महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,662

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२६

By Discover Maharashtra Views: 1327 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२६ –

सुप्याचा मोगली तळ मागे पडला. तीनशे मावळी घोडेस्वारांची जमात उन्हातून निथळत चालली होती. पेडगावच्या बहादूरगडाच्या ठाण झालेल्या दिलेर पठाणाला संभाजीराजांनी हारकारे पाठवून, आपण येत असल्याची वर्दी दिली होती. तीन हजार घोडेस्वारांची दिमत घेऊन दिलेरखानाने इखलासखान मियाना व खैरतखान या आपल्या सरदारांना बहादूरगडावरून संभाजीराजांना घेण्यासाठी धाडले होते. इखलास आणि संभाजीराजे यांची सुपे-पेडगाव मार्गावर भेट झाली. मावळी-मोगली जोडफौज पेडगावच्या वाटेला लागली.

पेडगावच्या वेशीवर खासा दिलेरखान संरजामाने संभाजीराजांची राह ताकत उभाच होता, पूर्वी पूर्वी रजपूत मिर्झाने ‘शिवा’ला सुलुखाला येणे भाग पाडले होते. तहाच्या अटी पूर्ण होईतो ‘“संभा’ला आपल्या गोटात ओलीस घेतले होते. त्या वेळी कऱ्हेपठारावर रजपुताने या संभाला एक शाही हत्ती नजर केला होता. मजाक म्हणून त्या वेळ फर्जंद संभाला केल्या गेलेल्या सवालाचा जाब याच पठाणाने ऐकला होता. सवाल होता, “इतना बडा शाही हाथी कैसे साथ ले जाओगे संभूराजे?” शिवाच्या या कडव्या बज्ञ्याने मोठ्या गरुराने त्या वेळी जाब दिला होता – “डुलत-झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते, ते नेणे सोपे आहे – पण आमच्या महाराजसाहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत, ते नेणे कठीण आहे!”

पठाण आज या आठवणीने स्वत:शीच हसला. त्याच्या मनी विचार आला – ‘जंगे- दिल शाहजादे, गड, किले नहीं चलते! उन्हे उठाना मुश्कील है, पर- पर आदमी तो चलता है। उसे उठाना आसान है!

संभाजीराजे इखलाससह पेडगावच्या वेशीवर येताच मोगली तळावर शाजणे, नगारे झडले. खांद्यावरची हिरवी जरीबंदी ख्रिल्लत नेटकी करीत, दोन्ही हात पसरून हसतच “आडइये संभूराजे, आइये,” म्हणत दिलेरखान संभाजीराजांना सामोरा गेला. पठाणी छाताडाला भोसलाई छातवान भिडले. उभा तळ ते अकरीत बघायला वेशीवर लोटला होता. हाताला धरून पठाणाने संभजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले.

मेणे जोडून संभाजीराजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूरगडाकडे रवाना केला गेला.

दुसऱ्या दिवशी तळावर नजराणा पेश करण्यासाठी दिमाखदार बैठक उठविण्यात आली. शाही बिछायती पांघरून ती सजविण्यात आली होती. आपले इखलासखान, इरजखान असे सरदार दिलेरने न विसरता हजर ठेवले होते. त्यांच्या साक्षीने संभाजीराजांना मोगली दख्खनसालार दिलेरने आलमगिराने दिल्लीहून पाठविलेला झुलबाज हत्ती, तीन अरबी घोडे, हिरव्या म्यानाची तलवार, चौघडा आणि शाही आसबाबांचा नजराणा पेश केला. सात हजार स्वार आणि सात हजार जातांची वबऱ्हाड-खानदेशीची मन्सब संभाजीराजांना शाही दरबाराने बहाल केल्याचे फर्मान जमल्या सरदार-दरकदारांना घोषित करण्यात आले. दिल्या मन्सबीतील हाताखाली येणाऱ्या फौजदार, हवालदार नायकांची दिलेरने संभाजीराजांना ओळख करून दिली.जे फर्मान औरंगजेबाने मागे संभाजीराजांसाठी म्हणून पाठविले होते आणि जे शिवाजी महाराजांनी धिक्कारून ठोकरून परत पाठविले होते, ते आता संभाजीराजांनी विचित्र मन:स्थितीच्या आहारी जाऊन स्वीकारले होते.

मराठी दौलतीचे ‘युवराज’ म्हणून मावळ्यांचे मुजरे आपलेसे करणारे संभाजीराजे आता औरंगजेबाचा “शाही मन्सबदार शंभूखान’ म्हणून हशमांचे कुर्निस आपलेसे करू लागले! उमद्या बांड्या भोसल्यांच्या हयातीतील काळ्याकुट्ट पर्वाला सुरुवात झाली. पणजोबा मालोजीराजे, आजोबा शहाजीराजे, आबासाहेब शिवाजीराजे या भोसल्यांच्या कुळदेठातील कुणीही कधी ना कधीतरी हे काळेकुट्ट पर्व सोसल्या- भोगल्याविना सुटलेले नव्हते. संभाजीराजांना दिला जाणारा नजराणा आणि मन्सबदारी बघून एकच असामी अस्वस्थ, बेचैन झाली होता. बजाजीराजे निबाळकरांचे पुत्र, छत्रपतींचे जावई, संभाजीराजांचे एका नात्याने मामेभाऊ आणि दुसऱ्या नात्याने दाजीसाहेब महादजी निंबाळकर.

नजराण्याच्या बैठकीवरून संभाजीराजे आपल्या डेऱ्यात आले. पाठोपाठ त्यांना पहाऱ्याच्या हशमाने वर्दी दिली. “शालक फलटणवाले निंबालकर पेश आ रहे है।”

मस्तकी तिकोनी, जरीबंद पगडी असलेले, अंगावर खरिल्लत चढविलेले, महादजी डेऱ्यात आले. वयाने ज्येष्ठ असले तरी मानाची अदब राखत त्यांनी संभाजीराजांना तसलीम दिली. “आम्ही जातीने भेटीस आलो आहोत. युवराजांशी काही बोलावं म्हणून.” महादजींनी विषयास हात घातला.

“बोला.

“राजे काय करून बसलात हे?” कसे बोलावे, ते महादजींना सुधरले नाही.

“मतलब?”

“कशाला आलात या खातेऱ्यात?”

संभाजीराजांनी महादजींना निरखत कडवा सवाल केला.

“अंगी शाही खिल्लत पांघरून तुम्ही आम्हाला हे विचारावं? तुम्ही का इथं हत्यार राबविताहात?”

“आमचा सल काय तो कुणाला कळायचा नाही कधी. पहाडासारखे वडीलधारे पाठीशी असता, ही आडवाट तुम्ही मात्र धरायला नको होती राजे.”

“बस्स! दाजीसाहेब, राजवाटा खुंटल्या की आडवाटेशिवाय काही करता येत नाही. आमचा सलही कुणाला कधीच नाही कळणार. कळला तरी उकलणार नाही.”

“अजून शांत विचार करा राजे. वेळ गेली नाही. तुम्ही परतावं, असं आम्हाला वाटतं. अभिषेक झालेल्या युवराजांनी राहावं अशी ही जागा नाही.”

“आम्ही विचार केला आहे. आम्हाला युवराज म्हणू नका.” भयाण शांतता डेऱ्यात कुचमून पडली.

“या निर्णयानं पस्तवाल एवढंच सांगतो आम्ही. येतो आम्ही.” महादजी आले तसे जायला निघाले. डेऱ्याबाहेर पडणाऱ्या त्यांच्या कानी बोल पडले,

“आमच्या अक्कासाहेबांना नमस्कार सांगा. युवराज म्हणून नव्हे. पाठचे दुर्भागी भाऊ म्हणून!” सखूबाईंच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले.

महादजी डेऱ्याबाहेर पडले. या मेहुण्यांच्या भेटीगाठीची खबर दिलेरला लागली होती. महादजी आपल्या गोटातील डेऱ्यात जातात न जातात तोच पठाणी हत्यारबंद हशमांचा त्या डेऱ्याभोवती घेर पडला. महादजी नजरबंद झाले!

दिलेरखानाचे ग्रह आता बळाला लागले. विजापूर दरबारात वजीर सिद्दी मसूद आणि सेनापती सर्जाखान यांची तेढ पडली. एकेकाळी मिर्झा राजा, दिलेरखान, शिवाजीराजे, नेताजी पालकर या चार ताकदवार सेनापतींच्या स्वारीत विजापूरचे रक्षण करणारा सर्जाखान विजापूर पारखा होऊन थेट दिलेरला येऊन मिळाला! दख्खनेचा एक शाहजादा आणि एक सरलष्कर मिळताच दिलेरचे पारडे जड झाले.

औरंगाबादला असलेल्या मुअज्जम ऊर्फ शहाआलम या दख्खनसुभा औरंगपुत्राला, दिलेरची ही वरताण काही मानवणारी नव्हती! दिलेर आता विजापूर गिळण्याचं स्वप्न बघत होता. त्याला हे श्रेय मिळू नये, म्हणून शहाआलम त्याला मराठ्यांवर चाल करण्याचा अनाहूत सल्ला देत होता. दोघांचे पराकोटीचे मतभेद झडत होते.

संभाजीराजांसह दिलेरने बहादूरगड सोडला आणि अकलूजला तळ दिला. हे ठाणे आदिलशाही व मराठशाह्दीवर चाल घेण्यासाठी मोक्याचे होते. दिलेर विजापूरवर चालून येणार या भयाने वजीर मसूदखानाने छत्रपती शिवाजीराजांशी बोलणी लावली. राजांनी मसूदला मदतीचा हात देण्याचे अभय लिहून पाठविले. यात दोन हेतू होते. विजापूर दिलेरच्या मोगली घशात जाऊ देणे हिताचे नव्हते आणि दुसरे म्हणजे साधेल त्या प्रयत्नाने संभाजी राजांना दिलेरच्या गोटातून उचलायचे होते.

सरलष्कर हंबीरराव आणि आनंदराव यांच्या म्होरकेपणाखाली मराठी फौजांच्या दोन फळ्या आदिलशाहीत उतरल्या. या फौजांतील जासूद प्राण धोक्यात झोकून दिलेरच्या तळावर संभाजीराजांना भेटले होते. पण युवराज हट्टाला पेटले होते. काही ऐकायला तयार नव्हते. जासूद हताश परतले होते.

आदिलशाहीत आता तीन शक्तींचा तिढा पडला होता. अकलूजला दिलेर, संभाजीराजे आणि सर्जाखान; विजापूरला चिंताग्रस्त मसूदखान व आदिलशाही आणि युवराज परत मिळण्यासाठी, जमेल तेवढा आदिलशाही मुलूख मराठशाहीला जोडण्यासाठी दौडणाऱ्या मराठी फौजा.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment