महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,454

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४९

Views: 1371
7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४९ –

शास्त्री-पंडितांनी मुक्रर केलेला, ललितापंचमीचा मंचकारोहण दिवस उजाडला. विचारपूर्वक शंभूराजांनी मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. सविध मंगलस््रान घेतलेले संभाजीराजे अब्दागिरे, गुर्शबारदार, शास्त्रीपंडित यांच्या मेळाव्यातून खाशा मार्गाने सिंहासनचौथऱ्यावर येताच मानकऱ्यांनी दाटला दरबार, वाऱ्यावर लवत्या कुरणासारखा मुजऱ्यासाठी झुकला.

आज प्रधानमंडळाच्या मानकरी सोनस्तंभाजवळ कुणीही उभे नव्हते, कारण हा राज्याभिषेक नव्हता. मंचकारूढ होऊन राज्यसूत्रे आपल्या हाती स्वीकारल्याचा तो केवळ रिवाजी विधी होता. मुहूर्तवेळी मंत्रघोषांच्या गजरात, सिंहासनाला नम्रभावे वंदन करून, त्याला चुकूनही पदस्पर्श होणार नाही याची दक्षता घेत संभाजीराजे राजआसंदीवर आरूढ झाल.

क्षणमात्र त्यांचे त्यांनाच कळेना की, आपल्या छातवानांकडे ठोके चढीला का पडावेत? उरात न कळणारी, पूर्वी कधी न अनुभवलेली प्रचंड खळबळ का माजावी? कानशिले सणसणून का यावीत? पाठीच्या कण्यातून भवानीचा पाजळला पोत सरासर फिरतो आहे, असे का वाटावे? गर्दन नागफण्यासारखी ताठ का व्हावी?

नेहमी आगेमागे वावरणारी, समोरच्या दरबारी चौकातील तीच हंबीरराव, आनंदराव, येसाजीकाका, केशव पंडित, कविजी, राघोपंत, खंडोजी ही माणसे त्यांना त्या राजसिंहासनावर बसताच एकदम आगळी-वेगळी वाटू लागली. आपल्या शरीराचे हात, पाय न्याहाळावेत तसेच ते दरबारातील मानकरी न्याहाळू लागले. वडीलधारे असले तरी हंबीरराव, येसाजी कंक ही माणसे त्यांना आता भवानीबाईसारखी अपत्यवत वाटू लागली! या आसना वरून म्हणूनच त्यांना कळून आले की, हंबीरराव बोलताना वारंवार ओठांवरच्या मिश्याखाली पालथी मूठ देतात! येसाजी कंकांचे पांढरेशुभ्र कानकल्ले, मनचे बोलण्यापूर्वी थरथरतात! कवी कुलेश बोलताना मध्येच आपल्या हातांची सडक बोटे न्याहाळतात! खंडोजींची बाराबंदी छातीवर तुटेल एवढ्या तणावात असते! केशव पंडितांच्या कपाळीचा ठसठशीत गंधटिळा आठ्यांच्या घड्यांवर दुमडत जातो! रायाजी-अंतोजी बोलताना कधी गर्दनच वर घेत नाहीत!

सिंहासनाच्या सायवळ हाताला असलेला समतोल सोनतराजू दृष्टीस पडताच शंभूराजांना आपलेच समोरच्या दरबारात पेश झालेले आरोपित रूप क्षणभर दिसले! आज या क्षणी त्यांना पुरते कळून चुकले की, ‘केवळ आबासाहेब या आसनावर होते म्हणून आम्ही सलामत सुटलो त्याबेळी!’

सगळे विचार त्या तराजूच्या पारड्यांत समतोल सोडून संभाजीराजांनी आपल्या दक्षिण हाताचा पंजा शांतपणे उठविला. समोर आलेल्या शिक्के करंडाच्या आणि कट्यारीच्या तबकाला “राजा” म्हणून स्वीकृतीचा हातस्पर्श दिला. राजदंडाचा मंत्र होईपर्यंत सोनेरी मत्स्यमोर्चेल हाती धरला. दरबारी मानकऱ्यांच्या मरातबी वस्त्रतबकांना ते हातस्पर्श देऊ लागले.

रायगडच्या सलामी तोफांची कडकडती बत्ती भोवतीच्या टोपीकर, सिद्दी, फिरंगी आणि मोगल, इदल, कुत्ब या शाह्यांना जणू गर्जून सांगू लागली, “मराठी दौलतीचा “शिव’ गेला, तरी त्या आसनावर आता ‘रुद्र’ आला आहे!”

“सरलष्कर, दख्खनसुभा कोकलखानानं आपले दात दाबायला सुरुवात केली. अहिवंतगडावर अचानक हमला घातला त्यानं. आजच गडाच्या शामजी केशव दफ्तरदारांचा माणूस खानदेशातून आला.” शिलेखाना, अंबारखाना, दारू कोठारे यांवर नजर टाकून परतणारे राजे हंबीरराबांना म्हणाले.

“गडाचं काही…” सेनापती चिंताक्रांत झाले.

“नाही. काही नाही झालं. गड पायरोव्यानं आहे. आपल्या किल्लेदारांनी निकरानं खान परतविला. शामजींना पत्र देऊन किल्लेदारांना मानवस्त्र॑ पाठवायला पाहिजेत मामासाहेब.”

“जी. दर्याकडची खंदेरीबेटावरनं एक वंगाळ खबर आल्येय धनी.”

“सिद्याच्या मग्रूरीचीच असणार.”

“जी. आपला लई मोलाचा सारंग गेला. मायनाक भंडाऱ्याचा ल्योक. तीनशे असामी घेऊन ग्येल्या पंधरवड्यापूर्वी शिद्याच्या उंदेरी बेटावरल्या जलकोटावर रातीचा त्येनं छापा घातला. काळोख गुडूप, जागा नवखी या गुणं छापा फसला त्येचा. च्यार विसा माणूस आन्‌ मायनाकाचा ल्योक ह्येंची शिरं काटून माजोर शिद्दी मुंबयला घेऊन गेला.” ती धडावेगळी शिरेच समोर उभी राहिल्याने हंबीररावांची घाटी दाटली.

ती वार्ता ऐकून शंभूराजे सुत्च झाले. हाती आल्या तपशिलावरून त्यांना खंदेरी बेटावरच्या जलकोटाचे महत्त्व कळून चुकले होते. खंदेरी आणि उंदेरी ही मुंबईच्या घेरातील जवळ-जवळ असलेली मोक्याची बेटे होती. मोठ्या परिश्रमाने खंदेरी बेट कब्ज करून महाराजांनी त्यावर जलकोटाचे बांधकाम सुरू केले होते. जे महत्त्व दक्षिण कोकणात मालवणच्या सिंधुदुर्गाला होते, तेच खंदेरीला उत्तर किनारपट्टीत होते. या जलकोटामुळे मुंबई या मोक्याच्या दर्याठाणकावर जरब ठेवता येणार होती. हे खंदेरी तीन दर्यासत्तांच्या डोळ्यांत खुपत होते. जंजिऱ्याचा सिद्दी कासम, सुरतेचा मोगल सुभेदार आणि मुंबईचे टोपीकर. उंदेरी घशात घालण्याचा या तीनही सत्तांनी प्रयत्न केला होता. त्यात सिही कासम कामयाब झाला होता. त्याने सुरतेच्या मोगली सुभेदाराशी संधान साधून, “मी इथं आहे म्हणजे तुम्हीच आहात.” या ढंगाने पावले टाकली होती. त्या सुभेदारांच्या मदतीनेच सिद्दी मुंबईच्या टोपीकरांनाही हवा तसा वाकवीत होता. दर्यावर चाचेगिरी करून, मराठी किनारपट्टीचा मुलूख जाळून-लुटून पाहिजे तेव्हा मुंबईचा आसरा घेत होता. टोपीकरांनाही पाव्हण्याच्या काठीने साप मारायचा होता! जसा टोपीकर, मोगल, सिद्दी यांना खंदेरीचा जलदुर्ग सलत होता, तशी मराठी दौलतीलाही उंदेरीवरची सिद्द्याची बसकण संधी साधेल तेव्हा बुडवायची होती. हे दर्या पटात घेण्यासाठी जुंपलेले खारट भांडण होते! चिवट सिद्दी, खवचट इंग्रज यांचे तिखट मराठ्यांशी जुंपलेले!

“सरलष्कर, मायनाकांना एक सांत्वनाचं पत्र द्या. त्यांना लिहा, “तुमचे मूल गेले, ते दौलतीच्या शिवर्पिंडीवरचे फूल गेले. आम्ही तुमचं बरे चालवू.’” सिद्द्याच्या विचाराने राजे गुमान झाले. “त्यो हबशी मंजे दौलतीच्या पदराला कुरतडनारा उंदीरच हाय. मिळंल त्ये चाबालत्योय अन्‌ जंजिऱ्याच्या बिळात लपत्योय. एकडाव नक्षा उतराय पायजे त्येचा.” हंबीरराव चिडीने बोलले.

“होय मामासाहेब, आबासाहेबांना खूप तापदरा दिल्यात त्यानं ते आम्ही जाणून आहोत. एकदा मायनाक, दौलतखान, कान्होजी, गोर्विदजी काटे या सारंगांना बोलावून घेणार आहोत आम्ही. सिद्द्याची बसकण उखडल्याखेरीज दर्यासही कौल देता होणार नाही.” बोलत-बोलत महादरवाजात आलेल्या राजांना मुजरा देत चांगोजीने वर्दी पेश केली. “पन्हाळ्याचं कैदी आल्यात गडावर.”

हंबीररावांकडे बघत राजे विचारगत झाले. काहीतरी मनोमन ठरवून त्यांनी आज्ञा केली, “चांगोजी, त्यातील प्रल्हाद निराजी आणि राहुजींना मोकळे करून आमच्या भेटीला पाठवा.”

“जी…” पुढे काही ऐकायला मिळेल, या आशेने चांगोजी रेंगाळला.

“निघा!” राजांनी मामला तिथेच तोडला. आतून त्यांचे मन मोरोपंतांसाठी व्याकूळले, पण राजओठांनी ती व्याकूळता परतवून लावली.

खासेवाड्याच्या सदरेवर आलेल्या राजांना राघो स्वानंद सामोरे आले. त्यांच्या हातात बऱ्याच कागदी वळ्या होत्या.

“सर्व कारखान्यांच्या मत्तेची फेरिस्तं सिद्ध आहेत स्वामी. फक्त रत्नशाळेची मोहर जोखमीची असल्यानं खाशांच्या साक्षीनं तुटावी, असं सर्वांचं मत आहे.” राघोपंत वळ्या चाळवीत म्हणाले.

“ठीक आहे. दफ्तरदार, आम्ही जातीनं सगळ्या कारखान्यांचा हिसाब-तपास घेऊ. सर्वांना समज द्या तशी.”

राघोपंत थोडे घुटमळले; पण जाण्यापूर्वी कानी घालावं म्हणून तुटक म्हणाले, “राजापूरहून टोपीकरांचे हेजिब आलेत आपल्या बक्षिसाची मागणी घालण्यासाठी.” संभाजीराजांची चर्या पालटली. आवाज करडा झाला. राघोपंतांना समज मिळाली, “त्यांना स्पष्ट सांगा. तो पदराखाली घातलेला सिद्दी अगोदर हाकला मुंबईहून आणि मग या बक्षिसी मागायला! आमच्या सामनेसुद्धा आणू नका त्यांना.”

“जी.” वळ्या सावरत राघोपंत हलले. त्यांच्या कानी जाता-जाता इशारा पडला, “निरोपाचे विडे देऊन त्यांना गडावरून काढा. अधिक थांबवू नका.”

राजे हंबीररावांना काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याची वर्दी आली, “परलादपंत आल्यात.”

“येऊ द्या आत.” हातपंजा उठवून मंजुरी देताना राजांची चर्या अनेक आठवणींनी वेढून गेली. आत आलेले प्रल्हादपंत आणि राहुजी तिवार मुजरा घालून खालगर्दनीने उभे राहिले. विचित्र शांतता दाटून आली.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १४९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment