महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,802

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३२

By Discover Maharashtra Views: 1359 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३२ –

“अक्कासाहेब… अक्कासाहेब.’ भोसलाई आतडे आतल्या आत तुटू लागले.

“हे असं पठाणांच्या संगतीत कुठवर फिरावं? कशासाठी?”

गलबलून गेलेल्या संभाजीराजांचे ओठ दाताच्या पकडीत जाताना असहाय पुटपुटले – “आबासाहेब, आमच्या करणीची सजाही तुमच्या अगोदर पठाणानंच आम्हास द्यावी!”

रायगडाच्या देवमहालात छत्रपती शिवाजीमहाराजांनी बिल्वदलाची ओंजळ स्फटिक शिवलिंगाला भावभक्तीनं वाहिली. भंडाऱ्याची चिमट भवानीमूर्तीच्या चरणांवर सोडून, हात जोडून “’जगदंब’ म्हणत डोळे मिटते घेतले. संभाजीराजे पन्हाळगडावर पावते झाल्याला पंधरवडा लोटला होता. आज छत्रपती त्यांच्या भेटीसाठी रायगड उतरणार होते. महाराजांची चर्या ओढल्यागत, चिंताग्रस्त दिसत होती. युवराजांची अनेक रूपे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर सरकून गेली.

“महाराजसाहेब, तुम्ही काढाल हुडव्यातील फळ बाहेर?” असं विचारणारा, अंगी डौर, चोळणा चढवून आईचा पाजळता पोत बेभानपणे नाचविणारा, रजपुताच्या गोटात ओलीस राहणारा, मथुरेत एकला पिछाडीला राहताना “तुम्हाला साजेल असंच आम्ही वागू” म्हणणारा, आरोपित म्हणून भरल्या दरबारी पेश होताना – “आम्ही बाईला कैदेत टाकलं आहे, संभाजीराजे भोसले म्हणून!” असं निधडं बोलणारा, गेल्या आऊंच्या देहावर, उरीफुटी स्फुंदत आसवांचा वर्षाव करणारा. केवढा पालटला! का? कशासाठी?

“यांची कोंडी झाली? कुणामुळ? आमच्यामुळं? राणीसाहेबांमुळं? राणीसाहेब – आमच्या आऊसाहेबांना माणसं घडविताना हाताला अपयश कधीच आलं नाही. पण – पण या राणीसाहेबांबाबत त्यांचंही काही नाही चाललं! दर्याभर फिरून कोरडयाच राहिलेल्या मासोळीगत ह्या! मायेनं माया वाढते; तेढीनं तेढ हे कधी शिकल्याच नाहीत….

“युवराज तरी किती तेजमस्तक! आपली कोंडी झाली असं ते मानतात. आम्हाला तर कोंडीचासुद्धा विचार करायला थांबण्याएवढी उसंत कधी मिळाली नाही. आपल्या माणसांवर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही. आम्हाला नकळतच आम्ही हयातीच्या उताराला लागलो. कुणाला सांगावं हे? कसं?’

अस्वस्थ झालेले छत्रपती देवमहालाबाहेर पडले. आपल्या खासेवाडयाच्या बैठकी दालनात आले. एक कुणबीण पेश आली. “राणीसरकार येत्यात,” अशी वर्दी देऊन निघून गेली. छत्रपतींच्या कपाळी, ती वर्दी ऐकताना आठ्या धरल्या. गड उतरायचा समय झाला होता.

“स्वारी पन्हाळ्यास कूच होतेय असं ऐकलं. राहवलं नाही म्हणून आलोत आम्ही.” दालनात आलेल्या सोयराबाई लटके, पण देखणे हसत म्हणाल्या. व्ह.”

“पन्हाळ्यावर जरा सबुरीनं घ्यावं, हे सांगायला आलोत आम्ही!” सोयराबाई ठरवून थांबल्या.महाराजांनी चमकून त्यांना निरखले. पण त्यांना अधिक कोड्यात न ठेवता सोयराबाईंनी नक्षी फिरवली.

“स्वारींचा स्वभाव करडा. काय म्हणता काहीतरी होईल, ही धास्ती वाटते. रांझेकर पाटलानं बदअंमल केला म्हणून त्याचे हातपाय कलम करण्याचा स्वारीनं हुकूम फर्मावला! खंडोजी खोपड्यानं चुगल केली, तर त्याचेही हातपाय कलम करविणं झालं! भूपाळगड सोडून आल्याबद्दल फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देणार होती स्वारी! हा कसूर तर केवढा! साक्षात गनिमाला सामील होण्याचा. तेही अभिषिक्त युवराज असून! या कसुराला स्वारी माफ करणार नाही, भलतीच सजा फर्मावून बसेल, याचं भय वाटतं आम्हास! जरा सबुरीनं घ्यावं, असं सांगितल्याखेरीज राहवत नाही आम्हाला!”

सोयराबाईचा प्रत्येक शब्द तिरका होता. ‘साध्या गुन्ह्यांना करडी सजा फर्मावणारे छत्रपती या करड्या गुन्ह्याला आता काय सजा देणार आहेत, ते आम्ही बघणारच आहोत!’ असा खोचक सवालच त्या बोलण्याआड लपला होता. महाराजांच्या लक्षात ती खोच तत्काळ आली. नजर सोयराबाईवर रोखून टाकीत छत्रपती शांतपणे म्हणाले – “युवराजांच्या जागी रामराजे असते, तर आज काही तुम्ही आम्हाला गड उतरू दिला नसतात! राणीसाहेब, कारभारी मामल्यात आम्ही जनान्याचा सल्ला कधी घेत नसतो. आम्हाला योग्य वाटेल तीच सजा आम्ही युवराजांना देऊ. यावं तुम्ही.” महाराजांनी सोयराबाईंना जवळ-जवळ हाकलूनच हाकलूनच लावले.

हंबीरराव, सूर्याजी, मालुसरे, जोत्याजी केसरकर अशी शेलकी मंडळी पाठीशी घेत छत्रपती रायगड उतरले. पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन करून ते पाचाडच्या वाड्यात आले. वाड्यासमोर सजली पालखी सिद्ध ठेवून पन्हाळ्याला बरंदघाटाने जाणारे धारकरी तयार होते. सातारा, बत्तीस शिराळा, मलकापूर अशा मार्गे छत्रपती पन्हाळा जवळ करणार होते.

जिजाऊ गेल्यापासून पुतळाबाईसाहेब पाचाडच्या वाड्यातच राहत होत्या. त्यांची भेट घेण्यासाठी महाराज दरुणीमहालात आले.

“आम्ही पन्हाळ्याला निघतो आहोत.” महाराज संथपणे पुतळाबाईंना म्हणाले.

“जी. त्यासाठीच स्वारींच्या पायांची डोळे लावून आम्ही वाट बघतो आहोत.”

पुतळाबाईंच्या डोळ्यांत गोळा झालेली कातरता महाराजांना जाणवली. त्यांच्या ध्यानीमनी नसता पुतळाबाई एकदम पुढं झाल्या. महाराजांच्या पायांवर आपल्या दोन्ही तळहातांचं पालाण घालीत भरल्या कंठानं म्हणाल्या, “आजवर या पायांशी कसलं मागणं नाही घातलं. आज घालतो आहोत. चुकलं तरी लेकरू आपलं आहे. पदरी घ्यावं, स्वारीनं युवराजांना अभय द्यावं. समजूत पाडावी.”

महाराजांना क्षणभर वाटले, सईबाईच जिते रूप घेऊन पायांशी साकडे घालून बसल्या आहेत. त्यांचा कंठ त्या सावळ्या आठवणीने दाटून आला.

“उठा.” त्यांनी पुतळाबाईंना भान दिले.

“आम्ही ज्याचं त्याला सारं देत आलो आहोत… देणारही आहोत. फक्त – फक्त तुम्हाला देण्यासारखं आम्हाजवळ काही नाही.” पुतळाबाईंचा विनापत्य वत्सलपणा छत्रपतींना जिव्हारी चाटून गेला होता. त्यांचा निरोप घेऊन ते वाड्याबाहेर पडले. सदरेवर मासाहेबांची वर्दी देणारी, तुळईला टांगलेली निसूर घाट एकवार त्यांनी नजरेत सामावून घेतली आणि ते पालखीत बसले. पालखी पन्हाळ्याच्या वाटेला लागली.

पन्हाळ्याच्या चौ-दरवाजावर आगवानीची नौबत दुडदुडली. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. ठाण झाल्या पालखीतून पायउतार झालेल्या छत्रपतींच्या स्वारीला किल्लेदार विठ्ठलपंत सामोरे आले. महाराजांनी जमल्या असामींवर नजरफेक टाकीत युवराजांचा माग घेतला. ते कुठं दिसत नव्हते.

“पंत, युवराज? – ”

“सज्जाकोठीत आहेत.” किल्लेदारांनी तपशील दिला.

“चला.” समाधानाचा सुस्कारा टाकीत महाराज हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोमाजी बंकी, जोत्याजी केसरकर यांच्या मेळाने बालेकिल्ल्याकडे चालले.

तलावाकाठच्या सोमेश्वराचे दर्शन करून स्वाऱ्या बालेकिल्ल्यात आल्या. विठ्ठलपंतांसह महाराजांनी रंगरूपी शिवरपिंडीचे दर्शन घेऊन गडाच्या खासेवाड्यात प्रवेश केला. दिवस चांगला वर आला होता, तरी धुक्याचा भुरकट थर गडभर पसरला होता.

वाड्याच्या सदरी बैठकीवर बसलेल्या छत्रपतींनी किल्लेदाराकडून गडाचा करीणा घेतला. कोल्हापूर प्रांताचे अधिकार जनार्दनपंत आणि कोकणसुभा रावजी पंडित यांना पन्हाळ्याला बोलावून घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या. सादिलवारीचे सारे आटोपताच महाराजांनी मतलबाच्या विषयाला हात घातला, “पंत, युवराजांना वर्दी द्या. आम्ही सज्जाकोठीवर जाणार आहोत.” महाराजांनी हेरले होते की, शरमिंदे संभाजीराजे आपणहून कधीच समोर येणार नाहीत.

“जी.” म्हणत विठ्ठलपंतांनी वर्दीची व्यवस्था लावली.

“हंबीरराव कुठं दिसत नाहीत.” छत्रपतींनी सदरेतल्या मंडळींवर नजर फिरवीत विचारले.

“सरलष्कर सज्जाकोठीवर गेलेत.” पंतांनी तपशील दिला.

त्या तशा स्थितीतही महाराजांच्या मनात विचार चाटून गेला – “हंबीरराव महाराणींचे सख्खे बंधू. त्या युवराजांना बघता येईल तेवढे पाण्यात बघतात. हंबीरराव मात्र युवराजांना सावरू बघतात.

“चला,” म्हणत छत्रपतींनी सदरी बैठक सोडली. पायीच ते सज्जाकोठीकडे चालले. गडाची तटबंदी धरून असलेली उंचावरची सज्जाकोठी आली. महाराजांना समोर पाहून, लगबगीने सज्जाकोठीबाहेर पडलेले हंबीरराव मुजऱ्यासाठी कमरेत झुकले. “हुबीरराव, तुम्ही रुजू घातलेली मसलत आज घडते आहे. आम्ही युवराजांना भेटतो आहोत.”

“जी. धन्याम्होरे आमचा वकुब न्हाई, पर हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार हिकमतीनं वळतं करून घ्यावं, असं वाटतंय आम्हास. ते पस्तावल्यात. स्वामींच्या हातात हाय त्येंची जिंदगी.”

महाराज पडेल हसले. त्यांना हंबीररावांना म्हणावेसे वाटले – “जिथं आमचीच जिंदगी आमच्या हातात नाही, तिथं त्यांची आमच्या हाती राखणार आम्ही कोण?” पण ते काही बोलले नाहीत. हाताच्या इशारतीवर विठ्ठलपंतांना कोठीच्या पायथ्याला थोपवून छत्रपती सज्जाकोठीत एकल्यानेच शिरले.

कोठीच्या निरुंद दगडी जिन्याने वर चढताना महाराजांना वाटले – “हा जिना कधी संपूच नये. श्वासाला खळ पडे पावेतो असेच चालावे. एकले!’ वरच्या मजल्यावरचे खुले, बैठकी दालन आले. त्या दालनाच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या पठारी मुलखात नजर गमावलेले संभाजीराजे आत उभे होते. ते नजरेस पडताच महाराजांचे पाय जागीच खिळले. जाम्याआड काळजात खळबळ माजली. पुऱ्या तीन सालांनंतर ही पितापुत्रांची भेट होती! ऐन उभारीचा सागवान वृक्ष चवरीच्या काटेरी वेलीने येरगटून टाकावा, तसे संभाजीराजे दिसत होते.

आज पहिल्यानेच छत्रपती शिवाजीमहाराजांना फार-फार जाणवले की, आपण मस्तकी छत्र धारण करणारे राजे नसून अंतरीचे गडकोट गमावलेले एक बाप आहोत!

मिर्झा राजासमोर नि:शस्त्र उभे राहून मान खाली टाकताना वाटली नव्हती, एवढी पिळवटणारी खंत त्यांना समोरचे खाली मान घातलेले संभाजीराजे बघताना वाटली.

कसल्यातरी विचाराने नि:श्वास टाकीत संभाजीराजांनी झरोका सोडला. दालनाच्या दारात उभे असलेले महाराज साहेब बघताच त्यांच्या काळजात मासळी फडफडली. “हे आबासाहेब आहेत? केवढे – केवढे थकलेले!’ क्षणातच गलबलून गेलेले त्यांचे काळीज पाणावून डोळ्यांत एकवटले. झटकन पुढे होत, त्यांनी महाराजसाहेबांच्या चरणांवर आपला माथा ठेवला.

त्या स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले. ढळू बघणारे मन तोलीत, ते नेहमीसारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले, “उठा.”

महाराज दालनात आले. हात पाठीशी बांधून काही वेळ सुन्न मनाने नुसताच पायफेर टाकीत राहिले. नेहमी वेळ न गमावता नेमक्या विषयाला सहज हात घालणाऱ्या छत्रपतींना आज काय नि कसे बोलावे तेच कळेना. मनात एवढ्या विचार-आठवणींची धुंदल जुंपली होती की, दालनात संभाजीराजे आहेत, हेही ते क्षणभर विसरले!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment