महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,564

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४१

Views: 1374
7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४१ –

थोड्या अवकाशातच दीड हजार घोडेस्वारांची तुकडी दौडत पन्हाळ्याच्या चौ-दरवाजातून बाहेर पडली. ती कोल्हापूरला चालली होती. सुमंत आणि पेडगावकरांचाही साजेल असा मरातब करण्यासाठी! तिकडे रायगडावर रामराजांचा मंचकारोहण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच सविध पार पडला होता. त्यांना ‘छत्रपती’ म्हणून घोषित केलेली अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी आणि महाराणी ही मंडळी पन्हाळगडावरून “संभाजीराजे कैद झाल्याची” खबर केव्हा येते, याची आतुरतेने वाट बघत होती!!

पन्हाळ्यावर जे घडले त्याचा वृत्तान्त कळताच रायगड हादरला. फासे परतत होते. आता क्षणही वाया दवडायला तयार नसलेले अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी यांच्यासह महाराणींच्या भेटीस आले. कटावाचा सर्वांत विरूप टप्पा पुढे आला.

“पन्हाळा हातचा सुटला. युवराजांना कब्ज झाला. तिथलं माणसूबळ दिवसागणिक वाढत आहे. ती थळी फुटल्या खेरीज आपण निभावणार नाही. आता आम्हीच पन्हाळ्याच्या रोखाने कूच झाल्याशिवाय तड लागणार नाही!” अद्याप चिवट अण्णाजींच्या विश्वास ढळला नव्हता.

“तेच म्हणतो आम्ही. तुम्ही, मोरोपंत, प्रल्हाद निराजी पाचाडचा जमाव उचलून लगोलग पन्हाळ्यास घेर टाका. एवढाही विलंब आणि कसूर झाला तर समस्तास घातक आहे.” सोयराबाईंच्या विश्वासाची जात तर राजेशाही होती.

“आम्ही कऱ्हाडतर्फेने निघावं म्हणतो. हर हिकमतीनं सरलष्करांना गाठीशी बांधल्याशिवाय पन्हाळा दस्त होणार नाही.” कसे झाले तरी अण्णाजींनी राजकारणाच्या डोहात चार हात मारलेले होते.

“सरकारस्वारींनी सरलष्करांसाठी खलिता द्यावा आमच्या सोबत. तो कारणी पडेल.” मोरोपंतांनी सुचविले.

“तुम्ही आणि अण्णाजी त्यांची मोठी उमेद धरता. आम्ही खलिता देतो, पण तो कारणी लागेल असं नाही वाटत आम्हास! सरलष्कर या वेळी गप्प बसले तरी आपल्या भाच्यावर मोठी मेहर केली त्यांनी असंच आम्ही मानू! आमचा विश्वास आहे, तो तुमच्या उभयतांच्या हिमती हिकमतीवर.” सोयराबाईंना हंबीररावांचा वाण चांगला माहीत होता. कशी असली तरी त्या आणि हंबीरराव एकाच मुशीची चिवट माती होती!

“येतो आम्ही.” अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी महाराणींना मुजरा देत लवले.

“या. तुम्हास येश देणार आई जगदंब थोर आहे!” हात उठवून, जिजाऊंच्याथाटात सोयराबाईंनी आशीर्वाद दिला!

हंबीररावांना द्यायचा खलिता घेऊन कटवाले रायगड उतरून पाचाडात आले. दहा हजारांचे हत्यारबंद, तगडे घोडदळ साथीला घेत पाचाडाबाहेर पडले.

निघाले! छत्रपतींच्या कैलासवासाला एक महिना होण्यापूर्वीच त्यांनी उठविलेल्या राज्याचे अपार स्वामीभक्त सुरनीस, पेशवे, न्यायाधीश एकमेळाने फौजबंदीने निघाले. आपल्याच साक्षीने युवराजपणाचा अभिषेक केलेल्या संभाजीराजांना जेरबंदीने दस्त करून आणण्यासाठी! मराठी दौलतीच्या डाव्या हाताने हत्यार उचलले, आपलाच उजवा हात कलम करण्यासाठी! पन्हाळ्याकडे निघालेल्या घोडदळाच्या टापांखालून उसळणारी धूळ उतरली – पाचाडातील थोरल्या आऊंच्या छत्रीवर आणि महाराजांच्या लाडक्या रायगडावर! मजला मारीत अण्णाजी- मोरोपंतांची फौज कऱ्हाडवर आली.

गावठाणाचा माळ धरून फौजेचा तळ पडला. अण्णाजी, मोरोपंतांसाठी डेरे उठले. वैशाखी उन्ह प्रांत कऱ्हाडवर रणरणू लागले. या तळाच्या शेजारीच दहा कोसांच्या पल्ल्यावर सरलष्कर हंबीररावांचे गाव होते- तळबीड. तिथे मराठी सेनेच्या हरावलीच्या पंधरा हजार बांड्या मावळ्यांनिशी हंबीरराव ठाण देऊन होते. रायगडाहून अण्णाजी-मोरोपंत पन्हाळ्याच्या रोखाने निघालेत याची कुणकुण लागलेल्या हंबीरराबांनी, सातारातर्फेच्या आनंदराव निंबाळकर, रूपाजी भोसले, महादजी मापोलकर यांना त्यांच्या जमावासह तळबीडास बोलावून घेऊन बळकटी केली होती. याचा काहीच माग नसलेल्या अण्णाजींनी एक विश्वासू हारकारा उचलून त्याच्यामार्फत महाराणींचा खलिता हंबीररावांसाठी तळबीडाकडे धाडला. आणि हंबीरराव भेटीला येतील, या वेडया आशेवर ते हारकाऱ्याची वाट बघू लागले.

खलिता हाती पडताच हंबीररावांनी आपल्या राहत्या वाड्याच्या खलबतीखणात आपल्या सल्लागारांची बैठक बसविली. अंथरल्या घोंगड्यावर आनंदराव, रूपाजी, महादजी गुजर, हंबीररावांचे बंधू शंकराजी आणि हरीफराव फेराने हंबीररावांभोवती बसले. हंबीररावांच्या चिटणिसाने खलित्याचा मजकूर बैठकीला वाचून दाखविला – “पेशवे, सुरनीस देतील त्या मसलतीस जोड घालोन असणे. फौजेसुद्धा त्यांच्या पाठीशी राहोन आम्हास, बाळराजांस रक्षून चालविणे. तुम्ही घरचेच आहात. पुढे तुमचे बरे उर्जित होईल. जाणिजे.”

मजकूर ऐकून कुणीच काही बोलेना तसे हंबीरराव म्हणाले, “चला – आता तरी याद जाली म्हणायची रानीसायबास्री आमची! बाळराजं मंचकावर चडलं त्यात अडगळ नगं म्हून गडावरनं काडलं त्येनी आमास्त्री. तवा म्हणाल्या, ‘तुमच्या मसलतीनं सारं निवांत करू! ‘ आता हुकूम हाय पंत-सुरनिसांच्या मसलतीला जावा! काय करायचं, बोला बगू?” हंबीररावांनी माणसं चाचपली.

“कराडात काय मसलत निगती बगाय काय हरकत हाय?” आनंदरावांनी सुचविले. ते ऐकून मिश्यांच्या कंगोलांखाली पालथी मूठ देत हंबीरराव आणखी कुणी काही बोलतेय काय याचा सासूद घेत राहिले.

“आता कसं बी जालं तरी रामराजं गादीवर चढल्यात. रानीसायबांचा हुकूम त्यो त्येंचाच मानाय पायजे की. नाही म्हटले तरी शंकराजी मोहित्यांनी आपल्या बहिणीची तळी आडमार्गाने उचललीच. बाकी थोरल्यासत्री पार बगलंला टाकलं सम्द्यांनी हे काय बरं क्येलं न्हाई.” महादजी मापोलकर बोलला.

ही भाबडी, मैदानावरची माणसं; अशीच बुजल्या खोंडागत कुठे नको तिकडे जाणार हे हंबीररावांनी ताडले. खाकरून भरड्या बोलीत ते म्हणाले, “आरं बाबांनू, ही फौज काय जोतिबाच्या यातरंला चाल्ली न्हाई! ती घिऊन अन्नाजी-मोरुपंत पनत्नाळ्याकडं निगाल्यात – युवराजास्री काडण्या चढवून जेरबंद कराय! हाईसा कुटं?”

ते ऐकताना कित्येकांचे टाळे वासले, गर्दना ताठ झाल्या. असे विपरीत ऐकायची सवय नव्हती कुणाला. बैठक पार येलबडून गेली. कुणीतरी म्हणाले, “छ्या, ह्ये म्हंजी लईच जालं.” हंबीरराव त्याला तोडत म्हणाले, “जालं न्हाई. पर हुयाचं काय! आपून व्हायचं का यात सामील? ध्याई पडली तरी धन्याचं भलं चिंतनारी जात आपली. हुर्‍याचं का खाल्ल्या मिठाला बेमान? कसं बी असलं, तरी युवराज थोरलं हाईत. धर्मानं गादीचं बारस हाईत! रामराजं आमच्या रगताचं असलं – तरी धाकलं हाईत. त्येंचा न्हाई लागत हक्क गादीला. कसं जावं मसलतीला आमी?”

“नगच त्ये.” दोन-चार आवाज एकदम उठले.

“निस्तं नगं म्हून ह्ये मिटत न्हाई. आमी सोता तर न्हाईच पर कुनाला बी काडन्या चढवू देनार न्हाई आमच्या युवराजांच्या हातात. ह्यो इस्कोट आवराय पायजे आपुन कुठंतरी.”

“कसा आवारनार त्यो?” रूपाजीला काही सुचेनासे झाले.

“अन्नाजी-मोरुपंतांस्री बलवू या हाकडं. च्यार गोष्टी सांगू या समजुतीच्या.” जाणते हंबीरराव तोड काढीत म्हणाले. सर्वांनी त्या मसलतीला संमती दिली.

हंबीररावांच्या चिटणिसांनी अण्णाजींच्या हारकर्यामार्फतच परतीचा निरोप दिला – “आपण उभयता भेटीस येणे. बैठकीत हिताची ती मसलत तपशिलाने करू.”

तो निरोप ऐकून मोरोपंत, अण्णाजींना म्हणाले, “आम्ही हेच म्हणत होतो पूर्वीपासून. जाऊ या आपण सरलष्करांच्या भेटीस.”

अण्णाजी ते खोडून काढीत म्हणाले, “चुकताहात पंत. आपणाला जोड द्यायची तर सरलष्कर जमावानिशी येते आपल्या तळावर. तळबीडात जाण्याचा धोका या क्षणी पत्करणं शहाणपणाचं ठरणार नाही. आम्हाला विश्वास होता, ते महाराणींचं नातं मानतील याचा. राजाज्ञेला मान देतील याचा. आता त्यांच्यावर विसंबून चालणार नाही. आपली पावलं आपणच उचलली पाहिजेत.”

मोरोपंत गंभीर झाले. आपण कसल्या दुष्ट चक्रात रीतसर गुरफटत चाललो आहोत, याची कल्पना येताच त्यांचे मन खिन्न झाले.

“या वेळी आपण युवराजांशी तहाची बोलणी करावी, असं वाटतं आम्हाला.” पहिल्यापासूनच अनिच्छेने अण्णाजींशी हातमिळवणी केलेले प्रल्हादपंत म्हणाले. “तह? आणि तो या क्षणी? युवराज तो मानतील असं वाटतं काय तुम्हास?” अण्णाजींनी त्यांनाही खोडून काढले.

ते ऐकून “आम्ही येतो जरा,” म्हणत प्रल्हादपंत अण्णाजींच्या डेऱ्यातून बाहेर पडले आणि आपल्या डेऱ्यात आले. खरोखरच त्यांनी तहाचे पत्र सिद्ध केले आणि आपल्या दिमतीच्या माणसांमार्फत पन्हाळ्याला पाठवूनही दिले.

क्रमशः.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment