महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,638

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४५

By Discover Maharashtra Views: 1345 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४५ –

“गडाचा बंदोबस्त झाला आहे. टाकीनं निघून यावं.” येसाजी कंक आणि पिलाजीमामा यांचा निरोप मिळताच पाचाड सोडून संभाजीराजे हंबीररावांसह रायगड चढू लागले. त्याच्या मागून पाच हजार मावळा गडचढीला लागला. चित दरवाजासमोर येताच संभाजीराजे थबकले. ‘जेव्हा इथून निघालो तेव्हा बरोबर महाराजसाहेब होते आणि आज… ‘ थरथरल्या हाताने त्यांनी दरवाजाच्या उंबरट्याला स्पर्श करून आत पाय ठेवला.

हंबीररावांनी इशारत केलेले भोई पावसाच्या सरी तरू लागताच रिकामी पालखी घेऊन युवराजांना गाठीत होते. हातपंजा डोलवून ती नाकारत संभाजीराजे दरडीच्या झाडाखाली आसरा घेत होते. सरी सुमार होताच पुन्हा गडचढीला लागत होते. पाठचा मावळा घोंगड्यांच्या खोळी पांघरून पावसाला दाद न देता गड चढत होता. लहाना दरवाजा मागे पडला. रायगडाचे आघाडी मनोरे दिसू लागले.

काठभरल्या गंगासागरावर नजर टाकून संभाजीराजे मनोऱ्यात आले. तिथे गडाच्या अठरा कारखान्यांतील माणसेच माणसे दाटीने उभी होती. त्यातून पांढऱ्या गलमिश्यांचे येसाजी कंक पुढे आले. ते मुजऱ्यासाठी झुकणार एवढ्यात झेपेने पुढे होत संभाजीराजे त्यांचे पाय शिवता-शिवता म्हणाले, “येसाजीकाका, तुम्ही आशीर्वाद द्यायचा आम्हाला!” त्यांना वर घेत कंकांनी छातीशी लावले. गहिवरला म्हातारा म्हणाला, “किती योळ लावलीसा ह्यो! पार रया ग्येली गडाची. बरं तर बरं आलासा! ज्येवडं कोलांट्या मारनारं हुतं त्येश्री अडकवून टाकलंया. ह्यो गड अदुगर ताब्यात घ्या अन्‌ नेटाक जुपीला लावा बगू.”

“लावा बघू नाही येसाजीकाका, लावू या म्हणा. आम्ही एकटे काय करणार?” आबाजी सोनदेव, येसाजी कंक, हंबीरराव, पिलाजीमामा, आनंदराव, रूपाजी, मदारी, चांगोजी काटकर, जोत्याजी केसरकर अशा हिमतीच्या माणसांनी मेळ धरलेले संभाजीराजे गडदेव जगदीश्वराच्या दर्शनाला चालले.

“युवराज गडावर आले!” ही खबर मिळालेली माणसे झुंडीने येऊन दुतर्फा उभी राहिली होती. वरून पावसाच्या सरी आणि भोबतीने माणसांचे झडते मुजरे आपलेसे करीत संभाजीराजे जगदीश्वराच्या मंदिरद्वारात आले. शिवर्पिडीचे दर्शन करून होळीमाळाने ते महादरवाजात येताच पुऱ्या तीन महिन्यांनंतर आज रायगडाचा नगारखाना पहिल्याने दुडदुडला!

समोर सिंहासन होते – श्रींचे, रिकामे होते, धन्याशिवाय पोरके दिसत होते. एक-एक पाऊल टाकत, कुणाच्यातरी मागून चालल्यासारखे संभाजीराजे सिंहासन चौकात आले. याच दरबारी ते हात बांधून ‘आरोपित’ म्हणून पेश आले होते. त्याच जागी ते क्षणभर ख्रिळल्यासारखे झाले. ‘आबासाहेब, आज – आजही आम्ही बांधल्या हातांनी इथे उभे राहू! आरोपित म्हणून. तेव्हा घेतली नाही ती सजा आज घेऊ, ताठ गर्दनीनं. “पण – पण – तुमची सफाई खडी होत नाही!” असं या सिंहासनावरून एकवार तरी ऐकवाल आम्हास?” सैरभैर झालेल्या संभाजीराजांची नजर चौकभर भिरभिरली. झिरझिरीत आडपडदे, कनाती फक्त वाऱ्यावर सळसळत होत्या.

तसेच चालत ते सिंहासनाला मिळणाऱ्या सोनपायऱ्या चढू लागले. हंबीरराव, आनंदराव, येसाजी, मदारी सारी माणसे दम रोखून त्यांच्याकडे बबतच राहिली. आजवर दरबारी मार्गाने त्या पायऱ्या अशा कधीच कुणीही चढले नव्हते.

जिथे युवराज म्हणून संभाजीराजे बैठक घेत होते ती पायरी येताच ते थांबले. आपलेच बसते रूप त्यांना दिसून गेले. पुढे होत ते थेट सिंहासनासमोरच उभे राहिले. दरबारी चौकातील माणसे अस्वस्थ झाली. एकमेकांकडे भांबावून टकमक बघू लागली. त्यांना वाटले युवराज असेच गैररिवाजी सिंहासनावर बसणार की काय! त्यांनी श्वास रोखले. सोनेरी असल्यामुळेच समोरचे भुंडे सिंहासन पार उदास दिसत होते, त्याच्या बगलेचे जबडे खोललेले सिंह निष्प्राण भासत होते. वरचे छत्र डळमळते वाटत होते.

या क्षणी संभाजीराजांना खोलवर जाणवले, “खरोखरच आता या जगात आबासाहेब नाहीत!

संभाजीराजांनी कमरेच्या हत्याराचा रेशमबंद उकलला. म्यान कपाळावर लावून आपली तलवार त्या चरणासनावर ठेवली. गुडघे टेकून महाराजांच्या पायांवर ठेवावा, तसाच आपला माथा त्या चरणासनावर ठेवला! जीव भरून आला त्यांचा. मिटल्या डोळ्यांनी मूकपणे ते म्हणत होते. “महाराजसाहेब, आता तुमच्या हाताचं नाही, पण पायधुळीचं बळ आम्हाला द्या. आम्ही एकटे आहोत!”

माणसांनी भरला दरबारी चौक ते हृदय हेलावणारे दृश्य बघत होता. त्यातील कैकांनी आपल्या मनानीच समोरच्या सिंहासनावर संभाजीराजांना बसवूनही टाकले. हेच संभाजी राजे कधी काळी दिलेरच्या गोटात गेले होते, हे कटू सत्य त्या माणसांनी मनाच्या तळात पार गाडून टाकले आणि युवराजांना पदरी घेणाऱ्या शिवछत्रपतींचेच आपण रयत – चाकर आहोत, हे सिद्ध करण्याचे ठरवून टाकले. त्यांना त्या उंचावरच्या भव्य सिंहासनावर बसणारा समर्थ राजा हवा होता. संभाजीराजांसारखा भर उमेदीचा, तगडा, लढाऊ, कदरदार आणि सर्वांत अधिक म्हणजे गेल्या छत्रपतींच्या प्रेमाखातर, शान-मान राखण्यासाठी प्रसंगी जिवाचा सुरुंग उडवायला सिद्ध असणारा. त्या सिंहासनाचा डौल राखणारा. मनातील शिवछत्रपती ज्याच्या रूपात बघता येतील असा – त्यांच्याच रक्ताचा. संभाजीराजांनी मनाच्या उमाळीने, आपला अनेक प्रसंगांशी टकरत आलेला माथा चरणासनावर टेकला होता, तो आपल्या मन:शांतीसाठी. त्याने जमल्या माणसांची मने अन्‌ मने मात्र कब्ज झाली. तीन महिने सुना असलेल्या त्या चौकात आज श्वास भरत होता. चौकाला जाग येत होती.

मावळलोकांना आजारी महाराजांचे मनभरे दर्शन घडले नव्हते. मंचकारोहण केलेल्या रामराजांचे मुख दिसले नव्हते, पण आज त्यांच्याच मेळातून आलेला राजपुरुष त्यांना सिंहासनाजवळ हवा तसा बघायला मिळत होता.

सोयराबाई आणि त्यांच्या हस्तकांना अवांतर सारे समजले होते, फक्त महत्त्वाचे एकच उमजले नव्हते, राजा हा प्रजेसाठी असतो. भाराभार खलबते करीत बसण्यासाठी नसतो. शेकडो भावभरे डोळे आपल्यावरच खिळले आहेत याचे काहीच भान नसलेले संभाजीराजे सिंहासन चौथऱ्या मागून महाराजांच्या खासेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाने चालत निघाले.

महाराज बसत ती खासेवाड्याची सदर आली. बैठकीवरचा छत्रपतींचा जामा, टोप, चोळणा, हत्यारे हा तबकात मांडलेला साज ते बघतच राहिले. त्यांना वाटले क्षणात त्या साजातून चालते-बोलते आबासाहेबच खडे होतील. हात खांदाभेटीसाठी पसरते करताना म्हणतील – “लेकरा, कुठं गेला होतास?”

त्या बैठकीला अदब देऊन जरा अंतर ठेवून संभाजीराजे सदरेत बसले.

दरबारी चौकातील माणसे एक-एक करीत पालखी दरवाजाने सदरेला रुजू झाली. त्यांतील चांगोजी काटकराला युवराजांनी फर्मावले, “चांगोजी, नजराण्याचं एक साजतबक सिद्ध करा.”

“जी.” चांगोजी निघून गेला.

“कोण-कोण असामी दस्त केलीत केलीत तुम्ही?” येसाजीकाकांकडे आणि मामासाहेबांकडे बघत युवराजांनी विचारले. “बापूजी माळी, सूर्याजी निमकर, भांडबलकर आन्‌ घाटगे.” पिलाजीमामांनी तपशील दिला.

“घरांवर चौक्या चढवून बाळाजी चिटणीस, त्येंचा मुलगा आवजी आन्‌ फर्जंदचा हिरोजी बी बंद केलाय.” येसाजी म्हणाले. “ठीक आहे. कंककाका, तुम्ही चलाखीची जहाली केलीत. नाहीतर….”

“लई कट्टाळलाव आमी ह्येंच्या तिरक्या चालीला. गडाचं दरवाजं बंद काय करत्यात. धन्याभोवती पारा काय चडवित्यात. एवढा मानूस हाय आमच्या दिमतीला पर सबूद इच्चारला न्हाई कुनी आमास्री कशानं कसं करावं म्हून.”

“तुम्ही अडचणीचे होता त्यांना काका. नेकीची अडगळ वाटली त्यांना.” संभाजीराजे चांगोजीची वाट बघत होते.

जामदारी दालनाकडून चांगोजी तबक घेतलेल्या खरिदमतगारासह आलेला बघताच संभाजीराजे हंबीररावांना म्हणाले, “चला. मामासाहेब, आमच्या संगती या.” सदर सोडून ते बाहेर पडले. सातमहालाच्या रोखाने चालू लागले. मागून हंबीरराव, चांगोजी आणि तबकधारी चालले.

युवराज येताहेत हे बघून सातमहालाच्या कुणबिणींत कालवा उठला. महाराणी सोयराबाईंच्या महालाचा दरवाजा तर करकरत बंदच झाला! त्या बंद दरवाजासमोर आलेल्या संभाजीराजांनी हंबीररावांकडे बघितले. त्या नजरेचा मतलब पकडत हंबीरराव पुढे आले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment