महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,971

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५३

Views: 1382
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५३ –

संभाजीराजांनी ही सूचना अगदी सादिलवार होती, पण ती ऐकताना कित्येकांच्या मनात, ‘कानामागून आला आणि हा कानोजा भलताच तिखट झाला.’ अशी कुलेशांबद्दल मळमळ उठली असेल, हे काही राजांच्या ध्यानी आले नाही! कुलेशांसह राजे दरुणीमहालात येसूबाईच्या भेटीला आले. ‘गडावर नजर ठेवण्याची’ सूचना त्यांनी सदरेवर कुणाला केली नव्हती, ती युवराज्ञींना केली!

आपला बेत त्यांना खुला करीत राजे म्हणाले, “आम्ही या कविराजांना बरोबर घेऊन केळशीला अवलिया याकुतबाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. आबासाहेबांनी बाबांना केळशीला आणून स्थापन केले आहे. त्यांच्या सोबतीत आम्हाला बरे समाधान मिळेल. काही दिवस राहावं म्हणतो तिथं आम्ही.”

“जी. निर्धास्त जावं.” खरे तर येसूबाईना नुकत्याच पुराकडे गेलेल्या आपल्या दादासाहेबांशी – गणोजींशी झालेली चर्चा राजांच्या कानी घालायची होती; पण बरोबर कविजी असल्याने त्यांनी ती तशीच ओठांआड ठेवली.

संध्याकाळी निवडीचे पन्नास एक धारकरी सोबत घेऊन संभाजीराजे कुलेशांसह गड उतरले. पोटरीला आलेली भातखाचरे न्याहाळत केळशीच्या वाटेला लागले. केळशीला पाच दिवस मुक्काम करून याकुतबाबांच्या दर्शनाने आणि त्यांच्या हितोपदेशाने प्रसन्न झालेले संभाजीराजे रायगडी परतले. इंदुलकराने उठविलेल्या “सतीच्या वृंदावना’चे आणि “महाराजांच्या छत्री’चे दर्शन त्यांनी घेतले.

आता पावसाळा उलगला होता. शिवारात भातांना लोंब्या पडल्या होत्या. पिवळ्या आश्विनी उन्हावर पोपटी राने तळपू लागली. झाडांच्या निथळल्या, निळपट डेऱ्यांत कवडे, कुक्‍्क्डकोंबे घुमू लागले. भोरड्यांचे भरारते थवे रानावर उतरू लागले. पावसाळाभर गारठलेले मुठीएवढे काळे खेकडे बिळांच्या तोंडाशी येऊन मनसोक्त उन्हं पिऊ लागले.

नवरात्र आले. पडल्या खांड्यांचे रक्त प्यालेली धारी हत्यारे मर्द हातांनी कमरांना आवळली. दसरा सजवून चौवाटांनी मावळी फौजा पाचाडात एकवटल्या. पाऊण लाख लढाऊ मावळा तळाला जमला.

मानाजी मोरे, तुकोजी पालकर, संताजी-बहिर्जी घोरपडे, येसाजी कंक व त्यांचा बांडा मुलगा कृष्णाजी, धनाजी जाधव, केसो त्रिमल, नागोजी बल्लाळ, सर्जेरार जेधे, विठोजी चव्हाण, संताजी जगताप, दादाजी व भिमाजी काकडे, नारो त्र्यंबक, येसाजी मल्हार, नारोजी भोसला, नेमाजी गायकवाड, दादाजी नरसप्रभू असा बाका मर्दाना रायगड चढून आला.

मोगलाई, बागलाण, जव्हारपट्टी, वऱ्हाड अशा भागांत राजांनी फेकलेले बहिर्जी, निश्वास, कर्माजी हे चलाख खबरगीर सरलष्करांच्या इशारतीसाठी रायगडावर परतले सिंहासनसदरेला बड्या मसलतीची बैठक भरली. हंबीरराव, प्रल्हादपंत, आनंदराव, रूपाजी, निळोपंत, कवी कुलेश यांच्या मेळाने संभाजीराजे सदरेला येताच जमल्या बाक्‍यांनी अदब रिवाज दिला. रिवाजी भंडारापरडी फिरली.

राजांनी आस्थेने जमल्या सुभेदार, जुमलेदार, सरनौबतांचे प्रथम कुशल घेतले. सदरी असामीवर नजरफेक टाकताना त्यांचा ऊर भक्कम विश्वासाने भरून आला. बारीक-सारीक तपशिलांचा मनाशी मेळ घालताना त्यांचा हात छातीवरच्या माळेवरून फिरला. मोहिमेचा तडफदार मनसुबा खुला करीत, ते तोलाच्या वजनदार बोलीत म्हणाले, “तुम्ही अवघे मैदानी कामाचे बाके तितके जमावासुद्धा आलात. संतोष झाला. श्रींच्या इच्छेने हे राज्य आबासाहेबांनी उभविले. त्याच बळावर ते वाढीस घालणे आहे. आबासाहेब गेले असे मनी आणू नका. ते तुम्हा आम्हातच आहेत. आम्ही आहोत ती त्यांची पायधूळ! अवघे बरी हिंमत बांधोन हत्यार धरता, तर चौतोंडावरचा गनीम जेर होतोच आहे. तुम्ही साऱ्यांच्या जोरबळावर तीन आघाड्यांची भक्कम मोहीम खोलण्याचा बडा मनसुबा धरून आहोत आम्ही. येश देणार आई जगदंबा थोर आहे.” राजे मोहिमेचा तपशील देण्यापूर्वी क्षणभर थांबले. सदरकऱ्यांना थोरले स्वामीच स्मरले.

“रूपाजी, तुम्ही मानाजी, संताजींच्या मेळाने सात हजारांची दिमत घेऊन नाशिक भागात उतरा. साल्हेरचे हंसाजी आणि त्रिंबकगडाची, सोनगडाची ठाणी तुमच्या कुमकेला राहतील. तुमची फौज गाठीशी आहे. तिला केव्हाही उगवतीला वऱ्हाड-खानदेशच्या आणि मावळतीला जव्हार-किनारपट्टीला जोड देण्यासाठी दुतर्फा दौडावं लागेल, या बेतात असा. हूल मात्र सुरतेवर चालून येणार अशी बेमालूम ठेवा.”

“जी.” रूपाजी भोसल्यांनी जोखीम उचलली. मळवट भरला.

“निळोपंत, तुम्ही जव्हार, मनोर, गणेशगाव हा फाटा धरून रूपाजींची बगल राखा. दादाजी प्रभू, तुकोजी, सुधागडपासून कल्याण पावेतो लक्ष ठेवून किनारपट्टीचा सिद्दी उचल खाऊ म्हणेल त्यास दाबून तुम्ही जरबेत ठेवा. म्हलोजी, तुम्ही कऱ्हाडचे बेंकोजी रुद्र, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांची जोड ठेवून मिरजेच्या आदिलशाही ठाण्यावर लक्ष ठेवा.”

“जी.” आज्ञा झुलत्या हातांनी वरच्यावर तोलल्या गेल्या. साऱ्यांनी भंडारबोटं कपाळी घेतली.

“सरलष्कर, तुम्ही आनंदराव, केसो त्रिमल, नागोजी बल्लाळ, धनाजी अशा तुमच्या निवडीच्या असामींनिशी तीस हजार जात स्वार पाठीशी घेऊन वबऱ्हाड- खानदेश चटक्या छाप्यांनी टापांखाली घ्या. औरंगाबादेवर चालून जाण्याची सतत हूल ठेवा. बऱ्हाड राखण्यासाठी मोगली फौजा बऱ्हाणपूर सोडतील तेच मारून चालवायचे आहे!

आम्ही जातीनं बागलाणात उतरू. तुमच्या जोडीनं थेट बऱ्हाणपूर टापेत घेऊ!”

सर्व सदरकऱ्यांना मानवस्त्रे आणि निरोपाचे विडे देण्यात आले, पुन्हा परडी फिरली.

बऱ्हाणपूर! मोगली सत्तेने “दख्खन दरवाजा’ मानलेले मातब्बर ठाणे! छत्रपतींनी सुरतेची “बेसुरत’ केलीच होती, आता त्यांचे पुत्र बऱ्हाणपूरचे “विराणपूर’ करण्यासाठी पक्के खडे ठाकले!

बहिर्जी, कर्माजी जासूदपेरणीसाठी वऱ्हाडाकडे कूच झाले. विश्वास बागलाणात उतरला.

जनावरांची नालबंदी करून, रसद घेतलेल्या मराठी फौजा बयाजीनं सिद्ध झाल्या. रायगड उतरून राजे पाचाडात आले. मोहीमशीर सरदारांना ऊरभेट देऊन त्यांनी निरोप दिले. हंबीररावांना उरी भेटताना ते म्हणाले, “वऱ्हाड जरबेत घेताच आम्हाला हारकारा धाडा. आम्ही तुमच्या खबरेला डोळे लावून आहोत.”

“जी.” लाल मुंग्यांचे वारूळ फुटावे, तशा मराठी फौजा पाचाडाबाहेर पडल्या. फुटल्या. दौलतीचे खंबीर सेनापती हंबीर बऱ्हाड-खानदेशवर चालून निघाले.

आता गडावर अभिषेकाची तयारी सुरू झाली. दरबारी चौक, गडमंदिरे रंगोटीसाठी रंगाऱ्यांनी हाती घेतली. अंबारखान्याच्या धान्ययोणी वाळवण, पाखड-निवड यासाठी बाहेर पडल्या. नाशिकच्या ब्रह्मवृंदांना घेऊन अभिषेक-जले आणण्यासाठी बाळंभट राजोपाध्ये गड उतरले. शिष्यांच्या तांड्यासह उत्तरदेशाकडे रवाना झाले.

आठ दिवस उलटले आणि कर्नाटक प्रांतातून खबर आली. “जिंजीला रघुनाथपंत हणमंते पोहोचले आहेत.”

ती ऐकून बैठकीतल्या हरजींना राजे म्हणाले, “हे हणमंते आपले बंधू कोल्हापूरसुभा जनार्दनपंत यांच्या मदतीने आम्हाला पन्हाळ्यावर दस्त करू बघत होते, राजे. आम्ही तुम्हावर सोपवावी ती जोखीम हीच आहे कर्नाटकसुभ्याची. तुमच्यासारखा घरचा माणूस नामजाद करावा म्हणतो आम्ही कर्नाटकावर. हणमंते काढणीबंद होणार आहेत.”

हरजी “जी” म्हणाले; पण कसल्यातरी विचारात गेले. आपला खुला सल्ला देत म्हणाले, “आम्ही सोपवाल ती कामगिरी आपली मानू. पण रघुनाथपंत मुजुमदार ते दफ्तर मोलाचे. ते असे अखत्याराविना ठेवून कसे भागावे?”

राजांनी हसून निळोपंतांकडे बघत त्यांना नजरेनेच काहीसे फर्मावले. ते उचलत निळोपंत बाहेर गेले. राजे हरजींना म्हणाले, “मुजमूच्या दफ्तराची आम्ही व्यवस्था केली आहे. तुम्हालाही ती पसंद पडावी.”

हरजींना त्यांचा अंदाज येईना.

थोड्याच वेळात निळोपंत, अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी यांच्यासह राजांसमोर पेश झाले.

अण्णाजींची मान काही वर उठत नव्हती. बाळाजींना तर ‘आता काय आज्ञा होईल?” या चिंतेने पार घेरून टाकले होते. “अण्णाजी,” राजे त्यांच्यासमोर येत थांबले. “गर्दन वर घ्या अण्णाजी. आमच्या दौलतीच्या मुजुमदारांची मान नेहमी ताठ असावीसे वाटते आम्हाला!”

आपण स्वप्नात आहोत की भ्रमात, असेच क्षणभर अण्णाजींना वाटले. बोलावे म्हटले तरी त्यांना काही बोलवेना.

“तुमचा स्वभाव हिशेबी अण्णाजी. तुम्ही मुजमूला योग्य आहात. इथे कुणबाऊ रयतेला धारामाफीचा संबंध नाही. आम्ही हस्तक्षेप करण्याचा सवाल नाही. तुमचा वकूब जाणून मुजमूची अखत्यारी आम्ही तुम्हाला इतमामाने बहाल करतो आहोत. तुम्हावर आमचा कसलाही रोष-आकस नाही. तुम्ही आबासाहेबांच्या सुरनिसांना शोभेल असेच बोललात.” डोळ्यांत दुखरेपण दाटलेले राजे क्षणभर थांबले. “आम्हाला भली जाण दिलीत आम्ही केल्या गैर वर्तनाची. पठाणीगोटात गेल्याची. ती चूक निस्तरायला आम्ही आणभाकेनं बांधले आहोत. तुम्ही आबासाहेबांच्या हाताखाली धाराबंदी नमुन्याची बांधलीत. आता त्यांच्या मुजुमदारीचं दफ्तर मेळात घ्या.

आमचा विश्वास आहे तुम्ही निष्ठेनं सारं कराल.”

“जी.” मरणाची तयारी केलेल्या अण्णाजींना मरातब देणाऱ्या राजांसमोर काय बोलावे तेच कळेना.

“शक मात्र ध्यानी ठेवा अण्णाजी, मुजमूचा संबंध संपत्तीच्या हिशेबाशी आहे. आमच्या आणि बाळराजांच्या नातेसंबंधाचा हिशेब तो नाही कधी होऊ शकत! तेवढं सांभाळून असा.” राजे तसेच बाळाजींच्या समोर आले. कारण नसता त्यांचे मन खंडोजी आणि चिटणिसांची जोड ताडून गेले. “चिटणीस, तुमची देखणी लिखावट पारखून तुम्हास आबासाहेबांनी हाताशी घेतलं. तुम्हीही मगदुरानं दौलतीची कलमी सेवा केलीत. तुम्ही जुने, वडीलधारी. आमच्या बाबीनं पन्हाळ्यास जाणारा गुप्तखलिता रेखण्यास नकार दिलात तुम्ही. पण चिरंजीव आवजींना चिटणिसी शिक्के-मुद्रा देऊन त्याच कामासाठी मासाहेबांकडं धाडलं तुम्ही. तीन तऱ्हेच्या गफलती झाल्या यात तुमच्या चिटणीस. तुम्ही शिक्के-मुद्रा दुसऱ्या हाती दिल्या ही एक. जे स्वत:ला पटलं नाही ते चिरंजीवांना पटावं ही उमेद धरलीत ही आणि ना नकार ना होकार अशी तोड काढल्याच्या समाधानी भ्रमात राहिलात ही.

“चिटणीस, राज्याला दोन बाबी मोलाच्या : कलम आणि कट्यार. यांची परस्परांस जोड असेल, तरच दौलत नांदती राहते. वाढती-चढती होते. राजांना हत्यार दुसऱ्या हाती देऊन मैदान मारता येत नाही. चिटणिसांना कलम दुसऱ्या हाती देऊन दफ्तरी कारभार कधी राखता येत नाही! तुमच्या हाती कलम आहे, ते एक जबरी हत्यार. स्वत:लाच ते कारीगर होणार नाही, याची दक्षता घेऊन हाताळा! तुमची चिटणिसी आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक सुपुर्द करतो आहोत! ती त्याच जोखमीनं सांभाळा.”

“जी. आज्ञा.” बाळाजींना केल्या सेवेत हे असे काही कधी थोरल्या स्वामींकडून ऐकायचा प्रसंग आला नव्हता.

गले हरजींची मुद्रा समाधानाच्या तृस्तीनं उजळून निघाली. चिटणीस, मुजुमदार निघून गेले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment