धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३५ –
गड-उतारासाठी भोयांनी चौ-दरवाजात पालखी सिद्ध केली. महाराज आज पन्हाळगड उतरून कोयनाघाटीने, सातारामार्गे सज्जनगडी जाणार होते, संतसमर्थ रामदासांच्या भेटीसाठी. संभाजीराजे, निठलपंत, हंबीरराव, रावजी, हिरोजी, उमाजी पंडित अशा मंडळींच्या मेळ्यासह नी बालेकिल्ला सोडला. रंगरूपी पिंड, सोमेश्वर तलाव, कोकणदरवाजा, सादोबाचे तळे, अशा आपल्या लाडक्या पन्हाळगडावरील स्थानांचे दर्शन घेत प्रशस्त चौ-दरवाजात आले. पुढे होत संभाजीराजांनी आबासाहेबांच्या भगव्या राजमोजड्यांना, पायधूळ घेण्यासाठी हात भिडविला.
त्यांना वर घेत महाराजांनी गाढ ऊरभेट दिली. काही न बोलता त्यांची पाठ हलकेच थोपटली. “येतो आम्ही शंभूराजे. जपून असा. जय भवानी!” श्रीमंत योगी शांतपणे बोलला.
“आबासाहेब, तब्येतीकडं ध्यान असावं. जय भवानी!” न राहवून संभाजीराजे बोलले. त्यांचे बोलणे तसेच सोडून निरोपासाठी आलेल्या असामींकडे बघत छत्रपतींनी कधी नव्हे, ते सर्वांना हात जोडले – “येतो आम्ही! जय भवानी!”
छत्रपती सर्वांना पाठमोरे होत पालखीत बसायला निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरे देण्यासाठी जमली छातवाने आदराने झुकली. इमानी हात हेलावले.
पन्हाळ्याच्या बेलाग ढाशा वाऱ्याचा एक ताकदवर झपकारा अवचित आला. पालखीत बसणाऱ्या छत्रपतींच्या अंगचा जामा त्यानं हवेत फरफरला. डुईच्या राजटोपात मढविलेल्या गरुडपिसांच्या पदकातील एक पीस त्या झपकाऱ्याने उखडून काढले. हवेत भेलकांडत ते शुभशकुनी पीस गडाच्या दरडीकडे जाताना बघून संभाजीराज चरकले. छातीवरच्या माळेला बोटे भिडवून डोळे मिटत कातर पुटपुटले, “जगदंब, जगदंब!”
भोयांनी श्रीमंत योग्याची पालखी उठवली. दृष्टिआडची सृष्टी भली करीत संभाजीराजांचे थोर, जाणते आबासाहेब, समर्थांचे “निश्वयाचे महामेरू, बहुत जनांसी आधारू’, श्रीमंत शिवयोगी पन्हाळगड उतरू लागले. माघी पौर्णिमा तोंडावर आल्यामुळं वाडी रत्नागिरीच्या यात्रेला चाललेले भक्तमंडळ वाटेत भेटले. हातच्या उंच सासनकाठ्या तोलत त्यांनी उठविलेला “जोतिबाच्या नावानं चांगभलं!’ हा जयकार ऐकून राजे हात जोडून पालखीतूनच पुटपुटले – “समस्तांचं चांगभलं कर खंडेराया!” पालखीला घेर धरत घोड्यांवर मांड जमविलेले हंबीरराव, हिरोजी फर्जद कदमबाज दौडीवर चालले. चो-दरवाजातील जमली मंडळी परतली तरीसुद्धा पालखी डोळ्यांआड होईतो, संभाजीराजे जखडल्या पायाने उभेच होते. त्यांच्यात मन गुंतलेले उमाजी पंडित त्यांच्या पाठीशी खडे होते. त्यांना बघताच संभाजी राजे म्हणाले, “पंडित, चला. तुमच्याशी काही बोलायचं आहे.”
उमाजी पंडितांसह संभाजीराजे सज्जाकोठीवर आले. पंडितांना बैठकीवर बसण्याची इशारत करून त्यांनी विचारले, “तुम्ही शृंगारपूरची काही खबरबात दिली नाही आम्हाला पंडित.”
पंडित गप्पच राहिले.
“आमच्या भवानीबाई कशा आहेत?”
“सुखरूप आहेत -” “आणि युवराज्ञी?”
पंडित पुन्हा गुमान झाले. काय बोलावे त्यांना कळेना.
“बोला.”
“युबराजांचा धाकटा कबिला पठाणांना दस्त झाल्याचं ऐकून त्यांनी हाय खाल्लेय. कुणालाच त्यांचं दर्शन घडत नाही. आपणहून बंदिवासच पत्करलाय त्यांनी.” उमाजी पंडितांची मान वर उठत नव्हती. कोठीच्या झरोक्यातून दिसणाऱ्या, ठाव न लागणाऱ्या पठारी प्रदेशभर संभाजीराजांचे डोळे भिरभिरत राहिले!
रायगडाच्या खासे महाली भरलेली सदर आता संपली होती. मोरोपंत, अण्णाजी, हंबीरराव, बाळाजी, येसाजी यांना महाराजांनी निरोपाचे विडे देवविले होते. मात्र बाळाजींना बजावले होते, “बाळाजी, तुम्ही जरा आम्हाला महाली भेटा.”
सदरकरी बाहेर पडले तरी रेंगाळलेले हंबीरराव महाराजांजवळ आले. “काय आहे सरलष्कर?”
“आम्ही बोलून लागी पडत न्हाई. पर बोलल्याबगार राहवत न्हाई. धन्यानी औरंगबादशाची काडीची फिकीर धरू नये. असलं धा बादशा चालून येऊ द्यात. मुलूख पिळाचा हाय. पर आम्हाला चिंता हाय ती खाशांच्या तब्येतीची. ह्ये राखाय पायजे धनी.”
महाराज निर्विकार नजरेने हंबीररावांकडे बघत राहिले. त्यांच्या काळजाचा कंद, तो प्रेमा पाहून फुटू बघत होता. तरी स्वतःला आतल्या आत सावरीत महाराज हसत थंडपणे म्हणाले, “हंबीरराव, तुम्ही सरलष्करच आहात काय अशी शंका आणू नका. आमच्या मनी आईच्या कृपेने आम्ही ठीक आहोत. करताहात तर चिंता दुसरी करा.” महाराजांनी कसबाने हंबीररावांना आपल्यावरून दुसरीकडे वळविले.
“कसली?” रांगडे सरलष्कर सबागती विचारात पडले.
“युवराजांची! तुमचा ओढा त्यांच्याकडं आहे. बाक्या प्रसंगी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना बिनतोडीचं सांगाल. त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या तुमचं.”
“जी. धन्यानी त्येंच्याबाबत बिनघोर असावं. या पायांची आण.” का कुणास ठाऊक हंबीरराबांना पुढे होऊन महाराजांची पायधूळ घ्याबीसे वाटले. सरसे होत त्यांनी छत्रपतींच्या पायांना हात भिडविला. त्यांना काहीच न बोलता महाराजांनी डोळे मिटत तो स्पर्श अनुभवला. हंबीरराव बाहेर पडले.
छत्रपती सदर सोडून आपल्या महाली आले. आता एकांतात मात्र त्यांना अंगची कसर पुन्हा जाणवू लागली. दारावरच्या पहारेकऱ्याने आत येत वर्दी दिली, “चिटणीस आल्यात.”
“येऊ दे त्यांना.” महाराज फेर घेऊ लागले. बाळाजी आवजी महालात रुजू झाले.
“बाळाजी, पन्हाळगडी युवराजांना खलिता द्या. लिहा. रामराजांच्या शुभकार्यास तुम्हाला पाचारण केलं नाही. त्याचं काही मनी धरू नका. भेटीत त्या बाबीनं तपशिलात बोलू. सांप्रत खबर आहे की, अलमगीर दख्खनेत उतरणार. त्याचा थोपा करण्यासाठी तुमची शिबंदी कसल्या जिनानं सिद्ध असू द्या. वेळीच आम्ही तुम्हाला याद फर्मावू. आमच्या संगती ठेवू.”
“जी.” बाळाजींनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकून मान डोलवली.
“खलिता तयार करून दस्तुरासाठी आमच्याकडे धाडा. आजच्या आज तो पन्हाळगडी जाईल तसे करा.” छत्रपतींनी हात उठवून बाळाजींकडे पाठ केली. कसल्यातरी खोल विचाराने ते महालाचे छत निरखत संथ पायफेर घेऊ लागले.
सज्जाकोठीच्या बैठकी दालनात बसलेले संभाजीराजे बैठक सोडून ताडकन उठले होते. त्यांच्या मस्तकात झिणसिणत्या मुंग्यांचे वारूळ फुटले होते. समोर पाचाडहून आलेले हुजूरपागेचे दोन हारकारे खालच्या मानेने खडे होते. त्यांतील एकाने पाचाडहून आणलेला पुतळाबाईचा ‘गोटाचा खासा सांगावा.’ संभाजीराजांच्या कानी घातला होता –
“रायगडाचे सर्व दरवाजे, कुणाच्या ध्यानीमनी नसता एकाएकी बंदिस्त झाले आहेत! गडाचा राबता थांबला आहे. ठाव उडत्या काळजानं आम्ही पाचाडी आहोत. स्वारी अंथरुणाला खिळल्याचं कानी आहे. गडावर कसली तरी घालमेल पडली आहे. काय करावं सुचेना झालं आहे.”
समजल्या सांगाव्याने काय करावे, ते संभाजीराजांना सुचेना. याच पावली कोठी उतरावी, मांड जमवून जनावर रायगडाच्या रोखाने फेकावे, या विचाराने त्यांच्या मनी अनावर उचल खाल्ली. पण तिला महाराजांच्या शब्दांनीच पायखीळ घातली – “आता आम्ही सांगेतो प्रांत पन्हाळा सोडू नका.”
“एका शब्दानं बा हालचालीनंही आबासाहेबांना आता दुखविणं होणार नाही.’ द्विधा मनाने संभाजीराजे येरझारू लागले. पन्हाळा सोडताना कष्टी झालेली महाराजांची मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर ठाकली.
“खयाजी-अंतोजी, तुम्ही दौडत्या टापांनी रायगड जवळ करा. जे काही कानी पडेल, ते टाकोटाकीनं आम्हाला पावते करा.” निरोपाचा हातइशारा देत संभाजीराजे एकांत झाले.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १३५.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.