महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,571

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४०

By Discover Maharashtra Views: 1366 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४० –

मोरोपंतांच्या संमतीमुळेच बुंध्यामागून फांद्या उतराव्यात तसे प्रल्हाद निराजी, राहुजी, कान्होजी सारे या धाडशी कटाला हातजोड द्यायला तयार झाले. जमल्या असामींचा इतबार घेण्यासाठी महाराणींच्यावतीने भवानीच्या पवित्र भंडाऱ्याची परडी फिरली! मळवट भरले गेले; कटाचे खलबत उलगले. बाहेर पडणाऱ्या कान्होजी भांडवलकरला महाराणी म्हणाल्या, “कान्होजी, बाळाजींना आम्ही तातडीनं  याद केल्याचं सांगा.”

व्ह जी.

थोड्या वेळातच चिटणीस बाळाजी महाराणींच्या समोर कलमी सेवेस रुजू झाले. “चिटणीस, आम्ही सांगतो त्या भातेनं खलिते सिद्ध करून उद्या दिवसफुटीला पन्हाळगड आणि कोल्हापूर तर्फेला आमचे विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा यांच्या मार्फतीनंच टाकोटाक रवाना करा.”

“जी.” महाराणी काय मजकुराचे खलिते सांगणार याचा बाळाजींना ठाव आला नव्हता. “पन्हाळ्याला किल्लेदार विठ्ठलपंत, हवालदार बर्हिजी इंगळा, हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना लिहा – येथील मसलत एक प्रकारची आहे. युवराजांस कैद करून बहुत सावधपणे असणे! स्वारी गेल्याचं वर्तमान फुटो देवो नये!”

“कोल्हापुरी जनार्दनपंत सुमंत आणि पाराजीपंत पेडगावकर यांस लिहा –

पन्हाळ्याच्या मसलतीस विठ्ठलपंतांना कुमक करून बंदोबंस्तानं असणे.”

“एक खलिता दौलतीच्या युवराजांनाही द्या.

युवराजांच्या खलित्यात मजकूर घाला – “स्वारीच्या तब्येतीस वाखा आहे. लवकरच आरोग्य होईल! भल्याबुऱ्या अफवा उठताहेत त्यावर विसंबू नये! चिंता करो नये!” सोयराबाईंचे हे आगळे दिव्य रूप बाळाजी आवजी विस्फारल्या डोळ्यांनी बघतच राहिले! त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. “चिटणीस, आम्ही तुम्हाला सांगतो आहोत, खलिते तयार करून तुमच्या शिक्केदस्तुरीने ते आमच्याकडे आणून द्या.” सोयराबाईचा आवाज जरबी झाला.

बाळाजींनी मान खाली घातली. कसल्यातरी निर्धाराने ते म्हणाले, “आम्ही राज्याचे दरखदार. युवराज ज्येष्ठ खार्विद असता, असे खलिते या हाते आम्ही कसे लिहावे? क्षमा असावी. आमच्यानं हे होणार नाही.”

“काय म्हणालात? तुमच्या दस्तुराशिवाय खलिते मानले जात नाहीत म्हणून तुमचा मुलाहिजा. विसरलात आम्ही महाराणी आहोत.” “गैरसमज नसावा. घरी पुत्र आवजी आहेत, त्यांना शिक्क्यांनिशी पाठवून देतो. जी घेणे असेल ती सेवा त्यांच्याकडून सरकारांनी घ्यावी. आम्हाला यात गुंतवू नये एवढीच प्रार्थना.”

सोयराबाई चडफडल्या, पण त्यांना चिटणिशी शिक्के हवे होते. कुणाच्याही धोंड्याने का होईना आंबा पडायला पाहिजे होता.

“ह्या त्यांना पाठवून तातडीनं. या तुम्ही!” त्यांनी बाळाजींना आज्ञा केली. बाळाजी निघून गेले आणि त्यांचे पुत हजर झाले. महाराणींनी सांगितल्याबरहुकूम आवजीने खलिते तयार करून, थैलीबंद करून ते त्यांच्या हवाली सुपुर्द केले. आवजी काम संपवून निघून जाताच वर्दी देऊन सोयराबाईंनी खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा या आपल्या विश्वासू चाकरांना बोलावून घेतले. त्यांच्या हाती ते खलिते देऊन सावधपणाच्या सर्व तपशीलवार सूचना त्यांना दिल्या.

खंडोजी-गणोजी बनावट खलिते घेऊन सातमहालाबाहेर पडले. आता रायगड रातकिड्यांचा अविरत कार्यरत करकरीत मुरत चालला!

कोकणदरवाजा, चौ-दरवाजा, राजर्दिडी, चारी वाटांनी रसदीचे गोण लादलेले काबाडीचे बैल फेसाटत पन्हाळा चढत होते. कोठीवान त्या गोणींच्या थप्प्या गंगा-यमुना या अंधारकोठड्यांत रचण्यात गढले होते. तट धरून कुणबी गवताच्या गंजा उठवीत होते. लोहारमेटावरच्या भात्यांसमोर फुलल्या निखाऱ्यांवर लोखंडी कांबी लाल होत होत्या.

हुजूरपागेला तबीब जनावरांना झाडपाल्यांच्या रसांचे उपचार देत होते. बंदिस्त होत चाललेल्या पन्हाळ्याचा फटका टाकून संभाजीराजे रायाजी-अंतोजीसह माळवदावर आले. दूरवर दिसणाऱ्या जोतिबाच्या डोंगराचे शिखर त्यांनी निरखले. खाली दिसणाऱ्या नागमोडी गाडीवाटेला नजर दिली. कालच्या अक्षय्य तृतीयेची लग्नकार्ये उरकून सवारी बैलगाड्या परतत होत्या. जोतिबाच्या डोंगराच्या रोखानं हात जोडत संभाजीराजे पुटपुटले, “मल्हारीचं चांगभलं!” मावळतीला कललेल्या सूर्याने डोंगरी कड्यांच्या सावल्या पठारी मुलखावर उतरविल्या होत्या.

एकाएकी संभाजीराजे माळवदाच्या कठड्याकडे पुढे सरकले. डोळे आक्रसत चौ-दरवाजात शिरणाऱ्या वळणदार वाटेकडे एकटक निरखून बघू लागले. त्यांची उजवी भुवई कमानी बाक घेत वर चढली. दोन घोडेस्वार चौ-दरवाजाकडे सरकत होते. जिनांवरूनच संभाजी राजांनी ताडले की, घोडी पाचाडच्या हुजूरपागेची आहेत!

सर्रकन वळते होत कोठीचा जिना जवळ करण्यासाठी झेपावत ते म्हणाले “रायाजी-अंतोजी, आमच्या मागानं या.” दोन-दोन पायऱ्या मागे टाकीत ते कोठी उतरलेही. मोतदाराला हात इशाऱ्यानं त्यांनी जनावर पागेबाहेर घ्यायला सांगितले. तो जनावर घेऊन येताच लगबगीने त्याच्या हातचे कायदे आपल्या हाती घेत एका झेपेतच युवराजांनी मांड घेऊन घोड्याला टाच भरली. आघाडीच्या टापा उचलून घोडे खिंकाळले आणि बाणासारखे चौ-दरवाजाच्या रोखाने सुटले. गोंधळलेले रायाजी-अंतोजी त्यांच्या टापांवर पाठोपाठ दौडू लागले.

चौ-दरवाजा येताच कायदे फेकून संभाजीराजांनी जनावर सोडले. दरवान देत असलेल्या मुजऱ्याकडे त्यांचे ध्यान नव्हते. समोरच्या वाटेला डोळे भिडले होते. वळण तोडून घोडेस्वार चौ-दरवाजात आले. समोर प्रत्यक्ष संभाजीराजेच खडे असलेले बघताना त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. पोटात खड्डाच पडला त्यांच्या. कायदे धरले हात ताठरले. पायउतार होण्याचेही भान त्यांना राहिले नाही.

ते सोयराबाईंचे रायगडाहून निघालेले विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा हे होते! दोघेही लटलट कापू लागले.

“कुठून आलात?” चौ-दरवाजातून कोरडा फुटला.

कसेतरी पायउतार होत मुजरा भरताना खंडोजी म्हणाला, “जी. कोल्हापुरास.”

“मतलब?” घोड्यांची जिने नीट निरखीत संभाजीराजे गर्जले.

“जी. न्हाई. रायगडास्रं कोल्हापूरला. कोल्हापुरास्रं इथं.” प्रसंग ओळखून गणोजीने खंडोजीचे बोलणे दुरुस्त केले.

संभाजीराजांनी टोप घातला होता, तरी त्यांचे मुंडण झाले मस्तक ओळखू येत होते. ते दृष्टीस पडताच खंडोजी-गणोजी चरकले.

“रायगडाची कोण खबर आणली आहे?” संभाजीराजांच्या सवालाला जाब न देता खंडोजी-गणोजी एकमेकांकडे टकमक बघू लागले. थरथर कापू लागले.

“असे बघताय काय? बोला सिताब.”

भेदरल्या जासुदांची जबान खुलेना. काय करावे, ते त्यांना सुचेना. “रायाजी, या हरामजाद्यांची फटक्याखाली चामडी लोळवा. आत्ता खुलेल यांची जबान.” त्या शब्दांनीच खंडोजी-गणोजीच्या उभ्या अंगभर काटा धरला.

“नगं. नगं धनी, आमास्री अबय द्यावं.” म्हणत खंडोजीनं संभाजीराजांच्या पायांवर सरळ लोळण घातली. त्यांच्या मागोमाग गणोजीही आडवा झाला. “उठा, तुमच्या केसासही धक्का लागणार नाही. पण काय घडलं आहे, ते बरं तपशिलानं आम्हास सांगा.”

खंडोजीनं बाराबंदीआड छातीशी लपविलेली किल्लेदार, हवालदारांना द्यायची थैली थरथरत संभाजीराजांच्या पायाशी ठेवली! गणोजीने आपल्याजवळची युवराजांसाठी असलेली दुसरी थैली तिच्या शेजारी ठेवली. दोन्ही जासूद द ओंजळीत मुखडे खुपसून हमसू लागले. खंडोजीने ठेवलेली थैली उचलून खलित्याची बळी बाहेर घेऊन संभाजीराजे वाचू लागले. शब्दाशब्दांगणिक त्यांच्या नाकपुड्या फुलत चालल्या. छातीचा भाता वरखाली होऊ लागला. डोळ्यांतून संतापाच्या ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या.

“युवराजांस कैद करून बहुत सावधपणे असणे!” हा मजकूर वाचताच खलित्याची गपकन मूठ भरत ते रायाजी-अंतोजीही भेदरून जावेत असे गर्जले, “कुणाची माय व्याली आहे आम्हास कैद करण्यास? ही मजाल….”

दुसऱ्या खलित्यातील – “लवकरच आरोग्य होईल.” हा मजकूर वाचताना तर महाराजांच्या आठवणीने त्यांचे ओठ थरथरले. डोळे डबडबले. “तो पुण्यपुरुष जाऊन पंधरवडा लोटला, तरी ही निस्संग माणसे स्वार्थासाठी त्याला ‘आरोग्य होईल” म्हणताहेत! आबासाहेब, काय वाटणीला यायचं बाकी राहिलंय तुमच्या?’ संताप, उबग, कीव, शोक अशा भावनांच्या लाटाच लाटा संभाजीराजांच्या मनात उसळून धिंगाणा घालू लागल्या. आपण युवराज आहोत, चौ-दरवाजात उभे आहोत, हे न विसरून आवंढा गिळून संभाजीराजांनी आज्ञा फर्मावली, “अंतोजी, त्या किल्लेदार, हवालदार सोमाजीला घेऊन या इथं. रायाजी, आमच्या परशमरापंतांना जरा बोलावून घ्या. जयद्रथांना जरा सूर्य दावावा म्हणतो आम्ही.”

“कोल्हापुरी का गेला होता तुम्ही?” युवराजांनी प्रत्येक बाब तपासून घेण्यासाठी समोरच्या खंडोजी-गणोजीला विचारले.

“असलंच खलितं जनार्दनपंत आन्‌ पेडगावकरांस्नी पोहोच करून आलो आमी.” खंडोजीनं सत्य ते रुजू घातले. ते ऐकताना संभाजीराजांच्या समोर सुमंत जनार्दनपंत आणि पाराजीपंत पेडगावकरांच्या मुद्रा फिरून गेल्या. बालेकिल्ल्याच्या रोखाने धारकऱ्यांच्या घेरात घालून अंतोजी – विठ्ठलपंत महाडकर, बहिर्जी इंगळा, सोमाजी बंकी, त्याचा मुलगा बापूजी, सूर्याजी काळे यांना घेऊन आला. सज्जाकोठीच्या मार्गाने रायाजी – परशमरापंत आणि उमाजी पंडितांसह आला. सर्वांच्या चर्येवर आश्चर्य स्पष्ट दिसून येत होते.

“या किल्लेदार, हवालदार. तुमच्या इमानदारीचा मरातब करण्यासाठी खोळंबलोत आम्ही इथं.” संभाजीराजे खोचून बोलले. आपल्या हातच्या थैल्या चिटणिसांच्या हाती देत म्हणाले, “पंत, हे रायगडाहून महाराणींच्या मार्फतीनं चिटणिसी शिक्क्याचे आलेले खलिते, या आमच्या दिमतीच्या चाकरांना जरा वाचून दाखवा!”

हवालदार, किल्लेदारांना आलेला खलिता खाकरून परशमरापंतांनी मोठ्याने मायन्यासह वाचला. अगोदरच गर्दनी खाली पडलेली, कटाची हस्तक माणसे तो ऐकताना सुन्न झाली. विठ्ठलपंतांच्यासमोर येऊन दोन्ही मनगटे वर उठवून धरत संभाजीराजे कडवट, तिरके म्हणाले, “करता कैद आम्हास? चढवता काढण्या आमच्या हाती?”

अपार शरमेने मान डुलविणाऱ्या विठ्ठलपंतांच्या डोळ्यांतून आसवे टपकली.

विजेचा कडकडाट सरकत जावा, तसे मनस्वी संतापाने संभाजीराजे धारकऱ्यांना आज्ञा देताना गर्जले, “या नमकहराम दगलबाजांना घेऊन जा आमच्या समोरून! काढण्या चढवून कोठीत फेकून द्या या सर्वांना!” धारकरी घेऊन चाललेली, ताबुतासारखी दिसणारी ती पाठमोरी माणसे बघताना रागाचा झेंडू फुटावा, तसे संभाजीराजे थरथरू लागले. कुणाची जोड न घेताच एकटे सज्जाकोठीकडे चालले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment