महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,560

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५४

Views: 1377
8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५४ –

दाटून आलेल्या शांततेचा भंग करीत निळोपंत म्हणाले, “कऱ्हेपठाराच्या मोरेश्वर गोसाव्यांची फिर्यादी तक्रार आली आहे स्वामी.”

“कसली?”

“फौजेच्या असामी आपल्या माणसांना आणि शेतीवाडीला तजवीज देतात असं म्हणणं आहे गोसावीबुवांचं.”

राजांची चर्या किंचित कडवी-कठोर झाली. त्यांनी तपास घेण्यासाठी विचारले, “पठाराला नामजाद हवालदारी कुणाची पंत?”

“जिवाजी नारायणांची.”

“त्या जिवाजींना करडी समज द्या. गोसावीबुवांच्या माणसांस, सेतापोतास, गुराढोरांस काडीचीही तजवीज न देणे. फिरून बोभाटा आला तर एवढी ती गय धरली जाणार नाही!”

सोलापूरच्या किल्ल्यावरून हलविल्या जाणाऱ्या पंचवीस तोफा त्या भागातील मावळ्यांनी हस्तगत केल्याच्या बातमीने राजांना आठवण झाली. ते म्हणाले, “निळोपंत, सरलष्करांचा हारकारा येईल, त्यावर ध्यान ठेवा. आम्ही सोलापूर-सांगोला भागात उतरणार आहोत.”

निळोपंत नाशिकहून आलेले अनंतभट, केशव पंडित, उमाजी पंडित, कविजी यांच्यासह राजांच्या भेटीला आले. हातातील पसरत्या पंचांगावर एकदा अखेरची नजर टाकून अनंतभट म्हणाले, “येत्या माघ शुद्ध सप्तमीचा दिवस सर्व दृष्टींनी अभिषेकास शुभदायी आहे स्वामी. पंचमीपासून विधींना प्रारंभ करता येईल.”

“ठीक आहे. निळोपंत, या मुहूर्ताची आवतनं सिद्ध करा.”

“जी. फोंडा प्रांतातून भीमगडच्या हवालदार नागोजी इंगळ्याकडून एक शिफारस आली आहे स्वामी.” निळोपंतांनी दफ्तरी काम पेश घातले.

“कशाबद्दल आहे पंत?”

“भीमागडच्या तर्फेला नागोजी नाईक सरदेसाई राहतात. त्यांनी तांब्रांच्या हमल्यातून गडाभोवतीच्या खेड्यांची मर्दानगीने राखण केली आहे, त्यासाठी अंतरुज भागातील हेमाडबारसे, चंद्रवाडी गावठाणाची सरदेशमुखी त्यांना मेहर व्हावी, अशी शिफारस आहे भीमगडच्या हवालदारांची.”

“पंत, त्या हमल्याचा सारा करीणा हस्तगत करा. फोंड्याचे मुद्राधारी धर्माजी नागनाथ यांच्या सल्ल्याने जासुदांकरवी खातरजमा घेऊन मगच दस्तके करून द्या सरदेसायांना.”

“आज्ञा स्वामी.” निळोपंत मुजरा देऊन सर्वासह निघुन गेले. मोकळ्या बैठकीमहालात राजे पायफेर घेऊ लागले. पावलागणिक आठवणींची काटेफणी मनाचे ओरखाडे काढू लागली : लिंगाण्यावरून दरडीत कुडी झोकून दिलेली गोदावरी, चितेवर चढलेल्या निर्धारी मासाहेब, नगरच्या कोठीत कोंडून पडलेल्या दुर्गा… स्त्रीजीवन! केवढ्या कठोर परीक्षेला जुंपलेले!

राजांचे मन ठिबकू लागले. पीळ पडत जाणाऱ्या वेदनेला कडव्या संतापाचे रूप येत चालले. एकच एक थाप मनावर थडथडत आदळू लागली – “नगर – नगर!”

इतक्यात “दिवाकर गोसावी आल्यात.” ही पहाऱ्याने वर्दी आणली. राजांचा पायफेर थांबला. मंजुरीसाठी हात आपोआप वर झाला. दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, कफनीधारी दिवाकर गोसाव्यांसह आत आले. राजांनी गोसाव्यांचे कुशल घेतले आणि समर्थांबद्दल विचारले, “समर्थांचा मुक्काम कोठे आहे गोसावी? कसे आहेत ते?”

“सद्‌गुरू सज्जनगडी आहेत. थोरले छत्रपती गेल्यापासून वृत्ती उदास आहे.” दिवाकर गोसाव्यांनी उत्तर दिले. “गोसावी, तुम्ही जाताहात. तुमच्या सांगती आमचे राघो अनंत येतील समर्थांच्या दर्शनासाठी. बुवांना आमचा दंडवत सांगा. आम्ही माघ शुद्ध सप्तमीला अभिषेक घेतो आहोत. समर्थांचा कृपाहस्त आम्हाला लाभावा. आशीर्वाद देऊन आम्हास धन्य करावे. आता त्यांच्याखेरीज आशीर्वाद घ्यावा, असे कुणी नाही आम्हाला.” राजांची चर्या कष्टी झाली. दिवाकरांनाही ती जाणवली. त्यासाठीच ते आग्रहाने म्हणाले, “राजे, तुम्ही जातीनं आलात सज्जनगडी तर….”

“तेच योजून होतो आम्ही. पण आता आम्हाला केव्हाही गड सोडून वऱ्हाडात उतरावं लागेल. समर्थांना हे सांगा. राघो अनंतांना जाताना बरोबर घेऊन जा. पंडितराव, राघोपंतां बरोबर समर्थांना आमंत्रण देण्याची व्यवस्था करा. बुवांना मानवस्त्रे व देवास पोशाख, जवाहिर पाठवा.”

नमस्कार करून बाहेर पडणाऱ्या कफनीधारी पाठमोऱ्या दिवाकरांना बघताना एका विचित्र, किचकट विचाराने राजांना घेर टाकला – ‘बोहलं सोडून समर्थ लग्नमंडपातून निसटले. तप:साधना करून त्यांनी अनेक मठ उठविले. शिष्यगण तयार केला. दासबोध ग्रंथ सिद्ध केला. संसारी जगाबाबत निरिच्छ झालेल्या त्या थोर संतांना कधी मागे पडल्या आपल्या ठरल्या पत्नीची आठवण झाली असेल काय?’

दोन दिवस उलटले. वऱ्हाडातून हंबीररावांना हारकारा चांगली खबर घेऊन आला – “वऱ्हाड मांडाखाली धरला आहे. साहेबस्वारीनं निघोन यावं.”

येसूबाईंचा निरोप घेऊन संभाजीराजे, खंडोजी बल्लाळ, कृष्णाजी कंक, जानराव, हिंमतराव अशा निवडक सरदारांनिशी गड उतरून पाचाडात आले. पागेचा दहा हजार जीनबंद घोडा बाहेर पडला. उधळत्या टापांचे गर्जते भिरे निघाले.

भोर, पुणे, चाकण, खेड, नारायणगाव, संगमनेर, अहिवंतगड अशा मजला टाकीत, भीमा, घोड, प्रवरा, गोदावरी अशा नद्यांचे पाणी घोड्यांना दावीत राजे बागलाणात उतरले. इथे रूपाजी भोसल्यांच्या जासुदांनी बऱ्हाणपूरची उचललेली खबर मिळाली – “केवळ पाचशेच्या आसपास हत्यारी बऱ्हाणपूरच्या कोटाला आहे. वरकड लढाऊ वऱ्हाडात उतरला आहे.”

राजांनी आपल्या फौजेला तवानगीसाठी तळाची आज्ञा दिली. आणि हंबीररावांना निरोप पाठविला, “आता वऱ्हाड सोडा. धरणगाव-चोपडा असा खानदेश जवळ करा.”

हंबीरराव हुकुमाची तामिली करीत, हूल देत वऱ्हाडाबाहेर पडले. बहादूरखानाला धुमाकूळ घालणारे मराठे यकायक कुठे गायब झाले, त्याचा माग आला नाही. त्याने औरंगाबाद बळकट करून सुटकेचा सुस्कारा सोडला.

जालना, देऊळगाव, फर्दापूर, एरंडोल अशा ठाण्यांना जरब देत हंबीरराव फौजबंदीने धरणगाव-चोपडा भागात उतरले. बागलाणातून निघालेल्या संभाजीराजांनी त्यांचा मेळ घेतला. वऱ्हाडात मागे पेरलेली दहा हजारांची फौज वगळताही आता मराठी फौज तीस हजारांच्या दमात झाली. तो सेनालोळ थेट बऱ्हाणपुरावर चालून निघाला.

बऱ्हाणपूर म्हणजे पंचपक्कान्नांचा, मेहमानाची वाट बघत असलेला, वाढून ठेवलेला शाही थाळाच होता! मध्ये तटबंदी असा भातमुदीसारखा बालेकिल्ला, त्या भोवती उघड्यावरचे संपन्न व्यापारीपेठांचे सतरा पुरे! गोडधोडाच्या पदार्थांसारखे.

या दख्खन दरवाजाचा मोगली सुभेदार होता खानजमान. रिवाजाप्रमाणे खानसाहेब या समयी ठाण्याला मौजूद नव्हते! त्याचा नायब काकडखान्यात हजर होता. जिझिया वसूल करण्याचे फक्कड काम हा काकड करीत असे. आजवर केला वसूल सव्याज फेरभरणा करण्याची नौबत काकडवर आली होती. मराठी फौजेने बऱ्हाणपूरला येरगाटा टाकला. थंडीने अगोदरच काकडलेला काकडखान त्या थरकविणाऱ्या कल्लोळाने पुरता काकडून गेला. त्याने सोईचा मार्ग काढला. येतील तेवढी माणसं बालेकिल्ल्यात घेऊन तटाचे दरवाजे बंद करून टाकले! बाहेरचे मालवान व्यापारी पुरे चक्क मरणावर सोडले. हंबीरराव, नागोजी, केसो त्रिमल यांनी ते ताब्यात घेतले.

नबाबपुरा, खुर्रमपुरा शहागंज, शहाजहानपुरा, हसनपुरा सर्व पुऱ्यांचे सराफी आणि व्यापारी कट्टे लुटीला पडले. सोने, चांदी, मोत्ये, नगदी नाणी यांची कलमवार रास राजांच्या सामने बाजारचौकात ओतण्यात येऊ लागली. मोजदाद करून जागच्या जागी ती गोणीबंद करून त्यावर मोहरा चढविल्या जाऊ लागल्या.

काही मावळे बालेकिल्ल्याच्या तटाला शिड्या जोडून वर चढण्याची खटपट करीत होते. भक्कम, उंच तटामुळे ते साधत नव्हते. बिजलीसारखे जनावर फेकीत हंबीरराव शहराभोवती फेर घेत बाक्‍्यांना चेतना देत होते.

वरचा माल हस्तगत करण्यात पहिला दिवस गेला. पुढचे दोन दिवस खणत्या लावून “भूमिगत’ धन बाहेर खेचण्यात आले. तीन दिवस बऱ्हाणपूरभोवती व्यापारी पुरे पेटत होते. लक्षावधी गोणीबंद लूट मावळ्यांनी दख्खन दरवाजाबाहेर काढली होती.

तीन दिवस संभाजीराजे आणि हंबीरराव त्या हमल्यावर जागती नजर ठेवून भिरभिरत होते. एवढ्यात जासुदाकडून खबर आली, “औरंगाबादेचा बहादूरखान बळकट फौजेनिशी बाहेर पडला आहे. बऱ्हाणपूरची कुमक करण्यासाठी येतो आहे.”

ज्या रानवाऱ्याच्या झडपेने मावळे आले होते, त्याच चलाखीने प्रचंड लुटीसह त्यांनी जळके बऱ्हाणपूर बहादूरसाठी सोडले. किमती कापड, काचसामान अशा अनेक बस्तू वाहनांची सोय नसल्याने तशाच मागे सोडण्यात आल्या.

फौजेच्या दोन फळ्या करण्यात आल्या. लुटीचे डाग घेतलेली फौज पाठीशी घेत संभाजीराजे चोपडा-धरणगाव मार्गे पुन्हा बागलाणाकडे वळले. हंबीरराव, नागोजी व केसो त्रिमल पुन्हा पलटी मारून वऱ्हाडात घुसले.

बागलाणातील साल्हेरीवर एक मुक्काम करून संभाजीराजांनी तिथल्या सरहद्दीवरचे गाजियापूर हे ठाणेही मारले. अगणित संपत्ती घेऊन अहिवंतगड, रामसेज, पट्टागड असे मुक्काम टाकीत राजे रायगडाकडे निघाले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment