महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,063

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५२

By Discover Maharashtra Views: 1319 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५२ –

हरजीराजे आणि गणोजीराजे यांनीही आग्रह धरला, “साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधानमंडळाच्या घरी चौक्या हे विहित नाही.”

राजांनी चांगोजीला याद फर्मावून हुकूम दिला, “दस्त असामींवरचे चौकीपहारे काढून घ्या. आणि – आणि पेशव्यांच्या वाड्यावर राजवैद्यांना पहिले पाठवून द्या.”

आज्ञेप्रमाणे अण्णाजी, पंत, हिरोजी, बाळाजी यांच्यावरचे पहारे उठले. कोल्हापूर, पन्हाळगडची कैद माणसेही मुक्त करण्याचे हुकूम देण्यात आले. औषधांची पडशी घेतलेले राजवैद्य मंत्रिवाडीतील मोरोपंतांच्या वाड्यात आले. ज्वराने सणसणलेल्या मोरोपंतांनी त्यांना बघताच हात डोलवून, काही न बोलताच उपचार घेण्यास साफ नकार दिला. दोन दिवस झाले. दौलतीचे कदीम चाकर पेशवे आपल्या धन्यासारखेच झेंडू फुटल्या ज्वराने संभ्रमात गेले. त्यांच्या मंचकाभोवती त्यांचे पुत्र निळोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत, राहुजी, राघो स्वानंद आणि हंबीरराव ही हवालदिल माणसे दाटली. आता पंतांचा भरोसा नव्हता. सर्वांनाच वाटत होते की, या अंतकाळी राजे पेशव्यांना भेटावे. पण तसे राजांपुढे ठेवण्याची कुणाचीही हिंमत नव्हती.

एकाएकी पंतांभोवती दाटल्या असामींत खसपस माजली. पंतांना आवरण्यासाठी निळोपंत आणि त्यांचे खासगी कारभारी तेवढेच मंचकाजवळ राहिले. बाकी सारे मागे हटले. दालनात कुजबुज उठली, “युवराज्ञी येताहेत!”

आपले खाजगीचे कारभारी आणि कुणबिणींच्या घेरातून प्रत्यक्ष छत्रपतींच्या खतरुषा युवराज्ञी येसूबाईसाहेब आज पहिल्याने मंत्रिवाडीची पायरी चढत होत्या.

दालनात प्रवेशणाऱ्या येसूबाई, भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना जिजाऊच वाटल्या. “मासाहेब!” क्षीणपणे त्यांचे ओठ हलले. तशा स्थितीतही ते मुजरा देण्यासाठी खटपटीने उठू बघू लागले. झटकन पुढे झालेल्या येसूबाईंच्या तोंडून शब्द उमटला, “पंतकाका!”

पंतांना तो ऐकू गेलाच नाही. त्यामागची वेदना भोवतीच्या सर्वांना चाटून गेली.

“स्वारी तुमच्या भेटीस येते आहे पंतकाका.” येसूबाईना अधिक बोलवेना. समोरचे पेशवे बघून, ‘अंतकाळी आबासाहेबांची स्थिती कशी झाली असेल?’ या विचाराने डोळे भरून आल्याने तर त्यांना पंतही दिसेनासे झाले.

भोवतीची माणसे मुजरे देण्यासाठी लवली आहेत, हे बघून पदरकाठाने डोळे निपटीत येसूबाईंनी मागे बघितले. हरजीराजांसह संभाजीराजे दालनात येत होते. मंचकावर लेटल्या पंतांवर खिळलेली त्यांची नजर विचित्र दिसत होती. आघाडी मनोऱ्याच्या दगडी खांबांना घेऊन बसलेली काळपट छटा तीत काठोकाठ भरून आली होती. त्यांच्या मस्तकीचा जिरेटोप दिसताच पंतांचे डोळे लखलखत तळातून ढवळून निघाले. दालनभर फिरणाऱ्या त्यांच्या नजरेला प्रत्येक चेहरा टोपधारी छत्रपतींसारखाच दिसू लागला! ओठ एकसर पुटपुटु लागले – “जी स्वामी…” हात उशाशी वारंवार जाऊ लागला.

“पंत!” संभाजीराजांच्या तोंडून घोगरी धरली साद उमटली. फक्त येसूबाईनाच तेवढे जाणवले की, अशी साद स्वारी कृचितच आणि तीसुद्धा आबासाहेब वा थोरल्या आऊंना घालीत होती. भावशून्य नजरेने पंत संभाजी राजांकडे बघू लागले. त्यांचे ओठ जे बोलत होते, त्याचा भोवतीच्या जगाशी काही एक संबंध नव्हता. तो गेल्या छत्रपतींशी होता. कुणालाच त्याची उकल होत नव्हती.

“या दोन वस्तू आम्ही आणल्या आहेत स्वामी… मागील सर्व सुखरूप आहे. सेवेस सादर होण्यास विलंब झाला. क्षमा असावी…” मध्येच डोळे मिटलेले पंत हात उशाशी नेत चाचपू लागले. संभाजीराजांनी नजरेनेच, “उशाशी काय आहे?” हे कळावे यासाठी निळोपंतांना विचारले.

निळोपंतांनी जन्मदात्याच्या उशाखालून दोन वस्तू काढून राजांसमोर उलगडून धरल्या. त्यातील एका करंडात पेशव्यांच्या शिक्के-मुद्रा होत्या. आणि दुसऱ्या एका छोट्या डबीत एक मोतीबंद भिकबाळी होती!

मुद्रा-शिकक्‍्यांचा अर्थ संभाजीराजांसह सर्वांना लागत होता. पण भिकबाळीचा अर्थ भ्रमचित्त झालेल्या मोरोपंतांशिवाय कुणालाच कळणार नव्हता. दुसऱ्या सुरतस्वारीनंतर रायगडी परतलेल्या थोरल्या महाराजांसमोर पंत एके दिवशी रुजू झाले होते. त्यांनी कानात घातलेली भिकबाळी महाराजांच्या लक्षात आली. ती बघून काही न बोलताच ते फक्त हसले होते.

महाराजांचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मोरोपंतांनी तातडीने खुलासा केला, “उत्तरेतून मथुरेच्या पाहुणेमंडळीकडून आलेला डाग आहे हा स्वामी.”

“तुम्हाला शोभून दिसतो पंत. आमचा काही गैरसमज नाही तुम्हाबाबत, पण -”

“पण काय महाराज?” उत्सुक पेशव्यांनी प्रश्न केला होता.

“पंत, आमचे हात केवढे थिटे आहेत! दोन वार आमच्या संगती सुरतेपावेतो दौडणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला अशी देखणी बाळी आम्हाला बक्ष करता आली असती तर…” महाराजांची ती झेप बघून मोरोपंत त्या वेळी अवाक्‌ झाले होते.

दुसऱ्या दिवशी ते महाराजांना पेश झाले तेच कानीची देखणी बाळी उतरून ठेवून! ते बघताना महाराजांची नजर व्यथित झाली होती.

कर्नाटक स्वारीहून परतताना महाराजांनी रघुनाथपंत हणमंत्यांना सांगून खास दख्खनी माटाची मोतीबंद बाळी घडवून घेतली होती. अंत:काळी पंतांच्या भेटीसाठी व्याकूळलेल्या छत्रपतींनी शेवटी ती चांगोजीच्या हाती देऊन आज्ञा केली होती, “हे पंतांना द्या!” छत्रपतींची ती अमोल प्रेमखूण बघताना मोरोपंत ढसढसा रडले होते. ती बाळी त्यांनी कधीच कानात चढविली नव्हती. नेहमी कुलदेवतेच्या अंगाऱ्यासारखी कमरबंदात जतून ठेवली होती. भ्रमात जाण्यापूर्वी त्यांनी निळोपंतांना बोलावून घेऊन सांगितले होते, “आमच्याबरोबर आमचे हे शिक्के आणि ही देणगी दोन्ही डाग स्मरणपूर्वक दहन करा!”

खिन्नपणे संभाजीराजे मंत्रिवाडीतून बाहेर पडले. संध्याकाळी वाडीत कल्लोळ उठला. मोरोपंतांची जीवनयात्रा संपली होती. मराठी दौलतीच्या कानातील जुनी, जाणती बाळी गळून पडली होती!

बोलावून घेतलेल्या प्रल्हाद निराजींना संभाजीराजांनी संथपणे आज्ञा केली, “पेशव्यांचे विधिकर्म होताच त्यांचे चिरंजीव निळोपंतांकडे पेशवाईची वस्त्रे आणि शिक्केकरंड पाठवा!” आणि काही न बोलता जडावल्या पावली ते येसूबाईच्या कानी हा निर्णय घालण्यासाठी दरुणीमहालाकडे निघून गेले.

“प्रल्हादपंत, सर्व तर्फांच्या सुभे, सरसुभे, सरनौबतांना पत्र द्या. दसरा उरकताच जमावबंदीनं सिताब रायगड जवळ करण्यास लिहा, अखत्यारीखालचा मुलूख, गडकोटास आवश्यक तेवढीच शिबंदी मागे राखून, दास्तानीच्या वरकड सर्व जातस्वारांनिशी सारा लढाऊ खासा बोलावून घ्या. या कामी कुसूर-उजूर कुणासही माफ नाही, हे साफ लिहा.”

कसल्यातरी खोलवरच्या विचारात डुबलेल्या शंभूराजांच्या चर्येवर करडे तेज उतरले होते. सिंहासनसदरेला जमली मंडळी त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होती. अंगावर पडणारी जबाबदारी कार्यी कशी लावावी, याचे आडाखे बांधीत होती.

“सरलष्कर, नाईक बहिर्जी, विश्वास मुसेखोरेकर, कर्माजी, महादेव जासूदखात्याचा निवडक तेवढा सारा असामी गडी पेश घ्या.” ती आज्ञा ऐकताच हंबीरराबांची कळी खुलली. ते मनोमन काय ते समजल्याने म्हणाले, “एका हप्यात जासुद हुबी ऱ्हातील धन्यांच्या म्होरं.”

“केशव पंडित, तुम्ही चिटणिसांच्या मदतीनं उत्तरेत काशीला गागाभट्टांकडे दूत धाडून त्यांना, “तुमच्या हस्ते आम्ही अभिषेक घेण्याची इच्छा करतो. मागे आबासाहेबांचे केले, तसे हे कार्य संपन्न करावे.’ असे कळवा. नाशिकच्या अनंतभट कावळ्यांनाही असेच आवतन द्या.”

सदरेला राजांच्या मनसुब्यांची चाल उकलत चालली.

“संताजी, यमाजी, बारामावळ, तळकोकणात उतरून तुम्ही साधेल तेवढी सैन्यसिंचणी कार्यी लावा. राघोपंत, चिमणगावकर, राजापूरच्या देवाजी विठठल, दाभोळच्या वेंकाजी निमदेव, डिचोलीच्या मोरो दादाजी आणि चेऊलच्या तिमाजी व्यंकटेश या समुद्रपट्टीच्या सुभेदारांना हारकारे धाडून राजापूर, नागोठणे, दाभोळ, थळ ही ठाणी जमाबंद करण्याची सूचना द्या.” भर घेराचे जाळे पसरते फेकण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घेताना कसबी कोळ्याच्या चर्येवर उठावेत तसे भाव राजांच्या चर्यवर पसरले. आपल्याच विचारात डुबलेले राजे बैठक सोडून समोरच्या एक एका माणसासामने उभे राहत चालले. प्रत्येकाला ती एक मूक समजच होती, “आम्ही काय सांगतो, ते शब्दाबरहुकूम पार पाडा.”

“प्रल्हादपंत, कार्तिकमास धरून सारंग दौलतखान, मायनाक, कान्होजी आंग्रे यांना आमच्या भेटीस येण्यास कळवा.”

आबाजी सोनदेवांना समोर बघताच राजांना भेटून गेलेल्या समर्थशिष्य दिवाकर गोसाव्यांची आठवण झाली. त्यांच्या आवाजात एकदम सर्वांना जाणवेल असे मार्दव उतरले. “आबाजी, समर्थशिष्य दिवाकर बाकर गोसावी भेटून गेलेत आम्हाला. या घालमेलीत समर्थाच्या मठांना सनदा तवान्या करून देणं ते राहिलं आहे.”

“तुम्ही जावळीच्या काशी रंगनाथ, सातारातर्फेच्या कोनेर रंगनाथ, वाईच्या येसाजी मल्हार या सुभेदारांना चाफळ, शिंगणवाडी, सज्जनगड आणि महाबळेश्वराच्या मठांच्या, महाराजसाहेबांनी दिल्या सनदा तशाच पुढे चालत्या करण्यास लिहा.”

रघुनाथपंत हणमंते समोर येताच मात्र नेहमी त्यांच्या दर्शनाने प्रसन्न होणाऱ्या राजांच्या कपाळी आठी धरून आली. आपला काहीच माग न देता ते त्यांना म्हणाले,

“रघुनाथपंत, तुम्ही कर्नाटक प्रांती तातडीने कूच व्हा.”

“जी?” हणमंते चमकले. पण आवाज सुमार ठेवून हसत राजांनी त्यांना न बोलू देताच बगल दिली, “तुमच्यासारख्या मुरब्बी, जाणत्या असामीशिवाय दूरवरचा एवढा मोठा सुभा कोण राखणार पंत?”

“जशी आज्ञा.” रघुनाथपंतांनी कुणालाही न कळेल असा हलका नि:श्वास सोडला.

त्यांना वाटले तरी राजांनी तो टिपला होता. झाल्या कटात रघुनाथपंत हणमंत्यांनीही हातमिळवणी केलेली होती! आता उशिरा त्याचे धागे राजांच्या हाताशी आले होते. रघुनाथपंत कर्नाटकात पोचताच त्यांच्या हाती काढण्या चढणार होत्या!

राजांनी सर्वांना निरोपाचे विडे दिले. सर्वांबरोबर बाहेर जाणाऱ्या कवी कुलेशांना ते काही हेताने म्हणाले, “तुम्ही थोडे थांबा कविराज.”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment