महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,563

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२७

Views: 1363
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२७ –

अकलूजच्या तळावर आपल्या डेऱ्यात संभाजीराजे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. त्यांचे मन बहादूरगडात गुंतले होते. आठवणींची गुंतवण उकलीत होते. “काय असतं एकेकाचं भाग्य! युवराज्ञीबरोबर आम्ही शृंगारपुरात राहिलो. त्यांचं कौतुक, सोपस्कार त्यांच्या माहेरी झाले आणि यांना…’आठवणीने संभाजीराजे पिळवटले.

युवराज्ञी, तुम्ही नेहमी म्हणत आलात – आम्ही बाशिंग बांधले आहे, ते रानवाऱ्याशी! खरं आहे ते. पण ते तुमच्या बाबीने नव्हे, जिथं आमचीच उधळण झाली, तिथं त्यांना कुणी जपावं?’ अंगच्या कपड्यांनी पेट घेतलेला माणूस धावावा, तसे संभाजीराजांचे मन सैरभैर धावू लागले.

“अक्कासाहेब, कसला खोडा घातलात हा तुम्ही! मुलखात असत्या तर आमच्या युवराज्ञींनी यांना तळहाताच्या फोडासारखं जपलं असतं.’

विचारांचा पाठलाग टाळावा म्हणून संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. दिलेरशी रदबदली करून संभाजीराजांनी महादजींची नजरबंदी उठवून घेतली. मोगलांच्या फौजा आता एकवट होऊ लागल्या. रसद, वैरणकाडी दास्तानी लावण्यासाठी मोगलांचे काबाडीच्या बैलांचे तांडे माळशिरस, इंदापूर, बारामती या भागात चकरा टाकू लागले. अशाच एका तांड्याशी भूपाळगडावर मावळ्यांची गाठ पडली. ‘तू- मी’ची बाचाबाची झाले. मोगली हशमांनी ती न चुकता दिलेरच्या कानी घातली – “भूपालगढके काफर मरहद्रे रसद इकला करनेमे हन हर्कत लेते है, टोककर दम भरते है। ”

झाले! दिलेर लाच टेकला होता. माकड मशालीचीच वाट बघत होते. एकतर याच निमित्ताने हातचे संभाजीराजे दिलेरला पारखून घ्यायला मिळणार होते.

“सेवा का लडका शाही मन्सबदार सचमुच हुआ है, या ये बाप-बेटेकी छुपी चाल है?” आणि मराठी फौजांचा विजापुरी मुलखावर पडलेला दबाव असा मराठ्यांना तिरका तडाखा दिल्याखेरीज हटणार नव्हता. दिलेर दख्खनेत काही उरुसाला आला नव्हता.

वैशाख शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अकलूजच्या तळावर दिलेरने जमलेल्या फौजांना हमल्याचा इशारा दिला. फौजा पथकापथकांनी शिस्त घेत तळ सोडू लागल्या. तोफखान्याचे गाडे खडखडत निघाले. किल्ले भूपाळ गडाच्या रोखाने. खासा दिलेर संभाजीराजांच्या डेऱ्यात आला. हसत म्हणाला, “संभूराजे. चलिये। आपके मर्द हाथोंका शगुन आजमाना है। भोपालगढपर कब्जा बिठाना है। औरंगाबादमें शाहजादा मुअज्जम आपपर शक लेता है। उसे अपनी करामत दिखानेका मौका आया है।”

भूपाळगडाचे नाव ऐकताच संभाजीराजे चाचरले, “पण खानसाहेब….”

गदगदा हसत दिलेर तडफेने म्हणाला, “सही है राजे। आपका हिचकिचाना रास्त है। हम आपको सिर्फ फर्मा नहीं रहे है। खुद सवारी भरके आपके साथ आ रहे है। जंगमें अपना-पराया कुळ नहीं। आपको हमारे साथ आना है। अपनी फौज को तैय्यारी फर्माओ।” गर्जत्या झंजावातासारखा दिलेर डेऱ्याबाहेर पडलाही.

संभाजीराजांचे आपल्या फौजेला फर्मान सुटले. चौघड्यांच्या तालावर शिस्त घेत बऱ्हाड-खानदेशची मोगली फौज कूचाला सिद्ध झाली. हौदा लादलेल्या एका हत्तीवर पठाण दिलेरखान आणि संभाजीराजे भोसले एकत्र बसले. हत्ती फौजेच्या आघाडीला झाला. दिलेरने हत्यार म्यानाबाहेर घेत ते उंचावले. पाठच्या सेनेने त्याची इशारत पकडून मोठी दाद दिली – “धीन, धीन!”

भरकटलेली नौका पाणझोताच्या थपडा खात भेलकांडत जावी तसे वाट चुकलेले संभाजीराजे पाठीशी मोगली फौज ठेवून, साथीला पठाण सेनापती घेऊन भूपाळगडावर चालून निघाले! शिवाजीराजांच्या ‘श्रीं’च्या राज्यावर त्यांचेच पुत्र संभाजीराजे चालून निघाले! भूपाळगडाच्या पंचक्रोशीतील भेदरलेली मराठी रयत गडाच्या आसऱ्याला धावून गेली. गडाचे दरवाजे बंद झाले. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तव्यासारख्या छातीत सुपाएवढे काळीज घेऊन बुरुजा-बुरुजांवरचे मोर्चे बांधून झुंजीला सिद्ध झाला. नरसाळा राजांचा कदीम आणि इमानाचा माणूस होता. बाल संभाजीराजांना त्याने अंगा खांद्यावर खेळविले होते. आज तेच अंगावर चालून येत होते.

रात्रभर फिरंगोजीचा डोळ्यास डोळा लागला नाही. तटावर येऊन गडपायथ्याला भिडलेल्या छावणीवर नजर टाकताना नरसाळ्याचे काळीज तुटत होते.

“बाळराजं, काय क्येलंसा हो?” हा त्याच्या मनी उठणारा सल पायथ्याच्या संभाजीराजांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. पोहोचला तरी उपयोग नव्हता!

बैशाख शुद्ध द्वितीयेचा दिवस फटफटला नाही तोच दिलेरच्या तोफखान्याचा गोळा भूपाळगडावर फुटला. जंगाला तोंड पडले. फिरंगोजीचे धारकरी किल्ल्यावरून बाण, दगडधोंड्यांची फेक करू लागले. दिवस वर चढू लागला. मोगली तोफखाना गडावर आग ओकीत होता. हशमांच्या फळ्या तटाशी लगट करू बघत होत्या. पेटला फिरंगोजी गोफणीगत गडावर भिरभिरत कुठंही भांगा पडू देत नव्हता.

पुरंदरसारखा बळकट किल्ला नमविणारा जिद्दीचा दिलेर भूपाळगडासमोर मात्र दमगीर झाला. दुपार धरून वैशाखी उन्ह सणकू लागले. तसे दिलेरने गोलंदाजांना बत्ती रोखण्याची आज्ञा दिली. मांजऱ्याचे पठार शांत झाले.

कपाळावरचा घाम निपटत दिलेर आपल्या डेऱ्यात आला. खानसाम्याने समोर ठेवलेल्या थाळ्यातील रोट सागुतीच्या सागुतीच्या कटोऱ्यात डुबवीत त्याने आज्ञा केली, “संभूराजाको बुलाव. गढ जरूर पडेगा. !”

संभाजीराजे दिलेरच्या डेऱ्यात आले. पहाटेपासून काहीच झाले नाही अशा थाटात दिलेर त्यांना म्हणाला, “राजासाब, आप सम्हालोंगे घेरेकी आघाडी?”

“हाँ. जरूर.” संभाजीराजांनी होकार दिला.

“देखिये गढ ताकदवर ठैे। कचदिल मत होना!”

संभाजीराजे त्याला दाद म्हणून नुसते हसले. दुपार टळतीला लागताच दिलेरने आपला ठेवणीचा, हातचा डाव काढला. आपला हत्ती त्याने संभाजीराजांना दिला. त्या हत्तीच्या पाठीवरचा हौदा हटविण्यात आला होता. संभाजी राजांसाठी त्यावर गिर्दीची सांडणी-बैठक बसविली होती.

आपल्या फौजेसह संभाजीराजे आघाडीला झाले. गडावरच्या इमानी तिरंदाजांनी तीरकमठे रोखून फौज टप्प्यात घेण्यासाठी पवित्रे धरले. बंदूकबारदारांनी नळ्या पेलून शिस्त घेतली. तट बुरुजांवर फेर टाकणाऱ्या फिरंगोजीला हत्तीवरचे संभाजीराजे दिसले, मात्र त्याने आपल्या माणसांना ओरडून इशारत दिली – “गड्यांनो, घात जाला. पठाणानं डाव साधला. बाळ धनी म्होरं काडलं! हात आवरा!”

माया कर्तव्याला आडवी आली. लढतीचे रूप पालटले. संभाजीराजांची फौज थेट गडाच्या तटाला भिडली. फिरंगोजीने तटाला दोर लावून गडावर पांढरे निशाण धरले. एक दोरबाज तटावरून खाली उतरला. त्याने सांगावा संभाजीराजांसमोर ठेवला – “तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम न्हाई! आलासा तसं निघून जावं.”

संभाजीराजे त्या दोरबाजावर गर्जले, “किल्लेदारास सांग, नरसाळा, आम्ही गड घेतल्याखेरीज हटणार नाही! एक आम्ही तरी पडू नाहीतर गड तरी पडेल!”

दोरबाजचा निरोप ऐकून फिरंगोजी पेचात पडला. लढत द्यावी संभाजीराजांच्यावर हत्यार धरावे लागणार. न द्यावी तर गड सोडावा लागणार! फिरंगोजीने गडावर सबनीस विठ्ठल भालेरावांशी मसलत केली, “काय करावं?”

संभाजीराजांकडून साऱ्यांना अभय घेऊन गड खाली करून द्यावा, अशी मसलत पडली. तटावरचे पांढरे निशाण डावे-उजवे डुलू लागले. ते बघताच मोगली तळावर शाजणे, नगारे झडले. फत्तेच्या तोफा फुटल्या. अभय घेतलेल्या फिरंगोजीने, विठ्ठल भालेरावांसह येऊन गडाचा दरवाजा खोलून मान खाली टाकली. त्याला संभाजीराजांच्याकडे बघावेसे वाटत नव्हते. आपली मावळी शिबंदी घेऊन फिरंगोजीने खालमानेने विठ्ठलरावांसह भूपाळगड सोडला. गडावर चांदताऱ्याचे हिरवे निशाण चढले. संभाजीराजे गडाच्या बालेकिल्ल्यावर गेले. दिलेर पायथ्याला पठारावरच्या तळावर राहिला.

रात्र उतरली. मांजऱ्याच्या पठारावरच्या मोगली तळावरचे टेंभे शिलगले. आगट्या पेटल्या. दिलेरच्या डेज्यासमोर दोरखंडांनी दावणीला जनावरांसारखी सातशे मराठी रयत माणसे खालमुंडीने खडी होती. त्यांच्याभोवती हत्यारबंद पहारा जातीने उभा होता. भेदरून भूपाळगडच्या आसऱ्याला आलेली ती कुणबाऊ माणसे गड पडताच वाऱ्यावर उघडी पडली होती. पठाण ठरवील ते त्यांचे भवितव्य होते.

इस्पहानी मद्यावर रस्सा-रोटी रिचवलेला दिलेर डेऱ्याबाहेरे आला. कैदखान्याच्या प्रमुखाने त्याला कुर्निस देत विचारले, “इनका क्‍या करना हजूर?”

दिलेरने साऱ्या तांड्यावर नजरफेर टाकीत एक उदार हुक्‍्म फर्मावला, “काफरोंका एक-एक हाथ कलम कर दो!!”

मांजऱ्याच्या पठारावर जल्लादांचा जथा हाती वीतभर रुंदीचा धारदार सपाता घेऊन लाकडी खोडावर दाबून धरलेले काफरांचे हात कलम करताना खवचटपणे विचारीत होता – “कौनसे हाथसे पथ्थर गिराये? कमीने।” दमलेला जल्लाद सापता दुसऱ्याच्या हातात नेताना तिरस्काराने म्हणत होता – “कितनी पैदाइश है कम्बख्तोंकी! तटपरसे फेक देते, तो हमें इतनी तकलीफ तो नही होती!”

पठारावर र्किंकाळ्यांमागून किंकाळ्या उठत होत्या. भूपाळगडच्या बालेकिल्ल्यांवरून त्या ऐकता येणार नव्हत्या. त्या किंकाळ्यांना कुणी वाली नव्हता. कसा असावा?

भूपाळगडच्या कुमकेसाठी महाराजांनी सोळा हजारांची सेना पाठविली. पण ती समयास पावली नाही. गडावरचे बदललेले निशाण बघून मावळी सेना परतली. दिलेरखानाने गडाच्या माऱ्याच्या मोक्याच्या जागा बेचिराख करून टाकल्या. पावसाळा तोंडावर आला होता. गडाची बंदिस्ती करून दिलेर आणि संभाजीराजे बहादूरगडाकडे निघाले. मराठी रयतेचे हात कलम करण्याचा ह हुकूम खानाने दिला, ही बाब संभाजीमहाराजांच्या मनात सलत होती. स्वस्थ बसू देत न बैठकीच्या हत्तीवर हौद्यात त्यांनी खानाला सांगितले, “बेकसूर माणसांचे हात कलम करण्याचा हुकूम दिलात. हे बरे नाही केलेत.”

खान बेपर्वाईने म्हणाला, “शुक्र गुजारो राजे, हमने उन्हें मौतके घाट नहीं उतार दिये! हमारा कितना हशम काम आया जानतो हो; ये नाचीज मिट्टीका ढेर कब्ज करने के लिये?” चाप बसविल्यागत संभाजीराजांची जबान खुंटली. काळजात मात्र काहीतरी सलत राहिले. बहादूरगड आला. आपल्या फौजेला दास्तानी लावून संभाजीराजे कबिल्याच्या दालनात आले. राणूअक्का आणि दुर्गाबाई काहीतरी बोलत होत्या. त्या बोलणे तोडून थांबल्या. सलवार-कमीज घातलेल्या, तलम ओढण्या चेहऱ्याभोवती ओढलेल्या सेवेच्या दासी दालनाबाहेर गेल्या.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment