धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४६ –
“दरवाजा खोला!” हंबीररावांच्या थापेबरोबर दरवाजावर आदळलेल्या त्यांच्या मनगटीच्या चंदेरी कड्याचा ‘खट’ असा आवाज उठला. मग थापांमागून थापा दरवाजावर पडल्या. आत कसलीतरी कुजबुज चालली होती. दरवाजाबाहेर निसटते शब्द येत होते – “आमची आण आहे. जाऊ नका!”
“सोडा सोडा आम्हाला!”
बऱ्याच वेळाने दरवाजा खोलला गेला. समोर रामराजे उभे होते! त्यांची चर्या रडवेली, तांबूस दिसत होती. जशी आजवर घातली होती तशीच त्यांनी साद घातली,
“दादामहाराज!” झापा घेत संभाजीराजे त्यांच्याजवळ गेले. पाय शिवण्यासाठी वाकणाऱ्या रामराजांना “बाळराजे!” म्हणत आवेगानं त्यांनी जवळ घेतले. त्यांना थोपवून ते म्हणाले, “घाबरू नका. मान वर घ्या.”
डबडबल्या डोळ्यांनी आपल्या धिप्पाड दादामहाराजांकडे बघत दबल्या कोंडल्या रामराजांच्या तोंडून कुचमले बोल होलपटत बाहेर आले, “तुम्ही – तुम्ही आमच्या मासाहेबांना… मारणार?”
ते ऐकून अंगभर काटा सरकलेल्या संभाजीराजांनी पराकोटीच्या दु:खावेगाने रामराजांचे मस्तक एकदम पोटाशी घट्ट धरले. नको ते ऐकल्याने त्यांचा उभा देह ताठरला होता. रामराजांच्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात सांगत होता, “कशाही असल्या तरी त्या मासाहेब आहेत आमच्या. तुम्ही आमच्याहून थोरले असता तर – तर आज त्यांच्या समाधानासाठी आम्हीच जेरबंदीने पेश झालो असतो त्यांना!”
रामराजे हसत होते. त्यांना थोपटून शांत करीत संभाजीराजे म्हणाले, “सबूर व्हा! शांत व्हा! आपल्या दादामहाराजांचा तो नजराणा स्वीकारा.”
रामराजांनी तबकाला हात दिला. डोळे टिपणाऱ्या हंबीरमामांचे पाय शिवले. रामराजांना बरोबर घेऊन संभाजीराजे सकवारबाईंच्या महालाच्या रोखाने चालू लागले. आपल्या महाली अंतःपुरात देव्हाऱ्यातील कुलदेवता वाघेश्वरीसमोर मस्तक टेकलेल्या सोयराबाई अंगभर गदगदत होत्या. त्यांना वाघेश्वरी कळली नव्हती आणि संभाजीराजेच काय; पण रामराजेही समजले नव्हते!
“ठण ठण ठण” पहाटवाऱ्याबरोबर कानी येणारे नाद संभाजीराजे ध्यानपूर्वक ऐकू लागले. मधूनच त्या नादांत पक्ष्यांचा कालवा मिसळत होता. जगदीश्वराच्या मंदिरात काकड आरती फिरत होती. छातीशी हात नेत तिला युवराजांनी मान दिला. हाततळव्याचे दर्शन घेऊन शालनामा हटवून त्यांनी मंचक सोडला.
खासेवाड्याच्या सुखदालनात ते रात्री बराच वेळ तळमळले होते. उत्तररात्रीला केव्हातरी त्यांचा डोळा लागला असावा. हे आठवताच त्यांनी पहाऱ्याला साद घातली, “कोण आहे?” एक धारकरी पेश आला. हात-तोंड क्षाळण्यासाठी हमाम्याकडे जाताना त्याला आज्ञा मिळाली, “जरा चांगोजींना पेश पाठव.”
थोड्या वेळात पोसाने हात-तोंड पुसणाऱ्या युवराजांसमोर चांगोजी पेश झाला.
“एवढ्या फाटंचं का याद करावं?’ या विचाराने तो बावचळला होता.
“चांगोजी, पाचाडच्या सदरेवर मासाहेबांच्या रिवाजाची घाट वाजते की नाही?” चांगोजीची उरलीसुरली झोप पार उडाली!
“जी.” तो चाचरला.
“गोंधळलात का?”
“थोरलं धनी आज्यारी पडलं आन् तो रिवाज कवा बंद पडला ध्यानी आलं न्हाई कुनाच्या!” चांगोजीने खरे ते पेश केले.
“व्वा! म्हणजे इथवर मजल गेली होती म्हणायची! काटकर, कुलाचारांचे रिवाज असे सुखासुखी बंद पडत नसतात. ती वाजती असली की, थोरल्या मासाहेबच या पंचक्रोशीत वावरताहेत असं वाटतं, आजच पाचाडात उतरा आणि तो रिवाज चालला होईल ते करा.”
“जी.” चांगोजी लवून जायला निघाला.
“आणि जाताना हत्यारी पहाऱ्यांचा एक मेणा घेऊन जा.”
जी.” चांगोजी निघून गेला. संभाजीराजे झरोक्यातून पाचाडच्या रोखाने बघत राहिले. पावसाच्या सरी कोसळत होत्या. लांबचे काही दिसत नव्हते.
तबकातून वाफारणारे काहीतरी घेऊन एक कुणबीण आत आली. तबक चौरंगीवर ठेवून म्हणाली, “भाईर शिर्केमामा हाईत.”
“पाठवून दे त्यांना.” संभाजीराजांनी तबकातील कटोरा उचलला. ते हुलग्याचं माडगं होतं! दारात पिलाजीमामा उभे होते. हातचा कटोरा तसाच खाली ठेवून संभाजीराजे “या” म्हणत पुढे झाले. मामांचे पाय शिवताना त्यांचे मन येसूबाईच्या आठवणीने भरले होते.
“युवराज, तुमच्या कबिल्याचं कसं करायचं? पोर पार हडबडल्येत तब्येतीकडनं. सव्वा वरीस जाले तुमचं दर्शान न्हाई तिला.” पिलाजींचा आवाज घोगरला.
“मामासाहेब, आमच्या कपाळरेषेबरोबर आमचे पाय फिरताहेत. साडे-तीन वर्षांनी आज ते रायगडाला लागताहेत हे बघताच तुम्ही. शृंगारपुरी माणसं पाठवून बोलावून घ्या युवराज्ञींना. केशव पंडित, उधो योगदेव आणि कवी कुलेशांनाही येण्याचे निरोप द्या.”
“जी” पिलाजींच्या चर्येवर फार दिवसांनी हसे तरळले.
“त्ये का ठेवलासा? घ्या की.” तबकातील कटोऱ्याकडे हात दाखवीत पिलाजीमामा मायेने म्हणाले.
“जी… ते…” संभाजीराजांना कसे आणि काय बोलावे सुचले नाही.
“येतो आम्ही. आजच पुराकडं मान्सं धाडतो.” पिलाजी निघून गेले. कटोऱ्यातून उठणाऱ्या वाफांकडे संभाजीराजे बघत राहिले. एक कोवळा चेहरा त्यांना दिसू लागला. भवानीबाईंचा. “केवढ्या झाल्या असतील त्या? आणि युवराज्ञी?
मामा म्हणाले तब्येतीचं त्यांच्या. होय येसू, खरं आहे तुम्ही म्हणता ते की, “आम्ही आमचं बाशिंग रानवाऱ्याशी बांधलं आहे. ‘ हात पाठशी गुंफीत ते भयाण एकटेपणाच्या जाणिवेने अस्वस्थ फेर घेऊ लागले. तबकातील माडगे तसेच निवत चालले. सान घेऊन, देवमहालातील भवानीचे दर्शन करून संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. जमले सदरकरी त्यांना अदब देत कमरेत लवले. युवराजांनी बैठक घेतली.
“मोगलाईतून औरंगाबादेकडील खबर आहे. आज्ञा होईल तर – ” राघो स्वानंद दफ्तरदार बोलले. संभाजीराजांनी मंजुरीचा हात उठविला. खबर सदरकरी ध्यान देऊन ऐकू लागले.
“दिल्ली दरबारनं दख्खनसुभा शहाआलम यास परत बोलावून घेऊन त्यांच्या जागी खान जहान बहादूर कोकलताश याला नामजाद केले आहे. औरंगाबादेत उतरलेला खान फौजबंदी करीत आहे.”
कपाळी आठी धरलेले संभाजीराजे चिंताक्रांत झाले. महाराजांच्या निधनाचा समय धरून हा अर्थपूर्ण बदल होत होता. शहाआलमनं सुभेदार असताना कधी औरंगाबाद सोडले नव्हते. “दफ्तरदार, मोगलाईच्या तोंडावरच्या किल्लेदारांना या बदलाची पत्रे द्या. ठाणी कडेकोट बांधून सावधानगीनं राहण्यास लिहा.”
“जी.” राघो स्वानंद लवले.
“मामासाहेब, पन्हाळ्याला जासूद पाठवून म्हलोजींना कैदी रवाना करण्याचा निरोप धाडा.” संभाजीराजांनी हंबीररावांना सांगितले.
“जी. जामदारखाना, दफ्तरखाना, जवाहिरखाना समद्यांस्नी मोहरा हाईत. त्या तुटल्याशिवाय गड राबता होत न्हाई.” हंबीररावांनी कारभारी लोकांची कुचंबणा मांडली.
गडाची हीसुद्धा नाकेबंदी झालेली ऐकताना संभाजीराजे क्षणभर कष्टी झाले. मग निर्धारपूर्वक म्हणाले, “सरलष्कर, तुम्हीच कारखान्यांच्या प्रमुखांच्या साक्षीनं मोहरा तोडून टाका. साऱ्या बारदान्यांची तपशीलवार यादी सिद्ध करायला सांगा प्रमुखांना, आणि आबाजी, तुम्ही सुरनिसी दफ्तर हाती घ्या.”
“शक तक्रारी अर्ज आहे स्वामी.” राघो स्वानंदनी दुसरा मामला पुढे घातला.
“कुणाचा?”
“बैलहोंगल तर्फेच्या मुरगोडचे देसाई माणकू रुद्राप्पा यांचा.”
“काय म्हणतात माणकोजी? आम्ही त्यांना पन्हाळ्याहून लिहिले होते की, खंडणीचा तह महाराजसाहेबांनी केला आहे तसाच चालवू म्हणून.” “त्याबद्दल नाही त्यांची तक्रार. माणकोजी खंडणी बसूल करून बेळगावतर्फेच्या कटोरगडाच्या इमारतींच्या देखरेखीसाठी ब तनख्यासाठी देतात. सध्या आपले अधिकारी विठ्ठल हरी त्या भागातून खंडणी म्हणून मध्येच पैसा वसूल करताहेत. त्यामुळे कटोरगडच्या भरण्यात तूट पडत आहे.” राघोपंतांनी तपशील दिला.
“दफ्तरदार, त्या विठ्ठल हरीला करडी समज द्या – ‘पैशाच्या वराता करण्यास तुम्हास काही एक समंध नाही! पुन्हा मुरगोड तर्फेला उसूल घेतल्यास मुलाहिजा नाही.’ तसेच माणकोजींना लिहा – “कटोरगडचा भरणा पूर्वीप्रमाणे करणे. तूट – तसदी न देणे.’”
सदरेवरची माणसे संभाजीराजांचे सावध, तातडीचे आणि अचूक निर्णय ऐकून मनोमन समाधानी होत होती.
“पाचाडच्या मासायबांचा मेणा मनोऱ्यापाशी आलाय.” चांगोजीने पाठविलेल्या धारकऱ्याने पेश येत वर्दी दिली. संभाजीराजे बैठक सोडून उठले. माणूसमेळाने आघाडी मनोऱ्याकडे चालले. त्यांना बघताच ठाण झाल्या मेण्यातून पुतळाबाई बाहेर आल्या. संभाजीराजांनी त्यांची पायधूळ घेतली. हंबीरराव, राघोपंत, येसाजी, आनंदराव साऱ्यांनी मुजरे भरले!
“चलावं मासाहेब.” संभाजीराजांनी सातमहालाकडे जाणाऱ्या पालखी दरवाजाकडे हातरोख दिला. जिंदगीचे सारे-सारे गंगासागरात अर्पण केल्यासारख्या पुतळाबाई चालत होत्या. सकवारबाईंच्या महाली येताच त्या म्हणाल्या, “युवराज, जरा राजोपाध्यांना बोलावून घ्या. स्वारींचे धर्मशास्त्राप्रमाणे करायचे जे-जे राहून गेले आहे, ते त्यांच्या सल्ल्याने करणार आहोत.” त्यांचा आवाज आभाळातून उतरल्यासारखा वाटत होता.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४६.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.