महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,74,410

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२९

By Discover Maharashtra Views: 1325 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२९ –

महाराजांना ही अट परवडण्यासारखी नव्हती. खरे तर दिलेरला टांगता ठेवून महाराजांनाच विजापूर दाबायचे होते; पण मसूद सावध झाला होता. महाराजांनी त्याला द्यायच्या मदतीचा मुखवटा फेकून दिला! मोरोपंतांना महाराजांनी फर्मावले,

“आदिलशाही लुटीला घाला. साधेल तितका मुलूख दास्तानी लावा.”

मराठी फौजेच्या दोन फळ्या महाराजांनी हंबीरराव, आनंदराव आपल्यासोबत घेऊन ते खासे धरणगाव, जालना असा म्होरा ठेवीत मोगलाईत उतरले. मोरोपंतांची सेना आदिलशाही लुटीत, जाळत निघाली. धान्याचे बोद, वैरणीचे बैलगाडे अशी रसद घेतली, ती दिलेरला पावती करण्यासाठी आपल्या फौजेसह संभाजीराजे कबिला घेऊन हलसंगीहून निघाले. इंदी, तोरगल मार्गावर अचानक त्यांची साबाजी घाटगे या आदिलशाही सरदाराशी गाठ पडली.

दिलेरची रसद तोडण्यासाठी साबाजी संभाजीराजांवर चालून आला. आमने- सामने हत्यारघाई जुंपली. कागलकर साबाजी घाटगे आणि संभाजीराजे दोघेही मराठा सरदार! पण एक आदिलशाहीकडून आणि दुसरे मोगलाईकडून एकमेकांवर हत्यार चालवू लागले! या चकमकीत साबाजी जायबंदी झाला. काढत्या पायाने शिबंदीसह आला तसा निघून गेला. रसदीचे तांडे घेऊन संभाजीराजे बहमनहळळीला पोचले.

पावसाची बुरबुर हटण्याची दिलेर वाट बघत होता. चौवाटांनी त्याच्या फौजा एकवट होत होत्या. विजापूरला सर्जाखान, संभाजीराजे यांच्या मदतीने सुलतानी तडाखा देण्याची तो स्वप्ने बघत होता. मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या जागजागी चकमकी उडत होत्या. एवढ्यात दिलेरला धसका देणारी पहिली खबर मोगलाईतून आली –

“धरणगाव लूटा गया!”

पावसाळा हटला. थंडीने तळ धरला. बहमनहळ्ळीच्या ठाण्यावर संभाजीराजे जनानी डेऱ्यात एका खाटल्यावर शालनामा पांघरून बसले होते. चिराखदानावर त्यांची नजर जखडून पडली होती. सारा तळ रात्रीच्या कुशीत शांत झाला होता. रात्रपहाऱ्याचे पठाण दूरवर देत असलेली गस्त चुकारपणे मध्येच कानी देत होती. राणूअक्कांचा डेरा लगतच होता. संभाजीराजांच्या मनात येसूबाईची आठवण झिरपू लागली. त्यांची अनेक रूपे चिराखदानाच्या ज्योतीत संभाजीराजांना भास देऊ लागली. स्वत:ला विसरून ते एकटक ज्योती निरखण्यात दंग झाले.

थंडीने दाटलेले धुके फोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या. आघाडीला दिलेर, संभाजीराजे, सर्जाखान ढालगजावरच्या हौदात बसले होते. राणूअक्का पठाणी जनान्याच्या तांड्यातील मेण्यांतून चालल्या होत्या. त्या तांड्याला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता.

मोगली फौजा विजापूरपासून पाच कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या. मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. विजापुरात हलकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार! पठाण विजापूर मरणाला घालणार! थंड्या मिजाजाने दिलेर विजापूर कसे घेरावे, याचा बेत आखू लागला. औरंगाबादेहून शहाआलमचे त्याला एकटाकीने खलिते येत होते – “सेवा मोगलाईत घुसला आहे. सैन्यबंदीनं टाकोटाक ह्याला परतवून विलायत राखावी.”

दिलेर आला खलिता मांडीखाली दाबत होता. त्याला हातातोंडाशी आलेला विजापूरचा घास सोडायचा नव्हता. अखेरचा म्हणून दिलेरने विजापूरच्या वजिराला – मसूदला खलिता धाडला. त्याच्या उत्तराची वाट बघत मोगली फौजा केव्हाही विजापुरावर तुटून पडायला खड्या ठाकल्या. दिलेर खुशीत होता. विजापूर पाडून तो औरंगजेबाला सिद्ध करून देणार होता की, दख्खन सुभेदारी हा फक्त माझा एकट्याचा हक्क आहे. शाहजाद्याला परत उत्तरेत नामजाद करावे.

पण त्याच्या या सुखस्वप्रावर शिवाजीराजांनी मावळी पाणी ओतले! औरंगाबादेला पाच मजला इतक्या लगत असलेले जालना हे मोगलांचे अव्वल मातब्बर ठाणे राजांनी दिवसाढवळ्या लुटले. जालना जळाला! शहाआलमने दिल्ली दरबारला खलिता धाडून याचे खापर दिलेरच्या माथ्यावर फोडले.

दिल्लीहून निघालेले, दिलेरची खरड करणारे फर्मान तळावर आले! मजकूर होता – “काफरको रोको। पीछे हटो।” हातातील फर्मानाचा चुरगळा करीत नाराज दिलेर चरफडला – “सब सत्यानाश कर दिया इस शहाजादेने और सेवाने!” बंदिस्तीने तळ दिलेल्या फौजेला दिलेरचे हुकूम सुटले – “उखाड दो डेरे- शामियाने. मिरज का मोर्चा लगावो। आदिलशाही मुल्क तबाह कर दो।”

चिडलेल्या पठाणांच्या फळ्या मिरजेचा रोख धरून जाळपोळ, लुटालूट करीत निघाल्या. हरावलीला होते – इखलास, ईरज आणि खैरत. दिलेर, संभाजीराजे, सर्जाखान यांच्या चौखूर उधळत्या घोड्यांच्या टापांखाली गावेच्या गावे बेचिराख होऊ लागली. माखनापूर, जालगिरी, होनवाड, तेलंग लुटले गेले. प्रत्येक गावात दिलेर आणि सर्जाखान वाली नसलेल्या हिंदू प्रजेचे तांडे दोरखंडांच्या दावणीला बांधून त्यांची धिंड काढू लागले. विटंबना करू लागले. ती समोर बघताना संभाजीराजे आतल्या आत घुसमटू लागले. सगळ्या वाटाच रोखल्यामुळे स्वत:वरच चिडू- चरफडू लागले. मागून पठाणांच्या जनाना तांड्यातून येणाऱ्या अक्कासाहेब हे सारे बघून संतापाने नुसत्या होरपळत होत्या. भोवती “आपलं म्हणावं’ असे कुणीच नसल्याने उरातली आग उरातच थोपवीत होत्या.

तिकोटा हे गाव आले. दिलेरच्या बेभान हशमांनी घरट्याघरट्यांत घुसून लूटमार केली. उभा गाव दिवसाढवळ्या धडाडून पेटला. आजवर ओलांडली नव्हती, ती हद्द सर्जाखानाच्या हशमांनी ओलांडली. बेघर, बेआसरा झालेल्या हिंदू रयतेच्या बायाबापड्यांच्या अब्रूवर घाला घातला. “लौंडी, रंडी।” म्हणत बायकांना अंगाखाली घेण्यासाठी पठाण, मोगल हशम त्यांच्यामागून वखवखल्या जनावरांसारखे गावातून सैराट धावू लागले. जिवाच्या आकांताने “वाचवा वाचवा!” असा हंबरडा फोडत तीनएकशे बायांनी विहिरी-आडांत आपले असहाय बेवारशी देह झोकून दिले. आभाळाला तडा गेला. अश्रूंचे, रक्ताचे रूप घेऊन सूर्यरस पाझरू लागला!

लुटीची, अत्याचाराची, दौडीची मस्ती चढलेले दिलेर, सर्जा तिकोट्याहून तडक अथणीला निघून गेले. आपली फौज पाठीशी घेत अथणीचा रोख धरत दौडणाऱ्या संभाजी राजांचे मस्तक संतापाने थडथडत होते. घणावर घण बसत होते. मांडेखालचे घोडे त्यांच्या बसणाऱ्या जबरदस्त टाचेने कळवळून खिंकाळत चौटाप उधळत होते.

समोर अथणी आली. पेटली! हातपंजा उठवून संभाजीराजांनी पाठची सेना थोपती केली. पेटत्या अथणीची आग त्यांच्या डोळ्यांत उतरू लागली. देहा-मनात, मस्तकात पाझरू लागली. धमन्यांचे भोसलाई रक्त पेटवू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वांवर जळजळीत नजरफेर टाकीत जबानीचा करडा कोरडा ओढला -टं “खबरदार किसने गावमें कदम रखा तो! कलम कर दिया जायेगा। सेना यहीं रोखवि.

वकुबाचे पंचवीस एक धारकरी निवडून बाजूला घेत संभाजीराजे गर्जले, “हमारे पीछे आव।” आणि कायदे झाडीत, घोडा फेकीत अथणीत घुसले. पेटत्या अथणीच्या पेठांतून पेटता भोसला तीरासारखा चालला. हे रूप, हा आवेश वेगळा होता. सारा गाव बेचिराख करून एका झाडाच्या घेराखाली दिलेर, सर्जा, इखलास घोड्यांवर मांड घेऊन उभे होते. त्यांच्या समोर लुटीची प्रतवारी लावण्यात काही पठाण गढले होते. कलकलत होते. उधळते संभाजी राजे थेट दिलेरसामने आले. गोंधळलेले, धपापणारे जनावर कायद्यांनी थोपवीत पायउतार झाले.

“आईये राजे” पठाणही हसत पायउतार झाला.

“खान, ये क्‍या चला है?” संभाजीराजांचा पालटलेला जरब भरणारा आवाज साऱ्यांनाच जाणवला. सर्जा, इखलासही पायउतार झाले.

“मतलब?” भुवया चढवीत दिलेर गुरगुरला.

“आमच्या डोळ्यांदेखत आमच्या रयतेची ही कुत्ते मौत? औरतींची बेइज्जत?”

“किसकी रय्यत? तुम्हारी?” गर्दन मागे टाकीत पठाण खदखदून हसला.

“पठाण! आम्ही जाब विचारतो आहोत.” संभाजी राजांच्या फटक्याने दिलेरचे बेगुमान हसणे थिजले.

“जाब? हमें आदत हे जाब पूछनेकी, सुननेकी नहीं! हैसियत सम्हालो।” पठाणाची गर्दन नागफण्यागत ताठ झाली.

“कसली हैसियत? तुमच्या पठाणी जनान्याची अशी बेइज्जत केली तर….”

“राजे, जुबान सम्हालो। ये काफरोंका जनाना नहीं है। पठानोंके मर्द हाथ हत्यार उठाकर जान की बाजी लगाते है, जनानेपर! तुम मामुली सप्तहजारी मन्सबदार हो, हम सालारे दख्खन है! तुम्हाला कबिला हमारे जनानेमें हे। होश रख्खो!”

“खामोश!” कमरेच्या हत्याराची मूठ उपसत, संतापाने थरथर कापणारे संभाजीराजे थेट दिलेरवर धावले. फासळ्या फासटून दिलेरने त्यांच्या काळजालाच हात घातला होता. “होश रख्खो! सँवारो!” म्हणत सर्जाखानाने चलाखीने पुढे होत संभाजीराजांचे मनगट पकडले. एव्हाना इखलास, खैरत, ईरज यांची पठाणी हत्यारे म्यानाबाहेर सरकली होती. हाताच्या इशारतीवर दिलेरने ती खाली पाडली.

थंड, दमदार बोलीत दिलेर संभाजीराजांना म्हणाला, “सुना था तुम्हारे आबाजानने आग्रामें शहेनशाहको तेजमिजाजका तरीका दिखाया था। भरे शाही दर्बारमें वाकई तुम उसके सही फर्जद लगते हो!”

प्रत्यक्ष दिलेरच्या तोंडून आबासाहेबांचे वर्णन ऐकताना अंगावर वीज पडावी तसे संभाजीराजे शहारले! मनाचे बांध फुटत चालले. अपमान, संताप, स्वत:चीच चीड, खंत आणि अगतिकता भोसल्यांच्या डोळ्यांत साकळून आली. पठाणांसमोर उभे राहणे मुश्कील झाले. फिरका घेत संभाजीराजे बळले.

चित्ता उडावा तशी झेप टाकीत जनावरावर स्वार झाले. खूर झाडीत जनावर उधळले. त्यांचा पाठलाग घ्यावा म्हणून इखलास, खैरत, ईरज यांनी पटापट घोड्यांवर उड्या घेतल्या, त्यांना रोखत दिलेर ठंडेपणाने म्हणाला, “जवाँ है, मर्द है, सत्र गँवाता है। ठंडा हो जायेगा।”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment