धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५६ –
अभिषेक होताच काश्याच्या परातीतील कढीव तूपरसात राजमुद्रांनी आपले मुखदर्शन घेतले. तिकडे सिंहासनचौक माणसांनी नुसता गजबजून गेला होता. राजदर्शनासाठी आतुरली प्रजा दरबारीचौकात दाटीवाटीने उभी होती. संभाजीराजे खासेवाड्यात आले. येसूबाई आपल्या महाली निघून गेल्या. राजे सिंहासनावर आरूढ होताना परिधान करण्याचा खासा पेहराव चढवून सिद्ध झाले. नमस्कार करून त्यांनी पुष्पमालांनी मंडित कोदंड खांद्यावर चढविला. बाणयुक्त भाता त्यांच्या पाठीशी येईल असा बांधण्यात आला. कमरेला भवानी चढली.
जोत्याजी केसरकराने समोर धरल्या दर्पणात निरखताना त्यांना आपलेच रूप आगळे वाटू लागले. मस्तकी गर्द केशरी टोप, अंगी चुणीबाह्यांचा, जरी कोयऱ्यांचा, श्वेतवर्णी, तलम जामा, त्यावरून फिरलेले जरीकिनारी, पीतांबरासारखे उपरणे, कंठात रत्नजडित हार व मोतीकंठे, त्यांना घेर टाकलेली भवानीमाला, कानी चौकडे, कपाळी शिवगंध, कमरेला आवळलेला तलम-गर्द निळा शेला, ठिबक्यांचा चुणीदार मांडचोळणा, खांद्यावर कोदंड, कमरेला भवानी तलवार, दाट दाढीमिश्यांची, कमानी भुवयांची, पुखरतेजी डोळ्यांची, फरीमाटाची, पुष्ट मुद्रा दर्पणातून त्यांनाच शांतपणे म्हणत होती – “संभाजीराजे भोसले, आम्हास नीट पारखून ठेवा! आम्ही मराठी दौलतीचे अभिषिक्त छत्रपती आहोत. शककर्त्यांचे वारस आहोत, तुमच्या आमच्या नात्याची कधी चुकूनसुद्धा गफलत होऊ देऊ नका!” आजवर कधीच न उमटलेला आगळाच राजगंभीर भाव संभाजीराजांच्या मुद्रेवर तरारून आला.
गर्द जांभळा, सोनबुट्ट्यांचा शालू ल्यालेल्या, सुवर्णी कमरबंद कसलेल्या, मोतीबंद नथ नाकी शोभणाऱ्या, आडवे कुंकुपट्टरे कपाळी धारण केलेल्या येसूबाई खासेवाड्यात येत होत्या. त्यासुद्धा संभाजीराजांना नेहमीच्या श्रीसखी येसूबाई वाटेचनात!! आघाडीला अब्दागिरे, गुर्थबारदार, चवरीवाले, अलकाबे ठेवून, अष्टप्रधान, ब्रह्मवृंद यांच्यासह संभाजीराजे आणि येसूबाई खासेवाड्यातून सिंहासनचौथऱ्याला मिळणाऱ्या राजमार्गाने चालले.
अष्टप्रधानांनी सिंहासनाचे आपापले मानकरी सोनखांब घेतले. येसूबाई आडपडय्यांच्या राणीवशात गेल्या. सिंहासनारोहणाचा सुमुहूर्त होताच राजोपाध्ये व अनंतभट यांनी “’राजआसन आपले करावे’, अशा अर्थाने राजांना हात केला. कोदंडधारी सिंहासनाचे दक्षिण पाऊल पुढे घेत, राजआसंदीला पदस्पर्श होणार नाही अशा दक्षतेने त्या पूर्वाभिमुख, सुवर्णी सिंहासनावर आरूढ झाले. मंत्रघोषांनी सिंहासनचौथरा न्हाऊन निघू लागला. पेशवे निळोपंत ओंजळीत सोनमोहरा घेऊन राजदंडधारी स्वामींना सुवर्णल्नान घालू लागले. अनंतभटांनी मोतीलग छत्राला हातस्पर्श दिला. संभाजीराजांनी छत्रपतिपदाचा स्वीकार केल्याची ग्वाही देण्यासाठी हातपंजा उठविताच मानकऱ्यांनी दाटला दरबार रिवाजासाठी लवला.
गुर्शबारदारांनी हातीचे सुवर्णी, गुर्थबी दंड उचलून तिबार आपटत खड्या आवाजीत अलकाबी ललकाऱ्या दिल्या.
“राजश्रियाविराजित, सकल राजलक्ष्मीअलंकत, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशहा, श्रीमन्महाराज संभाजीराजे – निग्गाह – निग्गाह अदब!”
तोफांची भांडी, बंदुका, उबळ्या कडकडत ‘निग्गाह ठेवत, अदब राखत’ मराठी दौलतीच्या दुसऱ्या छत्रपतींना मानमुजरा देऊ लागल्या. दरबारचौकात देशोदेशीच्या चारण, भाट, शाहीर, कवींनी ‘शंभूस्तुती’च्या कवनांचे एकामागून एक फड धरले. पंडित जीवनतत्त्वावर वादविवाद लढवू लागले, नर्तिका दरबारीमुद्रेचे नृत्याविष्कार करू लागल्या. सारा सिंहासनचौक कसा संमिश्र कोलाहलाने भरून गेला.
न्यायाधीश प्रल्हादपंतांनी राजमुद्रेचे सुवर्णतबक महाराजांच्यासमोर धरले. त्याला महाराजांनी हात लावून ती मुद्रा आपली केली. त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता
“श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव जायते।
यदंक सेविनो लेखा वर्तते कस्य नोपरी।।”
महाराजांनी अष्टप्रधानांना मानवस्त्रांची भरगच्च तबके बहाल केली. कवी कुलेशांना राजआसनासमोर पाचारून त्यांच्या खांद्यावर मानवस्त्रे ठेवीत महाराजांनी त्यांना किताबत मेहर केली – “छंदोगामात्य.”
महाराजांनी दिलेले एक मानतबक राणीवशातील महाराणी येसूबाईच्याकडे सेवेला रुजू होण्यासाठी चालले. त्या तबकात येसूबाईची महाराणी म्हणून, पत्नी म्हणून, जीवनसोबतीण म्हणून कदर करणारी अखत्यारी मुद्रा होती. त्या मुद्रेवर कोरीव शब्दलेख होता, “श्री सखी राज्ञि जयति।।
महाराजांनी जमल्या कलावंतांना कदर म्हणून वस्त्रे, होन, अलंकार बहाल केले. जमल्या रयतेला प्रत्येकी तीन होन देण्यात आले. कुतुबशाही, आदिलशाही, फिरंगी, टोपीकर, वलंदेज, डींगमार दरबारातून आलेल्या वकिलांनी महाराजांना नजराणे पेश केले. त्यांना फेरनजराणे देण्यात आले.
छत्रपती संभाजीमहाराज रायगडच्या सुवर्णी सिंहासनारूढ उगवतीला डोंगरकडांवर उठून दिसणारे सूर्य निरखू लागले. त्या बिंबात जशी मुद्रेची अक्षरे सोनवर्णात फेर धरत होती –
“श्री शंभो: शिवजातस्य – शिवपुत्र शंभूराजाची ही मुद्रा, द्यौरिव जायते – तेजस्वी राजमुद्रा शोभून दिसते आहे. यदंक सेविनो लेखा – राजअंकित अशा या मुद्रेची अधिकारसत्ता, वर्तते कस्य नोपरी? – कोणावर चालत नाही?”
राजइतमामात हा दुसरा महाअभिषेक रायगडावर संपन्न होत होता; पण या अभिषेकावर मूक बहिष्कार ठेवलेल्या सोयराबाई रामराजांसह आपल्या महाली होत्या. रामराजांना कसलाही विधी करू देण्यास त्यांनी स्वच्छ नकार दिला होता.
सिंहासनी बसल्या संभाजीराजांसमोर सूर्यरूपाने टळटळीत सवाल खडा होता.
“जलाभिषेक घेतलेला आपला माथा आशीर्वादासाठी ठेवावा तो कुणाच्या बडीलधाऱ्या चरणांवर?”
आठ दिवस उलटले. उत्तरेतून आल्या दोन वृत्तांचा विचार महाराज आपल्या मनाशी एकटेच पडताळून बघत होते. राजस्थानात सुभेदार असलेल्या औरंगजेबाच्या चौथ्या पुत्राने – अकबराने बगावत करून स्वत:ला ‘स्वतंत्र बादशहा’ म्हणून घोषित केले होते. त्याला या कामी मदत केल्याचा आरोप ठेवून औरंगने आपली कुवार मुलगी झेबुन्निसा हिला सलीमगडाच्या कोठीत कैद करून टाकले होते.
महाराजांचे कविजी बोलत असलेल्या विषयाकडे ध्यान नव्हते. महाराजांसमोर कविजींच्या जोडीने प्रल्हाद निराजी व केशव पंडित खडे होते. जोत्याजी केसरदार वर्दी घेऊन बैठकी महालात आला. “समर्थशिष्य दिवाकर गोसावी आल्यात. बुवांचा काही खलिता हाय त्यांच्यासंगं.”
“घेऊन या त्यांना.” महाराजांच्या हातचे गुलाबपुष्प थिरावले.
जोत्याजी दिवाकर गोसाव्यांना घेऊन आत आला. गोसाव्यांनी नांदी देत झोळीतील थैली बाहेर काढली व ती महाराजांच्या हाती दिली. ती आदराने कपाळी लावून प्रल्हाद निराजींच्या रोखाने धरत महाराज म्हणाले, “न्यायाधीश, वाचा. समर्थांचा आशीर्वाद काय आहे ऐकू द्या आम्हाला.”
प्रल्हादपंतांनी पुढे होत थैली स्वीकारली. आतील खलितावळी बाहेर घेऊन कपाळी लावल्यानंतर न्यायाधीश स्पष्टोज्ञारात समर्थांचे गोसावीबोल वाचू लागले –
“अखंड सावधान असावे| दुश्चित्त कदापि नसावे।
तजवीजा करीत बैसावे। एकांत स्थळी।।
काही उग्रस्थिती सांडावी। काही सौम्यता धरावी।
चिंता लागावी पराची। अंतर्यामी।।
मागील अपराध क्षमावे। कारभारी हाती धरावे।
सुखी करूनी धाडावे। कामावरी।।
वाचते प्रल्हादपंत क्षणभर थांबले. ओठांवरून जीभ फिरवीत त्यांनी एकदा भराचा दम प्रथम घेतला. सावधपणे ते एक-एक शब्द पुन्हा वाचू लागले. गिर्दी सोडून पुढे झालेले महाराज मिटल्या डोळ्यांनी ते संन्यस्त शब्द एकचित्ताने ऐकू लागले.
“पाटांतील तुंब निघेना|। तरी मग पाणीच चालेना।
तैसे जनांच्या मना। कळले पाहिजे।।
जनांचा प्रवाहो चालिला। म्हणिजे कार्यभाग आटोपला।
जन ठाई ठाई तुंबला। म्हणिजे खोटे।।
श्रेष्ठी जे जे मेळविले। त्यासाठी भांडत बैसले।
तरी मग जाणावे फावले। गनिमासी।।
ऐसे सहसा करू नये। दोघा भांडण तिसऱ्या जय।
धीर धरूनी महत्कार्य। समजोन करावे।।
राजी राखता जग। मग कार्याची लगबग।
ऐसे जाणोनि सांग। समाधाने करावी।।
आरंभीच पडिली धास्ती। म्हणिजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणे समस्ती। बुधी शोधावी।।
सकळ लोक एक करावे। गानिमा लाटून काढावे।
येणे करिते कीर्ती धावे। दिगंतरी।।
आधी गाजवावे तडाखे। तरी मग भूमंडळां धाके।
ऐसे न होता धके। राज्यासी होती।।
समय प्रसंग ओळखावा। राग निपटून सांडावा।
आला तरी कळो न दावा। जनांमध्ये।।
राज्यामध्ये सकळ लोक। सलगी देऊनी करावे एक।
लोकांच्या मनामध्ये धाक। उपजो चि नये।।
बहुत लोक मेळवावे। एक विचारे भरावे।
कष्ट कर्रूने घसरावे। म्लेंछावरी।।
आहे तितुके जतन करावे। पुढे आणिक मेळवावे।
महाराष्ट्राज्यचि करावे। जिकडे तिकडे।
लोकी ही हिमती धरावी। शर्तीची तलवार करावी।
चढती वाढती पदवी। पावाल येणे।॥
प्रल्हादपंतांनी उपरण्याने चा घाम निपटून घेतला. त्यांचे भावगंभीर झालेले डोळे ते अर्थमय शब्दमोती ट्पि लागले. समर्थांच्या चिंब भावेनेने, श्रीरामाच्या तीर्थात डुबून आलेले बोल महालाच्या दगडबंद भिंतीनाही पाणवू लागले –
“शिवराजासी आठवावे। जीवित्व तृणसमान करावे।
इहलोक परलोकी तरावे। कीर्तिरूपे।।
शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप।
शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी ।।
शिवराजाचे कैसे बोलणे| शिवराजाचे कैसे चालणे।
शिवराजाची सलगी देणे। कैसे असे।।
सकळ सुखाचा त्याग। कर्ख्ने साधिजे तो योग।
राज्य साधावया लगबग। तैसी करावी।।
त्याहून करावे विशेष। तरीच म्हणावे पुरुष।
या उपरी आता विशेष। काय ल्याहावे।।”
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५६.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.