धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४३ –
फिसकारल्या कंगोली मिश्यांचे भयावह हंबीरराव बघून अण्णाजींनी मान टाकली. मुळासकट नाळच उपटून काढल्यागत वाटलेल्या संभाजीराजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडा ओलावून आल्या होत्या. उभे राहणे असह्य झाल्याने ते तरातर सदर सोडून अंत:पुराकडे गेलेही.
“घिऊन जा यास्त्री – आन् टाका कोठीत.” अजूनही थरथरणारे हंबीरराव गर्जले आणि त्यांनीही सदर सोडली. धारकरी कैद्यांना कोठीकडे घेऊन गेले. पन्हाळ्यावरचे वैशाखी उन्ह तावतच चालले!
पन्हाळ्याच्या दफ्तरखान्यातून मावळ्यांचे तांडे खुशीने आपापल्या गोटांकडे परतू लागले. प्रत्येकाला दोन-दोन महिन्यांचा पगार आगाऊ आदा करण्याची आज्ञा संभाजी राजांनी दिली होती. चिटणिसी बैठकीवर बसलेल्या परशरामपंतांना युवराजांनी शंंगारपुरी पिलाजीमामांना द्यायच्या पत्राचा मजकूर सांगितला – “मिळेल तो मावळा जमा करून रायगडतर्फेच्या खबरदारीस निघणे. वाटेत पूर्वील चौक्या उठवून सर्व किल्ल्यांवर आपल्या चौक्या बसविणे.” हंबीरराव, रावजी, म्हलोजीबाबा सारे सावधपणे ते ऐकत होते.
आता पन्हाळा संभाजीराजांचे भक्कम बंदिस्त ठाणे झाले होते. आसपासचे सुभेदार, हवालदार पन्हाळा चढून “राजा’ म्हणून संभाजीराजांना रोज पेश होऊन मुजरा देत होते. “स्वामी, टोपीकर आपल्या बक्षिसांची निकड लावून आहेत. काय करावं?” राजापूरहून आलेल्या रावजी पंडितांनी वखारवाल्या इंग्रजांची कुरकुर संभाजीराजांच्या कानी घातली. पूर्वी महाराजांनी राजापूरच्या वखारी लुटल्या होत्या त्याची नुकसानी “बक्षिसाच्या रूपा’त सुरतेला ठाण झालेल्या इंग्रजांना दिली जात होती.
“रावजी, त्यांना कळवा, तूर्त आम्हास फुरसत नाही. सवडीनं पूर्वील हिसाब पाहून निकाल देऊ.”
व्ह जी.
“तुम्ही फार मोलाची कामगिरी केली आहे रावजी. राजापूरपासून कारवारपावेतोची दिवाणी रसद तुम्ही तातडीनं पन्हाळ्याला पाठविली. तिचा मोठा आधार आहे आम्हाला.”
“गोव्याच्या विजरईचा कै. स्वामींच्याबाबत सांत्ववपर खलिता आला आहे.” परशरामपंतांनी खलिता वाचून दाखविला. “पंत, त्यांना परतीच्या जाबात लिहा – दुर्दैव करून आमच्या आबासाहेबांचा कैलासवास झाला आहे. आम्ही कुल-एखत्यार आहोत, तुमचे पूर्वीप्रमाणे चालवू. तो खलिता रामजी नाईक ठाकूर याच्या मार्फतीनं फिरंगी दरबाराला पाठवून द्या.”
“जी” चिटणीस गोव्याच्या विजरई अंतोनिओ पायस-द-सांदे याला खलिता रेखू लागले.
“मामासाहेब, रायगडची खबर आली आहे.” संभाजीराजे शेजारी बसलेल्या हंबीररावांना म्हणाले.
“कसली बरं?”
“गडावर येसाजी कंकानी नायकवडीच्या मदतीनं काही असामी परस्पर दस्त केल्या आहेत. त्यात कान्होजी भांडवलकर, शहाजी भोसला आणि मोरोपंतांचे चिरंजीव निळोपंत आहेत.”
“ब्येस क््येलं कंकांनी.” हंबीरराव समाधानाने म्हणाले.
“आता रायगडी कूच होण्यापूर्वी एक मनसुबा पुरा करावा म्हणतो आम्ही.” संभाजीराजांनी हसत हंबीररावांना गोंधळात टाकले. “हुकूम व्हावा. जी असलं ती जोखीम पत्करू आम्ही.” हंबीरराव विचारगत झाले.
“बघा तर खरं.” म्हणत संभाजीराजांनी कारभाऱ्यांचा नजर-इशारा दिला. हाती सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार एकामागून एक असे येऊन बैठकीलगत तबके ठेवून निघून गेले. त्यातील पुढे ठेवलेल्या सर्वांत मोठ्या तबकावरचा सरपोस संभाजीराजांनी हटविला. त्या तबकाला हातस्पर्श देत ते कारभाऱ्यांना म्हणाले, “द्या त्यांना.” त्या तबकात जरीपगडी, शेला, तलवार असा साज होता. “क्काय करतासा हो?” म्हणत हंबीरराव लगबगीने उठले. “घ्या. मामासाहेब, शक्य असतं तर चौ-दरवबाजा पासून पायथ्यापर्यंत लाल फरासी अंथरल्या असत्या आम्ही तुमच्या वाटेवर!” संभाजीराजांनी त्यांना बोलूच दिले नाही. कारभाऱ्यांनी समोर धरलेल्या तबकाला हंबीरराव हात लावत म्हणाले, “ह्यो मनसुबा हुता व्हय?”
संभाजीराजांनी हातस्पर्श दिलेले दुसरे तबक कारभाऱ्यांनी म्हलोजी घोरपड्यांसमोर धरले. “म्हलोजीबाबा, आजपासून पन्हाळ्याची सरनौबती तुमच्या अखत्यारीत देत आहोत आम्ही. विश्वास आहे तुम्ही ती संताजी, बहिर्जीच्या मदतीनं संभाळाल.”
“जी.” म्हलोजी आणि त्यांचे पुत्र संताजी-बहिर्जी मुजरा देत लवले. हत्यारे, पेहराव, कडी, तोडे देऊन संभाजी राजांनी रावजी पंडित, आनंदराव, रूपाजी, जोत्याजी-अंतोजी सर्वांचा इतमामी मरातब केला. पन्हाळ्यावर नवे किल्लेदार, हवालदार नामजाद केले. ते बघताना सर्वांना वाटले की, आपण रायगडावरच आहोत!
“चला. फौजेची दरफ्ती नजरेखाली घालू” सर्वांना बरोबर घेत संभाजीराजांनी सदर सोडली. सगळा पन्हाळगड आता मावळ्यांनी फुलून उठला होता. एका-एका गोटाची दरफ्ती बारकाव्यानं नजरेखाली घालीत खाशा मेळाने संभाजीराजे चालले. त्यांना हात खाली घ्यायला वाव मिळू नये, असे अदबमुजरे झडू लागले. मावळतीच्या तटाने चालत ते सर्वांसह कोकणदरवाजावर आले. दुरवर दिसणारे मसाईचे पठार काळवबटून आले होते. झाडे कुदणीला पडली होती. उठविलेले धुळीचे खांब गरगरताना दिसू लागले. हांऊ हां म्हणता काळ्या ढगांची छपरी कोकण दरवबाजावर चालून आली. पावसाचे टपटपीत शिंतोडे उतरू लागले. डोळे आक्रसून आभाळ निरखत हंबीरराव म्हणाले, “वळीव धरलाय. निगावं.”
“मामासाहेब, मृगापूर्वी पन्हाळा सोडला पाहिजे. आता फौजबंदी मनाजोगी झाली आहे.”
“त्येच म्हन्तो आमी. एकदा आबाळ धरलं की जागचं हलू देणार न्हाई.” संभाजीराजांमागून पायऱ्या उतरणाऱ्या हंबीररावांनी सल्ला दिला. आभाळाची कैद तोडून बळिवाची झड तडतडत कोकणदरवाजावर कोसळू लागली.
“म्हलोजीबाबा, गड राखून बून सावधानगीनं असा. आम्ही निरोप देताच कोठीचे कैदी हत्यारी पहाऱ्यात बंदोबस्तीनं रायगडी पाठवा. येतो आम्ही.” संभाजीराजांनी म्हलोजींना खांदाभेट दिली.
पन्हाळ्याच्या चौ-दरवाजावर नगारे चौघड्यांची झड उठली, शिंगाच्या ललकाऱ्या फुटल्या. हात छताशी नेत राजांनी पन्हाळ्याला मान दिला आणि एका झेपेतच रिकीब भरून ‘चंद्रावत ‘ नावाच्या जनावरावर मांड जमविली. चंद्रावत नावासारखाच होता. – चंद्ररंगी – सफेद. बीस हजार जानकुर्बान, बांडा मावळा पाठीशी घेत राजे हंबीररावांसह चौ-दरवाजाबाहेर पडले. कदमबाज चालीवर गड उतरू लागले. रायगडाचा रोख मनी ठेवून आज पुऱ्या साडे-तीन सालांनंतर ते रायगडाकडे निघाले होते! काय-काय घडले होते आणि नव्हते या साडे-तीन वर्षांत!
गेल्या आबासाहेबांचे काळीजवेधी बोल राजांच्या मनी तरारून उठले – “जंजिऱ्यावर हबशी मांड ठेवून, खंदेरीवर टोपीकर जलदुर्ग उठवू देत नाही, आज ना उद्या औरंगजेबाची हवस दख्खनेत उतरणार याची जरा चिंता ठेवा. त्यासाठी मावळा व्हा!”
“हे असं लांबच्या पल्ल्याचं बोलणं आम्ही दोनच मुखांतून ऐकलं. एक आबासाहेबांच्या आणि दुसर थोरल्या आऊंच्या.
“कुठं आहेत ते? गेले? नाही…!’
कानशिलाशी भिडणाऱ्या गडवाऱ्यातूनच त्यांना शब्द ऐकू येत आहेतसे वाटले. “तुम्हास येश देणार आई थोर आहे!”
“जी. आम्ही मावळाच झालो आहोत आता.’ एका अनामिक बळाने संभाजीराजांचा ऊर ठासून भरला. हातपंजा उठवून त्यांनी भर दमाची टाच दिली. चंद्रावत खिंकाळत चौटापांवर उधळला. वारणा नदी पार करून, बत्तीसशिराळामार्गे संभाजीराजांची फौज कऱ्हाड प्रांतावर आली. पहिला तळ पडला. डेरे, शामियाने उठले. मुदपाका साठी खानसाम्यांनी दगडी चुलवाणे उठवून आगट्या शिलगावल्या. त्यावर चढलेली भगुणी रटरटू लागली.
तळाचा देख टाकून परतणाऱ्या संभाजीराजांना हंबीरराव कुणबाऊ मायेने म्हणाले, “युवराज, एक अर्जी हाय. म्हटलीसा तर घालू पायाशी.”
“मामासाहेब, असं दफ्तरी का बोलता? सांगा की कोण अर्जी आहे.”
“आमी चाकर मान्सं. पायरी सोडून भागत न्हाई. इथनं एका मजलंवर आमचं गावठान हाय. मर्जी व्हईल तर कुलदेवीचं – वागेश्वरीचं दर्शन करावं. गरिबाघरी हात वलं करावंत.” हंबीररावांचा गावरान प्रेमा बघून संभाजीराजे गहिवरून आले. त्यांच्यासमोर येत म्हणाले, “माफ करा मामासाहेब, आम्हीच आमच्या सरलष्करांच्या कुलदेवतेचं दर्शन करण्याची इच्छा करायला पाहिजे होती. तसं मनीही आलं होतं – पण… तळबीड हे महाराणी मातोश्रींचं माहेर असल्यानं संकोच केला, पण… आम्ही जरूर येऊ आपल्या घरी हात ओले करण्यास.”
हंबीररावांची चर्या उजळली. ते तयारीसाठी पुढे निघून गेले.
संध्याकाळ धरून पन्नास एक घोडा तळबीडच्या वाटेला लागला. संभाजीराजांनी हंबीररावांच्या वडिलांच्या – धारोजींच्या छत्रीसमोर माथा टेकून मगच मोहित्यांच्या वाड्यात प्रवेश केला. देवघरातील कुलदेवी – वाघेश्वरीचे दर्शन घेतले. देवीला चोळीखणाचा साज दिला. रात्री हंबीररावांच्या माजघरी खणात संभाजीराजांना घेर
धरलेल्या हंबीरराव, आनंदराव, रूपाजी, शंकराजी यांची पंगत बसली.
पहाट धरून सारे तळबीडाहून निघून तळावर आले. दहा-बारा निवडीचे मावळे उचलून संभाजीराजे स्रानासाठी कृष्णा-कोयनेच्या संगमावर गेले. संगमावरून तळावरच्या आपल्या डेऱ्यासमोर येताच पायउतार होत त्यांनी कायदे मोतहाराच्या हाती फेकले. डेऱ्यात जाऊ बघणाऱ्या संभाजीराजांना नमस्कार करीत एक कफनीधारी गोसावी सामोरा येत म्हणाला, “युवराजांच्या भेटीसाठी आम्ही गोसावी मल्हारबाबांच्या मठातून कोरटीहून आलोत.”
“बोला. मल्हारबुवांबाबत ऐकून आहोत आम्ही. कसे आहेत ते?”
“सुखरूप आहेत. बाबांचा युवराजांना खासा सांगावा आहे.”
“कसला?”
“बाबांच्या मठाचा मारूल तर्फेचा नाडोली गाव अग्रहार असता दिवाणात अनामत झाला आहे. त्यामुळे मठाची आबदा होत आहे. तेव्हा….”
“का अनामत झाला आहे अग्रहारी गाव?” संभाजीराजांनी तपशील जाणण्यासाठी सवाल केला.
“कै. स्वामींचे, “ही रीत कारभारात नाही यास्तव गाव अनामत केला आहे.’ असे आज्ञापत्र आले होते बाबांना.”
“काय म्हणता तुम्ही? आबासाहेब तर धर्मस्थळांचे सारे बरे चालवून होते. गोसावी, यात काही घालमेल आहे. तुम्ही थांबा थोडे, आम्ही जातीनंच येऊ बुवांच्या दर्शनास! मठाची व्यवस्था लावून देऊ. निर्धास्त असा.” संभाजीराजांनी हात उठवून मठशिष्याला निरोप दिला.
दुपारचे थाळे होताच तळ उठला. फौज पुढच्या मुक्कामाला कूच होऊ लागली. हत्यारी शिबंदी घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे कोरटीच्या वाटेला लागले. पुढच्या मुक्कामावर फौजेला मिळणार असे सांगून वनराईने वेढलेले मौजे कोरटी हे गावठाण आले. ओढ्याचा काठ धरून बसलेला मल्हारबुवांचा मठ नजरेस पडताच हात छातीशी नेत संभाजीराजांनी मांड मोडली. पायी वाट चालू लागले.
चिवाट्यांच्या बंदिस्त कुडाण्याने घेर टाकलेल्या मठाच्या कवाडात दाढी- जटाधारी शांत प्रसन्न मुद्रेचे मल्हारबुवा शिष्यगणांसह उभे होते. त्यांच्या नितळ पायांवर, आपला माथा ठेवीत संभाजीराजे म्हणाले, “बुवांचा प्रसाद असावा.”
“उठा युवराज…” छत्रपतींच्या आठवणीने तो बैरागीही भरून आला होता. त्याने आपला थरथरता हात युवराजांच्या टोपावर ठेवला. बाबांच्या पाठीशी होत, संभाजीराजे मठात गेले. बैरागीबुवांच्या चरणांशी बसले.
“युवराज, छत्रपती गेले. आम्ही बैरागी. जन्मणाऱ्याला एक ना एक दिवस जाणं पडतं, हे सत्य असूनही छत्रपतींच्या जाण्यानं कष्टी होतो. तुम्ही तर त्यांचे पत्रच आहात. तुमचं दु:ख आम्ही जाणू शकतो. पण विचार धरा – जित्या जिवांना कर्तव्याची जाण देण्यासाठीच सृष्टीनं मृत्यूची योजना अनादी कालापासून मांडली आहे. छत्रपतींच्या सारखे जीव तर ही जाण पिढ्यान्पिढ्यांना देण्यासाठीच जन्म घेत असतात. त्यांचा वसा सांभाळा. मुलूख राखा. माणसं जपा. छत्रपतींच्याहून मोठं कार्य उठविण्यासाठी मनबांधणी करा.” जसा मठाशेजारून वाहणारा ओढाच गोसावीबाबांच्या वाणीतून खळखळत होता.
खूप दिवसांनंतर कानी पडणारे ते बैरागी बोल ऐकून संभाजीराजे मन:शांतीने भरून आले. म्हणाले, “बुवा, आम्ही आमची असेल ती कुवत पणास लावू मुलूख राखण्यासाठी, माणसं जपण्यासाठी. पण – पण आबासाहेबांनी केलं आहे, तितकं आमच्या हातून हो न होणार नाही. आम्ही त्यांचे पुत्र आहोत. आमचा वकूब आम्हास माहीत आहे. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत.”
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४३.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.