महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,45,984

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५५

By Discover Maharashtra Views: 1342 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५५ –

बऱ्हाणपूरच्या या धामधुमीत गुंतलेल्या राजांना मागे रायगडावर घडलेल्या एका छोट्या घटनेची दखल असायचे कारण नव्हते. राजांनी मुजुमदारी सुपुर्द केलेल्या अण्णाजींना सोयराबाईनी “समाचारा’साठी आपल्या महाली पेश घेतले होते. त्यांना निरोप देताना सोयराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या होत्या, “अण्णाजी, मुजुमदारीत भरून पावलेले दिसता तुम्ही!” असे सुखासुखी आणि महाराणी असून, प्रत्यक्ष रायगडावर चौकीबंद जीवन पचवायला सोयराबाई काही कोणीही नव्हत्या!

राजे रायगडी परतले आणि दोन नाराज करणारे वृत्तान्त त्यांना ऐकायला मिळाले. केशव पंडितांनी त्यांच्या कानी घातले, “काशीचे गागाभट्ट अभिषेक सोहळ्यास येऊ शकत नाहीत. आपण सिद्ध केल्या विधींनुसार अभिषेक समारंभ संपन्न करून घ्यावा. पाठवून दिलेल्या धर्मग्रंथाचा स्वीकार करावा, असे गागाभट्टांनी कळविले आहे.”

गागांनी “समनयन’ नावाचा धर्मशास्त्रावरील एक ग्रंथ राजांना पाठवून दिला होता. दुसरा वृत्तान्त होता सज्जनगडी समर्थांना भेटून आलेल्या राघो अनंतांनी आणलेला समर्थांनी निरोप दिला होता, “येणे होत नाही. आम्ही छत्रपतींना दिला कोदंड धारण करून सिंहासनारूढ व्हावे.” निरिच्छ समर्थ, महाराजांच्या अभिषेक समारंभालाही आले नव्हते. पंडित गागा तर दूरस्थच होते.

आमंत्रणे गेली होती. गडावर दुसऱ्या महाभिषेकाची तयारी जारीला लागली. बारा महाल, अठरा कारखान्यांची सजावट-रांगोटी सुरू झाली. रामजी दत्तो या कारागिराने घडविलेल्या सुवर्णी मानछत्राच्या पालखीसह संभाजीराजे कवी कुलेश, खंडोजी, उमाजी पंडित यांना घेऊन रायगड उतरले. कुलदेवता भवानीला ते छत्र अर्पून, तिची महापूजा बांधण्यासाठी प्रतागडी आले.

पोडशोपचारांत भवानीची पूजा बांधून, तिला मानछत्र अर्पण करून राजांनी मिटल्या डोळी, जोडल्या हातांनी पाठराख्या जगदंबेला आशीर्वाद मागितला, “सिंहासन थोर आहे. आम्ही लहान आहोत. तुमच्या आशीर्वादानंच ही जिम्मेदारी निभणार आहे आबासाहेबांना होते, तसे आमच्या पाठीशी कुणी नाही. आहात त्या तुम्ही एकल्या आम्हास परडीत घ्यावे. हाती येश भरावे. भुत्येपण रक्षून चालवावे.”

रात्री प्रतापगडावर आईच्या मानाचा गोंधळ मांडून, थोरल्या स्वामींच्या रोजपूजेच्या स्फटिक शिवलिंगावर सविध अभिषेक करवून, एक मुक्काम करून राजे रायगडी परतले. आता गडाला माणसांची अखंड रीघ लागली. वासुदेव, पिंगळे, बैरागी, फकीर, गोसावी फक्कड बिदागीच्या आशेनं गड चढून आले. त्र्यंबक, नाशिक, कऱ्हाड, करवीर, आळंदी अशा तीर्थक्षेत्रांचे ब्राह्मण रायगडावर आले. डेरे, शामियाने, कमानी, राहुट्या यांनी गडमाथा फुलून गेला. सिंदखेड, फलटण, शृंगारपूर, जिंजी, तळबीड अशा राजकुळाच्या रक्तसंबंधांच्या स्थळांहून आलेल्या पाहुण्यांनी रायगडाच्या इमारती गजबजून गेल्या.

बऱ्हाड-खानदेश, नागोजी व केसो त्रिमलांच्या हाती सोपवून हंबीरराव, आनंदराव निबाळकरांसह आले, बागलाणातून रूपाजी भोसले, संताजी गायकवाड मानाजी मोरे आले कोल्हापूरसुभ ल्हापूरसुभा डबीर जनार्दनपंत हणमंते, म्हलोजी घोरपडे, संताजी बहिर्जी घोरपडे, सरदार ‘ आले. कोकणपट्टीतून दादाजी रघुनाथ, मोरो दादाजी सारंग दौलतखान, कान्होजी गोर्विदजी काटे, मायनाक आले. मावळातून गोपाळ रायाजी, मालोजी इतबारराव, कंक, बांदल, सिलिमकर, सर्जेराव जेधे आले. हरजीराजे, अचलोजीराजे महाडीक, गणोजी-कान्होजीराजे शिर्के, पिलाजीमामा यांच्यासह येसूबाईंच्या मातोश्री आल्या.

समर्थशिष्य दिवाकर, चिंचवड, पाटगाव, मारुळ, कुरटे येथील मठांचे संतशिष्य आले. तुळजापूर, प्रतापगड, माहूर येथील देवीच्या मंदिरांच्या गायिका आल्या. देशोदेशींचे भाट, चारण, शाहीर, गायक, नर्तक, कवी आले. पन्नास हजारांवर माणूस राशीने गडाला दाटले. जागजागी मुदपाकाचे मंडप उठले. चुलवणांवर अन्नांचे हंडे रटरटू लागले. रायगडाला यात्रास्थानाचे स्वरूप आले. गडाच्या चित, लहाना, महादरवाजा, जगदीश्वर, शिर्काई, हनुमंत या मंदिरद्वारांना सुवर्णी पत्र्याने वेष्टित श्रीफलांची तोरणे लटकली. मंदिरमाथे तिकोनी भगव्या पताका मिरवू लागले. महादरवाजाच्या नगारखान्यावर निशाणकाठी धरत आभाळात चढलेला, थोराड, भगवा, जरीनकशीचा दौलतध्वज मावळवाऱ्यावर सळसळू लागला.

माघ शुद्ध पंचमीचा मंगळवार मंगलकलश घेऊन उमटला. विधींना प्रारंभ झाला. स्नान घेऊन ठेवणीचे तलम राजआसवाब परिधान केलेले संभाजीराजे, येसूबाईसह पेशवे निळोपंत पिंगळे, सुरनीस आबाजी सोनदेव, मुजुमदार अण्णाजी दत्तो, न्यायाधीश प्रल्हाद निराजी, सेनापती हंबीरराव व येसाजी कंक, डबीर जनार्दनपंत हणमंते, दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, वाकनीस रामचंद्र दत्तो त्रिमल अशा प्रधानमंडळाच्या मेळाने बालेकिल्ल्या बाहेर पडले. त्यांच्यापुढे बाळंभट राजोपाध्ये, अनंतभट कावळे आणि व्युत्पन्न ब्रह्मवृंद चालला. कवी कुलेश, केशव पंडित, उमाजी पंडित चालले.

वृद्धत्वाने थकल्या धाराऊला सोबत घेऊन येसूबाई मेण्यात बसल्या. त्या मेण्यामागून अनवाणी पावलांनी संभाजीराजे सर्वांसह आघाडी मनोऱ्याबाहेर पडले. हजारो माणसे त्यांचे दर्शन घेत होती. राजमंडळ रायगड उतरून पाचाडात आले. सर्व असामी थोरल्या मातोश्रींच्या छत्रीकडे चालल्या. राजोपाध्ये, अध्वर्यू अनंतभट यांनी मासाहेबांच्या छत्रीची सविध महापूजा बांधली. जिजाऊंच्या पदचिन्हांवर संभाजीराजे-येसूबाईंनी बेलफुलांच्या ओंजळी वाहिल्या. जोडीने छत्रीच्या पायरीला माथे टेकले. ती राजमने अनंत भावनांनी भरून आली.

ती दगडबंद छत्री अभिषेकी जोडप्याला मूक आशीर्वाद देत होती, “औक्षवान व्हा! विजयी व्हा. फुलबंत, फळवंत व्हा!” जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन राजमंडळ पुन्हा गडावर आले. जगदीश्वराजवळ हिरोजी इंदुलकराने उठविलेल्या महाराजसाहेबांच्या छत्रीची महापूजा बांधण्यात आली.

अभिषेकी जोडप्याने आबासाहेबांच्या पदचिन्हांवर बेलभंडारा वाहून त्यांच्यासमोर नम्रभावे माथे नमविले. ती चक्रवर्ती पदचिन्हे मूक, धीरगंभीर आशीर्वाद देत होती –

“धैर्यवान व्हा! पहिले सेवक आणि सर्वांत शेवटी तुम्ही राजे आहात, हे ध्यानी ठेवा. आयुष्यमान व्हा!”

सतीच्या वृंदावनाचे, गडदेव जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन संभाजीराजे बालेकिल्ल्यात परतले. आता शांतिहोमांना प्रारंभ झाला. पहिला होम होता विघहर्त्या विनायकाच्या शांतीचा. राजजोडप्याने गणेशमूर्तीचे सविध पूजन केले. एकवीस उंची वस्त्रे, अलंकार गणेशाला अर्पण करण्यात आले. एकवीस पक्कान्नांचा भोग गणनायकाला देण्यात आला. अथर्वशीर्षाच्या पवित्रमंगल मंत्रघोषांनी बालेकिल्ला भरून निघू लागला –

ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि। त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि। त्वं गुणत्रयातीत:| त्वं कालत्रयातीत:। गं गणपतये नम:।”

“विनायकशांती’नंतर ‘पुरंदरशांती’, ‘ऐद्रशांती’, “देवकशांती’, ‘मृत्युंजय’ असे शांतिहोम करण्यात आले. होमकुंडात अर्पिल्या जाणाऱ्या दूध, तूप, मध, काष्ठसमिधा यांच्या दरवळाने गडमाथा, शुचित प्रेरक झाला.

अनिष्टांचे सांत्वन करून, इष्टांना आवतन करीत पंचमीचा, होमहवनांचा दिवस डुबला. षष्ठीचा दानधर्माचा दिवस वर उठला. आज बुधवार होता. बालेकिल्ल्याच्या हमचौकात एका चौथऱ्यावर प्रशस्त पारड्यांची तुला सिद्ध करण्यात आली होती. ती पुष्पमाला आणि आंबवती, श्रीफलांनी सुशोभित करण्यात आली होती. तिचे पूजन करण्यात आले.

घंगाळातील घटिकापात्र डुबतीला लागले. तुलासंपन्न होण्याचा मुहूर्त आला. संभाजीराजांनी मोजड्या उतरल्या आणि ते तुळेला हळदीकुंकू वाहून चौथऱ्यावर चढले.

राजोपाध्यांनी त्यांना तुलेच्या दक्षिण पारड्यात बैठक घेण्यासाठी हातइशारा दिला. पवित्र मंत्रघोष उठू लागला. राजे दक्षिण पारड्याजवळ आले. काय वाटले कुणास ठाऊक, पण त्यांनी छातीवरची कवडीमाला उतरून ती राजोपाध्यांच्या हाती दिली आणि मगच पारड्यात पाय ठेवून वीर बैठक घेतली. वाम पारडे खणखणत्या सोनमोहरांनी भरताच दक्षिणपारड्याने भुई सोडली. महाबळेश्वरावर झालेले थोरल्या मासाहेबांचे, राज्याभिषेक समयी झालेली आबासाहेबांची, दोन्ही तुलादाने राजांना आठवली.

सुवर्णतुला झाली. मग चांदी, पितळ, तांबे, लोखंड, साखर, अठरा धान्ये, कापूस, नारळ, मीठ, गूळ, सुपारी, मसाले, तेले यांनी राजांच्या भारंभार तुला संपन्न करण्यात आल्या. महाराणी होऊ घातलेल्या येसूबाईंच्याही तुला जोखण्यात आल्या.

एक तुला धाराऊचीही करण्यात आली. राजजोडप्याने तुला झाल्या वस्तूंना हस्तस्पर्श दिले. दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितरावांच्या देखरेखीखाली त्या वस्तू भट, भिक्षुक, गोसावी, फकीर, बैरागी यांना दान करण्यात आल्या. वस्त्रे, धान्ये, मोहरा, गाई यांची दाने झाली. षष्ठीचा दिवस दानाने संतुष्ट झाल्या जिवांचे आशीर्वाद आपलेसे करीत डुबला.

माघ शुद्ध सप्तमीची पहाट रायगडावर फटफटू लागली. आज गुरुवार होता. महाअभिषेकाचा दिवस! गडइमारतींची अंगणे सुवासिनींनी सडे सिंचून रांगोळ्यांनी चितारली. दिवल्यांच्या रोषणाईनेव्यापारपेठ, बालेकिल्ला, जगदीश्वर, शिर्काईचे मंदिर असा सारा गडमाथा लखलखून निघाला. पहाट धरूनच अभिषेकविधींना प्रारंभ झाला.

नागरखाण्यावरून उठणारी नौबत, नगारा-चौघड्यांची मंद दुडदुड पहाटवाऱ्याच्या गारव्यात मुरू लागली. उपोषणाच्या व्रतात असलेले संभाजीराजे व येसूबाई हे राजजोडपे सरंजामी मेळाने बालेकिल्ल्याच्या खासेवाड्याबाहेर पडले. मंत्रित धाग्यांनी फेर घालून सिद्ध केलेला सुवर्णकलशांचा अभिषेकचौक आला. त्या आखीव अभिषेकचौकाच्या पूर्वदिशेला सुवर्ण घृतकलश घेऊन मुख्यप्रधान निळोपंत पिंगळे, पश्चिमेला दह्याचा ताम्रकलश तोलून अमात्य अण्णाजी दत्तो, उत्तरेला मधाचा सुवर्णकलश घेऊन दानाध्यक्ष मारेश्वर पंडितराव, दक्षिणेला दुधाचा रौप्यकलश घेतलेले सेनापती हंबीरराव, ईशान्येला प्रतीकरूप सोनेरी न्यायतराजू तोलून धरलेले न्यायाधीश प्रल्हाद निराजी, आग्रेयीला मोतीलगाचे छत्र उंचावून धरलेले सचिव आबाजी सोनदेव, नैर्त्रत्येला सुवर्णमुठीचा पंखा घेतलेले सुमंत जनार्दनपंत हणमंते आणि वायव्येला सोनमोर्चेल हाती धारण केलेले मंत्री रामचंद्र दत्ताजी त्रिमल असे अष्टदिशापालांसारखे अष्टप्रधान हारीने उभे राहिले. त्यांच्या सोबत बाळाजी आवजी, कवी कुलेश, केशव पंडित,

उमाजी पंडित, येसाजी कंक अशा असामी उभ्या राहिल्या.

चौकात मांडल्या दक्षिण सोनचौरंगावर संभाजीराजे व वाम सोनचौरंगावर येसूबाई पूर्वाभिमुख बसल्या. ब्राह्मण अभिषेकमंत्रांचा अखंड उद्घोष करू लागले. मुर्हर्त धरून राजजोडप्याला प्रथम पंचामृताचे स्नान घालण्यात आले. दूध, तूप, दही, मध अशा समृद्धि-रसांचे स्रानानंतर मंत्रभारित असे ससनद्यांचे पवित्र शुद्धोदक संभाजीराजे आणि येसूबाईंच्या मस्तकावर मंत्रघोषांच्या उद्वगायनात सिंचले जाऊ लागले.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment