महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,478

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५०

Views: 1420
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५० –

बैठक सोडून प्रल्हादपंतांच्या समोर शांतपणे येत शंभूराजे म्हणाले, “घाबरू नका न्यायाधीश. आम्ही तुमच्यावरील आरोपपत्र नाही वाचून दावणार! आबासाहेब गेल्यापासून तुम्ही पन्हाळ्याच्या रोखानं कूच होईपर्यंतच्या तुमच्या हालचालींचा बरा तपास घेतला आहे आम्ही. तुमचं खूप उशिरा आलेलं तहाचं पत्रही पावलं आम्हाला पन्हाळ्यावर. तुम्ही न्यायाधीश आहात. आमच्या मनचं न्यायाधीशाचं रूप तुम्हापुढे ठेवण्यासाठी पेश घेतलंय आम्ही तुम्हास. काही सुनावण्यासाठी नाही.” राजआसंदीवर बसल्यावेळी उतरले होते, तसेच तेज संभाजीराजांच्या डोळ्यांत भरून आले. प्रल्हादपंतांना ढवळून काढणारे राजबोल त्यांच्या ओठांतून बाहेर पडले –

“राजमुद्रा धारण करणारे आबासाहेब गेले असता कट करून आम्हाला दस्त करण्यासाठी सुरनीस-पेशवे चालून आले, त्या वेळी आम्हाला खरा आधार द्यायला हवा होता, तो तुम्ही! तुम्ही न्यायाधीश होता. न्यायाला कौल देणारे, अन्यायाला जाब विचारणारे. तुमचं कर्तव्य या सरलष्कर मोहितेमामांनी बजावलं! आम्हाला न्याय मिळाला तो त्यांच्या हस्ते – मैदानावर!

“मुलखात जसे डोंगरकडे तसे राज्यात न्यायाधीश असे आम्ही मानतो. आल्या लाटेवर झाडे-पेडे डुलली तर आम्ही समजू शकतो. पण – पण डोंगरकडेच डळमळू लागले, तर आधार सुटल्यानं आभाळ कोसळेल याची धास्त वाटते पंत!

“न्यायाधीश, एकवार न्यायाला कौल देणं साधलं नाही तरी चालेल, पण किमानपक्षी नकळतसुद्धा त्याच्या हस्ते अन्यायाची जोड कधी होता कामा नये.”

प्रल्हादपंत, राहुजी, हंबीरराव सर्वांनाच वाटले प्रत्यक्ष महाराजच तर समोर उभे राहून बोलत नाहीत ना?

आपल्याच विचारांत, पाठीशी हात बांधून फेर घेणाऱ्या संभाजीराजांनी आपलं मन मोकळे केले – “पंत, ध्यानी ठेवा. प्रत्येक असामीला तीन मासाहेब असतात. एक जन्म देणारी नाळेची. दुसरी पोषण करून शेवटी ठाव देणारी पायतळीची धरती आणि तिसरी त्याच्या जगत्या हयातीवर मिटल्या डोळ्यांनी जागती नजर ठेवणारी न्यायमाउली!

“पहिलीचे डोळे ममतेनं भरलेले असतात, तिला ऐब-दोष दिसत नाही. दुसरीला डोळेच नसतात. तिसरीला असलेले डोळे बंद करून घ्यावे लागतात. का? तर हाती धरलेल्या न्यायतराजूच्या पारड्यांत माप घालताना भावनेपोटी काही गफलत होऊ नये म्हणून. पंत, तुम्ही न्यायाधीश असून डोळ्यांवरची पट्टी खोललीत! तुमची नजर जाया झाली. हातचा तराजू सोडून तुम्ही सिधे त्याच्या एका पारड्यात जाऊन बसलात! बसलेले सारे तडाखे मनाआड घालून आम्ही तुम्हाला इतमामानं त्या पारड्याबाहेर घेत आहोत. तुमचा न्यायतराजू तुमच्या हाती देत आहोत. तो सांभाळा. पुन्हा अशी गफलत आम्हास मानवणार नाही. न्यायाधीशांनाच आरोपित म्हणून बघताना काय वाटतं, हे सांगवत नाही. पुन्हा असा प्रसंग आमच्यावर नका आणू.”

प्रल्हादपंतांच्या नेत्रकडा ओलावून आल्या होत्या. हात जोडून, पगडी डोलवीत ते भरल्या मनी म्हणाले, “स्वामी, क्षमा असावी. आम्हास पश्चात्ताप वाटतो झाल्या गैर बर्तावाचा…” त्यांना पुढे बोलवेना.

“प्रल्हादपंत, तुम्ही न्यायाधीश आहात याचीच ती निशाणी आहे. उद्यापासून तुमच्या अखत्यारीची सूत्रे ताब्यात घेऊन राबती करा!”

“राहुजी, तुम्ही गडाचे सरकारकामावरचे सुभेदार आहात. राजे कोण आहेत याची दखल घेण्यापरिस राजधानी गोमटी कशी राहील, याची दखल घेत चला! तुम्हीही तुमच्या सुभेदारी कामावर रुजू व्हा.”

“जी” राहुजी आणि प्रल्हादपंत मुजरा देऊन जायला निघाले. कैलासवासी स्वामींच्या काळात असा प्रसंग कधी प्रल्हादपंतांबर आला नव्हता! तो आला असता तर…

गलबलून गेलेले प्रल्हादपंत तसेच परतले आणि तरातरा चालत संभाजीराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले.

झटकन मागे हटत राजांनी त्यांना थोपविले. वर घेत त्यांना खांदाभेट देताना ते म्हणाले, “पंत, खूप जोखीम आहे तुम्हा-आम्हावर. आमच्या पाठीशी असा.”

समाधानाने प्रल्हाद निराजी निघून गेले. भारल्या हंबीररावांनीही निरोप घेतला.

वबिचारगत राजे अंत:पुरातील दरुणीमहालात आले. तिथे येसूबाईंनी दुहाती तोलून धरलेल्या भवानीबाईंच्या डुईवर धाराऊ सोनफुले मढविलेली कुंची चढवीत होती.

“आ बा, आबा” करून झेपावणाऱ्या भवानीबाईंना राजांच्या हाती देताना येसूबाई म्हणाल्या,“स्वारींना कळलं असेल धाकल्या बाईंना मुलगा झाला आहे.”

दुर्गाबाईच्या आठवणीने ते दोन्ही जीव व्याकूळ झाले. फेरिस्तवार खास कारखान्यांच्या मालमत्तेच्या हिसाब जातीने घेण्यासाठी राजे खासेवाड्याबाहेर पडले. त्यांच्या सोबत प्रल्हाद निराजी, हंबीरराव, येसाजी, रघुनाथ नारायण, कवी कुलेश, राहुजी, आबाजी सोनदेव, चांगोजी अशी मंडळी निघाली.

पावसाने भिजल्या दगडी इमारतींवरून श्रावणी उन्हं उतरल्याने पांढरट वाफा तरंगून येत होत्या. दूरवर पाचाडात झडणाऱ्या घाटेचे नाद कानी पडताच छातीशी हात नेत राजांनी घाटेला मान दिला. त्यांच्या हाती एक नकसदार लाकडी संदूक होती. रत्नशाळा आली. राजांच्या साक्षीने मोहर तोडण्यात आली. फेरिस्त बाचले जाऊ लागले.

कारकून बारदान्याचे माप करू लागले –

पाचशे रती हिरे, दोनशे रती माणके, एक हजार तोळे मोत्ये. एक-एक कलम पडताळून आलमारीत बंदिस्त होऊ लागले, फेरिस्त पूर्ण झाले. फेरमोहोर देण्यासाठी रत्नशाळाप्रमुख बहिर्जी घाटगे आलमाऱ्या बंद करू लागले.

“थांबा बहिर्जी, हा सर्वांत मोलाचा डाग आत ठेवून द्या. त्याशिवाय रत्नशाळा पूर्ण नाही होत.” हातातील संदूक खोलून आबासाहेब नेहमी छातीवर वागवीत ती भवानीची कवबडीमाला शंभूराजांनी बाहेर घेत कपाळाला भिडवून पुन्हा आत ठेवली. हिरे, माणके, मोत्यांना शोभा आणण्यासाठी संदूक आलमारीत चढली.

राजे गडाच्या राबत्या जामदारखान्यात आले. कारकून नऊ कोट रुपये किमतीची चलनी नाणी वजनावर मापू लागले. त्यात पाच लक्ष रुपयांचे केवळ सोन्याचे होनच होते.

अनघड सोने नऊ खंडी, चांदी अडीच खंडी. सर्व कलमांचे वजन झाले. होनांच्या सोनेरी ढिगाकडे नजर टाकीत राजांनी राघोपंतांना आज्ञा केली, “दफ्तरदार, सालीना दहा हजार होन प्रतापगडी आणि वीस हजार होन तुळजापुरी आई भवानीच्या सेवेस रुजू होतील असे करा!”

ज्याच्या बळावर दौलत उभी राहते, त्या शिलेखान्यात राजे सर्वांसह आले. बाकाच्या तोड्यांनी पाचुंद्यात बांधलेल्या कलमांचे मोजमाप होऊ लागले – “तीस हजार एकधारी तेगी, पन्नास हजार दुधारी, चाळीस हजार भाले, साठ हजार ढाली, चाळीस हजार धनुष्ये आणि आठरा लक्ष बाण” असे हत्यार साठवणाला होते.

धारांवर झळझळणाऱ्या त्या शस्त्रराशींकडे बघताना राजे गंभीर झाले. त्या राशी आबासाहेबांची दूरदृष्टी सांगत होत्या. साठवणाला हत्यारे होती. ती वागविणारे हात उभे करायचे होते. उद्याच्या काळाला सामोरे जाण्यासाठी छत्रपतींनी केलेली ती सिद्धता होती.

“सरलष्कर, कंककाका, पावसाळा उलगताच तवान्या सैन्याची सिंचणी करून ही हत्यारे राबती करायची आहेत. सर्व तर्फांच्या सुभेदार-हवालदारांना याची समज द्या.” हे बोलताना राजांचे डोळेही धारी बनले होते.

ज्या कारखान्याच्या जोरावर सैन्ये दौडतात तो अंबारखाना आला. इथे दगडबंद कोट्यांत धान्यांच्या गोण्यांच्या थप्प्या रचल्या होत्या. उंदीर-घुशींच्या बंदोबस्तासाठी जागोजागी चाप टाकले होते.

थप्प्या रचलेल्या कोठ्यांतून फिरताना अंबारखान्याचा प्रमुख तपशील देऊ लागला. “ही भातकोठी. सतरा हजार खंडी दास्तान आहे. जिरे दोन हजार खंडी आहे.”

डाळी, कडधान्ये, साखर, तंबाखू यांची कोठारे बघत जाणाऱ्या राजांना आबासाहेबांचे शब्द आठवले, “तुम्ही-आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत. मावळा व्हा!”

आसवाबखान्याचे दालन आले. कलमवार विभाग दाखविताना प्रमुख सांगू लागला – “यात जालना-अहमदाबादी एकलक्ष तागे कापड आहे. यात चार हजार पांढरी ब एक हजार बऱ्हाणपुरी ठाणे, यात तीन हजार सागे सादिलवार आणि चार हजार तागे पैठणी कापड आहे.”

ती सारी संपत्ती नजरेखाली घालून, गंजीखान्यात साखळदंडांनी जखडलेले झुलते हत्ती बघून परतणाऱ्या संभाजीराजांच्या मनात आले, “ही गजान्त लक्ष्मी महाराजसाहेबांनी दास्तानी केली ती का? आपल्यासाठी? नाही. ते जाणून होते की, सर्वांत मोलाची संपत्ती आहे माणूस! इथला माणूस ताठ गर्दनीनं जगावा. आपले कुलाचार त्याला निर्वेध करता यावेत. यासाठीच त्यांनी आपल्या हयातीचा भंडारा उधळला.’

आपल्याच विचारतंद्रीत चालणाऱ्या राजांना रघुनाथ नारायण अदबीने म्हणाले, “कुडाळच्या देशाधिकारी गणोरामांचे पत्र आले आहे स्वामी.”

“काय म्हणून?”

“तेथील योगी नामदेवभट बाकरे यांचा काळ झाला. मागे वारस मुलगा आहे. त्यांचे चालविले पाहिजे म्हणतात गणोराम.”

चालते राजे थांबले आणि म्हणाले, “पंत, बाकरेबुवांच्या मुलाला घोडे आणि नजराणा पाठवून द्या. त्यांचे चालेल अशी मोईन करून दानपत्र सिद्ध करा. आमच्या दस्तुराने कुडाळी पाठवून द्या. आबाजी, तुम्ही ते दानपत्र नजरेखाली घालून त्यावर मोर्तब करा.”

“जी.” रघुनाथपंतांना ते ऐकताना समाधान वाटले.

काहीतरी आठवल्याने राजांनी दुसरीही एक सूचना रघुनाथपंतांना केली -“पुण्याहून सुभेदार दामाजी रघुनाथांचा माणूस येऊन गेला आहे पंत. देहूच्या तुकारामबुवांचे चिरंजीव महादोबांचा आणि त्यांचा भेटप्रसंग झाला आहे. महादोबांनाही एक खंडी ज्वारी आणि एक पातशाही होनाचे वर्षासन जोडून द्या.”

“आज्ञा स्वामी.” राजे धर्मस्थळे आणि संत, योग्यांवर बारकाव्याने लक्ष देताहेत, हे बघून सर्व मंडळी समाधान पावली होती.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment