धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५७ –
महाराजांच्या नेत्रकडा पाणावून आल्या होत्या. भोवतीच्या कुणालाही त्या दिसू शकत नव्हत्या. हात उठवून महाराजांनी तो पत्रबोध पंतांना पुन्हा वाचायला लावला. त्या शब्दाशब्दाने आपल्या आयुष्यातील एका चुकल्या दैवयोगाची सर्वांत खोलवर कळ महाराजांना छेदून गेली. तडफडते मन मूकपणे म्हणून गेले, ‘समर्थ, सज्जनगडी तुमची आमची भेट होती, तर ह॒यातीतील सर्वांत मोठा काळिमा चुकला असता आमचा!’
“काही उग्रस्थिती सांडावी – काही सौम्यता धरावी” खरेच आम्ही उग्र आहोत? की सर्वांना तसे वाटतो? समर्थांनाही? त्यांची तरी काय चूक? जे कानी पडले त्याला धरूनच त्यांनी स्पष्ट बोध दिला. आम्ही कटाच्या असामी दस्त केल्या हे सत्य आहे. समर्थांनाच का रामराजांनाही नाही का वाटले की, आम्ही महाराणी मासाहेबांवर हत्यार धरू म्हणून? रायगडाहून पन्हाळ्याला काय मजकुराचे खलिते गेले होते, हे समर्थांना कसे कळावे? आम्ही दस्त झालो असतो तर… तर हा खलिता लिहिण्याचा योगच समर्थांना नसता आला!
“मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे” समर्थ, आम्ही हे केलेच आहे. हाती धरले कारभारी आमचे हात बळकट करतात की लुळे पाडतात, हे सिद्ध व्हायचे आहे. त्याचीही वाट बघू आम्ही.
“पाटांतील तुंब’ उखडून काढण्यासाठी आम्ही हात घातलेच आहेत. आमचे दोन हात त्यासाठी नाही पुरे पडणार, हे आम्ही जाणतो. ते हात हयातभर पाण्यातील तुंब काढण्यासाठी, पाणी खेळते राखण्यासाठी आम्हाला राबवावे लागले, तरी त्यासाठी मनाची बांधणी करून सिद्ध आहोत आम्ही. संत-महंत, लढवय्ये, कलमबाज सर्वांना राजी राखण्यासाठी हरकोशिश करतो आहोत. भोवती टपल्या गनिमांच्या बाबतीत सावधच आहोत आम्ही. एक खरे आहे, वावगे काही सोसवत नाही आमच्या वृत्तीला. आला राग सर्वांसमक्ष साफ बोलू दाखवतो आम्ही.
“हे महाराष्ट्र राज्य ‘जिकडे तिकडे’ करण्यासाठी आयुष्याचा पट मांडून आम्ही खडे आहोत. आम्ही स्वत:ला छत्रपती मानीत नाही. या राज्याचे सेवकच मानतो.
“आबासाहेबांचे रूप, बोलणे, चालणे, राज्यकारभाराची लगबग तर अहोरात्र आमच्या धमन्यांतून रक्तमार्गी फिरते आहे. असा एक दिवस उमटत नाही, ज्या दिवशी आमच्या मनश्चक्षूंना त्यांचे, थोरल्या आऊंचे, सती गेल्या मासाहेबांचे दर्शन होत नाही. आम्ही शक्य ते-ते करू. पण केवढेही केले तरी आबासाहेबांहून “विशेष’ ते होणे नाही. आम्हालाच काय कुणासही ते शक्य नाही. आम्ही आबासाहेब नाही. केवळ त्यांच्या रक्ताची एक सावली आहोत! सावली आकृती कशी व्हावी? आबासाहेबांनी बरड जहागिरीतून हे राज्य उठविले. ते यश त्यांच्या नावाला साजेसे. आम्ही हे राज्य राखण्या-वाढविण्यात यशस्वी ठरलो, तरी स्वत:ला धन्य मानू. प्रसंगी त्यासाठी खर्ची पडलो, तर मालुसरेकाका, बाजी मुरारराव, गुजरकाका यांच्यासारखे कृतार्थ होऊ.
“समर्थ, आपल्यासारखे “दुसरे समर्थ’ आपण सिद्ध केल्या अकरा मारुतींना, आपल्या शिष्यगणांतून बघायला मिळतील काय? हे तरी कुणी व कसे सांगावे? सृष्टीला आपल्यासारखी, आबासाहेबांसारखी गोमटी स्वप्ने रोजाना नाही पडत. तुमच्या पिढीने घालून दिल्या पायवाटेनं आखरी श्वासापावेतो चालण्याचं भाग्यही काही कमी मोलाचं नाही. आपले आशीर्वाद आम्हाला शिरसावंद्य आहेत.’
विचारच विचार दाटून आल्याने महाराज बैठक सोडून उठले. “प्रल्हादपंत, गोसावीबुवांची व्यवस्था निसबतीनं बघा.” न्यायाधीशांना सांगून त्यांनी त्यांच्याकडून समर्थांचा मौल्यवान आशीर्वादी खलिता आपल्याकडे घेतला. काही न बोलता ते अंत:पुराकडे चालले. आत पिलाजीमामा, गणोजी-कान्होजीराजे व येसूबाई होत्या.
महाराजांना बघून पिलाजीमामा म्हणाले, “आता निगावं म्हन्तो आमी पुराकडं.”
“का? कंटाळलात गडाला?” महाराज त्यांना हसत म्हणाले.
“तसं न्हाई, आता अबिषेक जाला. संगती कबिल्याची जोखीम… तवा.”
“आमच्या बाबीचा तेवढा निवाडा द्यावा महाराजांनी म्हणजे कागदपत्रे घेऊनच निघून आम्ही.” गणोजीराजांनी येसूबाईशी चालत्या चर्चेचा मुद्दा पटावर घेतला.
“कसला निवाडा म्हणता राजे?” महाराजांची कपाळपट्टी वर चढली.
“थोरल्या स्वामींनी शिरकाणाचं वतन आमच्या नावे करून देण्याचं वचन दिलं होतं. तुमच्या-आमच्या साट्यालोट्याच्या लग्नकार्यात!” गणोजींनी मतलब सांगितला. “काय सांगता तुम्ही राजे? आबासाहेब तर नवे वतन देण्याविरुद्ध काटेकोर होते.” महाराजांची मुद्रा गंभीर झाली.
“तुमच्या सूनबाईंना मुलगा झाला की, पुराचे वतन तुमच्या नावे करू म्हणाले होते थोरले धनी. आपल्या कन्यावारसाला चोळीखणासाठी ही मोईन करून द्यावी, असा इरादा होता स्वामींचा. आता गणोजींना मुलगा झालाय तवा…” पिलाजींनी जुना करीणा सांगितला.
“मामासाहेब, गणोजी आहेत तसेच महादजी, हरजीराजेही जावई आहेत आबासाहेबांचे. सर्वांनी असाच वतनासाठी शब्द घातला तर? तुम्ही घरचे आहात. हे समजून घ्या. गणोजी-कान्होजींना आम्ही दौलतीच्या सेवेत त्यांना साजेशी जागा देऊ. नव्या वतनाचा आग्रह नका धरू. त्यानं आणखी कटकटी उभ्या राहणार.”
“महाराणींचा काय सल्ला आहे?” येसूबाई रक्ताच्या नात्याने कौल देतील या भ्रमाने गणोजीराजांनी त्यांना बोलते करण्यासाठी सवाल केला.
“स्वारींचा निवाडा रास्त वाटतो आम्हास! नव्या वतनाचा आग्रह आणि तोही घरच्यांनी या बख्ती धरणे रिवाजी नाही. आबासाहेब आज असते, तर त्यांनीही आज हाच निवाडा दिला असता.” येसूबाईंच्या उत्तराने गणोजीराजे चरफडले. कडवटपणे बोलून गेले, “म्हणजे भोसल्यांनी दिला शब्द तोडला असंच मानायचं काय आम्ही?”
“शिर्के!” संभाजीराजांच्या डोळ्यातील भाव पालटले. हातच्या समर्थखलित्यातील शब्द मनात फिरले, “राग निपटून सोडावा! आला तरी कळो न द्यावा! जनांमधी!” मोठ्या निकराने त्यांनी स्वत:ला सावरले.
“आम्ही समजलो काय ते! निघतो आम्ही. आबा, चला. आता इथं पाणीसुद्धा घ्यायला थांबायचं नाही आम्हाला.”
गणोजीराजे तडक बाहेरही पडले. मागोमाग पिलाजीमामा आणि कान्होजी मुकाट बाहेर पडले. येसूबाई आणि महाराज ख्िन्नपणे ते गेलेल्या रित्या दरवाजाकडे बघत राहिले.
“समर्थ, पाटांचा तुंबा कसा निघावा? पाणी कैसे खेळते राहावे? वाशांनाच घर परके वाटले, तर ते तरी कैसे नांदावे?’ सुत्षपणे संभाजीराजे हातच्या खलित्याकडे बघत राहिले. त्यांना काही सुचेना!
“धक अर्जी आहे. आज्ञा होईल तर…” पेहरावसिद्ध महाराजांच्या हाती म्यानबंद कट्यार देताना येसूबाई म्हणाल्या.
“बोला, काय आज्ञा आहे?” महाराजांनी हसत येसूबाईचाच शब्द फिरविला.
“सारं निर्वेध पार पडलं. आता पाचाडी एक राजमंदिर उठावं वाटतं. वाडीला मंदिर नाही.”
येसूबाईंना दिल्या राजमुद्रेचा लेख महाराजांच्या मनी फिरला – “श्री सखी राज्ञि जयति।”
२दरवानाला याद फर्मावून त्यांनी हिरोजी इंदूलकराला बोलावून घेतले. त्याला आज्ञा देण्यात आली, “हिरोजी, पाचाडी चखोट जागा पारखून राजमंदिराचा पाया घ्या. बांधकाम निवडीच्या घडीव दगडांचे धरा.”
“जी.” हिरोजी मनोमन मंदिराचा आराखडा रेखतच बाहेर पडला.
बाहेर उभ्या असलेल्या जोत्याजी, अंतोजी-रायाजी यांच्या मेळाने महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले. सदरेला अष्टप्रधान कविजी, हरजीराजे, शामजी नाईक अशी मंडळी होती. महाराजांनी सर्वांचे कुशल घेतले, हंबीरराव आणि आनंदराव वऱ्हाड- खानदेशात चौथाई वसुली आणि मुलूखगिरीला निघून गेले होते.
“डिचोलीच्या मोरो दादाजींचा माणूस आला आहे. फिरंग्यांनी आपल्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत असा निरोप आहे त्यांचा.” निळोपंतांनी महत्त्वाची बाब महाराजांच्या कानी घातली.
“मोरो दादाजींनी त्यांची माणसे व तो व्यापारी खुला केला की नाही पंत?”
महाराजांनी फिरंग्यांशी मतभेद येणाऱ्या प्रश्नाचे मूळ धरले.
“जी, नाही. त्यामुळेच विजरई नाराज झाला आहे.”
“मतलब? आम्ही सुभेदारांना ती माणसं मोकळी करण्यास सांगितलं होतं. मोरो दादाजी सुभ्याचे पूर्ण अखत्यार मानतात की काय स्वत:ला? त्यांना लिहा, आम्ही जातीनं डिचोलीला येणार आहोत! ”
“जी. फिरंगी दरबारात एक महत्त्वाचा बदल झाला आहे स्वामी. पूर्वीचा विजरई अंतोनिओ बदलून त्याची जागी कोदि द आलव्होरची नेमणूक झाली आहे. अद्याप नवा विजरई गोव्यात आला नाही.”
“आपले रायाजी पंडित आहेत गोव्यात. त्यांना नवा विजरई येताच खबर द्यायला कळवा.” आज ना उद्या पिरंग्यांशी, हबश्यांशी झगडा द्यावाच लागणार. त्यासाठी कुडाळ, डिचोली भागात आताषीचे कारखाने उभे केल्याशिवाय तड लागणार नाही, हा विचार महाराजांच्या मनात घोळत असतानाच निळोपंतांनी वृत्तान्त दिला.
“बादशहानं सुरतेत आपल्या मुसलमानी रयतेवरही कर बसविला आहे. बऱ्हाणपुरावर इरजखानाची सुभेदार म्हणून नामजादी केली आहे महाराज.”
या वृत्ताने महाराज गंभीर झाले. बहाणपूरहून राजस्थानात असलेल्या औरंगजेबाला झाल्या लुटीचे खलिते गेले होते. जुम्मा रोजची नमाजसुद्धा बंद पडते की काय, अशी शंका बऱ्हाणपूरकरांनी बादशहासलामतला कळविली होती. त्या शहराभोवती तटबांधणीचे हुकूम औरंगजेबाने जारी केले होते. आपल्या बंडखोर मुलाचा – अकबराचा काटा काढण्यासाठी औरंगजेब राजस्थानात गुंतून पडला असला, तरी तो स्वस्थ बसणार नव्हता.
“पंत, मोगलाईच्या तोंडावरच्या किल्लेदारांना ठाणी रसदबंद करून सावधानगीने राहण्यास कळवा. सगळ्या तर्फांच्या सुभेदारांना फौजेची नौसंचणी जारी करायला लिहा. बऱ्हाड-खानदेश मिळेल तेवढा लुटीत घेण्याची सरलष्करांना सूचना द्या. आबासाहेबांचे श्राद्धकर्म होताच आम्ही पन्हाळा, राजापूरकडे येत असल्याचं लिहा.” चारी तोंडावरच्या गनिमी फळ्यांचा विचार महाराजांच्या मनात फेर धरू लागला.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५७.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.