महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,526

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५९

Views: 1411
8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५९ –

“मुजुमदार आल्यात भाईर.” खिदमतीच्या जोत्याजीने वर्दी दिली.

“येऊ द्या त्यांना.” महाराजांना अण्णाजी का यावेत, याचा माग आला नाही. आत आलेले अण्णाजी मुजरा देऊन कसल्यातरी विचाराने तसेच उभे राहिले.

“बोला अण्णाजी, काय आहे?”

एवढे सडेतोड बोलीचे अण्णाजी तरीही घुटमळलेच. ते बोलायला भांगा शोधताहेत हे ताडून महाराजांनी त्यांना दिलासा दिला,

“अण्णाजी, काही खास बाब असली तरी नि:संकोच सांगा.” “जी संगमेश्वराचं देशकुलकर्ण वारसाविना पडून आहे. स्वामींनी आमची कदर करण्याचं मनी घेतलं तर…” अण्णाजींना मनोमन महाराजांची धास्त वाटत होती, हा प्रस्ताव ठेवताना.

छत्रपतींच्या मनात समर्थांचा बोध फिरून गेला –

“कारभारी हाती धरावे। सुखी करून सोडावे। कामाकडे।।”

भ तुम्ही खातरजमा करून घेतलीत कुलकर्ण वारसाविना आहे याची, अण्णाजी?”

“मग आम्ही तुम्हाला संगमेश्वराचं देशकुलकर्ण दिलं मुजुमदार! तुमच्यासारखा कारभारी लाभतो आहे त्या कुलकर्णाला, हे संगमेश्वराचं भाग्य आहे अण्णाजी!” महाराज प्रसच आणि मनमोकळे बोलले.

भरून पावलेले अण्णाजी लगबगीने लवले. निरोप घेऊन बाहेर पडले.

“जासुदाचं नाईक बहिर्जी आल्यात.” पहाऱ्याने खास वर्दी आणली. ती ऐकताना महाराजांच्या मनातले विचारचक्र क्षणभर थांबले. त्यांनी संमती दिली. थोड्याच वेळात बहिर्जी आत आला. अंगच्या मोगली पेहरावाने आणि हनुवटीवर चढविलेल्या नकली, कोरीव दाढीने तो चटकन ओळखू येत नव्हता. त्या वेषातच त्याने जोहार दिला.

त्यांना घेऊन महाराज एका बंदिस्त कोठीत गेले. आग्रा, बऱ्हाणपूर, बागलाण असा फटका टाकून, ससाण्याच्या डोळ्यांनी आणि चित्त्याच्या कानांनी खबर उचललेला बहिर्जी दबके म्हणाला, “धनी रजपुतांच्या फाट्याची खाशी खबर हाय. बादशहाने आपल्या पोराला हातोहात चकवा दिला. अजमेरच्या तळावर. शहजादा अकबर रजपुतांच्या म्योळ घिऊन बापावर चालून ग्येला. पर निभला न्हाई. बादशहानं त्येच्याच नावाची बनावट पत्रं क्‍्येली. “तू रजपुतास्री घेर टाकून माझ्या सामने आनलास. भली खिदमत क्येलीस, तू नी म्या मिळून ह्ये रजपूत काटून काढू या!” अशा लागीची ती पत्रं हुती. बादशाने ती रजपूत सरदारांच्या नेमकी हातात जातील, अशी खबरदारी घ्येतली.

तसंच झालं. ती दस्तं पत्रं वाचून रजपूत बिथारलं. रातोरात अकबराचा तळ टाकून पांगापांग झालं. साठ हजार हुतं त्या जागेला ईस हजारबी हशम टिकला न्हाई ऐन बख्ताला. हाय खाल्ल्याला अकबर रानोमाळ पळत्योय. बोलवा हाय त्यो आपल्या मुलकात सरकावा.”

बहिर्जीचा शब्दन्‌शब्द ध्यान देऊन ऐकलेले महाराज विचारात गेले. त्यांनी महत्त्वाचा प्रश्न बहि्जीला घातला, “बादशहाची चाल काय आहे नाईक पुढं?”

“तिकडं मोगलाईत हवा हाय त्यो दख्खनेत उतरनार म्हून. बऱ्हाणपूर, औरंगाबादेत जोराची तयारी हाय त्येच्या येण्याची. ”

महाराजांची चिंताक्रांत नजर बहिर्जीच्या कोरीव दाढीभर फिरली. “ठीक आहे. नाईक, तुम्ही चार दिवस विसावा घेऊन निघा, निवडीचा तेवढा खबरगीर बऱ्हाणपूर, औरंगाबादेत पेरा. जे मिळेल ते टाकोटाक आम्हास पावते करीत चला.” बाप, भावानंतर आता मुलाच्या पाठीशी लागलेल्या औरंगजेबाचा विचार करीतच महाराज कोठीबाहेर पडले.

चांगोजीला बोलावून त्यांनी एक आज्ञा केली. तिचा हेतू होता, आता गड सर्व बाबींनी निर्मळ नांदता राहावा. “चांगोजी, मासाहेबांच्या थोरल्या महालावरील चौकीपहारे आता काढून घ्या. महाल खुला ठेवा.” महाराजांच्या ध्यानीमनीही नव्हते की, या आज्ञेतून केवढे रामायण पुढे उभे राहणार आहे!

नर्मदेच्या उत्तरेस महेश्वरला आलेल्या औरंगपुत्र अकबराने महाराजांना लिहिलेल्या फारशी पत्राचा मराठी तर्जुमा प्रल्हाद निराजींनी कवी कुलेशांच्या मदतीने सिद्ध केला. त्यांच्यासह प्रल्हादपंत महाराजांच्या भेटीस आले.

“शहजाद्यांकडून आल्या पत्राचा तर्जुमा तयार झाला आहे, महाराज.” प्रल्हादपंतांनी हातची तर्जुमावळी पुढेशी केली.

“वाचा प्रल्हादपंत, शहजादा अकबराचा मनसुबा.” महाराजांनी त्यांना फर्मावले. प्रल्हाद निराजी तर्जुमा वाचू लागले.

“महाराजांचे अग्रणी शंभूराजे यांसी – माझ्या अमर्याद कृपेची आशा ठेवून जाणावे की, सर्व हिंदूंचा नायनाट करणे हाच माझे आबाजान अलमगिरांचा राज्याच्या प्रारंभापासून हेत होता व आहेही. त्यांचा हा हेत महाराजा जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर सर्वांस उघडपणे कळून चुकला आहे. याच उद्दिष्टासाठी अलमगिराने उदेपूरच्या राणा राजसिंगा वरही हमला केला. “ज्याअर्थी सर्व माणसे खुदातालाची लेकरे असून तोच सर्वांचा रक्षणकर्ता आहे, त्याअर्थी ज्याची हिंद हीच मायभूमी आहे, अशा इथल्या जमीनदारांचा, रयतेचा हिंदुस्थानच्या पातशहाने नाश करणे, सर्वस्वी अयोग्य आहे. अलमगीर ही साधी मर्यादा सोडून वागत आहे.

“हिंदच्या लोकांचा असाच नाश होऊ दिला, तर माझ्या खानदानाला एक दिवस हिंदुस्थानच्या पादशाहीलाच मुकावे लागेल. मी माझे खाजगी चाकर घेऊन अलमगिरावर खपा होऊन, शहजहानाबाद, लाहोर, एलगड, बागलाण असा प्रवास करून भैसवाडजवळ नर्मदा ओलांडून आलो आहे. रजपूत सरदार दुर्गादास राठोड माझ्याबरोबरच आहेत. देवाच्या कृपेने जेव्हा दिल्लीचे तख्त माझ्या हाती येईल तेव्हा मी नामधारी बादशहा असेन, सर्व राज्य तुमचेच होईल. तुमच्या व माझ्याबाबत अलगमीराच्या मनात असलेल्या शत्रुत्वाचा पूर्ण बिचार करून आपण दोघांनी एकच ध्येय गाठण्यासाठी जुटीने यत्न करण्याचा निश्चय करू या.

“जग कधीच एकाच परिस्थितीत राहत नाही. कमावलेले नाव आणि सत्कार्य मात्र चिरकाल टिकते. योद्धयापासून एवढीच काय ती उमेद असते. तुमचे शौर्य व जबर धडाडी यांचा विचार करून मी तुमच्या राज्यात प्रवेश करण्याचे ठरविले आहे. अधिक लिहावे असे नाही. शहाण्याला फक्त इशाराही पुरेसा असतो.”

प्रत्यक्ष पुत्राने रेखलेले ते आपल्या बापाचे – बादशहाचे चित्र मोठे बोलके होते. ते ऐकून महाराज विचारमग्र झाले. एकेकाळी ते स्वत: विजापूर दरबाराच्या मसूदखानाला

“सोनेरी कट्यारीसारखे’ वाटले होते. आज त्यांना आपल्या राज्यात येणारा शहजादा अकबर तसाच वाटू लागला. तो औरंगपुत्र होता. साधा देवडीवालासुद्धा चिलमीवर ठेवायचा इंगळ हाताला चटके बसणार नाहीत, असा घोळवीत उचलतो. हा तर शाही निखारा होता! त्याला उपेक्ष्न चालणार नव्हते, तसेच त्याला अवाजवी महत्त्व देऊनही उपयोगी नव्हते. अकबर आपली मार खाल्लेली किस्मत आणि पळती पावले घेऊन येत होता.

“कविजी, तुमचा काय सल्ला आहे, या शहजाद्याबाबत?

“बादशहाका पुत्र है अकबर। जितना हो, उसका लाभ उठाना चाहिये स्वामी।” कुलेशांनी मसलत दिली.

“चुकताहात कविजी, काव्यात यतिभंगासाठी येणाऱ्या अडगर मात्रेसारखा आहे हा शहजादा! आम्ही त्याला अधिक महत्त्व देणार नाही. तो जेवढा फायद्याचा ठरण्याची शकयता आहे, तेवढाच नुकसानीत घालणारा ठरू शकतो. त्याचा पुरा अंदाज पडेपर्यंत त्याच्या या पत्राला दाद देऊ नका, प्रल्हादपंत. त्याच्या वाटेवर चलाख जासूद पेरा.”

महाराजांनी निर्णय घेतला.

मुंबईच्या टोपीकर दरबारातून आलेल्या आवजींसह निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले. आवजींनी गोऱ्या दरबाराने महाराजांना दिलेला दीडशे रुपये किमतीचा नजराणा पेश केला. त्याला हात देऊन महाराजांनी आवजींकडून हेजिबीचा तपशील घेत विचारले, “टोपीकर हबश्याला राखून आहेत की त्याला फटकारतात?”

“आम्ही गेल्यापासून एक महिन्यातच साहेबाने आपले गॅरी ब थारवीन हे वकील जंजिऱ्यावर हबश्यांशी बोलणी करायला पाठविले. नागोठाणे, आपटे, पेण भागात चालणारी हबश्यांची लूटमार थांबली पाहिजे. नाहीतर मुंबई बंदर त्यांना मना होईल, अशी जरब गोऱ्यांनी सिद्द्याला भरली आहे. टोपीकर हबश्यांशी काटेकोर वागत आहेत.

आम्ही महाराजांचा निरोप गोऱ्या साहेबाच्या कानी घातला. त्यामुळं इंग्रजांनी हबश्यांना धारेवार धरलं आहे.”

“आता हबशी कुठं आहे?” समाधानी चर्येने महाराजांनी विचारले.

“गलबती तांड्यासह तो सुरत बंदराकडे गेला आहे.” आवजींनी मुंबईत राहून सिद्द्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले होते.

“ठीक आहे.” म्हणत महाराज बैठकीवरून उठू लागले.

बरेच दिवस मनात घोळत असलेला एक विषय कुलेशांनी चालता केला. “महाराज का अभिपेक समारोह हुआ, लेकिन युवराज्याभिषेक पुत्र के कारण रह गया, इसलिये….”

“काय मनी आहे तुमच्या छंदोगामात्य?” महाराजांना त्यांना काय सुचवायचे आहे, ते कळले नाही.

“शक पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न किया जाय तो…!” कविजींनी जिव्हाळ्याच्या विषयाला तोंड फोडले.

महाराजांनी हसत त्याला दाद दिली. “तुम्ही खरेच छंदोगामात्य शोभता कविराज. जीवन हेही अनेक ळंदांनी आकार घेणारे एक काव्यच आहे. यज्ञ हा त्याचाच भाग असेल, तर तो तरी का बाजूला ठेवावा? कारभाऱ्याच्या मदतीने तुम्ही त्याची तयारी करा.” छत्रपतींनी बैठक सोडली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १५९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment