महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,685

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२३

By Discover Maharashtra Views: 1322 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२३ –

सांजवेळ धरून सज्जनगड नजरटप्प्यात आला. गडाच्या पायथ्याशी संभाजीराजांच्या आगवानीसाठी किल्लेदार जिजोजी काटकर सरंजामाने मौजूद होता. त्याने पुढे होत आगवानी केली. जिजोजीला पाठीशी घेत संभाजीराजे राणूअक्का, दुर्गाबाईसह समर्थांच्या सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरी मागे टाकताना त्यांच्या मनाची एक गत लागली. फार दिवसांपूर्वी शिवथर घळीत समर्थांची भेट झाली होती. तो दिवस त्यांना आठवला. समर्थांची दाढीधारी सतेज चर्या डोळ्यांसामने खडी ठाकली. तासाच्या टोलांसारखी त्यांची बोली कानात घुमू लागली. “आम्ही बैरागी, तुमच्या राज्यभिषेकास देण्याजोगी भेट आमच्याजवळ नाही. आम्हाला प्राणप्रिय असलेला हा कोदंड आम्ही तुम्हाला देतो आहोत!” त्या समयी समर्थ आबासाहेबांना भारल्या बोलीत बोलले होते.

थोरल्या आऊ पाचाडात ज्या रात्री आम्हास सोडून गेल्या, त्या रात्री त्यांनी शेवटची इच्छा आबासाहेबांना सांगितली – “समर्थांचा बोध ऐकावा वाटतो.” समईच्या उजेडात केशव पंडितांनी जात्या थोरल्या आऊंना बोध ऐकविला – “जीव जीवात घालावा – आत्मा आत्म्यात मिसळावा – राह राहो परांतरीचा – गेले बहुता बळांचे बळवंत राजे – बहुता कुळांचे कुळवंत राजे – सरली शब्दांची खटपट – आला ग्रंथाचा शेवट!” थोरल्या मासाहेब गेल्या. उरल्या फक्त आठवणी.

संभाजीराजे गडावर आले. ते आल्याची खबर मठभर पसरली. मठाच्या प्रवेशद्वारात मोजड्या उतरून संभाजी राजांनी पायांवर पाणी घेतले. राणूअक्का, दुर्गाबाई यांच्या सोबतीने समर्थशिष्यांनी भरलेल्या मंडपातून जात हनुमानमूर्तीचे दर्शन घेतले. जवळच उभ्या असलेल्या समर्थशिष्य कल्याणस्वामींच्या पायावर मस्तक ठेवीत ते म्हणाले, “स्वामींची कृपा असावी.”

“जय जय रघुवीर समर्थ” म्हणत कल्याणस्वामींनी झुकते होत युवराजांना खांदे धरून उठते केले. राणूअक्का, दुर्गाबाई यांनी कल्याणस्वामींना भरल्या पदरांच्या ओंजळीने नमस्कार घातले. “युवराज, आम्ही तीर्थप्रसाद घेऊन येतो आहोत. तोवर तुम्ही मठओवरीत विश्राम घ्या.” कल्याणस्वामी ममतेने म्हणाले.

“संभाजीराजे ‘जी.’”’ म्हणाले आणि ओवरीच्या रोखाने चालू लागले. मंडपातील समर्थशिष्य डोळाभरून युवराजांना निरखू लागले. ओवरीत अंथरलेल्या बिछायतीवर युवराजांनी बैठक घेतली. राणूअक्का व दुर्गाबाई समर्थशिष्यिणींच्या सोबत माजघरात गेल्या.

थोड्या वेळाने हाती ओल्या डाळीच्या प्रसादाचा द्रोण व तीर्थाची झारी घेऊन कल्याणस्वामी ओवरीवर आले. हसतमुखाने युवराजांना म्हणाले, “घ्या श्रींचा प्रसाद.”

क्षणभर रेंगाळत संभाजीराजे त्यांना म्हणाले, “प्रथम… प्रथम समर्थदर्शन करू आणि मग….”

शांत हसत कल्याणस्वामी उत्तरले, “गुरुदेव गडावर नाहीत! परिक्रमेसाठी बाहेर पडलेत! घ्या.” त्यांनी ओल्या डाळीचा प्रसाद संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवला. तो ओठांआड करण्याचे युवराजांना भानच राहिले नाही. “घ्या.” कल्याणस्वामींनी त्यांना भान दिले. युवराजांनी प्रसाद आपलासा केला. तीर्थ ओठांआड घेतले. त्या रात्री युवराजांनी मठाचा थाळा घेतला नाही. जागा पालटल्याने असेल, पण त्यांना दिलेल्या कोठीत मंचकावर ते एकसारखे कूस पालटत तळमळत होते.

सज्जनगडच्या कातळबंदीवर हाततळवे टेकून रायगडच्या रोखाने नजर जडवलेले संभाजीराजे पुरते अस्वस्थ झाले. इथे येऊन एक हप्ता लोटला होता. बेचैनीने युवराजांनी कातळबंदी सोडली. चार धारकऱ्यांत पाठीशी अदब धरून खडे असलेल्या किल्लेदार जिजोजीला ते गंभीर बोलात म्हणाले, “गडकरी, रायगडी खलिता द्या. समर्थ इथं

नसल्याचं लिहा. आम्ही पुढील आज्ञेची वाट बघतो आहोत, ते कळवा.”

“जी.” जिजोजीने युवराजाज्ञा उचलली. त्याला पाठीशी घेत संभाजीराजे गडाच्या सदरेच्या रोखाने चालू लागले.

हत्यारी पहाऱ्याने युवराजांना मुजरा दिला. जिजोजीने एका धारकऱ्यामार्फत चिटणिसाला बलावू दिले. चिटणीस सदरेला रुजू झाला. रायगडी धाडण्याचा खलिता मोरपिसाने रेखू लागला.

“धाकलं धनी, गोसावी सदानंद भेटीची अर्जी करत्यात. पेश घालावं?” बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुजरा देत जिजोजीने वर्दी दिली.

संभाजीराजांच्या कपाळी आठी धरली. हाततळवा रेललेल्या गिर्दीवर क्षणभर फिरला. संथपणे ते म्हणाले, “येऊ द्या त्यांना.” सदानंद गोसावी सदरेत आले. नांदी देत त्यांनी युवराजांना नमस्कार दिला. खांद्याची झोळी नेटकी करीत हातची कुबडी उडवीत ते म्हणाले, “युवराज आमची एक फिर्यादी आहे!” रेललेले संभाजीराजे गिर्दी सोडून पुढेसे झाले. कफनीधारी सदानंद गोसाव्यांवर नजरफेक टाकताना त्यांना म्हणावेसे वाटले, “बुवा, फिर्याद तर आमचीही आहे.

कुणासामने ती पेश करावी? एक फिर्यादी दुसऱ्या फिर्यादीस कसला निवाडा देणार?” तरी स्वतःला सावरीत गोसाव्यांना दिलासा देत ते म्हणाले, “बोला.”

“आमचा इनाम सध्या दिवाणातून मना केला आहे. तो आम्हास सोडवून देण्याची कृपा व्हावी.” सदानंद गोसावी निर्धाराने बोलले. ते ऐकताना संभाजीराजांना समर्थांची आठवण झाली. राज्याभिषेकाचे आमंत्रण निरिच्छपणे बाजूला सारणारे समर्थ! त्यांचे हे शिष्य सदानंद गोसावी! गोसाव्यांनासुद्धा इनामाची आच लागते! शेवटी आभाळाशी झुंज घेत वाढतात ती साग, ऐनाची झाडे, कुरणातील गवत नव्हे! समर्थ एकलेच “समर्थ”.

“कुणी मना केले इनाम?” संभाजीराजांनी फिर्यादीची दाद घेत सवाल घातला.

“सुरनिसांनी!” सदानंद गोसावी उत्तरले.

हे ऐकताना संभाजीराजे पार बेचैन झाले. नियतीच्या फसगमतीचा माग घेत विचारगत झाले. तरी स्वतःला तोलत धीमेपणाने म्हणाले, “ती त्यांच्या अखत्यारीचीच बाब आहे, गोसावी. आम्ही कळवू त्यांना तुमची फिर्याद. या तुम्ही.”

सदानंद गोसावी नांदी उठवून सदरेतून गेले. संभाजी राजांनी चिटणिसाला इशारत केली, “आणखी एक खलिता रायगडी द्या. सुरनिसांना! लिहा – “सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे. चालता केला पाहिजे म्हणतो. हा मामला आम्हास दखल नाही. तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे.”

दोन्ही खलिते सिद्ध झाले. संभाजीराजांनी त्यावर दस्तुराची मोहर केली. हारकारा खलिते घेऊन सदरेबाहेर पडला.

सदर सोडून उठताना संभाजीराजांना फार-फार जाणवले की, “सदानंद गोसावी यांच्या निमित्ताने सुरनीस अण्णाजींना आम्ही खलिता लिहिला आहे. तो वाचताना खुद्द त्यांनाही अंदेश येईल की, ही भाषा युवराजांची नाही! ही दफ्तरी भाषा आहे. खाशांची नाही. तूर्त आम्ही खासे नाही, उरलो आहोत केवळ दफ्तरी! ‘

पौष मासाचा शुक्लपक्ष आला. आकाशीची चंद्रकोर कलेकलेनं बळावू लागली. भरल्या सज्जनगडावर युवराज संभाजीराजे देहामनाने एकले पडू लागले. एकच एक विचार त्यांचे मनी ठाण धरून बसला, “हा गड सोडणे आहे. पण ते कुठं? पुन्हा शृंगारपुरी? छे! कुठंही जावं!’

एका सांजेला ते देवदर्शन करून आपल्या दालनाकडे परतत होते. पाठीशी जिजोजी आणि मोजके धारकरी होते. समर्थमठासमोर ते आले. सूर्य डुबायला घातला होता. एकाएकी चालते संभाजीराजे पायी साखळदंड पडल्यासारखे थबकले. “काव काव काव” मठासमोरच्या दगडी पारातून उठलेल्या डेरेदार पिंपळवृक्षावर मोजता येणार नाही, असे कावळ्यांचे जथेच्या जथे उतरत होते. क्षणभर युवराजांना भास झाला की, आपल्या मनाचाच हिरवाकंच पिंपळवृक्ष झाला आहे! काळेकुट्ट, कर्कश रेकणारे खंडोगणती कावळे त्या वृक्षावर पंख झाडीत उतरताहेत! ते कल्लोळते कावळे कर्कशताहेत

– “हा गड सोडणे आहे! जावं… जावं कुठंही! लव-कुशांनी घोडा रोखला, एकाच बळावर कारण ते राजअंकुर होते. त्यांचा जन्म वनात, झाडझाडोऱ्यांत राहण्यासाठी नव्हता. जावं कुठंही!” वेड्यासारखे, सुन्न संभाजीराजे त्या काळ्या पक्ष्यांचा पिंपळवृक्षावरचा सुलतानढवा पापणी न पाडता बघतच राहिले. बाहेर पुरते सांजावले तेव्हा युवराज आपल्या दालनात आले. चिराखदानांनी दालनाचे अंतरंग कसे उजळून निधाले होते!

बेचैनीने ते दालनात फेर टाकू लागले. बाहेर पहारा देणारा धारकरी आत आला. अदब देत म्हणाला, “मठाचं गोसावी आल्यात.”

पायफेर थांबवून संभाजीराजांनी त्याला फर्मावले, “पेश येऊ द्या.”

कल्याणस्वामींचा निरोप घेऊन एक मठशिष्य दालनात आला. नांदी देत त्याने निरोप सांगितला. “स्वामींची युवराजांना सांगी आहे.”

“बोला.”

“दोन दिवसांनी पर्वणीचा योग आहे. क्षेत्र माहुलीवर कृष्णा-वेण्णा संगमात स्त्रान करून राजहस्तानं दानधर्म करणं, पुण्यकर्म आहे.” समोरच्या मठशिष्याचा आवाजही युवराजांना काळ्या पक्ष्यासारखा भासला – “पर्वणी!’ त्यातच त्यांचा स्वत:चा कर्कश निश्चय मिसळला. “हा गड सोडणे आहे! कुठंही जावं!” आत कालवा होता, तरी संभाजीराजे बाहेरून शांतपणे त्या शिष्याला म्हणाले,

“स्वामींना सांगा आम्ही ही ‘पर्वणी’ साधू! या.”

मठशिष्य समाधानाने निघून गेला. नकळत जाताना संभाजीराजांच्या मनाचा मठ ढवळून गेला. पाठीशी हात बांधून ते जखमी जनावरासारखे दालनात पायफेर टाकू लागले. आपलीच असंख्य रूपे सावल्यांचा आकार घेऊन त्यांच्याभोवती फेर धरून गोंधळ घालू लागली. कोंडी, सोसणे, अगतिकता यांची संबळ, तुणतुणी झडू लागली. मनाची पट्टा, तेग, विटा, भाला अशी हत्यारे बनून एकमेकांशी तंडू लागली. त्या धुंदळीत त्यांचे मानाचे “युवराजपण’ पायदळी चिंबू, चिरडू लागले –

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment