महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,764

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२०

By Discover Maharashtra Views: 1359 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२० –

संभाजीराजे बैठक सोडण्यासाठी उठू लागले, एवढ्यात चिटणीस पडल्या आवाजात म्हणाले, “कुणी एक थैलीस्वार आला आहे मोगलाईतून. भेट मागतो खाशांची.”

संभाजीराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. डोळ्यांत नाराजी उतरली. तरीही ते शांतपणे म्हणाले, “पेश करा.”

मोगली पेहराव धारण केलेला हाराकारा सदरेस दाखल झाला. तसलीम देत म्हणाला, “हुजूर आपको खलबतखानामें मिलनेका हुक्म है मुझे।”

“खामोश, वाटेल त्या वरकडास खलबतात भेटत नसतो आम्ही. कोण काम आहे? जबान पेश कर.” संभाजीराजांचे डोळे ठिणगू लागले.

“जी.” लटलटत्या हाराकाऱ्याने तहबंदाआडचा हिरव्या मखमली थैलीचा खलिता पुढे होत संभाजीराजांच्या पायाजवळ ठेवला. थैलीची गाठ उकलून संभाजीराजांनी खलित्याची वळी बाहेर घातली. मजकुरावरून नजर दौडू लागली. तोच मायना – “मशहुरल अनाम, दामदौलतहु जंगेबहादर शाहजादा संभू -” तोच मजकूर – “आम्हास येऊन सामील व्हावे! मरातब होईल!” दिलेरखानाकडून आलेला. झटका बसावा, तसे संभाजीराजे बैठकीवरून उठले. निखारा फेकावा तसा तो खलिता त्यांनी हारकाऱ्याच्या अंगावर फेकला. विजेचा कोरडा फुटावा तसे राजबोल सदरेवर उठले, “समजतो काय तुझा खान आम्हास? मागील खलित्यास जाब दिला. या खलित्यास हाच जाब. बेइज्जतह चालता हो इथून.”

झपाझप चालत संभाजीराजांनी सदर सोडली. तसेच आपल्या महालात आले. अस्वस्थपणे फेर टाकू लागले. बराच वेळ त्यांना आपल्या महालात झरोकक्‍्यालगत येसूबाई आहेत, हे ध्यानीही आले नाही. जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्या रोखाने पुढे झाले.

“केव्हापासूनच्या उभ्या आहात?” त्यांनी हलकेच विचारले.

“बराच वखत झाला. पण स्वारी आज नाराज दिसते.”

हिरवागर्द शालू, तसलीच चोळी, हिरवे चुडे अशा साजात हळदवाणाची नव्हाळीची छटा अंगभर चढलेल्या येसूबाई वेगळ्याच दिसत होत्या. “कशासाठी केला आहे हा रानशृंगार आज?” संभाजीराजांनी हसत विचारले. “भलतंच. हा रानशृंगार नाही. ही ‘चोरचोळी’ आहे. आमच्या आऊंनी केलेली.”

“मतलब?” संभाजीराजांना ‘चोरचोळी’चा मतलब कळला नाही

“कुणाही परक्या स्त्रीला न कळविता आई आपल्या लेकीला चोरून लुगडं-चोळी एकांतात देते, तिला ‘चोरचोळी’ म्हणतात.” येसूबाई हसून वळत्या झाल्या. तसे वळताना त्यांच्या जडावलेल्या हालचालीने संभाजीराजांच्या ध्यानात सारा प्रकार आला.

शृंगारपूरच्या नदीकाठावरच्या मठात शिवयोगी व्याघ्रचर्म अंथरलेल्या उच्चासनावर बसले होते. त्यांच्या पायाशी एका पायरीवर संभाजीराजे बसले होते. त्यांच्या दुहाती केशवभट व गणेशभट जांभेकर उभे होते. मठाच्या कोन्यात ठेवलेल्या दगडी धूपदानातून धुराची उग्रमंगल वळी उठत होती.

“युवराज, तुम्ही पुरात कालीची प्रतिष्ठापना केलीत. रोज भद्रेची पूजाअर्चाही होते. पण ही रणमर्दिनी. तिची यथायोग्य शांत झाली पाहिजे.” शिवयोगी धीरगंभीर आवाजात बोलले

“आज्ञा व्हावी. स्वामी आम्ही कालिमातेची सांगाल त्या रिवाजानं शांत करू.”

“युवराज, पुरुष कितीही पराक्रमी असो त्याला ईश्वरी शक्तीचं पाठबळ लागतं तुम्ही भद्रेसमोर ‘कलशाभिषेक’ करून भाक घालावी. त्याने तुम्हाला तंत्रसिद्धी मिळेल. पौटी येणाऱ्या अपत्याचं अभद्र टळेल.” शिवयोगी जपमाळ ओढीत राहिले.

“जशी आज्ञा स्वामी. पण तंत्रसिद्धीचा मतलब नाही समजलो आम्ही.”

“तोच नीट समजून घ्या. त्या भावनेनंच अभिषेक करा. तंत्रसिद्धी म्हणजे कर्ता पुरुष म्हणून परिवाराच्या पालनासाठी साध्य केलेलं पुण्य. कालिमातेच्या विधींमध्ये यासाठी कलशाभिषेक सांगितला आहे. आम्हाला वाटतं तुम्ही, हा सविध कलशाभिषेक करावा.”

जी.” संभाजीराजे विचारगत झाले. थोड्या वेळाने म्हणाले, “स्वामींनी कलशाभिषेकाचा तपशील व मुहूर्त केशवभट आणि गणेशभट यांना द्यावा.”

“युवराज कलशाभिषेक करणार.” साऱ्या सुभ्यात ही वार्ता पसरली. तशीच ती रायगडी जाऊन पोहोचली. ती ऐकून सुरनीस अण्णाजी दत्तो सोयराबाईंच्यासमोर रुजू झाले. त्यांनी कलशाभिषेकाबद्दल आपला अंदाज महाराणींच्यापुढे पेश केला –

“आम्हास या अभिषेकात भला हेत दिसत नाही! शृंगारपुरी जासूद पाठवून वेळीच याचा माग घेणं हिताचं होईल.” त्या सल्ल्यानुसार सोयराबाईंची चक्रे फिरू लागली. रायगडचे नजरबाज गोंधळी, बैराग्याचे वेष घेऊन संभाजीराजांच्या सुभ्यात उतरले.

पौष शुद्ध एकादशी तोंडावर ठेवून संभाजीराजांनी उपोषण केले. अभिषेकाचा दिवस उजाडला. वाड्यावर चौघडा दुडदुडु लागला. शिवयोग्याच्या पौरोहित्याखाली कलशाभिषेकाला सुरुवात झाली. वाजत-गाजत भावेश्वरीच्या मंदिरातून कलश वाड्यावर आला. उंबरठ्यावर कलशासामने बळीची बकरी पडली. कालिमातेच्या मूर्तीसमोर तांदळाच्या चौकावर कलशाची स्थापना करण्यात आली. खांद्याभोवती रक्तवर्णी उपरणे पांघरलेले, तसलेच कटिवस्त्र नेसलेले संभाजीराजे कालीला समोर धरून कलशाजवळ एका पाटावर बसले. चौरंगावर बसलेले शिवयोगी अभिषेकाचे विधी त्यांना सांगू लागले. केशवभट आणि गणेशभट यांनी राजकुळाच्या जन्मू घातलेल्या अपत्यांचे अरिष्टनिवारणार्थ मंत्रघोष धरला. प्रसन्नपणे संभाजीराजे आम्र आणि कुशाच्या पल्लवांनी पवित्र नद्यांचे जल, मधुरस, दूध याचे कलशावर सिंचन करू लागले.

“युवराज, आता शेवटचा अभिषेक करा.” शिवयोग्यांनी संभाजीराजांना सांगितले.

“कोणता?” अशा आशयाने संभाजीराजांनी त्यांना नजर दिली.

“तुमच्या पावन राजरक्ताचा!” शिवयोग्यांनी गणेशभटांकडे पाहिले. गणेशभटांनी नागवी तलवार ठेवलेले एक तबक उचलून संभाजीराजांसमोर धरले.

“म्हणा. जय भद्रकाइली आणि तुमच्या अंगठ्याचे राजरक्त कलशावर सिंचा.” शिवयोग्यांनी डोळे मिटले आणि स्वत:च मंत्रघोष सुरू केला.

“जय भद्रका$ली.” संभाजीराजांनी हत्याराला उजवा अंगठा देऊन ठिबकत्या गरम राजरक्ताचा अभिषेक केला. हात जोडून डोळे मिटले. त्यांच्यासमोर साक्षात भद्रेची मूर्ती उभी ठाकली. जीव लावून तिला ते डोळाभर निरखू लागले. कलशाभिषेकाचा विधी संपला. चिपळूण, संगमेश्वर, करवीर अशा देवस्थानातून आलेल्या ब्राह्मणांना दानधर्म करण्यात आला. गोदाने झाली.

या विधीने संभाजीराजांच्या पोटी जन्मास येणाऱ्या भोसल्यांच्या अंकुराचे अरिष्ट टळणार होते… पण याच विधीने खुद्द युवराज संभाजीराजांवर अंदाज नसलेले अरिष्ट येऊन कोसळणार होते! कारण रायगडची अखंड उतरंड उतरून एक थैली स्वार कानडी मुलखाकडे निघाला होता. त्याच्या कमरशेल्यात खोवलेल्या थैलीत एक गुप्त खलिता होता. महाराणी सोयराबाईंनी दिलेला. त्या खलिताचा मजकूर होता –

“आता विशेष करोन लिहणे ते युवराजांबद्दल. शृंगारपुरी त्यांनी आपणास “कलशाभिषेक’ करवून घेतला. यास्तव की, “आपले पुण्यवान जन्मदाते शक्‍य त्या टाकोटाकीने स्वर्गवासी व्हावे!! मुलखाचे कुल राज्यपद ते आम्हासच मिळावे ‘!!”

तोंडावर आला तसे शृंगारपुरावर चैतन्याची कशी झड उठली. सुभ्यात वार्ता आली होती. “कर्नाटकसुभा रघुनाथपंत हणमंते यांच्या देखरेखीखाली सुपुर्द करून छत्रपती महाराज मुलखाकडे परतीच्या वाटेला लागले. दिग्विजयी छत्रपती येताहेत. पावणे-दोन वर्षानंतर. जिंजीपासून गदग-तोरगळपर्यंतचे नवे राज्य उठवून.”

ही वार्ता ऐकताच केवढ्यातरी अनावर उत्साहाने संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. कारभारी परशरामपंत, खंडोजी यांना त्यांनी याद फर्मावले. भराभर त्यांच्या तोंडून आज्ञा सुटू लागल्या. “कारभारी, पुराच्या दक्षिणेला आंबवतीची वेस उठवा. तिथं चौघडा- नगाऱ्याची सिद्धता राखा. परशरामपंत, आबासाहेबांच्या परतीच्या तळाच्या रोखानं थैलीस्वार धाडा. लिहा – आम्ही आगवानीसाठी, पायधूळ घेण्यासाठी शृंगारपुरी वाटेला डोळे लावून आहोत. खंडोजी, निवडीचे घोडाईत हुजुराती पेहराव देऊन सिद्ध ठेवा. त्यांना आमच्या पाठीने दौडायचे आहे. तुम्ही आमच्या सोबतच राहा. कुचराई करू नका. खासे आबासाहेब परतीला लागलेत.”

महाराजांच्या परतीचा संभाजीराजांनी अंदाजाने धरलेला दिवस फुटला. पुराच्या दक्षिणेला श्रीफळाचे तोरण हिंदोळणारी, आंबवतीची वेस उजळून निघाली. तिच्या बगलांना चौघडा, नगारा सिद्ध होता. घरट्या घरट्यांसमोर, रयताऊ कुणब्यांनी गुढ्या चढविल्या. भावेश्वरीच्या कळसावर तिकोनी भगवी पताका फडकू लागली. वाड्यावर राणूआक्का, येसूबाई, दुर्गाबाई यांनी ठेवणीचे ठाण काढून साज केला. फारा दिवसांनी आज धाराऊनेही टोपपदरी लुगड्याची घडी अंगावर मोडली. केसरी टोप मस्तकी शोभणारे, जरीबतूचा जामा छातीवर दाटलेले, ठिबक्यांचा मांडचोळणा चढविलेले संभाजीराजे राणूअक्कांचे, येसूबाईच्या आईसाहेबांचे दर्शन करून वाड्याबाहेर पडले. खंडोजीने दौडीची जनावरे व सरंजामी घोडाईत सिद्ध ठेवले होते.

“जय भवानी,” असे पुटपुटत संभाजीराजांनी घोड्यावर मांड जमविली. त्यांच्या मागे पिलाजी, गणोजीराजे आणि खंडोजी यांनी जनावरांवर बैठकी घेतल्या. त्यांच्या पिछाडीला उमाजी पंडित, केशव पंडित, कवी कुलेश असा पंडितमेळा स्वार झाला. सर्वांमागे शंभर एक हुजराती घोडाईतांनी शिस्त धरली.

संभाजीराजांनी इशारत देताच सर्व पथकांच्या आघाडीला असलेली, फुलमाळांनी सजलेली पालखी भोयांनी उचलली. छत्रपतींना बैठक देण्यासाठी ती नेण्यात येत होती. पथक चालले. संभाजीराजे आपल्या दिग्विजयी पित्याच्या स्वागतासाठी पुराची वेस ओलांडून कोसभर पुढे चालले. त्यांच्या छातीवरची माळ घोडचालीबरोबर हिंदोळू लागली. मन अनेक आठवणींवर हिंदकळू लागले. पावणे-दोन वर्षांची उन्हा-पावसातील मोहीम. आबासाहेब थकले असतील. पण तरीही ते हसत म्हणतील, “कशाला सामोरे  यायची तकलीफ घेतलीत? तुम्ही का परके आहात? कशा आहेत आमच्या सूनबाई?” सर्वांसामने आम्ही कसा जाब देणार? मग ते मामासाहेबांना विचारतील, “कशी आहे आमची कन्या?” हा शब्दाशब्दांतील फरक. आबासाहेब बोलत असले की बोलतेच राहावेत, असे वाटते.

वेस मागे पडली. एक कोसाचा पल्ला आला. पालखी थांबली. पथक थांबले. सर्व मंडळी पायउतार झाली. घोडाईतांनी म्यानातील तलवारी बाहेर खेचल्या. खंडोजीने कमरशेल्यात छत्रपतींच्यावर उधळण करण्यासाठी सोनमोहरांची थैली घातली होती. तिच्यावर हात ठेवून त्याने स्वारांची हारीने शिस्त लावून घेतली. आंबा घाटाने शृंगारपुरात उतरणाऱ्या वाटेकडे पथकातील डोळा-डोळा लागला. प्रहर टळला. सूर्य कासरे मागे टाकीत आभाळात चढू लागला. पालखीचे आवरण सणाणून तापले. फुलमाळा सुकल्या. डोळे, डोळे थकले. वर्दी घेण्यासाठी घाटात पेरलेल्या खबरगिरांपैकी एक दौडत येताना दिसू लागला. आशा पालवबल्या. स्वार पथकाजवळ आला. संभाजीराजांनी लगबगीने त्याला चाचपला – “कुठवर आले?”

“धनी, आपला थैलीस्वार मागनं येतु या.”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment