरीकळीचा बुंदेदार शालू समोर आला! त्यावरच्या एका झगझगत्या बुंदीवर नळीची शिस्त रोखत संभाजीराजे स्वत:शीच हसले.

“ठीक आहे खंडोजी. तुम्ही तयारीला लागा. उन्हं कलतीला लागली की, निघणार आम्ही.” हातीची धुराटी तशीच पेलत संभाजीराजे वाड्यात शिरले. शिकारीला निघण्यापूर्वी एकदा येसूबाईंच्या कानी घालावे या विचाराने. तिसरा प्रहर सरतीला आला होता. वाड्याच्या सफेलीत येसूबाई आणि दुर्गाबाई उभ्या होत्या. संभाजीराजांना येताना बघून त्या सावरल्या.

“आम्ही आता रान काढायला निघणार आहोत.” म्हटले तर येसूबाईंना, म्हटले तर दुर्गाबाईना, असे संभाजीराजे बोलले.

काही वेळ तसाच शांततेत गेला. आपल्या पदरकोटाचा पंखा करून तो हलकेच आपल्या गळ्याभोवती वारीत येसूबाई म्हणाल्या, “आज वळिवाचा माग दिसतोय!”

त्यांना म्हणायचे होते, “आज स्वारीनं नाही गेलं, तर नाही का चालणार?” “वळीव अंगावर घेत, घोडा फेकीत रान काढण्यातच शिकारीचा खरा मजा.” तेवढ्यात पिलाजींचे कारभारी सफेलीत आले. झुकत त्यांनी वर्दी दिली – “कुणी एक हारकारा आला आहे. खासा युवराजसाहेबांना भेटण्याची अर्जी करतो आहे.”

मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले संभाजीराजे काही न बोलता कारभाऱ्यांच्या पाठीशी झाले. येसूबाई आणि दुर्गाबाई आपल्या स्वारीच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघतच राहिल्या. “येतो आम्ही” असे म्हटल्याखेरीज स्वारी अशी कधीच निघून नाही गेली आजवर, असा विचार नाहीतरी येसूबाईंच्या मनी आला.

संभाजीराजांनी घोडाइताला सदरेवर पेश करण्याची आज्ञा कारभाऱ्यांना दिली. घोडाईत शिरक्यांच्या सदरेसमोर आला. त्याने झुकून तसलीम दिली.

“क्या है?” संभाजीराजांच्या तोंडून जरबी बोल उठले.

“गुस्ताखी मुआफ हुजूर. आपको खलबतखानेमें मिलनेका मुझे हुक्‍्म है।” घोडाईत शांतपणे म्हणाला.

संभाजीराजांनी डावी-उजवी गर्दन फिरविली. सदरेवर असलेले कारभारी, परशरामपंत, खंडोजी साऱ्यांनी तिची इशारत पकडीत सदर सोडली.

“बोलो. यही हमारा खलबतखाना है।” संभाजीराजे निर्धाराने समोरच्या घोडाइताला निरखत म्हणाले.

जरीबुंदी तहबंद लखलखला. हशमाने त्या तहबंदाआड लपविलेला खलित्याचा फासबंद थैला बाहेर खेचला. हलक्या पावलांनी पुढे होत त्याने झुकून तो संभाजी राजांच्या हाती दिला. तो खलिता औरंगजेबाच्या दख्खन स्वारीवर नामजाद सरलष्कर दिलेरखानाचा होता! अकलूज प्रांतातील तळावरून धाडलेला. आपल्या गोटात येऊन मिळण्याचे आवाहन करणारा!!

त्यातील मजकूर वाचताना संभाजीराजांच्या मस्तकात मुंग्याच मुंग्या धरल्या. हात थरथरला. “साक्षात मोगली गोटात – दक्षिणेचा मुलूख मारण्यासाठी? कैसे व्हावे हे?’

युवराजांच्या नाकपाळ्या फुलल्या. श्वास चढीला पडला.

एका बंद दरवाजाला नजर रोखत संभाजीराजांनी दणदणती टाळी दिली. परशरामपंत आत आले. “पंत, कलमदान आणि खलित्यासाठी वळी घ्या.”

“जी.” परशरापंतांनी आपल्या चिटणिसी बैठकीजवळचे कलमदान उचलले. खलित्यासाठी एक कोरी वळी युवराजांच्या हाती दिली. समोर कलमदान ठेवले.

“या तुम्ही!” परशरापंतांना इशारत मिळाली. ते निघून गेले.

आधारासाठी वळीखाली गोल गिर्दी घेऊन संभाजीराजांनी पीस कलमदानात डुबविले. क्षणभर ते तसेच राहू दिले. तेवढ्यात मजकुराचा मेळ मनाशी बांधून घेतला. कापडी अस्तराच्या वळीवर खास राजहाताने अक्षरे उमटू लागली.

“मशहुरल अनाम, दाम दौलतहु, लष्करे सालार दिलेरखान सुभे दख्खन बजानीब रा. रा. युवराज शंभू उपरी विशेष –

खान मजकुरी दिल्हे खत पावले. ये समयास आमचे महाराजसाहेब मोहीमशीर होवोन मुलखाबाहेर असत. मागील दौलतीची हरएक जिम्मेदारी त्यांनी आम्हावर सुपुर्द केली असे. बरी गत हेरून खलिता धाडिला. पण आम्हास आण इमान आमच्या बापजाद्यांचे. तुम्हाकडे येऊ हे कैसे मनी धरता? ते होणे नाही! जाणिजे.”

तळपत्या, समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट त्यावर शिवरली. आलेल्या फासबंद थैलीतच त्याची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडाईताच्या रोखाने.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ११७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment