धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२२ –
मुलीला पाळण्यात घालण्याचा मुहूर्त जवळ येऊ लागला, तसे संभाजीराजे बेचैन झाले. एवढ्यात खंडोजीने धावत येऊन वदी दिली – “रायगडचा बाळंतविडा आला!” संभाजीराजांचे डोळे लखलखले. ‘आबासाहेब आले! सामोरे गेले पाहिजे.’ ते बैठकीवरून उठले. आज्ञा सुटली. “खंडोजी, सामोरे गेले पाहिजे. सिद्धता करा.” खंडोजीने युवराज कसल्या गैरसमजात आलेत हे ताडले. मान खाली घेत तो म्हणाला, “थोरले स्वामी नाहीत आले….”
“ठक ठक ठक’ संभाजीराजांच्या काळजाला शंकेचा सुतारपक्षी टोचा मारू लागला. चर्या उतरली. “नाही आले?” त्यांच्या तोंडून न कळणारे शब्द सुटले. रायगडचा बाळंतविडा वाजत-गाजत वाड्यात घुसला. तो घेऊन येणाऱ्या स्वारांनी संभाजीराजांना मुजरे दिले. सरपोसांनी झाकलेली बाळबाळंतिणीच्या मानाची दोन तबके त्या स्वारांनी सदरेवर ठेवली. रायगडचा निरोप झुकत्या मानेने राजपुत्राला पेश केला, “धन्यांची तब्येत खराब हाय. ह्ये बाळंतविडे दिल्यात. सांगावा हाय नाव “भवानीबाई’ ठेवावं.”
संभाजीराजे सुन्न झाले. ते सदरेवरून उठले. महालाच्या रोखाने चालू लागले. मुहूर्त साधून घटिकापात्र घंगाळात डुबले. राजकुवरबाईनी आपल्या भाचीला पाळण्यात घालून तिच्या कानात तिचे नाव सांगितले – “भवानी! भवानी!! भवानी!!!”
राजकुवरबाईंनी पाळण्याला पाठ लावून झोला दिला. त्या झोल्यावर “भवानी’चा पाळणा हिंदोळू लागला! या समारंभात दुर्गाबाई दिसत नव्हत्या. वांत्यांनी बेजार झाल्याने त्या आपल्या महाली लेटून होत्या.
दसरा मागे पडला. या खेपेला सोनआखाड्यावर हत्यारमार करायला संभाजीराजे दसरामाळावर गेले नाहीत. कुणाशीच काही न बोलता ते दिवसन्दिवस आपल्याच महाली एकले राहू लागले. त्यांचा आपल्याच मनाशी मनाचा संवाद जुंपला. त्याची उकल त्यांना होईना. गुंतवा झालेल्या मानी राजमनाचा शेव काही केल्या हाताशी येईना. असह्य, भयाण एकलकोंडेपणाने त्यांच्याभोवती घेर टाकला. वाड्यावर सासुरवाडीचे शिर्केमंडळ होते; रक्ताच्या नात्याच्या राणूअक्का होत्या; अग्नीच्या साक्षीने पाठीशी आलेल्या येसूबाई, दुर्गाबाई या अर्धांगी होत्या; खंडोजी, रायाजी, अंतोजी असे इमानाचे सोबती होते; उमाजी पंडित, केशव पंडित, कवी कुलेश असे शास्त्रपारंगत पंडित होते; पिलाजींच्यासारखे जाणते थोरपण होते पण – पण यांपैकी कोणीच त्यांना ‘आपले’ आहे, याचा भरोसा काही येईना!
नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्लाचे कौतुकही त्यांच्या लेखी ओसरले. मन अनावर फरफटीला लागले. शंकांचे पलोते नाचवू लागले – ‘असं का व्हावं? आम्ही खातरजमेनं हाती घेतलेल्या सोन्याची मातीच का व्हावी? जर साक्षात आबासाहेबांच्या मनीच आमच्या बाबीनं काही अंदेश आला असेल, तर वरकड सारं असून नसल्यासारखं! आमच्याविशी त्यांच्या मनी कसलं कुट्ट काळं आणि कुणी-कुणी घातलं आहे? का?
मासाहेबांचं असं आम्ही काय वाईट चिंतलं आहे? कोण जातीची तापदरा आम्ही अण्णाजींना दिली आहे?
“कर्नाटक स्वारीवर जाताना महाराजसाहेब आम्हाला पुरात ठाण करून जातात. त्यांच्या दिग्विजयाला गालबोट लागू नये, म्हणून मनावर धोंड ठेवून आम्ही ते शिरसावंद्य मानतो. परतीच्या वाटेवर महाराजसाहेबांना आम्हास भेटावंसं वाटत नाही. आमच्या पोटी जन्मास आलेल्या आपल्या नातवंडाचं मुखदर्शन घेण्यास ते आले नाहीत. काय चाललं आहे हे? कुठल्या कसुराची ही आम्हाला शिक्षा आहे? आम्ही थोरले म्हणून जन्मास आलो हा कसूर? आम्हाला युवराजपदाचा अभिषेक झाला हा आमचा कसूर? की नकळत्या वयात आमच्या मासाहेब गेल्या आणि ऐन हव्या होत्या त्या समयाला थोरल्या आऊ गेल्या हा आमचा कसूर?
“आबासाहेबांचा आमच्याविशी गैरमेळ पडला आहे खास. आमच्यावतीनं रायगडी तो कोण निपटणार? कोण सफाई देणार? आम्हालाच जातीनिशी का बोलावणं होत नाही रायगडाकडून? की आम्ही हयातभर शृंगारपुरी सासऱ्यांच्या वाड्यातच पावणेर झोडत राहावं, अशी इच्छा आहे आबासाहेबांची? पावणे-दोन साले झाली आम्ही इथं आहोत. आता इथं राहणं नको वाटतं, पण जावं तरी कुठं? कसं?’ त्यांना काही सुधारेनासे झाले!!
“युवराज, गडाहून थैलीस्वार दाखल झाला आहे. थैली खाशी म्हणून सदरेला खोळंबून आहे.” महाली आलेल्या परशरामपंतांनी वर्दी दिली.
“थैलीस्वार! गडावरचा! आबासाहेबांनी नक्कीच याद फर्मावलं असणार.’ क्षणापूर्वीची संभाजीराजांच्या चर्येवरची काळजी नाहीनिपट झाली. झपाझप चालत ते सदरेला आले. सदरेच्या चाकरमान्याने झडते मुजरे दिले. रायगडाहून आलेला थैलीस्वार अदबीने पुढे झाला. त्याने कमरेची भगवी थैली युवराजांच्या हाती दिली. संभाजी राजांनी क्षणैक मस्तकाला भिडवून, लगबगीने थैलीचा फासबंद उकलला. वळी बाहेर घेतली. खुलल्या खलित्यावरचे शब्द टिपू लागले –
“श्रीयासह विराजित, अखंड लक्ष्मी अलंकृत, युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद उपरी विशेष.
वजचुडेमंडित सौ. सूनबाईस कन्यारत्न जाहले. वृत्त ऐकोन परम संतोष जाहला. आता विशेष करोन लिहिणे ते पत्र देखत जरोरीने सज्जनगडी कूच होणे. समर्थचरणी रुजू होवोन चित्तास शांती लाभेल तसे करणे. समर्थ देतील तो बोध सावधपणे मनी धरणे. मनी भलेबुरे जे असेल, ते समर्थचरणी ठेवणे. विशेष काय लिहिणे. जाणिजे!”
खलित्यातील शब्दाशब्दांनिशी संभाजीराजांच्या डाव्या भुवबईला कमानबाक चढत गेला. टपोरे डोळे आक्रसले. छातीचा जामा काखेत दाटून आला. मनात विचारांची, शंकांची धुमाळीच धुमाळी माजली – ‘म्हणजे आबासाहेबांच्या मनी आमच्या बाबीनं अंदेश आला खास! आम्ही सज्जनगडी समर्थचरणी जावं! समर्थ देतील, तो बोध ऐकावा. कशासाठी? मनी भलेबुरे असेल ते निपटण्यासाठी. असं काय भलंबुरं आणलं आम्ही मनी?
इथं ठाण होऊन सुभा सांभाळला हे? अडल्या रयतेला धारा माफी केली हे? की अपत्याच्या अरिष्टनिवारणार्थ कलशाभिषेक केला हे? आबासाहेब. आबासाहेब कसली आज्ञा दिलीत आम्हास ही? आम्हाला बोध नको आहे, हवं आहे आपल्या चरणांचं दर्शन. थोरल्या आऊंच्या छत्रीचं दर्शन. का जावं आम्ही कशासाठी?’
हाती खलिता घेऊनच संभाजीराजांनी सदर सोडली. ते तसेच येसूबाईंच्या दालनी आले. हातातील खलित्याची वळी उठवीत म्हणाले, “ऐकलंत. गडाहून आबासाहेबांचा खलिता आला आहे. आम्हास सज्जनगडी रुजू होण्याची आज्ञा आहे. समर्थचरणी मनचं भलंबुरं ठेवण्यासाठी. का जावं आम्ही?”
येसूबाईंनी कुशीत घेतलेल्या दोन महिन्यांच्या भवानीचा पदर हलकेच तोडला. हसत त्या म्हणाल्या, “एवढं संतापण्यासारखं काय आहे त्यात? सज्जनगड पावन स्थान. आमचं ऐकावं. आज्ञेप्रमाणे सज्जनगडी कूच ठेवावं. आम्ही या अशा गुंतून पडलो, नाहीतरी आम्हीही आलो असतो, समर्थदर्शनास.”
यांच्या शांत उत्तराने संभाजीराजे चकित झाले. स्वतःशीच विचारगत होत पाठीशी हात बांधून फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने दालनाबाहेर पडण्यापूर्वी संथ शांत शब्दांत म्हणाले, “ठीक आहे. जाऊ आम्ही सज्जनगडास.”
सज्जनगडी जाण्याचा दिवस फुटला. खंडोजीने निवडलेले तीनशे घोडाईत वाड्यासमोर हत्यारबंदीने सिद्ध झाले. झिरमिऱ्या आडपडद्यांचा एक मेणा भोयांनी तयार ठेवला. समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राणूआक्का आणि दुर्गाबाई संभाजीराजांबरोबर निघणार होत्या. भरल्या दुर्गाबाई आता रसरशीत दिसत होत्या. पायधूळ मस्तकी धरून संभाजीराजांनी पिलाजीमामा आणि मामीसाहेबांचा निरोप घेतला. येसूबाईचा निरोप घेण्यासाठी ते त्यांच्या दालनात आले. लेटल्या येसूबाई त्यांना बघताच उठून मंचकावर बसत्या झाल्या. पाळण्यात छोटी “भवानी’ शांत सुख झाली होती. पाळण्याची काठाळी धरून धाराऊ खडी होती.
“येतो आम्ही. सांभाळून असा.” संभाजीराजे येसूबाईची नजर चुकवीत भरल्या आवाजात म्हणाले. पाळण्याजवळ जात त्यांनी झोपल्या भवानीच्या गालावर ओठ टेकले. भवानी क्षणभर चाळवली. पुन्हा शांत झोपी गेली. धाराऊने पाळण्याला हलका झोका दिला.
“स्वारी अजून घुश्शात आहे. पण सज्जनगडाच्या दर्शनाने तो कमी होईल. परतेल तेव्हा स्वारी एखादं काव्यही बांधून परतेल!” संभाजीराजांना खूश करण्यासाठी येसूबाई म्हणाल्या.
नेहमीसारखा हसरा प्रतिसाद संभाजीराजांनी त्यांना दिला नाही. दुखऱ्या काळजातून पडेल बोल आले – “काव्य आता आम्हाला कायमचं पारखं झालं आहे!”
पळभर असह्य शांतता दालनात दाटून पडली. मग येसूबाई म्हणाल्या, “स्वारी समर्थदर्शनास जाते आहे. आमचाही दंडवत सांगावा समर्थांना. बुवांनी काही कठोर सांगितलं, तरी त्याचा किंतू मनी धरू नये. आम्हाला विश्वास आहे. भावेश्वरीच्या कृपेनं सारं काही ठाकेठीक होईल.”
ते ऐकताना संभाजीराजे स्वत:शीच कसनुसे हसले. धाराऊला म्हणाले, “येतो आम्ही आऊ, यांना जपा.”
“येताना भवानीबाईसाठी समर्थांच्या हातचा मंतरलेला गंडादोरा आणायचा आहे. विसरणं होईल नाहीतर.” येसूबाई पाळण्याकडे बघत कौतुकाने म्हणाल्या. बाळंतपणाचे वसबी तेज त्यांच्या चर्येवरून नुसते ओसंडत होते. मंचकाला तळहाताची टेकण देत त्या उठल्या. कोनाड्या जवळ गेल्या. एक लाकडी पेटी त्यांनी कोनाड्यातून उचलली. ती खोलून त्यातील कवड्यांची भरगन्च माळ बाहेर घेतली. संथपणे त्या संभाजीराजांच्या जवळ आल्या. हातची माळ ओंजळीने त्यांच्यासमोर धरीत म्हणाल्या,
“हा डाग फार मोलाचा. त्याखेरीज स्वारींची छाती भुंडी दिसते. हा डाग सांभाळण्याचा आमचा वकूब नाही! घ्यावा. आमच्या धाकल्या बाईंना जपावं.”
संभाजीराजे आपल्या सखीला निरखत राहिले. त्यांच्या ओंजळीतून उचलून त्यांनी ती भवानीमाला छातीवर चढविली. येसूबाईनी पदरशेव हातात धरून आपल्या कुंकुबळाला तीन वेळा सौभाग्य-नमस्कार केला. त्यांच्या हातीचे हिरवे चुडे खणखणले.
“येतो आम्ही!” संभाजीराजे वळते झाले. तसे होताना त्याच्या भुजेचा भवानीच्या पाळण्याला धक्का बसला. त्या तेवढ्या धक्क्यानेही भवानीबाईंची झोप उडाली. पाय झाडून त्यांनी सूर लावला! संभाजीराजे, येसूबाई, धाराऊ एकमेकांकडे बघतच राहिले. धाराऊने पुढे होत, पाळण्यातील शंभूकन्या उचलली. थोपटून शांत केली.
मागे न बघता संभाजीराजांनी दालन सोडले. सगळ्यांचा निरोप घेतलेल्या राणूअक्का ब दुर्गाबाई वाड्यासमोरच्या मेण्यात चढल्या. संभाजीराजांनी एका सफेद घोड्यावर मांड जमविली. त्यांना निरोप देण्यासाठी पिलाजी, गणोजी, पंडितमेळा, खंडोजी, अंतोजी-रायाजी पुराच्या उत्तर वेशीपावेतो चालले. संभाजीराजांनी वाटेत लागणाऱ्या शिरक्यांच्या कुलदेवतेचे, भावेश्वरीचे पायउतार होऊन दर्शन घेतले. उत्तर वेस आर, पिलाजींना खांदाभेट देताना संभाजीराजे म्हणाले, “तुम्ही आहात, मागील चिंता नाही.”
“बिनधोक असा. भेट घेऊन परता. आम्ही वाट बघतोय.” पिलाजी मायेने उत्तरले. सगळ्यांचा निरोप घेऊन संभाजीराजांनी शुंगारपूर सोडले. घोडे पथक मेण्याभोवती कडे धरून कोयनाघाटीच्या रोखाने संथ चालू लागले.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२२.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.